|
Bee
| |
| Sunday, March 18, 2007 - 10:41 am: |
| 
|
वैशाख ऋतुने वर्हाड अगदी भाजून निघत होतं. खिडक्यांच्या गजावर बोट ठेवले असता विस्तवासारखा चटका बसावा इतके कडक ऊन. पारदर्शक तावदानांमधून दिसणारा मोगरा राजीखुशीने उन्हाचे चटके सोसून फ़ुलत होता. दरवाज्याच्या किरीतून मी न्याहाळून बघितलं. खरखर खर्याट्याने शांताबाई ३ वाजताच्या प्रखर उन्हात अंगण झाडत होत्या. अंगणात केर नाही, की गवत नाही, काडी नाही की कचरा नाही. तिची खरखर व्यर्थ वाटली आणि मी तिला आवाज दिला.. अहो काकू, कशापायी झाडलोट चालली आहे? मला बघून ती केविलवाणी हसली. मोरीतून ओंजळभर पाणी आणून तिने अंगणात शिंपले आणि खाली लवून अंगणात वाढलेल्या एकटदुकट हराळीला कुरवाळले. त्यावेळी मला 'श्रद्धांजली' मधील रोहीणी हट्टंगडीची आठवण झाली. त्या चित्रपटामधील शेवटचा प्रसंग. तसेच भाव, तिच संवेदना शांताबाईंच्या चेहर्यावर मी टिपली होती! मैदानाला लागून शांताबाईंचे घर होते. कडेला जरी पोरांचा घोळका असला तरी आत शांताबाईंच्या घरामधे एक चिरकाल पसरलेली शांतता होती. आता तर वय झाले म्हणून पण शांताबाई खूप आधीच खचून गेल्या होत्या. रोज उगवणारा दिवस आणि मावळणारी संध्याकाळ ह्यात काहीच फ़रक तिला वाटतं नव्हता. कडी लावून शांताबाई आतमधे एकदा गेल्यात की काही काम असल्याखेरीज बाहेर येत नसत. तिच्या उठण्याच्या कामाच्या वेळा इतक्या वेगळ्या होत्या की शेजारीपाजारी तिला क्वचित बघतं. एकदा मोह झाला आणि माझी वाट शांताबाईच्या घराच्या दिशेने वळली. मी कडी वाजवली पण शांताबाईंनी काही दार उघडले नाही. रस्त्यावरून पळत जाणारा संत्या म्हणाला त्या कुणासाठीच दार उघडत नाही. मी माघार फ़िरली, पण परत एकदा मायेने हाक दिली, शांताकाकू, उघडा ना दार! कोण जाणे तिला माझ्या शब्दातील अधीरता जाणवली की काय, तिने हसत दार उघडले. वंदन करुन मला आत बोलाविले. चहाचे आधण ठेवताना फ़ळीवरची वाटी खाली पडून खूप वेळ गोल गोल फ़िरत आवाज करत राहीली. क्षणभर वाटले संपूर्ण घर फ़िरत आहे. शांताबाईंनी खूप दिवसानंतर आवाज ऐकला की काय त्यांनी दोन्ही कानावर आपले हात ठेवले. मी म्हंटले, चहा नको, त्यापेक्षा सहज बोलायला आवडेल मला तुमच्याशी. हे वाक्य संपण्या आधी मी हळूच म्हंटले 'जर हरकत नसेल तर'. आणि त्या हसल्या, म्हणाल्या खरे तर मी कुणाशीच बोलत नाही. माझे जग वेगळे आहे. मी माझ्या भुतकाळात रमते. मला तुमच्या वर्तमानाशी काही घेणेदेणे नाही. इतक्यात मी गप्पांचा ओघ बदलला. त्यांना परत त्यांच्या भुतकाळात नेऊन कुठल्याच सुखदुःखाचा उहापोह मला करायचा नव्हता. न जाणताच मला खूप काही ओळखता आले. काहीतरी स्पर्श झाले. म्हणून विषय बदलत विचारले, तुम्हाला पंख्याशिवाय उन्हाळा कसा काय सहन होतो? तुमच्या ह्या भिंतीवर हे ओहोळ कशाचे आहेत? खूप वर्षापुर्वी पूर आला होता त्याचे का? मग बोलता बोलता त्यांनी मला त्यांचे घर दाखविले. नाझिच्या लोकांपासून लपून बसलेल्या ऍनी फ़्रॅंकच्या घराची मला आठवण झाली. एखादे antique घर वाटवे तसे होते ते घर! त्या घरातील भिंतींचे स्पर्श निर्जीव नव्हते. त्यांना एक चेतना होती, एक लहर होती. आम्ही दोघे पाठिमागील परसात आलो. तिथे उन्हामुळे काहीच नव्हते. ऐरवी जांभळी फ़ुलपाखरे लेवून फ़ुलणारी गौकर्णी वाळून तंतूमय झाली होती. वरतून ठिबकणार्या पाण्याच्या टाकीमुळे, भिंतीवर ओल फ़ुटली होती. तिच्यावर इवलाली रोपटी उगवलेली दिसली. शांताबाई त्या रोपट्यांना आता कुरवाळतील असे मला क्षणभर वाटून गेले. हे असे का वाटले? खरे तर खूप वर्षांपुर्वी मी अलोनची कविता 'मौजेत' वाचली होती. घरी पोचल्यानंतर त्या अंकाची धुळ झटकत नव्या गंधरुपाने ती समोर आली आणि शांताबाईंचा चेहरा तिच्यात प्रतिबिंबित झाला होता.. माझ्या चंद्रमौळी घरी आल्या पावसाच्या सरी जशा सणाला माहेरी येती लेकी तृप्त आषाढ - श्रीमंती घर होय जळवंती चढे पायातुनी भिंति प्रेम - ओल जीवभये उडे झोप खचे पायातून बाप भिंतीवरी बाळरोप जीव धरी... नोंद - वरील कविता मौज दिवाळी अंक सन १९८९ मधून घेतलेली आहे. कवी अलोन ह्यांची कविता.
|
Saee
| |
| Tuesday, March 20, 2007 - 11:10 am: |
| 
|
चांगलं आहे पण काही वेळा फारच साहित्यिक भाषा वापरतोस. त्यामुळे सहजसोपी वाक्येही जडबंबाळ वाटतात आणि कृत्रिमता येते. कविता मात्र छान आहे आणि तिचा संदर्भही उत्तम वापरला आहेस.
|
Ashwini
| |
| Tuesday, March 20, 2007 - 11:32 am: |
| 
|
बी, सुरूवात उत्तम झाली होती. आणि शेवटही सुरेख आहे, मध्ये जरा गडबडल्यासारखे वाटते आहे.
|
Bee
| |
| Wednesday, March 21, 2007 - 2:19 am: |
| 
|
हे ललित मी लिहू की नको लिहू? अशा मनःस्थितित लिहिले आहे. सई, अश्विनी अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! जेन्व्हा आपण वेगळे काहीतरी करतो तेंव्हा चार लोकांचा अभिप्राय नक्कीच महत्त्वाचा ठरतो.
|
Ek_mulagi
| |
| Wednesday, March 21, 2007 - 2:24 pm: |
| 
|
बी छान लिहलस. सई म्हणते तस भाषा थोडी जड झालीय.
|
|
|