Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » मराठी गझल » Archive through April 02, 2007 « Previous Next »

Aaftaab
Wednesday, March 28, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती दूर आलो कळालेच नाही
कसे पान पिकले, गळालेच नाही

सुखाच्या अनाहूत धुंदीमधे मी
किती दु:ख प्यालो कळालेच नाही

भविष्याकडे आस लाऊन बघता
कधी भूत झालो, कळालेच नाही

तुला जाळले या जगाने कितीदा
तुझे शील, सीते, जळालेच नाही

किती काळजी 'काल' होती 'उद्या'ची
कधी 'आज'चे सुख, मिळालेच नाही


मायबोली ग़जल कार्यशाळेतून nursary पास झाल्यानंतर इथे ही छोटी ग़जल पोस्टत आहे. जाणकारांनी हा एक प्रयत्न म्हणून समजावा आणि मार्गदर्शन करावे. धन्यवाद......

Ganesh_kulkarni
Wednesday, March 28, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब
छान गज़ल

भविष्याकडे आस लाऊन बघता
कधी भूत झालो, कळालेच नाही

Excellent!



Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब, सहीच! सुखाच्या अनाहूत धुंदीत, भविष्याची आस, तुला जाळले जगाने, हे अतिशय सुंदर. मला साधारणपणे 'च' चा वापर थोडा खटकतो, पण रदीफ़ मध्ये तुम्ही 'जोर' लावून केलेला वापर छान आलाय! मक्ता सुंदर! लवकर संपली असेही वाटले नाही, लांबी अगदी समर्पक.

Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे गोड गाणे

मना वेड लावी तुझे गोड गाणे
खळाळून वाही तुझे गोड गाणे

कितीदा क्षणांना विस्मरून जावे
मन्तरून जाई तुझे गोड गाणे

कुणा पारव्याची घुमे शीळ रानी
तरंगे मनाशी तुझे गोड गाणे

कुठे शांत माझे अबोले उसासे
गन्धाळून देही तुझे गोड गाणे

उदासीन होते किनारे दिलाचे
कशी ओढ लावी तुझे गोड गाणे

कळीबंद स्वप्ने, धुके आर्जवी ती
जशी गोड चोरी! तुझे गोड गाणे...


Mankya
Wednesday, March 28, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो चिन्नू ... चिन्नू !
nursary तून पहिल्या वर्गात गोड प्रवेश झाला म्हणायचा !
गंधाळून देही ... वाह !
मक्ता ... मनाला भिडला पण तुझ्याकडू अर्थ एकायला आवडेल !
गोडंच आहे हि गजल !
फक्त ' असासे ' कि ' उसासे ' तेवढं बघ गं !

आफ़ताब .. मित्रा जबरीच उतरलिये !
सुखाची अनाहूत धुंदी ... आवडलं !

माणिक !


Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्सं माणिक, बदल केलायं.

Daad
Wednesday, March 28, 2007 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब, सुंदर. आयुष्याच्या प्रवासाची ही गज़ल चिन्नुशी सहमत. कळाले'च' मधला च चा वापर आवडला.
मला स्वत:ला शब्दांशी खेळ आवडतो. नव्या लयीचे अर्थ छटांचे शब्द त्यातून तयार होतात. पण एक शंका
मिळणे- मिळाले नाही
पण
जळाले नाही, गळाले नाही, कळाले नाही... थोडं (अगदी थोडकंच) खटकतय.
आफताब, तुम्हाला काय वाटतं?
सीतेचा शेर आणि, मक्त्यावर तर बेहद्द खूष!

चिन्नू, आवडली गज़ल. त्याची लय जबरदस्त आहे. कळीबंद स्वप्ने मस्तच आहे.
(मंतरून आणि गंधाळून या शब्दांत मिटर घसरतय का? गुरूलोक सांगतीलच चू.भू.द्या.घ्या., गं)


Pulasti
Thursday, March 29, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब,
शलाकाशी सहमत. "कळलेच", "जळलेच", "गळलेच" - हे जास्त योग्य. मक्त्यामधे - "मिळालेच" मधे - अलामत भंगतेय.
पण या दोन गोष्टी वगळल्या तर - गझल मस्तच जमलीय! मला अर्थ आणि शब्दाच्या दृष्टीने सर्वच शेर आवडले. मतला आणि मक्ता तर विशेष!!

चिन्नु,
मंतरून (गालगाल), गंधाळून (गागागाल) मधे पहिला "गा" आहे. अर्थात, शलाका म्हणतेय तसे मीटर चुकतंय. (मीही "विद्यार्थीलोकातच" आहे पण याबद्दल बर्‍यापैकी खात्री वाटतेय :-)) मला "पारवा" सर्वात जास्त आवडला.
या गझलेचे एक वैशिष्ट्य म्हणज़े इथे "स्वरकाफ़िया" आहे. "तुझे गोड गाणे" हा अख्खा रदीफ़ आहे. आणि काफ़ियाचे अक्षर नसून "ई" हा स्वर आहे. काफ़ियाच स्वराचा असल्यामुळे या गझलेत "अलामत" नाही.

मना वेड लावी तुझे गोड गाणे
खळाळून वाही तुझे गोड गाणे
-- उला मिसरा छानच. पण "मनाला वेड लावणारं" गाणं आणि "खळाळून वाहणारं" गाणं - मला नीट संबंध लागत नाहिये.

कितीदा क्षणांना विस्मरून जावे
मन्तरून जाई तुझे गोड गाणे
मला वाटतंय "विस्मरून" मधेही मीटर चुकतंय - "विसरून" वापरलं तर?

कुणा पारव्याची घुमे शीळ रानी
तरंगे मनाशी तुझे गोड गाणे
मस्तच!!

कुठे शांत माझे अबोले उसासे
गन्धाळून देही तुझे गोड गाणे
मीटर जरा नीट केला तर हाही शेर छानच होईल.

उदासीन होते किनारे दिलाचे
कशी ओढ लावी तुझे गोड गाणे
मला वाटतं "उदास" असणं आणि "उदासीन" असणं यात फरक आहे. आणि बहुधा तुला "उदास" अभिप्रेत आहे??

कळीबंद स्वप्ने, धुके आर्जवी ती
जशी गोड चोरी! तुझे गोड गाणे...
शब्द आणि लय अतिशय आकर्षक! पण मला अर्थ नीट कळला नाही. पुन्हा वाचून पाहीन.. हा शेर पुन्हा-पुन्हा वाचावासा वाटणाराच आहे!!

-- पुलस्ति.

Mayurlankeshwar
Thursday, March 29, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब.. वैभव ने आधी म्हटल्याप्रमाणे तुझ्या गझलेची 'तबीयत' काही औरच आहे!
मक्ता प्रचंड आवडला! मस्त गझल आहे.
चिन्नु... गोड गाणे वाहवा!!

कळीबंद स्वप्ने, धुके आर्जवी ती
जशी गोड चोरी! तुझे गोड गाणे...
एकदम फिदा!!
'मंतरून', 'गंधाळून' मध्ये मलाही मीटर चुकल्यासारखे वाटतेय.
नवोदीत गझलकार म्हणता म्हणता गरूडझेप घेताहेत!! keep it up :-)


Mayurlankeshwar
Thursday, March 29, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

*****लढाई*****

मी स्वत:च्या प्रेतास जाळून आलो
मात्र शोकसभेलाच टाळून आलो.

राहिलो ना स्मरणात आता तुझ्याही
व्यर्थ का आठवणींस चाळून आलो?

जीवनाची जन्मभर केली प्रतिक्षा
वेळ मरणाची अटळ पाळून आलो.

का उतरलो नजरेतुनी हिरवळीच्या?
आसवांना आगीत ढाळून आलो.

चिंब भिजलेलो मृगजळी पावसाने
मी उन्हाळी वा-यात वाळून आलो.

चांदण्यांना दर्वळ तुझ्या स्पंदनांचा
श्वास तुझिया श्वासात माळून आलो.

तू विजेचे काळीज सांभाळ वेडे...
मी तुझ्या आभाळी ढगाळून आलो.

मी लढाई लढलो जरी हारलेली
रक्त बलिदानाचे उफाळून आलो.

(कार्यशाळेच्या अंगणवाडीत खेळून झाल्यावर
हा माझा धडपडीत प्रयत्न.खरचटलं तर सावरून घ्या :-) मयूर)


Chinnu
Friday, March 30, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक धन्यवाद. दाद कसचं कसचं :-) तुझ्याएवढी सुंदर शब्द काही सुचत नाही आम्हाला! :-) धन्यवाद.
पुलस्तीजी, विद्यार्थी म्हणता आणि एवढे ज्ञान वाटता, हे कसे! :-) 'सर्वकाफ़िया' च्या माहीती बद्दल खुप खुप धन्यवाद. ही गझल लिहीतांना ती गेय व्हावी, हा मुळ उद्देश्य होता. म्हणुन लयीवर जास्त भार दिला.
गाणे, मना वेड लावते आणि मनात खळाळून वाहते, गाण्याच्या flow बद्दल, हे अभिप्रेत होते.
मला उदासीनच म्हणायचे होते पुलस्ति. सानी मिसर्‍यात उदासीनतेकडून जीवनाच्या ओढीचा प्रवास तुझ्या गोड गाण्यामुळे घडून आला, हे सांगणे. गंधाळून, मंतरून वर विचार चालला आहे. खुप धन्यवाद :-)


Jayavi
Saturday, March 31, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांदण्यांना दर्वळ तुझ्या स्पंदनांचा
श्वास तुझिया श्वासात माळून आलो.

तू विजेचे काळीज सांभाळ वेडे...
मी तुझ्या आभाळी ढगाळून आलो.
मयूर.........क्या बात है!!

Jayavi
Saturday, March 31, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब....... तुझी गझल फ़ार फ़ार आवडली. प्रत्येक शेर अगदी मनापासून पटला....... !
मतला, मक्ता..दोन्ही खास.

भविष्याकडे आस लाऊन बघता
कधी भूत झालो, कळालेच नाही
हा शेर सगळ्यात जास्त आवडला.

Jayavi
Saturday, March 31, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु, गोड गाणे फ़ार गोऽऽऽऽड झालंय :-)
थोड्या मात्रांमधे मलाही गडबड वाटतेय.
गुरुजी सांगतीलच. रदीफ़ आवडेश :-)

Dhulekar
Saturday, March 31, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताबभाई:
अतिशय सुंदर गज़ल आहे. माशा अल्लाह.
आपण आम्हा सगळ्या लोकांची व्यथा आणी भवीष्याची चिंता अतिशय समर्पकपणे मांडली आहे, त्याला जवाब नाही.

आपण असेच लिहित रहा आणी आम्हाला आपल्या गज़लांची मेजवानी देत रहा.



Dhulekar
Saturday, March 31, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु
छान गोद्द गोद्द गज़ल आएहे. तबियत एकदम खुश, लाजवाब. गज़ल सहि जमली आहे.
अश्याच सुंदर गज़लांची आणखीन मेजवानि आम्हाला देत रहा.





Chinnu
Saturday, March 31, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर, धुळेकर आणि जयुताई आभारी आहे. :-)
गुरुजी आणि पुलस्ति, कळीबंद स्वप्ने, आर्जवी धुके आणि गोड चोरीसारखेच गोड गाणे तुझे, हे थोडे confusing वाटणे साहजिक आहे. :-) एखादी गोड चोरी केल्यावर सतत मनात गोडशी शिरशिरी जी उठत राहते, तसे काहीसे भाव तुझे गाणे ऐकतांना होतो, असे म्हणायचे होते. हे भाव तुम्हाला मोशुमीच्या चेहेर्‍यावर 'रिमझिम गिरे सावन' ह्या गाण्यात दिसतील. :-)
दाट धुके, अंगाखांद्यावर रुळुन राहते. समोरचे काही दिसत नाही, म्हणुन आपण हाताने धुके हलवू पाहतो, पण उपयोग होत नाही. लाळघोटेपणाने ते धुके परत जवळ येते. गोड गाण्यामधेही काही ताना अशा 'लाळघोटी' वाटतात! :-)
कळीबंद स्वप्ने, कळीचे फुल होतांना बाहेर पडतात, असे म्हणायचे होते. कळीच्या स्वप्नांचा रंग फुलावर कसा हळु हळु फुलत जातो, तसे तुझे गोड गाणे हळु हळु मनात रंगत जाते. हुश्श!! :-)


Aaftaab
Monday, April 02, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तहो..
पुलस्ती आणि शलाका... तुमच्या म्हणण्याशी मी बराच सहमत आहे. पण 'कळालेच' वगैरे शब्दप्रयोग कवितांमधे वापरलेले आपण पाहतो त्यामुळे तसे वापरले. अर्थात मिळालेच मधे अलामत भंग होतेय हे तुम्ही सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं. ह्याची खूणगाठ बांधायला हवी.. खूप खूप धन्यवाद सर्वांचे(च)...


Aaftaab
Monday, April 02, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



मित्रहो, हा आणखी एक प्रयत्न तुमच्या प्रामाणिक अभिप्रायासाठी..
अजून शिकतोच आहे...
धन्यवाद.

केवड्यांमधे साप पाहिले वेळोवेळी
सज्जनांतही पाप पाहिले वेळोवेळी

शेपुट हलवित, गोड बोलती, एकांमेकां
माणसाळती, हिंस्त्र श्वापदे वेळोवेळी

दात लाभले वा न लाभले खाण्यासाठी
दाखवायचे दात लाभले वेळोवेळी

मरण पावती घाव झेलुनी मानवतेचे
सरण जाळती तीच लाकडे वेळोवेळी

प्रांत, धर्म, वा रंग, कारणे काहीबाही
युद्ध खेळण्या सज्ज माणसे वेळोवेळी



Mankya
Monday, April 02, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब ... दोस्ता मीटर मध्ये गडबड आहे रे !
जरा परत एकदा पाहणार का ? चु.भु.दे.घे.

केवड्यांमधे साप पाहिले वेळोवेळी
गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा गा गा गा
माणसाळती, हिंस्त्र श्वापदे वेळोवेळी
गा ल गा ल गा गा गा गा ल गा गा गा गा गा

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators