|
Cool
| |
| Tuesday, December 27, 2005 - 12:34 pm: |
|
|
गेल्या महिनाभर प्रत्येक रविवारी दुर्गभ्रमण चालु असल्यामुळे बरिचशी महत्त्वाची कामे राहुन गेली होती त्यामुळे या रविवारी ती सर्व कामे उरकुन थोडासा आराम करावा असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे जीएस ला सुद्धा कळवलं, पण त्यातुन त्याने या रविवारी ढाकचा बहिरी करायचं असं सांगितल्यामुळे मनाची पुन्हा घालमेल झाली कारण तो ट्रेक सुद्धा चुकवता येण्यासारखा नव्हता. पण नाइलाजाने त्याला नकार द्यावा लागला. याच मनस्थितीत पुण्यात पोहोचलओ आणि रात्री झोपण्याची तयारी करत असतांनाच माझा फोन गुरगुरला (खणखणला हवं होतं पण फोन Vibrator मोड वर असल्यामुळे गुरगुरला :-) ) माझे पुण्यातले काही मित्र सिंहगडावर जाणार होते त्यातील एका मित्राने येतोस का म्हणुन विचारण्यासाठी फोन केला होता. कुठलाच नाही तर निदान सिंहगड करावा म्हणजे व्रत मोडणार नाही असा विचार करुन मी लगेचच होकार दिला. पण नंतर लगेचच जायचच आहे तर मग दुसया एखाद्या किल्ल्यावर का जाउ नये असा विचार मनात आला . गडांचा राजा, राजांचा गड राजगड बघण्याची इच्छा खुप दिवसांपासुन होती. दोनच आठवड्यापुर्वी तोरण्याला गेलो होतो त्यावेळी राजगड खुणावतच होता. म्हणुन लगेचच मी त्याला फोन करुन आपण राजगडावर जाउयात असा निरोप दिला. पण इतरांपासुन ही गोष्ट निदान सकाळ पर्यंत लपवुन ठेवावी लागणार होती कारण त्यातले काही जण सिंहगड वर जाण्यासाठी सुद्धा मोठ्या मुश्किलीने तयार झाले होते. ठरल्याप्रमाणे सकाळी सर्वजण साडेसहाच्या आसपास स्वारगेट वर गोळा झाले होते, पण मलाच थोडा उशीर झाला. पोहोचताच आम्ही दोघांनी इतर सर्वांना आपण सिंहगडावर न जाता राजगडावर जाउयात असं 'पटवलं'. सिंहगडावरच जायचं असल्यामुळे कोणीही विशेष तयारी न करता आले होते फक्त एकाच जणाकडे सर्वांना पुरतील एवढ्या पोळ्या आणि भाजी होती. तेवढ्यावरच आम्ही प्रवासाला प्रारंभ करायचं ठरवलं. थोडासा उशीर झाल्यामुळे सकाळी साडे सहाची वेल्हाकडे जाणारी बस चुकली होती आणि पुढची बस आठ वाजता असल्याचं कळलं. मग मी तेवढ्यात सर्वांना दिवसभराचा plan सांगितला. राजगडाकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत असं एकलय, पैकी मला माहीती असणारा मार्ग म्हणजे स्वारगेट वरुन वेल्ह्याला जाणारी गाडी पकडायची, वेल्ह्यापासुन थोडंस अलिकडे मार्गासनी नावाचं एक गाव आहे, तिकडे उतरुन मग गुंजवणे गावात जाण्यासाठी साधन मिळवायचं. मार्गासनी ते गुंजवणे गाव हे अंतर साधारण सात-आठ कि.मी आहे. स्वारगेट वरुन थेट गुंजवणे गावात जाण्यासाठी सुद्धा बस उपलब्ध असते. आमची ती बसं चुकल्यामुळे आम्ही मार्गासनी पर्यंत पोहोचण्याचं ठरवलं. एस टी त बसल्याबरोबर लक्शात आले की आपल्याकडे पाण्याच्या फक्त तीन-चारच बाटल्या आहेत मग पुढे गावात पोहोचल्यावर पाणी घेउयात असा विचार आम्ही केला. माझ्याबरोबर असणारे माझे हे मित्र मी नगरला Collage ला असतांचे माझे साथिदार, सध्या नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात आहेत. पण सर्वांचे off वेगवेगळे असल्यामुळे एकमेकांना भेटण्यासाठी आवर्जुन असे रविवार शोधावे लागतात. त्यामुळे बस मधे बसल्याबरोबर जुन्या आठवणी आणि नव्या जगातील अनुभव यांची एक मैफल जमली. याच नादात मार्गासनी गाव केंव्हा येउन पोहोचले हे आम्हाला कळले सुद्धा नाही. उतरल्याबरोबर समोर दिसणाया एका hotel मधे आपण काहितरी खाउन घेउयात अशी सर्वांनी फर्माईश केली पण एव्हाना साडेन उ वाजले असल्यामुळे पुढे चढतांना खुप उन लागेल हा हिशोब करुन आपण गुंजवणे गावात गेल्यावर बघु अशी मी सुचना मांडली. नाखुषीने सर्वांनी होकार दिला आणि पुढचा प्रश्न लगेचच उभा राहीला की आता गुंजवणे पर्यंत जाणार कसे? गाडि शोधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. मग चालत गेल्याशिवाय पर्याय नाही म्हटल्यावर चालायला सुरुवात करावी लागली. माझ्या डोळ्यासमोर मागचा रविवार उभा राहिला. मागच्या रविवारी सुद्धा गोरखगडावर जातांना सात-आठ कि.मी. चालत जावे लागले होते आणि या रविवारी सुद्धा! फरक एवढाच की मागच्या रविवारी रात्र होती आणि आता उन चटके देत होते पण वेडात दौडलेल्या सात मराठे विरांची आठवण ठेवत आम्ही चालत होतो. चालत असतांना मधे एक उसाचे शेत लागले, तिकडे शेतकरी दादांनी आम्हाला बोलावुन उसाचे एक एक कांडे दिले मग त्याचा आस्वाद घेत आम्ही पुढे निघालो. उन्हामुळे चालण्याचे श्रम जाणवत होते पण नजरेत राजगड भरला होता आणि म्हणुनच आम्ही भारावल्या सारखे चाललो होतो. वाटेत साखर नावाचे एक गाव लागले. तिथुन पुढे निघालो असतांना आम्हाला रस्ता दुरवर जातांना दिसला आणि एका डोंगराला वळसा घालुन तो परत समोर आलेला दिसला म्हणुन आम्ही मग shortcut घेत तो वळसा टाळण्याचे ठरवले, आणि शेतावरुन उडया मारत त्या रस्त्यावर पोहोचलो. पुढे दहा मिनिटे चालत गेल्यावर काही घरं दिसली. घड्याळ अकराची वेळ दाखवत होते म्हणुन अजुन किती अंतर जायचे आहे असा साधा प्रश्न आम्ही एका गावकयाला विचारला. आणि त्याने दिलेल्या उत्तराने आमची तोंडे बघण्यासारखी झाली. वास्तविक ज्या रस्त्याला आम्ही वळसा घालुन आल्यासारखा समजत होता तो वेगळा रस्ता होता आणि आम्ही गुंजवणे गावाच्या एकदम विरुद्ध दिशेला येउन पोहोचलो होतो.
|
Cool
| |
| Tuesday, December 27, 2005 - 12:37 pm: |
|
|
त्यातच इथे खाण्यासाठी काहीही व्यवस्था होऊ शकणार नाही आणि पाण्याच्या बाटल्या सुद्धा मिळणार नाहीत आणि आता गुंजवणे गावात जाणे सुद्धा शक्य नव्हते. आता आम्हाला राजगड दिसतही नव्हता. "समोर दिसणारा डोंगर चढुन जा आणि त्या बाजुने उतरा म्हणजे तुम्ही बरोबर किल्ल्याच्या सोंडेवर पोहोचाल मग तुम्हाला बरोबर गुंजवणे कडुन येणारा रस्ता दिसेल तोच रस्ता तुम्हाला गडावर घेउन जाईल " अशी माहीती आम्हाला मिळाली आणि आम्ही थकवा बाजुला सारुन लगेचच चढायला सुरुवात केली. रणरणतं उन, पोटात काहीही नाही अश्या परिस्थीत चढणे म्हणजे खरोखर एक वेगळाच अनुभव होता. झपाझप आम्ही तो डोंगर पार् केला खरा पण त्याच्या डोक्यावर असलेल्या एका झाडाखाली बसण्यापासुन आम्ही स्वतःला रोखु शकलो नाही. सकाळी घेतलेला एक कप चहाच्या जोरावर आम्ही जेवढी Energy होती ती सर्व संपली होती त्यामुळे जेवण करणे क्रमप्राप्त होते. त्याच झाडाखाली आम्ही जेवायला सुरुवात केली. जेवणाची चव अवर्णणीय होती, कदाचित आमच्या भुकेमुळे सुद्धा असेल. थोडेसे खाउन आम्ही उठलो. आमच्या कडचे सगळे पाणी आता संपले होते. जेवल्यानंतर लगेचच आम्ही चालायला सुरुवात केली, जेवण केल्यामुळे चालण्यास गती आली होती. पटपट चालत आम्ही मुख्य सोंडेच्या मध्यावर आलो. इथुन आम्ह्लाला समोर गड, आणि मागे गुंजवणे गाव आणी आम्ही चुकवलेली वाट सारे काही दिसत होते. रविवार आणि नाताळची सुट्टी असल्यामुळे आम्ही चढायला सुरुवात केल्यापासुन आम्हाला बरेचसे ट्रेकर्स भेटत होते. पैकी काही जणांनी गडावर मुक्काम केला होता तर काही सकाळी सकाळी चढुन खाली उतरत होते. आमच्या बघतांना दुपारच्या टळ्टळीत उन्हात चढणारे हे कोण वेडे असाच प्रत्येकाच्या चेहयावर भाव होता. सोंड संपत असतांनाच दोन्ही बाजुने कारवीच्या झाडी आहेत. त्याच्यातुन वाट काढत आम्ही गडाच्या बुरुजाखाली आलो. बुरुजाखालुन उजव्या बाजुने पायवाट धावत होती, त्या पायवाटेने आम्ही चालत निघालो. पुढे एका ठिकाणी थोडासा कटीण patch आहे पण डाव्या बाजुला रेलिंग लावलेले असल्यामुळे चढणं एकदम सोपे होउन जाते. सावरत सावरत आम्ही वर पोहोचलो आणि 'चोर दरवाजा' नावाच्या दरवाज्यात जाउन बसलो. तिकडुन मागे बघितले तर आमच्या सर्व श्रमाचा मोबदला दिल्यासारखे दृश्य समोर दिसत होते. दुरवर धावणारी सोंड, खाली खोल दरी. चोर दरवाजा नावाप्रमाणेच आहे, साधारण साडेतीन चार फुट उंची असेल. तिथुन वर निघाल्याबरोबर आमचे लक्श एका तळ्यावर (पद्मावती तळे) गेले आणि आम्ही त्याच्याकडे धावलोच. तळ्यातील पाणी अत्यंत थंड होतं, त्या पाण्याने आमचा सगळा थकवा धुवुन काढला. तळ्याच्या बाजुन चालत आम्ही समोर पोहोचलो. समोर डाव्या बाजुला शाळेसारख्या काही खोल्या होत्या आणि तिकडे काही पर्यटक मंडळींचा मुक्काम होता, त्यांच्या स्वयंपाकाची तयारी आतुन येणाया धुरावरुन दिसुन येत होती. त्यांना मागे टाकुन पुढे जाताच प्रशस्त असे पद्मावतीचे देउळ दिसते. मंदिराच्या आत गेल्यावर निशब्द वातावरणात आम्ही सर्व समाधी लागल्या सारखे बसलो होतो. आत एकुण तीन मुर्त्या आहेत. आणि मंदिर एवढे प्रशस्त आहे की वीस पंचवीस जण आरामात मुक्काम करु शकतात. अत्यंत शांत वातावरणात बसल्यानंतर उठण्याचा कंटाला आला होता पण अजुन बालेकिल्ला बघायचा होता. म्हणुन आम्ही निघालो, निघत असतांना एका दुर्गभ्रमण संस्थेने लावलेल्या फलकावर आमचे ध्यान गेले. "छ्त्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यात जवळपास तिनशे किल्ले होते. त्यापैकी काही त्यांनी स्वतः बांधुन घेतले होते तर काही पराक्रमाने जिंकले होते पण तरिही त्यातील एकाही किल्ल्यावर आपले नाव कोरुन ठेवावे असे त्यांना वाटले नाही कारण स्वतःच्या कर्तुत्वाने त्यांनी स्वतःला जोडले होते. आणी आम्ही मात्र कपाळ करंटे याच गड किल्ल्यावर आमचे नाव कोरुन त्यांना शरम येईल असे वागतो.........." असा काहीसा तो फलक होता. त्यातील अत्यंत प्रभावशाली शब्दात लिहिलेल्या संदेशाने काहीतरी फायदा होईल असा विश्वास वाटला. मंदिरातुन बाहेर आल्याबरोबर डाव्या बाजुला दोन विहिरी आहेत, या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत, त्यांना झाकण बसवलेले आहेत. त्याच्यातुन पाणी शेंदण्यासाठी आम्ही एका ताक विकणाया आजी कडुन त्यांचं भांडं मागितलं पण ताक घेणार असाल् तरच भांड मिळेल अशी आजी बाईंनी अट घातली. त्यांची अट मान्य करुन आम्ही पाणी शेंदण्यास सुरुवात केली. संपुर्ण गड चढुन येईपर्यंत कुणीही पाणी पिलं नव्हतं त्यामूळे पाण्याची आम्हा सर्वांना अत्यंत गरज होती. मनसोक्त पाणी पिउन आम्ही बाटल्या भ्ररुन घेतल्या आणि मग अटीप्रमाणे आजीबाईंकडे ताक पिण्यासाठी बसलो. बोलत असतांना त्या भुतोंडे गावातुन चढुन आल्याचं कळलं आणी सकाळपासुन ट्रेकर्स मंडळींनी फक्त पाण्यासाठीच भांडी वापरली पण ताक कुणी घेतलं नाही म्हणून त्यांनी सशर्त भांडी द्यायला सुरुवात केल्याचं कळलं आणी आम्ही लगेचच त्याचं समर्थन केलं. तिथे समोरच महाराणी सईबाईंची समाधी आहे, छत्रपतींच्या प्रथम पत्नी, संभाजीराज्यांच्या मातोश्री महाराणी सईबाई विषयी मी फक्त श्रीमान योगी पुस्तकातच वाचलय आणि जे काही वाचलय त्यावरुन त्यांची मनात उभी राहणारी प्रतिमा आठवत त्या समाधीजवळ बसलो. तिकडुन पुढे बालेकिल्ल्याकडे निघालो, उजव्या हाताला एक छोटंसं पुर्वाभिमुख मंदिर आहे, बाहेरुन डोकावुन बघितल्यावर आतील शिवलिंग दिसले पण तिकडे दोन पथाया टाकलेल्या होत्या आणि ती मंडळी आत साफ सफाई करतांना दिसली. तिथुन पाययांनी वर जात असतांना डाव्या बाजुला दारुगोळा कोठार आहे आणि उजव्या बाजुला सदरेचे काही अवशेष शिल्लक आहेत. ते पाहुन झाल्यनंतर पुढे बालेकिल्ल्याकडे निघालो. एका ठिकाणी दोन रस्ते फुटत होते आणि बाजुला एक पाटी लावलेली होती,'सुवेळा माची' पण त्याच्या खाली दिशादर्शक बाणच गायब झाल्याने नेमका कुठला रस्ता बालेकिल्ल्यावर जातो आणि कुठला रस्ता माचीवर ते एक क्शण लक्शात आले नाही, थोडेसे पुढे जाउन पाहिले असता डावीकडील रस्ता दुर धावणाया माचीकडे जातांना बरोबर दिसला मग आम्ही उजवीकडचा रस्ता पकडुन बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो.
|
Cool
| |
| Tuesday, December 27, 2005 - 12:40 pm: |
|
|
हाच रस्ता थोडासा पुढे गेल्यावर पुन्हा दोन रस्ते फुटतात, पैकी डावीकडील रस्ता बालेकिल्ल्याकडे घेउन जातो आणि उजवीकडील रस्ता पाली दरवाज्याकडे जातो. बालेकिल्ल्याकडे जात असतांनाची वाट खुपच सुखद आहे, उजवीकडे बालेकिल्ल्याच्या उंचच उंच कातळ आणि डावीकडे गच्च झाडी. पुढे चालत गेल्यावर वर चढण्यासाठी दगडांमधुन जाणारा रस्ता दिसतो. हा सुद्धा एक अवघड टप्पा आहे पण इकडे सुद्धा रेलिंग लावलेले असल्यामुळे तितकासा त्रास होत नाही. जपुन चालत गेल्यावर पुढे एक वळण घेतल्याबरोबर गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. त्याचं नाव महा दरवाजा या दरवाज्यावर पोहोचल्याबरोबर त्याच्याकडे पाठ करुन बसायला विसरु नये. समोर सोंडेवर पुर्वेकडे धावणारी सुवेळा माची , तिच्यावर शाबुत असलेली तटबंदी, माचीच्या डाव्या आणि उजव्या बाजुला दिसणारे घनदाट जंगल, अप्रतिम नजारा. इथेच आम्हाला एक गृहस्थ भेटले, अवलिया शोभणारी हि व्यक्ती डोंबिवली वरुन आली होती. प्रत्येक रविवारी कुठला ना कुठला गड बघणे हा त्यांचा रिटायरमेंट नंतरचा छंद होता. मग त्यांच्या बरोबर केलेल्या गप्पांमधुन त्यांनी आतापर्यंत केलेल्या अनुभव आम्ही ऐकले. त्यांनी गोरखगड, सिद्धगडासारखे गड सुद्धा सर केले असे कळले. हा माणुस या वयात सर्व किल्ले चप्पल घालुन चढतो हे ऐकुन तर त्याला नमस्कार करावासा वाटला. अशी माणसं भेटली की गडभ्रमणाचं सार्थक झाल्यासारख वाटतं. त्यांचा निरोप घेउन दरवाज्यातुन उठुन आम्ही चालु लागलो, पुढे अलिकडेच बांधलेल्या पायया नजरेस पडल्या त्यावरुन चढुन गेल्यावर समोर तीन तळी एकमेकांच्या बाजुला दिसली. तळ्याच्या डाव्या बाजुने आणखी थोडेसे वर चालत गेल्यावर आपण गड माथ्यावर येउन पोहोचतो. इथेच काही भग्नावस्थेतील चौथरे दिसले. आणि आता इथुन आम्हाला डोळाभरुन राजगड दर्शन देत होता. समोर तोरणा दिसत होता, डाव्या बाजुला संजिवनी माची आणि उजव्या बाजुला खाली राजवड्याचा भाग, सदर वैगरे दिसत होते. तळपत्या उन्हात आम्ही त्याच चौथयावर बसलो आणि आता हेच उन चटका सुद्धा देत नव्हते, गड चढण्याचा आनंद, आणि गडावरील भारावलेलं वातावरण यामुळं आम्ही खुप वेळ तिथेच बसुन राहु शकलो. डोळाभरुन सर्व सौंदर्य अनुभवले, आता परतावे लागणारं होतं पण मन सुवेळा माची, संजिवनी माची शेवट्पर्यंत बघावं असं सांगत होतं, नाईलाजाने परत फिरलो. परततांना पुन्हा लवकरच परत येण्याचा निश्चय मात्र केला. गुंजवणे गावातुन चार वाजता शेवटची स्वारगेटला जाणारी गाडी असते ती पकडायची होती कारण ती चुकल्यास परत सात-आठ कि.मी चालावे लागणार होते आणि तेवढी शक्ती कुणातही शिल्लक नव्हती. म्हणुन धावत पळत आम्ही गड उतरायला सुरुवात केली. उतरतांना बरोबर वाट पकडुन आम्ही गुंजवणे गावात पोहोचलो, आम्ही पोहोचलो तेंव्हा चार वाजत होते त्यामुळे आम्हाला ती बस मिळणार नाही अशी आमची खात्री झाली. आणि उतरल्याबरोबर जाउन चौकशी केली असता बस अजुन आलीच नसल्याचं कळलं. दुपारचं जेवण चुकल होतं आणि आता सुद्धा बसची वाट पहायची होती त्यामुळे जेवण शक्य नव्हतं. म्हणजे आमचं पुर्ण दुर्गभ्रमण जवळ्पास अन्नपाण्यावाचुन झालं होतं. मग सर्वांनी माझा निषेध केला आणि माझं मन भुतकाळात डोकावलं. मागे एकदा मी विसापुर लोहगडावर जेवण न मिळाल्याबद्दल जीएस चा जोरदार निषेध केला होता (History Repeats :-)) मग तिकडेच बाजुला सुवेळा नावाच्या होटेल मधे कांदापोह्यांची order दिली. फ्रेश होईपर्यंत कांदापोहे तयार झाले होते. या होटेलच्या आवारातच एका संस्थेने राजगड किल्ल्याची एक खुप सुंदर प्रतिकृती बनवुन ठेवली आहे. त्या प्रतिकृती मधे सर्व गडाची व्यवस्थित माहिती दिली आहे. त्यात आपला बराचसा गड बघायचा राहिला आहे हे लक्शात आलं. कांदापोह्यांचा प्लेट हातात येणार तोच बस आल्याचं कळलं, मग काय धावपळ करायला सुरुवात केली आणि पार्सल बनवुन द्यायला सांगितलं. त्यावर होटेल च्या मालकांनी तुमच्या Request वर गाडी थांबेल, तुम्ही आरामात खा अशी माहीती दिली. आणि खरोखर गाडी आमचं खाउन होईपर्यंत थांबली. चहा मारुन गाडीत जाउन बसलो. आणि गाडी स्वारगेटच्या दिशेने निघाली. गडव्हेंचर सोबत सुरु केलेलं हे व्रत अतुट राहिल्याचा आनंद मनात होता. त्याच बरोबर अनेक वेळेला त्या सर्वांची आठवण सुद्धा आली. माझ्या बरोबर आलेल्या मंडळींपैकी सर्वजणांना उन, भुक, तहान या सर्वांचा त्रास होऊन सुद्धा हा अनुभव मनापासुन आवडला होता आणि त्यांच्या थकलेल्या चेहयावरील समाधान त्याची खात्री पटवत होतं.
|
Gs1
| |
| Tuesday, December 27, 2005 - 1:17 pm: |
|
|
वा मजा केलीत की रे. गुंजवणीचे पोहे छान होते का ? राजगड, रायगड, हरिश्चन्द्रगड वगैरे नीट बघायचा तर एक दिवस तरी रहायला पाहिजे.
|
Cool
| |
| Tuesday, December 27, 2005 - 1:21 pm: |
|
|
पोहे खुपच छान होते आणि BTW त्यांच्या कडे Non-Veg सुद्धा चांगले मिळते.. आणि राहण्याचं म्हणशील तर आपण जाणार आहोतच की रहायला..
|
Dhumketu
| |
| Thursday, December 29, 2005 - 10:09 pm: |
|
|
जर ऊन जास्त लागत असेल तर गुंजवणे दारातून चढणे फ़ायद्याचे ठरते. बर्यापैकी झाडी आहे. पण चुकण्यासारख्या जाग आणी माकडे अनेक.
|
Mansoon
| |
| Wednesday, August 01, 2007 - 10:39 am: |
|
|
आम्हाला राजगडावर एक रात्र पावसाळ्यात काडायची आहे तर ते शक्य होईल का?.किव्हा जेवण बनवण्याची व राहण्यची सोय होइल का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|