|
मित्रांनो, ही आणखी एक मुळातच जवळपास निर्दोष असणारी गज़ल: सतीश देशपांडे ऋतू येत होते ऋतू जात होते वसंती फुलोरेच ह्रदयात होते अजूनी कशी भूल आहे मनाला असे काय त्या इंद्रजालात होते? तुझ्या आठवांना मनी जाग नाही असे का कधी कामकाजात होते? पुढे काय येईल हे ज्ञात कोणा सुखे चालणे वाट, नादात होते तुझ्या मंदिरी का असा गल्बला हा तुझ्या हे खरे काय शोधात होते? तुझी साद ये कोठुनी ते कळे ना तुझे चिन्ह सार्या पसार्यात होते उरे ना मुळी राहणे मीपणाने जणू सावली लीन बिंबात होते
|
Zaad
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:02 am: |
| 
|
तुझ्या मंदिरी का असा गल्बला हा तुझ्या हे खरे काय शोधात होते? व्वा!! हा शेर खूपच आवडला!!!
|
वा!! छान प प्र!! हे मी माझ्या परीने केलेले रसग्रहण-- 'ऋतू येत होते ऋतू जात होते वसंती फुलोरेच ह्रदयात होते' वा!सुंदर आणि साधं सरळ... 'अजूनी कशी भूल आहे मनाला असे काय त्या इंद्रजालात होते? ' क्या बात है!..वाचायला छान वाटले पण 'इंद्रजाल' हे प्रतिक नेमके कोणत्या अर्थाने आले आहे? आध्यात्मीक आणि ऐहीक अश्या दोन संदर्भामधील माझे confusion कायम आहे.जाणकारांनी थोडा प्रकाश टाकावा. तुझ्या आठवांना मनी जाग नाही असे का कधी कामकाजात होते? एक नंबर!! globalisation धकाधुकीतही तुझ्या आठवणी मनाला हळव्या करून जातात..सुंदर! पुढे काय येईल हे ज्ञात कोणा सुखे चालणे वाट, नादात होते सुंदर... 'जिंदगी है सफर सुहाना... यहा कल क्या हो किसने जाना?' तुझ्या मंदिरी का असा गल्बला हा तुझ्या हे खरे काय शोधात होते? मस्त! 'तुझी साद ये कोठुनी ते कळे ना तुझे चिन्ह सार्या पसार्यात होते' वा!तुझा भास मी अजुनही उराशी जपला आहे! उरे ना मुळी राहणे मीपणाने जणू सावलीतील बिंबात होते 'सावलीतील बिंबात काय होते?' हे समजले नाही. एकूणच सुंदर भावूक गझल
|
तुझ्या आठवांना मनी जाग नाही असे का कधी कामकाजात होते? सर्वात आवडलेला शेर...
|
सतीश देशपांडे , छान गज़ल! "तुझ्या मंदिरी का असा गल्बला हा तुझ्या हे खरे काय शोधात होते? क्या बात है!
|
छान. तुझे चिन्ह सार्या पसार्यात होते. वा!
|
Mankya
| |
| Thursday, March 22, 2007 - 8:42 am: |
| 
|
वाह ... सतीशभाऊ ! सुखे चालणे .. असा गल्बला .. चिन्ह सार्या .. जमूनच गेलेत अगदि ! मक्ता .. सावलीतील बिंबात .. नाही कळलं ! सहज आतपर्यंत पोचणारी आणि एकसंध प्रवाहात उतरलेली अशी वाटली ! माणिक !
|
Desh_ks
| |
| Thursday, March 22, 2007 - 8:44 am: |
| 
|
मित्रहो, सार्याच रसग्रहण आणि प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार! आपण लिहिलेलं काही, इतरांनाही आवडावं यात खरंच आनंद आहे आणि तो या प्रतिक्रियांमधून मी घेतो आहे. श्री. मयूरलंकेश्वर यांनी मांडलेल्या शंकेबद्दल स्पष्टीकरण "उरे ना मुळी राहणे मीपणाने, जणू सावली लीन बिंबात होते" हे माझे मूळ शब्द "जणू सावलीतील बिंबात होते" असे अनवधानानं टाईप झाले आहेत असं वाटतं. 'मयूर या मूळ शेरावरही तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल' -सतीश म. देश्पांडे.
|
Desh_ks
| |
| Thursday, March 22, 2007 - 8:45 am: |
| 
|
मित्रहो, सार्याच रसग्रहण आणि प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार! आपण लिहिलेलं काही, इतरांनाही आवडावं यात खरंच आनंद आहे आणि तो या प्रतिक्रियांमधून मी घेतो आहे. श्री. मयूरलंकेश्वर यांनी मांडलेल्या शंकेबद्दल स्पष्टीकरण "उरे ना मुळी राहणे मीपणाने, जणू सावली लीन बिंबात होते" हे माझे मूळ शब्द "जणू सावलीतील बिंबात होते" असे अनवधानानं टाईप झाले आहेत असं वाटतं. 'मयूर या मूळ शेरावरही तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल' -सतीश म. देशपांडे.
|
सतीश जी दुरुस्ती केलीये. अत्यंत दिलगीर आहे . typing mistake झाली
|
Imtushar
| |
| Thursday, March 22, 2007 - 9:16 am: |
| 
|
सतीश, खूपच सुरेख गझल... पुढे काय येईल हे ज्ञात कोणा ... वरून मयूरसारखंच मलाही 'जिंदगी एक सफ़र है सुहाना..' आठवलं, पण परत एकदा वाचल्यावर यात बेफ़िकीरी ऐवजी ईश्वरावरील निष्ठा, विश्वास जाणवला... तुझ्या आठवांना मनी जाग नाही ... हा प्रेयसी च्या आठवणींचा हळवा शेर न वाटता देवाच्या नामस्मरनाचा भक्तीपूर्ण शेर वाटला... एकूणच गझल खूप आवडली. पण तुझ्या मंदिरी का असा गल्बला हा तुझ्या हे खरे काय शोधात होते? हे तितकेसे आवडले नाही... तुझा आणि माझा थेट संवाद चालू असताना 'तुझ्या हे खरे काय शोधात होते?' ही 'ह्यां'ची पंचाईत मी का करावी? व्याकरण आणि गझलेचे नियम यामध्ये हा शेर बरोबर बसतो, आणि अर्थही सुरेख आहे, पण संपूर्ण कवितेचा बाज बघता, हा शेर तिथे नसता तर अजून बरे वाटले असते... अर्थात हे माझे मत. आतापर्यंत इथे वाचलेल्या सर्व गझलांमध्ये हे मला सर्वात जास्त आवडली. -तुषार
|
वा सतिश!! मक्त्यात सुधारणा केल्यानंतर अर्थ फारच अगाध आहे असे जाणवले. स्पष्टच बोलायचे तर ह्या पद्दाला गद्दातून व्यक्त करणे माझ्यासाठी फारच कठीण काम आहे.तरीही मी प्रयत्न करतो -- 'उरे ना मुळी राहणे मीपणाने जणू सावली लीन बिंबात होते' इथे बिंब ह्या अर्थी 'सूर्यबिंब' अपेक्षीत असेल अशी आशा करतो. असो. --जगता जगता हा 'मी'पणाचा प्रवास शेवटी अश्या स्थितीला येऊन पोहोचला की हे 'मी'पण आता उरलंच नाही.समाधानाची एक परमोच्च अनुभूती इथून प्रकट होते. हे माझं 'मी'पण केवळ सावली सारखं होतं. ख-या अर्थाने विधात्याने जगण्याचा प्रकाश माझ्यावर टाकल्याने मला हे 'मी'पण अनुभवायला मिळालं. शेवटी ही सावलीही त्याच प्रकाशात विलीन झाली आणि हे 'मी' पण उरलंच नाही ,'मी' माझा उरलोच नाही! ------- हुश्श! इतकंच म्हणायचं होतं मला. शहाण्याने समीक्षेची पायरी चढू नये!!
|
Imtushar
| |
| Thursday, March 22, 2007 - 9:30 am: |
| 
|
पण आपण चढावी -तुषार
|
Mankya
| |
| Thursday, March 22, 2007 - 9:37 am: |
| 
|
मूळ शेर वाचल्यावर ( मक्ता ) रहावलं नाही .... लीन बिंबात होते .. शब्दरचना अप्रतिम जमलिये ! बहुतेक सगळ्या गोष्टींचं यश लपलय यामध्ये ! खूप आवडला हा शेर ! माणिक !
|
Nachikets
| |
| Thursday, March 22, 2007 - 12:18 pm: |
| 
|
सतीशजी, मस्त आहे गझल... मक्ता विषेश आवडला. अभिनंदन आणि पुढील लिखाणास शुभेच्छा!!!
|
Pulasti
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:47 pm: |
| 
|
देशपांडेजी, गझल खूप आवडली! सर्व शेर भावले. इंद्रजाल शेरातल्या अर्थाचा धूसरपणासुद्धा मस्त वाटला. मक्ता फार फार छान आहे. पण सगळ्यात भिडलेला शेर "कामकाज" - इतका contemporary विचार इतका थेट आलाय की .. क्या बात है! मनापासून शुभेच्छा. -- पुलस्ति.
|
Desh_ks
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:52 pm: |
| 
|
सार्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार. वैभव, तुम्ही हा जो उपक्रम केला आहे त्याच्या संदर्भात किती काम करत आहात याचा अंदाज केला तरी नवल वाटतं अणि तुमच्या या बद्दलच्या बांधिलकीचंही. आणि म्हणूनच तुम्ही अशी दिलगिरी व्यक्त करणं याचा मलाच संकोच वाटतो. खरं तर अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार. मयूर, सावली’ याचा प्रकाशाचा अभाव’ असा अर्थ घेऊन केलेल तुमच विवेचन मला आवडल. विशेषत: 'जगता जगता हा मीपणाचा प्रवास शेवटी अशा स्थितीला येऊन पोहोचला की हे मीपण’ आता उरलंच नाही' हे. नेमकं हेच मला म्हणायचं आहे. पण तो शेर लिहितानाची माझी कल्पना थोडी स्पष्ट करतो ‘सावली’ याचा एक अर्थ प्रतिबिंब’ असा ही आहे. आपल्या तत्व-विचारात एक विचार असा आहे की असणे’ हा गुण ज्या गोष्टीला आहे अशी गोष्ट एकच आहे’. आणि दोन पणाचा केवळ आभासच असतो. त्याला उदाहरण आरशात दिसणार्या प्रतिबिंबाच दिलं जातं. आरशाच्या माध्यमामुळे जो 'मी' एक आहे तो दोन असल्याचा भास होतो. आणि आरसा बाजूला गेला की केवळ मीच राहतो. प्रतिबिंब (आरशातल) कुठे जातं तर मूळ जो 'मी' त्याच्यातच. आणि अशा दोनपणाचा अनुभव (भासात्मक) देणार सर्वात प्रभावी माध्यम्’ काय तर आपला अहंकार. त्यामुळेच मला मी कुणीतरी’ आहे अस वाटत राहतं. हे माध्यम, हा अहंकार गेला की 'भासमान मी' वस्तुत: ‘असलेल्या त्याच्यात्’ लीन होतो. मला असं म्हणायच आहे. तुषार, मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ‘तुझ्या मंदिरी…’बद्दल तुम्ही म्हटल्या प्रमाणे तुझ माझ’ बोलण थेट होतं आहे आणि मला तुझ्या’ सर्वसामर्थ्यवान असण्याबद्दल शंका नाही, म्हणूनच मला दिसलेल्या विसंगतीची मी तुझ्याकडे’ तक्रार करतो आहे अस त्याचं स्वरूप आहे; तूच यावर काही उपाय करावा ही विनंती आहे. इतर शेर आवडल्याबद्दल सांगितलत त्याचा आनंद वाटला. मंक्या, नचिकेत, पुलस्ति, सर्वांचे अभिप्रायाबद्दल आभार. -सतीश
|
Chinnu
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:29 pm: |
| 
|
सतीश, तुझ्या मंदिरी.., तुझ्या आठवांना, नादात चालणे, तुझी साद.. मधील सर्वव्यापी तु! हे फार्फार आवडले. सावली लीन बिंबात होते. मस्तच!
|
|
|