|
Sonchafa
| |
| Tuesday, April 03, 2007 - 2:30 pm: |
|
|
एक एप्रिल. युनिव्हर्सिटीच्या परीक्षेचा पहिला पेपर. अनेक वर्षांनी पुन्हा परीक्षा द्यायची म्हणून तिच्या मनात प्रचंड भीति. जिवाची घालमेल. पेपर नीट लिहिता येईल की नाही अशी मनात शंका. तो दिलेल्या वेळेत पुरा होईल की नाही ही पुढची शंका. लक्ष आणि ईच्छा दोन्हीही नसताना चार घास जबरदस्तीनेच घशाखाली ढकलून, कपडे करून तयार 'ती'. घामानं पुन्हा पुन्हा भिजणार्या केसांना वैतागलेली 'ती'. घड्याळाचा काटा नेहेमीपेक्षा जोरात धावणारा आणि सकाळच्या वेळेस रेल्वेतल्या गर्दीतून पाऊण तास प्रवास करायच्या कल्पनेनं धास्तावलेली 'ती' ! परीक्षाकेंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत एकही पुस्तक बाहेर कढून त्यातली एकही ओळ वाचता येणार नाही अशी खात्री असताना पिशवीभर पुस्तकांचे ओझे पेलत, पर्स सावरीत आईला नमस्कार करून तिने गॉगल डोळ्यावर चढवला. मरीनलाईन्सला एवढ्या दूर परीक्षाकेंद्र आल्याने आधीच मानसिक खच्चीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं. परीक्षा चारच दिवस असली तरी रोज तिकिटासाठी त्याच त्या लांब रांगेत उभं रहाण्यापेक्षा एकदाच पास काढून टाकावा असा विचार करून आयकार्ड आणि पैसे हातात घेऊन, घाईतच चपला चढवून ती घराबाहेर पडली. घर ते स्टेशन हा अवघा पाच मिनिटांचा रस्ता पण हातातल्या ओझ्यामुळे आणि पावणेनऊ वाजताच्या पण तरीही प्रखर उन्हामुळे तिचा जीव अगदी नकोसा झाला. सगळ्यात कठीण पेपर आणि तोही एप्रिल फूल च्या दिवशी. मनात नको नको ते विचार येत होते. ही अशी क्रूर चेष्टा करणार्या युनिव्हर्सिटीचा सुद्धा मनातल्या मनात तिने उद्धार केला. पण ह्यावर ईलाज नाही हेही कळत असल्यामुळे तिने तो विचार मनातून लगेचच कढूनही टाकला. डोक्यातील विचार बदलावेत म्हणून तिने चालता चालता आजूबाजूला नजर टाकली. दुकानदार दुकानची शटर्स उघडण्यात मग्न होते. मधूनच सायकलवरून दुकानात पाव पोहोचवायला जाणारा एखादा पाववाला दिसत होता. अचानक तिला जाणवलं की एखाद्-दोन जण तिच्याकडे बघून चेहेर्यावरचे भाव बदलत आहेत. कोणी चमकून वर बघतयं तर कोणी परत मागे वळून तिच्याकडे बघतयं. "छे चेहेर्यावर बहुतेक भीति स्पष्ट दिसत्येय आपल्या!", लगेच तिच्या मनात आलं. "आज आपण फारच सुंदर तर दिसत नाही?" क्षणभर परीक्षेचा विसर पडून तिच्या चेहेर्यावर हलकसं स्मित उमटलं. हो. तशी ती सुंदर नसली तरी आकर्षक नक्कीच होती त्यामुळे कोणी मागे वळून पहाणं अगदीच काही नवीन नव्हतं तिच्यासाठी. ह्याच विचारात असताना ती स्टेशनवर येऊन पोहोचली. पास काढायला एक्-दोन जण खिडकीशी उभे होते. त्यांच्या मागे तीही रांगेत उभी राहिली. तिची पाळी येताच खिडकीतून आयकार्ड आत सरकवतच तिने चर्चगेटचा एक महिन्याचा सेकंडचा पास मागितला. "नेमके पैसे द्यावेत म्हणजे सुट्यांची भानगड करीत बसायला नको" तिने विचार केला. "किती हो पासाचे? अलिकडे बरेच दिवसात काढला नाहीये पास. दर बघत होते पण सापडले नाहीत वेस्टर्नचे." एका दमात ती बोलून गेली आणि तिचे तिलाच जाणवले की परीक्षेच्या भीतिने ती किती हवालदिल झाली होती. नाहीतर पास कितीतरी दिवसांनी काढतोय हे काय गरज होती तिथे बोलायची? दोन प्लटफॉर्म्सपैकी गाडी आधी कुठच्या प्लटफॉर्मला येईल हे बघत सगळेच जण ब्रिजवरच उभे होते. ती ही चेहेर्यावरचा घाम पुसत तशीच तिथे उभी राहिली गाडीच्या येण्याकडे डोळे लावून. शेजारीच उभ्या असलेल्या कोण्या एकीच्या हाताच्या अनपेक्षित स्पर्षाने ती दचकली. लहानपणी तिच्याच शाळेत पण तिच्याहून एक वर्ष पुढे असलेली एक मुलगी बरेच दिवसांनी तिला भेटत होती. मिनिटभरात कोण काय करतं ह्याची उजळणी करून झाली आणि अचानक तिने विचारले,"तुझ्या एकाच डोळ्याला काही झालं आहे का?" असा विचित्र प्रश्न ऐकून ती चक्रावून गेली. हातातली पिशवी, पर्स सावरित तिच्ने हात नकळत डोळ्याकडे नेला आणि डाव्या हाताचे पहिले बोट थेट तिच्या डाव्या डोळ्यावर जाऊन आदळले... आज ती नक्कीच फार सुंदर दिसत असणार! डोळ्यावरचा गॉगल तिने घाईतच काढला आणि तिच्या लक्षात आलं... डाव्या बाजूची काच आणि फ़्रेम ह्यांची अर्ध्या वाटेतच ताटातूट होऊन गेली होती!
|
Sunidhee
| |
| Tuesday, April 03, 2007 - 6:55 pm: |
|
|
जाम हसु आले ते दृष्य डोळ्यासमोर येऊन.
|
Runi
| |
| Tuesday, April 03, 2007 - 8:20 pm: |
|
|
डाव्या बाजूची काच आणि फ़्रेम ह्यांची अर्ध्या वाटेतच ताटातूट होऊन गेली होती! >>> मस्त, ..... छानच. मला पण हसु आले. या वरुन मला एका प्रसंगाची आठवण झाली, माझ्या मैत्रीणीची बहिण चुकुन एकदा २ वेगवेगळ्या रंगाच्या कॉन्टक्ट लेन्स लावुन गेली होती आणि तिला एका दुकानदाराने विचारले की तुमचे डोळे जन्मल्यापासुनच असे आहेत का? ती म्हणाली हो, मग घरी आल्यावर तिला प्रश्नाचा रोख कळला.
|
Disha013
| |
| Tuesday, April 03, 2007 - 9:47 pm: |
|
|
हे हे हे!भारीच की. मलाही एक किस्सा आठवला. रुमालाने चेहरा पुसताना माझी टिकली एकदा सरकुन उजव्या भुवईवर जावुन बसली होती. लोकांच्या नजरा मलाही जाणवलेल्या. घरी आरशात पाहिले तेव्हा समजले. नवरा बरोबर असताना! वर म्हणतो,माझ्या लक्षात आले नाही!कमाल होती त्याची पण!
|
Saee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:37 am: |
|
|
वाचता वाचता मनाने तिच्याहीपुढे पळत, वैतागत पार परिक्षाकेंद्रापर्यंत पोचले होते की मी! म्हटलं आता पुढे काय होतंय आणि कशाची ताटातूट वगैरे... इतकी उत्कंठा ताणवलीस आणि मग भन्नाट चक्रमपणा केलास मजा आली
|
Suvikask
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:41 am: |
|
|
हो ना... मलाही वाटले कि आता रेल्वे स्टेशन आले... आता गर्दी आणी आता कुणाची तरी ताटातुट नक्किच होईल... पण हाय रे देवा.. माझा फॉर्मुला चुकला... छान शेवट!!
|
रुपाली एकदम सुंदर उतरलय, खरच मीपण तिच्याबरोबरच पळतेय अस वाटत होत मला... शेवट एकदम अनपेक्षित त्यामुळे खुप आवडली... खुप दिवसांनी दिसतेस मायबोलीवर, कशी आहेस???
|
Swa_26
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:53 am: |
|
|
मस्तच आहे कथा... दिशाच्या पोस्टवरुन मलापण माझ्या एक मैत्रिणीचा किस्सा आठवला.. बसमधे तिने रुमालाने तोंड पुसले तेव्हा टिकली सरकुन भुवईच्या वर गेली आणि नंतर तिने कपाळाला चाचपुन पाहिले तर टिकली नाही लागलि म्हणुन, दुसरी टिकली काढली आणि आरशात न पाहताच अंदाजाने लावली. घरी येऊन पाहते तर २ टिकल्या... तेव्हा म्हणते, "तरीच लोक बघत होते माझ्याकडे..."
|
Princess
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:59 am: |
|
|
आई ग, काय भन्नाट लिहिलय ग... खुप मज्जा आली वाचुन
|
Sneha21
| |
| Thursday, April 05, 2007 - 10:19 am: |
|
|
छान आहे कथा...keepp it up
|
R_joshi
| |
| Thursday, April 05, 2007 - 11:06 am: |
|
|
सोनचाफा खरच एप्रिल फुल बनवलस. छान विनोदी कथा
|
जाम हसू येत होते वाचताना...
|
आयला!!!! एकदम सॉलिड आहे, यार..............
|
Sonchafa
| |
| Monday, April 16, 2007 - 6:08 am: |
|
|
सगळ्या अभिप्रायांबद्दल मनापासून धन्यवाद
|
|
|