|
Supermom
| |
| Friday, March 09, 2007 - 3:20 pm: |
|
|
घराचं दर्शनी दरवाजा उघडून रसिका आत आली. केसांवर, ओव्हरकोटावर पडलेले बर्फ़ाचे कण तिनं अलगद झटकले अन कोट नीट कपाटात लावून ठेवला. एक नजर आपल्या सुरुचीपूर्ण सजवलेल्या दिवाणखान्याकडे टाकतानाच तिच्या ओठांच्या कोपर्यात हसू उमटलं. बाहेर विलक्षण थंडी होती. शिकागोमधला हिवाळा म्हणजे अगदी नकोसा होत असे. अशा जीवघेण्या वातावरणात, कामावरून थकून आल्यावर विसावायला इतकं सुरेख घर आपल्याला आहे याचा थोडा अभिमान, थोडा आनंद तिच्या मनात तरंगल्यावाचून राहिला नाही. जिन्याखाली पायातले बर्फ़ाचे बूट काढून ठेवत ती वर जायला निघाली, तोच हेमलचा किनरा आवाज अन भरतचं हसणं तिच्या कानावर पडलं. 'आज बाप लेक इतक्या लवकर घरी?' मनाशी नवल करतच ती स्वैपाकघराकडे वळली. 'ममा, ममा, आम्ही जेवण बनवतोय....' हेमल धावत येऊन तिच्या गळ्यात पडली. ' अरे, आज तुम्ही दोघं लवकर घरी कसे? अन आज तर पिझ्झा डे आहे आपला...' हेमलला उचलून तिची पापी घेत रसिकानं प्रश्नार्थक नजरेनं भरतकडे पाहिलं. 'अग, आज ऑफ़िसमधे लवकर संपलं काम. मग हेमललाही घेऊन आलो डेकेअर मधून. तसाही शुक्रवार आहे आज. म्हटलं एक दिवस आराम द्यावा बायकोला.' टेबलावर झाकून ठेवलेली भांडी उघडून बघताबघताच रसिका एकदम खुशीत आली. 'अरे वा, आज खास गुज्जु स्वैपाक...' 'मग काय? आपण गुजराथ्याशी लग्न केलं आहे, याची आठवण करून द्यावी लागते बाईसाहेब मधून मधून. नाहीतर तू मला पक्का मराठी गडी बनवून टाकलंयस गेल्या दहा वर्षात....' भरत दिलखुलास हसला. रसिकाही हसत हसत हेमलला घेऊन वर गेली. आंघोळ करून, ताज्यातवान्या होऊन दोघी खाली आल्या.गप्पागोष्टी करत,हसत खेळत जेवण उरकलं. रसिकानं मागचं आवरायला घेतलं. कार्टून्स पहात सोफ़्यावर लोळणार्या हेमलचे डोळे मिटायला लागले,तसं भरतनं तिला उचलून घेतलं. 'हिला झोपवून येतो मी, रसिका....' भांडी डिशवॉशरमधे लावता लावता रसिकानं मान डोलावली. दिवसभर ऑफ़िसमधे आज खूप काम पडल्यानं ती आता पार थकली होती.केव्हा एकदा अंथरुणावर पडतो असं झालं होतं तिला. पण आज शुक्रवार म्हणजे भरत नक्कीच जुना हिंदी सिनेमा घेऊन आला असणार. काम आवरून ती सोफ़्यावर येऊन बसली. हेमलला झोपवून भरतही खाली येऊन बसला. पण आज नेहमीसारखं त्याचं लक्ष टी व्ही बघण्यात नव्हतं. रसिकाही मधूनच थोडीशी पेंगत होती. 'मग काय करायचं रसिका, 'बा' ला इकडे आणण्याबद्दल? डोळ्यावरची झोप खाडकन उडाल्यासारखी रसिका जागी झाली. हा अप्रिय विषय निदान या वीकएंड पुरता निघू नये असं तिला फ़ार फ़ार वाटत होतं. पण भरतचा स्वभाव असाच. कुठलीही गोष्ट मनात घोळत असली की तिचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. 'सारं काही ठरवूनच टाकलयंस तू, तर मला जमेत घेतोस तरी कशाला? तू, अन तुझा निर्णय....' काहीशा त्राग्यानंच ती म्हणाली.
|
Runi
| |
| Friday, March 09, 2007 - 5:23 pm: |
|
|
नेहमीप्रमाणेच छान सुरुवात केलीये सुमाॅ तुम्ही कथेची. रुनि
|
Supermom
| |
| Friday, March 09, 2007 - 6:17 pm: |
|
|
'अशी चिडचिड करून काही साधणार आहे का रसिका? काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल ना आपल्याला?' 'आपल्याला? माझा निर्णय समजा नाही असला तरी तू ऐकणार आहेस का? मग काय अर्थ आहे या बोलण्याला? अन तसाही यात हो किंवा नाही यापलिकडे तिसरा प्रश्न येतच नाहीय. मग? तू ठरव तुला हवं ते....' रसिका आता पारच रागावली होती. 'रसिका, शांत हो आधी. बा वर इतका राग ठेवून काही होणार नाहीय. शेवटी मी तिचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्याशिवाय आता तिला कोण आहे सांग बरं? अन या वयात तिच्यावर नाराजी ठेवून तू तरी काय मिळवणार आहेस? तू बघितलेली बा आता राहिली नाहीय ग. फ़ार बदललीय ती......' ' बा..? अन बदलणार?...' रसिकाच्या ओठांना कळेल न कळेल अशी कुत्सित मुरड पडली. 'बां च्या बाबतीतल्या आपल्या सार्या आठवणी इतक्या कडवट आहेत की विसरू म्हटलं तरी न विसरण्यासारख्या.' तिच्या मनात आलं. भरतची चुलतबहीण रश्मी अन रसिका पक्क्या मैत्रिणी होत्या. रश्मीच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघांची ओळख झाली होती. अपर्या नाकाची, पिंगट डोळ्यांची अन बडबडी रसिका भरतला पहिल्याच भेटीत भावली होती. दोघांची ओळख मैत्रीच्या पुढच्या पायरीपर्यंत गेली केव्हा अन चोरून गाठीभेटी सुरु झाल्या केव्हा हे दोन्ही घरच्या लोकांना कळलंच नाही. अन जेव्हा कळलं तेव्हा दोन्हीकडे भडका उडाला होता. भरत गुजराती अन ती मराठी हे नुसतं एकच कारण नव्हतं त्याला. भरतचं घर अगदी जुन्या वळणाचं, शाकाहारी अन गरिबीतून वर येऊन, धंद्यात उत्तम जम बसवलेलं. शहरात कित्येक दुकानं होती त्यांची. याउलट रसिकाकडे मध्यमवर्गीय पण आधुनिक वातावरण होतं. तिघी बहिणींमधली सर्वात मोठी रसिका. भाऊ नव्हता. मांसाहाराचं त्यांना वावडं नव्हतं, उलट आवडच होती. तिन्ही मुलींनी खूप शिकावं, नोकरी करावी, स्वावलंबी बनावं,हे तिच्या आईवडिलांचं स्वप्न. भरतच्या जुन्या वळणाच्या कुटुंबात आपली मुलगी कोमेजून जाईल असं तिच्या घरच्यांना वाटत होतं. बां ना तर ही मॉडर्न सून नकोच होती. त्यांच्या माहेरच्या ओळखीतल्या एका घरातली मुलगी, हंसा, त्यांना सून म्हणून आणायची होती घरात. आधीच घरच्या व्यवसायात लक्ष घालण्याऐवजी भरतनं इंजिनियर होऊन नोकरी पत्करली हे त्यांना नापसंत होतं. त्यामुळे हंसाच्या घरच्यांचा बिझिनेसही पुढेमागे त्यालाच मिळेल अन तो व्याप वाढल्यावर तो नोकरी सोडून धंद्यात लक्ष घालेल हा होरा होता त्यांचा. पण बां चे सारे आराखडे, सारे मनसुबे या प्रेमविवाहाने उध्वस्त होणार होते. त्यात रसिकाचं आधुनिक वागणं त्यांच्या घरात चालणं शक्यच नव्हतं.
|
ह्या "बां"चा त्या KYONKI मधल्या "बां"शी काही संबंध नाही ना??????????????? बाकी कथा झक्कास आहे..................
|
Manutai
| |
| Monday, March 12, 2007 - 11:55 am: |
|
|
सुपरमौम, पुढच्या भागाची वाट पहात आहे आपली एक चहाती
|
Supermom
| |
| Monday, March 12, 2007 - 12:44 pm: |
|
|
बरेच दिवस दोन्हीकडच्या लोकांची रणधुमाळी चालली, अन शेवटी काही नातेवाईकांच्या मध्यस्थीने भरत अन रसिकाचं लग्न ठरलं. भरत त्यानंतर दोन तीनदा रसिकाकडे येऊन गेला,अन त्याच्या लाघवी स्वभावानं त्यानं तिच्या आईबाबांना जिंकून घेतलं. रसिकाच्या बहिणी तर या उमद्या, हसर्या मेहुण्यावर फ़िदाच झाल्या. पण दुर्दैवानं हे भाग्य रसिकाच्या नशीबी नव्हतं. बा मनातून तिच्यावर सतत नाराजच होत्या. रुसवे फ़ुगवे न होता लग्न जेव्हा एकदाचं पार पडलं, तेव्हा रसिकानं सुटकेचा निश्वास सोडला. पण खरी लढाई आता पुढेच होती. लग्न झाल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी सासवा सुनांमधे संघर्षाची ठिणगी पडली. संध्याकाळी काही धार्मिक समारंभ होता, त्याबद्दल सांगायला बा तिच्या खोलीत आल्या. रसिका नुकतीच आंघोळ उरकून आरशासमोर केस विंचरीत होती. तिनं गाऊन घातला होता. तिच्याकडे बघताच बां च्या कपाळावर आठी पडली. 'आपल्या घरात गाऊनची पद्धत नाही रसिका. साडीच नेसतात मोठ्या माणसांसमोर....' त्यांनी समजावणीच्या सुरात हे सांगितलं असतं, तर रसिका कदाचित इतकी दुखावली नसती, पण त्यांचे शब्द साधे असले, तरी सूर इतका हेटाळणीचा होता की तिला त्यातला विखार बरोबर समजला. तरीही आवाज अन मन दोन्हीवर संयम ठेवून ती म्हणाली, 'फ़क्त खोलीतच घालणार आहे मी बा. खाली साडीतच येईन.' 'तसं चालेल मग. नाही का बा?' तेवढ्यात खोलीत आलेल्या भरतनं तिची बाजू घेतली. त्यावर काहीही उत्तर न देता, बा खाली गेल्या. पण जाताना धाडकन ओढून घेतलेल्या दाराच्या आवाजानं दोघांनाही काय समजायचं ते समजलं. अशाच कित्येक लहानलहान प्रसंगातून त्या दोघींमधला दुरावा वाढतच गेला. भरतचे वडील सतत धंद्याच्या निमित्ताने बाहेरच असत. ते तसे स्वभावाने कडक असले, तरी ते एकदा बाहेर पडले, की घरावर बां चं राज्य असे. कमरेला किल्ल्यांचा जुडगा खोचलेला, अंगावर खास उलटा पदर घेतलेली गुजराती साडी, अन मोजकेच पण वजनदार दगिने, अशा वेषात बा विजेच्या चपळाईनं रसोई, दिवाणखाना, अंगण, अन गच्चीवर जा ये करत, नोकरांना हुकूम सोडत असत. रसिका बहुतांश वेळ आपल्या खोलीतच असे. मुलानं आपल्या मनाविरुद्ध सून घरात आणली असली, तरी आता तीच या घरची लक्ष्मी आहे, तेव्हा तिला आपल्यात सामावून घ्यावं- हे जाणण्याचा समजूतदारपणा बां मधे नव्हता, अन रसिका तर मुळातच नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी होती. त्यामुळे दोघींमधे कायम एक काटेरी भिंत उभी राहिली.
|
Supermom
| |
| Monday, March 12, 2007 - 12:48 pm: |
|
|
प्रतिक्रियांबद्दल आभार. अमृता, 'मी क्यों की....' ही मालिका बघितलेली नाही अजून. त्यामुळे गोष्टीशी साधर्म्य आहे का हे माहीत नाही.
|
Disha013
| |
| Monday, March 12, 2007 - 3:22 pm: |
|
|
Sं, छान चाललिये कथा. आणि 'क्योकी' मधील बा खुप चांगली आहे.(२ वर्षांपुर्वी बघायचे).
|
सुमॉ चांगली चाललीय गोष्ट पण गुजरती मध्ये 'बा' म्हणजे आजी. आईला 'बा' नाही म्हणत. मा आपली अशेच एक शंका लिहीली.
|
Jhuluuk
| |
| Tuesday, March 13, 2007 - 9:48 am: |
|
|
सुपरमॉम, अगदि मस्त चालली आहे गोष्ट, येउ दे..
|
Anjut
| |
| Tuesday, March 13, 2007 - 10:31 am: |
|
|
छे छे मनुस्विनि बा म्हणजे आईच
|
Manutai
| |
| Tuesday, March 13, 2007 - 1:24 pm: |
|
|
झकास चालली आहे कथा. येऊ देत अजून पटापट
|
Supermom
| |
| Wednesday, March 14, 2007 - 6:28 pm: |
|
|
असं एक वर्ष लोटलं. या वर्षभरात बा अन रसिकाचं शीतयुद्ध सुरुच होतं.दोघींच्या मधे बिचार्या भरतचा चांगलाच कोंडमारा होत असे.त्याचे वडील या त्यांच्यामते क्षुल्लक गोष्टींमधे पडत नसत. अन तसेही ते सदानकदा बिझिनेस वाढवायच्या फ़िकिरीत असत. लग्नाआधी मुक्त पाखरासारखी वावरणारी रसिका, पण सतत जुन्या चालीरीती पाळाव्या लागत असल्याने तिची अवस्था पिंजर्यात कोंडून घातल्यासारखी झाली होती. वेगळं रहायचा विचार करणंसुद्धा त्या घरात धाडसच होतं. अर्थात आधी सार्या गोष्टींची कल्पना रश्मीनं दिलेलीच असल्याने तिला तक्रार करायला जागाच नव्हती. भरतचा समजुतदार स्वभाव अन त्याचा तिच्यात असलेला जीव या दोन गोष्टींवर ती आला दिवस ढकलत होती. अन अचानक कोंडी फ़ुटावी तसं झालं रसिकाचं. भरतला अमेरिकेला जायची संधी मिळाली.तीन वर्षांसाठी त्याची कंपनी त्याला पाठवणार होती.मनातून जरी खूप आनंद झाला, तरी रसिकाच्या मनात अनेक शंका थैमान घालत होत्या. घरून त्याला विरोध होईल हे तिला माहीतच होतं, अन तसा प्रबळ विरोध झालाही. पण भरतला मुळातच वेगळ्या क्षेत्राची आवड असल्याने तो आपल्या निर्णयावर ठाम होता. घरात बराच गोंधळ माजला, पण शेवटी भरत रसिकाचं जाणं निश्चित झालं. विमानात बसल्यावर रसिकानं अगदी मोकळा श्वास घेतला. आता निदान तीन वर्षं तरी ती हवं तसं वागायला रिकामी होती. शिकागोला पोचल्यावर दोघांचं छोटसंच अपार्टमेंट तिनं अगदी सुरेख सजवलं. दुकानात जाऊन मनासारखे पाश्चात्य पद्धतीचे कपडे ती घेऊन आली.स्वतः च्या मनाने प्रथमच सगळं करताना आपलं लग्न अन संसार जणू कालच सुरु झालाय अशी सुखद अनुभूती ती घेत होती. भारतात असताना बांच्या वागण्यामुळे कधीकधी होणारी चिडचिडही आता नव्हती. तिच्या या लग्नानंतर प्रथमच दिसणार्या उत्साही, फ़ुलपाखरी वृत्तीने भरतही जाम खूष होता. वर्षभरातच हेमलचा जन्म झाला अन रसिकाच्या सार्या सुखावर जणू कळसच चढला. भरतही त्याच्या नोकरीत स्थिरावत गेला. अमेरिकेतली कार्यपद्धती, एकंदर वातावरण त्यालाही आवडू लागलं. अन तीन वर्षांचा व्हिसा वाढत जाऊन, शेवटी ग्रीनकार्ड अन अखेरीस अमेरिकन नागरिकत्वापर्यंत दोघे येऊन पोचले केव्हा हे त्यांनाही समजलं नाही. प्रथम मोठं अपार्टमेन्ट, अन मग मोठं घर अशी स्थित्यंतरं अगदी सहजच झाली. घरी दोन गाड्या आल्या. संगणकीय क्षेत्रातले काही अभ्यासक्रम पूर्ण करून रसिकानंही नोकरी पत्करली. नाही म्हणायला दर दोन वर्षांतून भारतवारी होत असे. पण बांचा स्वभाव काही विशेष बदललेला रसिकाला कधीच वाटला नाही. उलट हेमलनंतर आता मुलगाच व्हायला हवा असं अप्रत्यक्षपणे अनेकदा फ़ोनवरही सुचवून त्यांनी रसिकाच्या मनात त्याही बाबतीत अढी निर्माण केली होती. या काही गोष्टी वगळल्या तर रसिकाचा संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा चालला होता. हे सारं ढवळून निघालं दीड वर्षांपूर्वी झालेल्या भरतच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनं.
|
Jhuluuk
| |
| Thursday, March 15, 2007 - 9:24 am: |
|
|
सुपरमॉम, क्लासिक रंगलीए कथा.. मग, पुढे काय झालं?
|
नाही हं................ Supermom, ह्या "बा" जरा realistic वाटतायतं मला................ पुढची posts पण लवकर येऊद्या.........
|
Supermom
| |
| Friday, March 23, 2007 - 12:48 pm: |
|
|
भरतचे वडील गेल्याचा फ़ोन आला तेव्हा भरत दौर्यावर होता. रसिकानंच धावपळ करून तिघांची तिकिटं काढली. मिळेल त्या फ़्लाईट्स घेत ते भारतात घरी पोचले तोवर सगळे अंत्यसंस्कार अर्थातच आटोपले होते. बांच्या या रंगहीन रूपाकडे रसिकाला बघवेचना. अंगावर पांढरी बारीक किनारीची साडी नि अलंकारविहीन अशा त्या बाप्पांच्या फ़ोटोजवळ बसल्या होत्या. आवाजातली नेहेमीची धार लुप्त झाली होती. पण रसिकाशी वागताना नेहेमीचाच कोरडेपणा सुरात अन स्वभावात डोकावत होता. नाही म्हणायला हेमलला आल्या आल्या त्यांनी घट्ट जवळ घेतलं अन त्यांच्या डोळ्यांचे कोपरे पाणावलेले वाटले, की भासच झाला रसिकाला? कोण जाणे. बाप्पांचे दिवस झाल्यावर भरतनं अन रसिकानं निदान काही दिवस तरी अमेरिकेला चलण्याचा बा ला खूप आग्रह केला. पण त्याला त्यांनी ठाम नकार दिला. दुकानांची व्यवस्था बघणारं कोणीच नाही अन शिवाय बरीच इतरही कामं मार्गी लावायची आहेत या सबबीखाली त्या विषयावर जास्त बोलायचंही टाळलं त्यांनी. एखाद दीड वर्षं सुरळीत पार पडलं अन मग मात्र चक्क भारतातून बांचे फ़ोन येऊ लागले. बोलणं अर्थात जास्त वेळ भरतशीच असे, पण फ़ोन ठेवल्यावर तो बराच वेळ गंभीर होत असे. मधूनच 'बा आता खूप कंटाळलीय' असंही पुटपुटत असे. अन अखेरीस त्यानं मागच्या आठवड्यात 'बा ला नेहेमीकरताच आणायचा विचार असल्याचा' गौप्यस्फ़ोट केला होता. तेव्हापासून मधून मधून दोघांमधे या कुरबुरी सुरू झाल्या होत्या. अखेरीस 'काही दिवस बा ला आणायचं, अन सारी परिस्थिती बघून पुढचा निर्णय घ्यायचा ' असा सुवर्णमध्य साधण्यात आला अन बां चं येणं निश्चित झालं. विमानतळावर बा जेव्हा बाहेर आल्या तेव्हा रसिकानं प्रथम त्यांना ओळखलंच नाही. एकतर त्यांचं वजनही खूप कमी झालं होतं. नेहमी भरपूर उंची अन वजनामुळे धिप्पाड दिसणार्या बा अगदीच थकल्या भागलेल्या वाटत होत्या. प्रवासाचा शीण असेल असा विचार रसिकानं केला. आठवड्याभरानं, बांचा जेटलॅग कमी झाला. अन त्या थोड्या माणसांत आल्या. रसिकाशी बोलताना आता त्या बर्याच सौम्य वाटत होत्या. वीकएंडला भरत घरी आल्यावर त्या आपली बॅग उघडून बसल्या. हेमलसाठी लाखेच्या बांगड्या, घागरा,बिंदीपासून सारे खड्यांचे दागिने,बरेचसे फ़्रॉक्स, भरतसाठी चुरीदार कुर्ता हे सारं तर त्यांनी आणलं होतंच, पण नवलाची गोष्ट म्हणजे रसिकासाठी खास गुजराती साड्यांबरोबरच जीन्स वर घालायला भरतकाम केलेले कुर्ते सुद्धा त्या घेऊन आल्या होत्या. काहीशा निर्विकार भावानंच रसिकानं ते सारं घेतलं खरं, पण आता आपल्याजवळ रहाण्यासाठी ही सारी लाडीगोडी आहे असा विचार तिच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही.
|
Supermom
| |
| Friday, March 23, 2007 - 2:51 pm: |
|
|
बांना येऊन आता एक महिना लोटला होता. या काळात रसिकानं आपल्या दिनक्रमात मुद्दामच कोणताही बदल करण्याचं टाळलं होतं. सकाळी उठून ती भरत अन हेमलचा डबा तयार करीत असे. त्यानंतर स्वतः चा डबा अन बांसाठी जेवण करून ती कामावर निघून जाई. जाताना त्यांना जेवून घ्या असं ती सांगत असे. संध्याकाळी आधी भरत येई, मग हेमलला घेऊन रसिका डे केयर मधून येत असे. रसिकानं काही दिवस सुट्टी घ्यावी असं भरतनं सुचवून पाहिलं, पण ऑफ़िस मधे खूप काम आहे या सबबीवर तिनं नकार दिला होता. आल्यावर ती संध्याकाळचा स्वैपाक करीत असे. बा तिला भाजी निवडणे, लसूण सोलणे अशा बारीकसारीक कामात मदत करीत असत. पूर्ण काम त्यांच्यावर या वयात टाकणं रसिकाला प्रशस्त वाटत नव्हतंच, शिवाय कुठलीही गोष्ट पूर्णपणे त्यांच्या ताब्यात देण्याची थोडीशी भीतीही तिच्या मनात वावरत होतीच. 'रसिका, तू बा शी जरा अलिप्तपणेच वागतेस असं नाही वाटत का तुला? अचानक एक दिवस, वर आल्यावर भरतनं रसिकाला सरळच प्रश्न केला. त्याच्या प्रश्नानं रसिका चांगलीच उखडल्यासारखी झाली. 'हा प्रश्न जरा भूमिका बदलून,माझं लग्न झालं तेव्हा तुझ्या आईला विचारावासा नाही वाटला तुला, भरत? तेव्हा तर तू मलाच जुळवून घ्यायला सांगत होतास....' 'मान्य आहे मला, रसिका...' भरत किंचित वरमून म्हणाला. 'पण झालं ते झालं. आता भूतकाळातल्या कडू आठवणी उगाळत राहून तू किती दिवस अशी तुटक वागणार आहेस? अन त्याचा त्रास सार्याच घराला होईल. त्यापेक्षा खेळकरपणे सारं घेतलस तर जास्त चांगलं नाही का?' 'मी त्यांच्या वागण्याने इतकी दुखावलेय भरत याआधी, की त्यांच्याशी कुठले धागे जुळवावेसेच वाटत नाहीत रे....' आता भरतही चिडला. 'मी इतकं समजावून सांगतोय, तर तुझं पुन्हा तेच ते. माणसं बदलतात रसिका.इतकं हटवादी राहून नाही चालत. जाउ दे. तुला वाटेल तसं वाग. मी याउप्पर काही बोलणार नाही...' सकाळी रसिकाला जरा उशिराच जाग आली. डोकं जड झालं होतं अन दुखतही होतं. गोळी घेऊन, तिनं ऑफ़िसला उशिरा येणार असल्याचं कळवलं अन ती झोपून राहिली. भरत अन हेमल निघून गेले होते.बा एकदा वर येऊन तिला काही हवं का विचारून गेल्या. त्यांना जरा वेळानं उठते, तुम्ही नाश्ता करून घ्या असं सांगून ती पुन्हा पडून राहिली. अगदी अर्धा तासच तिचा डोळा लागला असेल,कर्कश्श वाजणार्या बेलनं ती जागी झाली. थोडा वेळ बा दार उघडतील असा विचार करून ती उठलीच नाही. पण खालून काही आवाज येईना, अन बेल वाजतच होती. चडफ़डतच रसिका खाली आली. बा आंघोळीला गेल्या होत्या. दार उघडताच समोर दोन निळ्या वेशातल्या पोलिसांना बघून ती बुचकळ्यातच पडली. 'मिसेस पॅरेख..?' "या. व्हॉट्स द मॅटर?' 'युवर हजबंड हॅज मेट विथ ऍन ऍक्सिडेंट..' पुढचं काही ऐकायच्या आधी रसिकाला भोवळ आली.
|
Supermom
| |
| Saturday, March 24, 2007 - 3:31 am: |
|
|
रसिकाला जाग आली तेव्हा तिला सोफ़्यावर झोपवलं होतं.बा जवळच गरम दुधाचा पेला घेऊन बसल्या होत्या. आजुबाजूची दोन भारतीय कुटुंबं, शर्मा अन मनसुखानी पण जमली होती. 'भरत, हेमल....' स्वतःशीच बोलत रसिकानं उठण्याचा प्रयत्न केला. 'हळू,हळू ऊठ रसिका. अन हे गरम दूध घे आधी...' बा विलक्षण प्रेमळपणे म्हणाल्या. 'पण बा, ते दोघं....' 'हेमल अगदी ठीक आहे रसिका. भरतनं तिला शाळेत सोडल्यावर झालं हे. हातापायाला बराच मार लागलाय पण जिवावरची दुखापत मुळीच नाहीय. तू हे घे, अन या लोकांबरोबर जा. हेमलला आणायला शर्मांची मुलगी गेलीय. मी घरी थांबते हेमलबरोबर. तू आधी भरतला बघून ये, अन मग मी जाईन बरं.' 'पण हे सारं कोणी सांगितलं बा तुम्हाला?' 'मी आंघोळ करून बाहेर आले तेवढ्यात अन मला सारा प्रकार कळला. शेजारचे नंबर होतेच तुम्ही दोघांनी देऊन ठेवलेले, त्यावर फ़ोन केले मी. अन या लोकांनी दवाखान्यात फ़ोन केला लगेच. पण आता हे बोलत बसायला नकोय. जा तू आधी.' रसिका दवाखान्यात पोचली अन भरतला बघून तिला रडूच यायला लागलं. हातापायाला भलेमोठे बॅंडेजेस, डोक्याला पट्ट्या.. 'अग रडतेस काय वेडी.. मी बरा आहे अगदी. अन बा न हेमल कुठे आहेत?' भरत क्षीण आवाजात म्हणाला. 'त्या दोघी घरी आहेत. हेमलला भीती वाटेल सारं बघून म्हणून बा तिच्याजवळच राहिल्यात..' डॉक्टरांशी बोलून, सारं नीट समजावून घेऊन रसिका घरी निघाली. आत आल्याबरोबर तिला बां चं हळुवार सुरातलं गाणं ऐकू आलं. हलक्या पावलांनी ती वर गेली. बा हेमलला अंगाई म्हणून झोपवत होत्या. मधूनच पदरानं डोळे पुसत होत्या. रसिकाला बघताच त्या उठल्या. 'झोपलं लेकरू. जेवली ग ती. आता तू ये बघू जेवायला. मी थांबलेय तुझ्यासाठी...' 'बा..' रसिकाला एकदम भरूनच आलं. पटकन ती बांच्या गळ्यात पडली. 'चल रडू नकोस आता. मलाही जायचंय न दवाखान्यात...' तिचे डोळे पुसून बा तिला खाली घेऊन आल्या. चार महिन्यांनी भरत पुष्कळच बरा झाला. एक दिवस तो खोलीत आला तर रसिका स्टडी टेबलजवळ काहीतरी लिहीत होती. 'हं, हे घे. सह्या कर याच्यावर..' 'काय आहे हे..?' 'बां चा व्हिसा वाढवायचे कागद आहेत. अन हो, उद्या दोघंही वकिलाकडे जाऊन येऊ या. त्यांना इथेच ठेवण्यासाठी काय करावं लागेल ते...' 'खरं म्हणतेस? पण अशी खाष्ट सासू चालेल का तुला नेहेमीकरता घरात?' भरतचे डोळे मिश्किलपणे चमकत होते. पण रसिका गंभीर होती. ' तू म्हणाला होतास तेच खरं आहे भरत. माणसं बदलतात. जुन्या गोष्टी जन्मभर उगाळणं बरोबरच नाही. अन या वयात त्या बदलल्या, बदलू शकतात, तर मी बदलायला काय हरकत आहे? खरंच, काय हरकत आहे....? या चार महिन्यात मला पुरतं कळलंय रे, म्हातार्या माणसांना जसा आपला आधार हवा असतो ना, तशीच ती पण आपला आधार होऊ शकतात रे...' रसिकाच्या पापण्यांवर एक थेंब हलकेच उतरला. 'झालं. लागल्या वेडाबाई रडायला पुन्हा. भारीच बुवा पाणीदार डोळे तुझे...' दोघांच्या हसण्याने घर उजळलं. बा त्यांच्या खोलीत शांत झोपल्या होत्या. शेजारीच झोपलेल्या हेमलचा हात त्यांच्या गळ्यात होता. समाप्त.
|
Jhuluuk
| |
| Saturday, March 24, 2007 - 8:04 am: |
|
|
मस्त !!! सुंदर end .... माणसं बदलतात ... अशा पद्धतीनी बदलली तर फारच छान....
|
सुपरमॉम नेहमीप्रमणे सुंदर कथा... हे प्रत्यक्षात घडले तर खरच मस्त होईल...
|
|
|