Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भेट

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » कथा कादंबरी » भेट « Previous Next »

Bhaskar_lele
Friday, March 23, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवसभराच्या विमानप्रवासानं आखडलेलं अंग एकदम मोकळं होत होतं. मस्त गरम पाण्यानं आंघोळ, तीही बादलीतून तांब्या तांब्यानं पाणी घेत. कितीतरी दिवसात असा योग आला नव्हता. निख्या लग्न झाल्यावर एकदम गृहस्थ झालाय. काकाच्या घरचा पितळ्याचा तांब्या वगैरे आलाय इकडे. मी जरा निवांत होतोय तितक्यात निख्या बाहेरून हाका मारायला लागला. "साइटवर जायचंय लगेच. लवकर ये बाहेर..." पटापट टॉवेल गुंडाळून बाहेर आलो, तर निख्या तिथेच बाहेर उभा आणि सोबत केतकीही रखुमाईसारखी. आता परत बाथरूमध्ये पळावं की आल्या प्रसंगाला शौर्यानं तोंड द्यावं अश्या द्विधेत मी, आणि हे दोघे आपले भराभर बोलतायत.

" ... ती पहिल्यांदाच येतेय आपल्याकडे. काय रे तू! जरा पाच मिनिटं बोलून जा की."
"अगं, त्या जॉर्जचा फोन आला होता आत्ताच. तो दहाला साइटवर पोचतोय. ऑलरेडी नऊ वाजून गेलेत. ट्रॅफिक मध्ये अडकलो तर .."
"काही होत नाही पाच मिनिटं उशीर झाला तर."
"ह्या! दिलेल्या वेळेला..."
"काय रे! तुझी बहीण, माझी तिच्याशी ओळखसुद्धा नाही. थोडी ओळख करून दे मग जा की. प्लीऽज." केतकीनं निख्याच्या गळ्यात हात टाकले.

"अरे अरे! माझ्या बालमनावर परिणाम...!" मी ओरडलो. निख्या मोठ्यांदा हसला. केतकीनं डोळे मोठे केले. आणि मी कपडे शोधायला बॅगेकडे पळालो.

"अरे भास्क्या, त्या जॉर्जभोचा फोन आला होता. दहाला या म्हणून."
"हो, मी काय पाच मिंटात तयार होतो." मी बॅगेत शोधाशोध करत म्हणालो.
"अरे पण ती डॉली येतेय. आत्ताच तिचा पण फोन आला. ती परवाच आली आहे भारतात. आता इथेच आहे म्हणा.." निख्या काहीतरी सांगत राहिला.

डॉली!? निख्याची मावसबहीण डॉली? मला निख्याची मावशी आठवली. त्याच्या लग्नातली.
' ... नशीब काढलंन हो आमच्या डॉलीनं. मोठं घर, गाडी, हौशी नवरा ...'
' ... अमेरिकेला असते ...'
ती आपल्या हौशी नवऱ्यासकट भारतात? परत? कायमची?

"... तर केतूची तिच्याशी ओळख करून देऊ नि मग सटकू. ओके?" निख्या बाहेर गेला.



Bhaskar_lele
Friday, March 23, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉली, निख्याची मावसबहीण. आमच्याच वयाची. लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत निख्याकडे भेटणारी. एकदम बाहुलीसारखी होती ती तेव्हा. गोरीपान, राखाडी-शेवाळी रंगाच्या डोळ्यांची. निख्याची बहीण प्राचीसुद्धा घारी गोरीच होती. पण डॉली वेगळीच. कदाचित ती लहानपणापासून दिल्ली, कलकत्ता असल्या मोठ्या शहरात राहिल्यामुळे असेल, तिच्या वागण्यात एक ऐट होती. कोणाशीही बोलताना डोळे बारीक करून एकदम गोड हसायची ती. की समोरच्याची काय बिशाद तिला नाही म्हणण्याची! माझी सुट्टी सगळी पुण्यातच जायची. निख्याकडे, आमच्या दुसऱ्या काकाकडे, माझ्या मामाकडे वगैरे आम्ही सगळी मुलं फिरायचो. डॉलीचेही कोणी काका वगैरे होते पुण्यात त्यामुळे तीही तिथेच असायची. मला तर कायम डॉली निख्याकडे असली की आपणही तिथेच असावं असं वाटायचं. तिनं तसं गोड हसून आपल्याशी बोलावं, आपण तिला हवं ते करू असं वाटायचं. पण तिच्याशी थेट बोलण्याचा धीर मात्र व्हायचा नाही.

सातवीतून आठवीत जाण्याच्या सुट्टीत एकदा आम्ही चौघेच म्हणजे मी, निख्या, प्राची आणि डॉली एव्हढेच काकाच्या घरी होतो. सकाळीच आमचा 'नवा व्यापारी' खेळ सुरू झाला. माझ्याकडे चांगली कार्डं जमली होती, तीन निळे वगैरे पण बाकीच्यांकडे एकेकाकडे एका रंगाची एक, दोन अशी कार्डं असल्यानं त्यांचे पैसे वसूल होत नव्हते. एका रंगाची तीन कार्डं मिळाली की दुसऱ्या खेळाडूंकडून डबल, टिबल भाडं घेता येतं तसं करता येत नव्हतं. खेळ बास असं त्या दोघी म्हणायला लागल्या तेव्हा मला एक आयडीया सुचली. मी निख्याला म्हणालो, "तू डॉलीकडून फ्लॉरा फाउंटन घे, म्हणजे तुझ्याकडे तीन हिरवे होतील ..."
"मी का देईन!" डॉली उद्गारली.
"ऐक तर! तू निख्याला जे कार्ड देशील त्याचे तो पैसे देईल. शिवाय तू जेव्हा या जागेत येशील तेव्हा त्याचं भाडंही घेणार नाही."
मला पूर्ण करू न देता ती म्हणाली, "पण बाकीच्या त्याच्या जागांचं भाडं मला दुप्पट भरायला लागेल त्याचं काय?"
"अगं ऐक तर! त्या जागांचं भाडंही तो जुन्याच दरानं घेईल."
"मग काय उपयोग!" पण निख्याची ट्युबलाइट पेटली, "पण तुझ्याकडून आणि प्राचीकडून डबल मिळेल! मस्तच डील!"

मग काय, असल्या डील्सचा सुळसुळाटच झाला आणि दिवसभर खेळ सुरु राहिला. अधे मधे 'ही डीलची आयडिया भारीच होती' असले डॉलीचे उद्गार ऐकून मी खुश होत होतो. संध्याकाळी बाबा आले आणि माझा निकाल कळला. पहिला नंबर आलाच होता. खरं तर निख्याला माझ्याहून जास्त मार्क असून त्याचा नंबर मात्र मधलाच कुठला तरी होता. पण काकूनी खूप कौतुक केलं. माझं विमान तर अगदी उंच उडायला लागलं होतं. असाच आनंदात मी शेजारच्या मित्राकडे निघालो होतो. प्राची आणि डॉली तिथे पायरीवर गप्पा मारत बसल्या होत्या. माझं नाव ऐकून मी एकदम थांबलो.

".. हुशारच आहे तो", प्राची म्हणाली.
"ह्या! एटीवन पर्सेंट आणि ते पण स्टेट बोर्ड. कुठली ती शाळा, काय शिकवत असतील आणि काय तपासत असतील कोण जाणे!" डॉलीचा स्वर ऐकून माझं विमान कोसळू लागलं.
" ... तसं काही नाही ", पण प्राचीला काय बोलावं हे सुचलेलं नव्हतं. तिनं एकदम विचारलं, "तुझा कधी आहे गं निकाल?"
"जूनमधेच कळेल.", डॉली गडबडीत म्हणाली. "आणि हा भास्कर...? कसला खेडवळ आहे ना? काय ती ढगळी पँट. आणि त्याची आई काळी आहे का गं, इतका कसा तो ..." पुढचं मला ऐकूच आलं नाही. पण तिचं हसणं तिच्या आवाजात ऐकू येत होतं.

संताप, अपमान, दुःख, भावनातिरेकाने मला काय करावे सुचेना. तसाच पुढे गेलो. मला पाहून डॉली एकदम गप्प झाली. तिला मारावं, रडवावं अशी तीव्र इच्छा झाली पण दोन क्षण थांबून मी भर्रकन घराबाहेर पडलो. प्राची मागून हाका मारत होती पण मी भराभर चालत राहिलो. पुण्यातल्या गजबजलेल्या रस्त्यांवरून. कुठेतरी दूर निघून जावं, अदृश्य व्हावं, कोणी मला बघायला नको असं वाटत होतं. शेवटी खूप फिरून मामाच्या घरी पोचलो. मामाच्या प्रश्नांना काहीतरी उत्तरे देऊन थेट झोपी गेलो.



Bhaskar_lele
Friday, March 23, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यानंतर मी डॉलीला कधी भेटलो नाही. अभ्यास, शाळा, कॉलेज, परीक्षा आणि नंतर नोकरी, कधी प्रसंगच आला नाही. पण मी तिला विसरलोही नाही. तिला आणि त्या दिवसाला. छान हसून बोलणारी, कौतुक करणारी डॉली खरी की माझ्या अपरोक्ष मला हिणवणारी डॉली? सगळे कायम कौतुक करतात, काकू, मामी वगैरे, तेही माझ्याबद्दल असंच म्हणत असतील का? या प्रश्नांनी त्यानंतर बरीच वर्षं माझा पिच्छा पुरवला. माझ्या आणि निख्याच्या इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या वेळेस हळू आवाजात काकू आईशी बोलत होती, "... नापास झाली. पण देखणी आहे. मुलीच्या जातीला ..." तेव्हा आत आत खूप बरं वाटलं होतं. मलाच काहीतरी मिळाल्यासारखं. त्या दिवसाची टोचणी बोथट झाली मग. डॉली आठवणीतून फिकट होत गेली. आणि ती आता इथे, अचानक ..!

मी आरशात बघितलं. दाढी करायला हवी होती, पण ठीक आहे. तितक्यात बाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. मनाने नाही म्हणायच्या आत मी खिडकीतून डोकावलो. डॉलीला न ओळखणं शक्यच नव्हतं. थोडी मोठी दिसत होती पण तरी, सुंदर! सोबत एक दोन तीन वर्षांची मुलगी. मी एकदम मागे आलो. जीन्स चढवली. डिओचा फवारा मारून शर्ट घातला. आरशात परत बघितलं. शेजारच्या निख्याच्या लग्नातला निख्या नि मी एकाच रंगाचे दिसतोय. या विचारासरशी दचकलो. काय करतोय मी? 'कूल इट', मी स्वतःला म्हणालो. 'कूल इट भास्क्या, यू आर बियाँड ऑल दॅट. यू शुड बी.' दोन वेळा दीर्घ श्वास घेतला. बाहेर काहीच हालचाल दिसली नाही, कोणी हाकही मारली नाही तेव्हा स्वतःच बाहेर गेलो.

मी गेल्या गेल्या निख्याचा फोन वाजला नि तो बोलत बोलत आत गेला. केतकी पुढे होऊन म्हणाली, "ओळख करून देते हं, हा निखिलचा चुलतभाऊ भास्कर, भास्कर, ही निखिलची मावसबहीण देवयानी, आणि हे तिचे ..." मी नाव ऐकलं नाही पण हे डॉलीचे 'हे' ते कळलं. हे चांगलेच गोलाकार होते. शिवाय डॉलीच्या शेजारी बसल्यामुळे की काय पण तसे कृष्णवर्णीच दिसत होते. मी शिष्टपणे हसलो, डॉलीकडे वळून म्हणालो, "हाय डॉली!"
"अरे! तुम्ही एकमेकांना ओळखता?" केतकी चिवचिवली.
"हो, लहानपणी भेटलोय काकाकडे." मी.
".. आलेच", म्हणत केतकी आत गेली आणि पटकन सामोसे घेऊन आली. डॉलीच्या मुलीशी डोळ्यांचे खेळ खेळत मी एक सामोसा उचलला. केतकी चहा करायला आत गेली. एकदम शांतता! मी डॉलीकडे नि ह्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्या गोड मुलीशी लांबूनच खेळत होतो. तेव्हढ्यात गडबड करत निख्या अवतरला. "अरे, चल चल. तो जॉर्जभो वाट पहातोय तिकडे." माझ्या खांद्यावर थापा. ह्यांच्याकडे वळून म्हणाला, "भास्करसाठी फ्लॅट बघतोय. तिकडे साइटवर जायचंय. आम्ही तासाभरात परत येतो. तोपर्यंत जरा विश्रांती घ्या. आणि जेवायला थांबा, उगाच गडबड करू नका." परत मला हलवत तो म्हणाला, "बूट घालायला लाग, मी शर्ट घालून आलोच!" निख्याची एव्हढी घाई चाललेली आणि मी निवांतपणे सामोसा खात होतो.

निख्या आत गेला. अपेक्षेप्रमाणे ह्यांनी विचारलंच, "कुठे घेताय फ्लॅट? निखिलच्या प्रोजेक्ट मध्येच का?"
"अं.. नाही. त्याची बुकींग्ज केव्हाच बंद झाली. मी केजी एन्विरो मध्ये घेतोय. जवळच आहे पण निखिलच्या फ्लॅटच्या."
"अच्छा! किती स्क्वेअरफूट?" बाण फुकट! ह्यांना केजीईची माहिती नव्हती.
"सतराशे. तीन बेडरूमचा आहे."
"अरे वा! कितीला बसतोय मग?"
"पस्तीसपर्यंत जाईल बहुतेक..", मी आवाजात शक्य तेव्हढा सहजपणा आणत म्हणालो.

निख्या घाईघाई करत आलाच तेव्हढ्यात आणि आम्ही बाहेर पडलो.

साइटवर जॉर्जने चांगलेच प्रेझेंटेशन दिले. तिथून आम्हाला केजीईची तयार घरे बघायला घेऊन गेला. बांधकामाचे वेळापत्रक, पैशाचे गणित, आणखी काय काय स्पेशल सोई असल्या चर्चा केल्या. एका फ्लॅटचे तोंडीच बुकिंग करून आम्ही परत निघालो. एकदम मस्त वाटत होतं, जिंकल्यासारखं! बाइकवर निख्याच्या मागे बसून मी विचार करत होतो. 'पस्तीस लाख! एव्हढे पैसे! भास्क्या, श्रीमंत झालास की रे तू!' बाइकच्या आरशात मला माझा चेहरा दिसला. अचानक ह्यांचा गोल चेहरा आठवला नि मी हसलो. आणि माझा मीच दचकलो. काय चाललंय डोक्यात, काही कळेना. काय सिद्ध करायचा प्रयत्न चालवलाय मी? की मी ह्यांच्यापेक्षा उजवा आहे? एकहाती मोठाल्या रकमा खर्च करू शकतो? ह्यांना हसू शकतो? पण काय संबंध त्यांचा? त्यांच्यावर का राग उगाच? तुलना कशाला? डॉली मला काय वाट्टेल ते म्हणाली म्हणून मी लगेच तसा झालो का? " ... काय चूक आहे त्यात, खरंच बोलली की पोर." डॉलीची आई काकूला म्हणाली होती. कोण जाणे, असेनही मी तसा. पण तिनं कमी लेखलं म्हणून माझं मी मला कमी का लेखून घ्यावं. उगाच कोणाशी स्पर्धा का करावी? आणि तिच्या नवऱ्याला कमी लेखून काय मिळणार आहे? सूड कसला तरी?

आम्ही घरी पोचलो. केतकीनं निख्याला कामाला लावलं आणि ह्यांच्याशी बोलण्याची जबाबदारी माझ्यावर आली. डोक्यातल्या गोंधळानं मी तसा बोलत कमीच होतो आणि जास्त त्यांच्या छोट्या मुलीशी खेळत होतो. पण हे एकदम गप्पिष्ट आणि दिलखुलास गृहस्थ निघाले. बोलता बोलता गाडी 'अरे पराग' वर केव्हा आली कळलंही नाही. जेवणं झाली आणि निख्याही आम्हाला सामील झाला. मग काय! टाळ्या, पाठीवर थापा, एकदम दंगाच! मी आणि निख्यानं आमच्या कॉलेजातल्या फजित्या सांगितल्या, परागनं त्याच्या तुंदिलतनुवरून होणाऱ्या गडबडी सांगितल्या. आमचे जगभरातले अनुभव बोललो. खूप हसलो. एकदम मोकळे झालो.

शेवटी त्यांची निघायची वेळ झाली. पराग माझ्याशी हात मिळवत म्हणाला, "बरं झालं ओळख झाली. भेटू असेच."
"खरंच, बरं झालं." मी मनापासून म्हणालो.



Bhaskar_lele
Friday, March 23, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

---------------------------
मित्रहो, मायबोलीवरचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. गोड मानून घ्याल अशी आशा आहे. मी अजुनी धडपडत शिकतो आहे. तेव्हा बर्‍यावाईट प्रतिक्रिया सगळ्याच मोलाच्या आहेत.

भास्कर.

ता. क. गोष्टीचं नाव "भेट" ठेवलं होतं. पण काहीतरी आकडेच दिसतायत त्याऐवजी!


Milindaa
Friday, March 23, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेले, आकड्यावर तुमचं भारी प्रेम दिसतंय. कोठे आहेत आकडे? :-)

Marhatmoli
Friday, March 23, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेले,

गोष्ट खुपच मस्त होति.


Dhoomshaan
Sunday, March 25, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भास्कर,
मस्त आहे गोष्ट!!!!!
ही तुझ्या खर्‍या आयुष्यातली आहे का???????????????
नाही म्हणजे,
detailsचांगले दिलेस..........

Ganeshbehere
Sunday, March 25, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'पस्तीस लाख! एव्हढे पैसे! भास्क्या, श्रीमंत झालास की रे तू!' बाइकच्या आरशात मला माझा चेहरा दिसला. अचानक ह्यांचा गोल चेहरा आठवला नि मी हसलो. आणि माझा मीच दचकलो..>>>>>>>>>>>>>>>>>>>

मस्त रे भो छान लिहिल...........

Sanghamitra
Monday, March 26, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोष्ट साधीशी छान. Flow मस्त आहे कथेचा आणि भाषाही.
प. प्र. नाहीये वाटत. :-)
लिहीत रहा.


Jayavi
Monday, March 26, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भास्कर.......आवडली रे तुझी गोष्ट. अगदी प्रामाणिक आहे लेखन. पुढच्या लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा :-)

R_joshi
Monday, March 26, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भास्कर लिखाणावरुन असे मुळीच वाटत नाहि की पहिला प्रयत्न आहे. खुप सुंदर आणी सुटसुटित सुरवात केली आहे कथेची.पुढचा भाग आता लवकर येऊ द्या:-)

Swaatee_ambole
Monday, March 26, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त कथा.
( मायबोलीवरचाही) पहिला प्रयत्न नाही वाटत. :-)


Dineshvs
Monday, March 26, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान, साधीसुधी कथा. अजिबात आव न आणता लिहिलेली.

Milindaa
Tuesday, March 27, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कथा अर्धवट वाटली (कळली नाही असे म्हणू शकता :-))

Swaatee_ambole
Tuesday, March 27, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, तुला कथा कळली नाही. म्हटलं. :-)

Kedarjoshi
Tuesday, March 27, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भास्कर गोष्टीत फ्लो होता, मस्त जात आहे असे वाटले व एकदम संपली. पहीलाच प्रयत्न असेल तर एकदम जमेश. पण समेवर येताना थोडी गडबड झालीये असे उगीच वाटत राहाते.

Lalu
Tuesday, March 27, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडली. :-) (मिलिन्दाला कळली नाही. ~D ) काही नवीन लोक (ID) आणि जुनेच पण नुकतेच लिहायला लागलेले छान लिहितायत ही चांगली गोष्ट आहे.


Adm
Tuesday, March 27, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह... संपलिये का गोष्ट? मग I think मला पण कळली नाही.. :-)

Bee
Wednesday, March 28, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छानच आहे कथा. खरे तर ह्या कथेच्या शेवटाला काही खास महत्त्व नाही. पात्राची छान रसमिसळ झाली आहे..

लालु, पण तुझ्यासारखे चांगले लिहिणारे आता लिहित नाहीत त्याचे काय.. :-)


Bhaskar_lele
Monday, April 16, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल आभार मंडळी. शेवटी जरा घाईच झाली खरी.
गोष्ट खर्‍या आयुष्यातली आहेही आणि तशी खरी नाहीही! ;-)


Astitva
Tuesday, April 17, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा चागंली आहे.
लिहिता लिहिता लिहित रहावे.
जगता जगता आयुस्य जगावे.
मनातले काही असे उमगावे.
नियतीचे हे सारे ख़ेळ असावे.
झाहले दु:ख़ तरी, सुख़ाची
आस न सोडावी.
नवीन स्वप्न्नाची
वाट पाहावी.

आयुप्य ही एक रह्यस्य कथा आहे
पुधे काय होणार या आशेत
माणूस चार पाणं सोडत असतो.

असच लिहित रहा, माझ्या शुभेच्छा...............
तुझा साहिल.


Disha013
Tuesday, April 17, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त हं कथा!भाषा साधीसुधी आहे एक्दम. शेवट पण आवडला.

Maitreyee
Tuesday, April 17, 2007 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भास्कर, मलाही आवडली कथा! fresh treatment..!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators