Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2007

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » तेरेखोल ते विजयदुर्ग : सफर सिंधुदुर्ग किनार्‍याची » Archive through May 11, 2007 « Previous Next »

Gs1
Wednesday, May 09, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेरेखोल ते विजयदुर्ग : सफर सिंधुदुर्ग किनार्‍याची.
general

यशवंतगडावरून दिसणारा मनोरम सागरकिनारा.

वेळेअभावी संक्षिप्त वृत्तांत लिहिणार आहे. सहभागी झालेल्यांपैकी इतर कुणाला शक्य असल्यास विस्तार करावा.



Gs1
Wednesday, May 09, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कोकणच्या भूमीचे स्वतःचे असे एक खास आकर्षण आहे. गोनिदांच्या मृण्मयीला वाटणारे हे अनामिक आकर्षण गोनिदांसारखे शब्दात मांडता नाही आले तरी अनेकांना त्याच तीव्रतेने वाटत आलेले आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यातला किनारी भाग म्हणजे तर शेजारच्या रमणीय गोव्यापेक्षाही काकणभर सरस आणि तरीही गर्दीपासून मुक्त असा नितांत सुंदर प्रदेश.

अशा या किनारी सिंधुदुर्गाची सफर करण्यास कूल, आरती, फदि,प्रसाद मोकाशी, सुलभा, दक्षा असे सात जण शनिवारी २८ एप्रिलला चार वाजता निघालो. कोल्हापूर, गगनबावडा, कणकवली, कुडाळ असा प्रवास करत वेंगुर्ल्याला पोहोचेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली. वेंगुर्ल्याच्या थोडे पुढे शिरोड्याकडे जाताना तीन चार किमीवरच सागरेश्वराचा समुद्रकिनारा आहे, तिकडे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे, त्याच्याजवळच गाडी थांबवली. पांढऱ्याशुभ्र मऊसूत वाळूची एक अगदी छोटीशी टेकडी चढून उतरलो की समोर सागरेश्वराचे किनाऱ्यावरचे देऊळ दिसू लागते. देवळाचे आवार प्रशस्त आहे, पाण्यासाठी एक विहीर आहे. जागा पसंत पडली आणि लगेच मुक्काम ठोकण्याची तयारी सुरू केली. पण त्यापूर्वी थोडा वेळ समुद्रावर जाऊन चंद्रप्रकाशात लखलखणाऱ्या लाटा बघायचा मोह आवरला नाही. समुद्राला उधाण येत होते, या भागात एकूणच लाटांचा जोर फार. सिंधुसागराला भेटून लगेच परत जावेसे वाटत नव्हते, पण आता त्याच्याच सान्निध्यात तीन दिवस आहोत अस स्वतःला समजावत देवळात आलो. आत इतके उकडत होते की बाहेर अंगणातच पथाऱ्या पसरल्या. चारशे किमीचा प्रवास करून सिंधुदुर्ग किनाऱ्यावर पोहोचून पहिला दिवस संपला.

रविवार २९ एप्रिल, पहाटे लवकर उठून आवरून निघालो, पावसाची रिमझिम सुरू झाली होती. शिरोड्याकडे वळलो, शिरोडा ओलांडले आणि तेरेखोलला पोहोचलो. तेरेखोलच्या खाडीपलीकडे गोव्याची भूमी दिसत होती. खाडी अलिकडचा तेरेखोल किल्लाही जरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडलेला असला तरी राजकीय दृष्ट्या गोव्यातच मोडतो. आमचा सर्व प्रवास हा या दक्षिण टोकाकडून सुरू होऊन, विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर टोकाशी संपेल अशी योजना केली होती. एम एस एच ४ या राज्य सागरी महामार्गावरून हा सगळा प्रवास किनाऱ्याकिनाऱ्याने होणार होता. तो किती सुंदर असणार आहे याची पहिलीच झलक वाटेत मोचेमाडला दिसली. टेकडीवरून जाणारा रस्ता, खाली गच्च हिरवी माड, पोफळी, काजू, आंबे , कोकम यांची दाटी, पलीकडे शुभ्र वाळूचा पट्टा आणि मग नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला निळा समुद्र.

अगदीच छोटेखानी असा तेरेखोलचा किल्ला आता हॉटेलात रूपांतरित केला आहे. पण पर्यटकांना किल्ला बघण्यासाठी नऊ ते पाच या वेळात प्रवेश दिला जातो. जॅकी श्रॉफ सध्या मुक्कामाला आहे अशी माहिती रखवालदाराने दिली. किल्ल्यात एका बुरुजावरच कॉफी शॉप थाटलेले आहे. आतले चर्च मात्र स्थानिकांच्या ताब्यात आहे. किल्ल्याची बांधणी पोर्तुगीज आहे आणि बहुतांश काळ अंमलही त्यांचाच होता.


jhad
यशवंतगडाच्या भिंतीतले एक झाड, की झाडाचे चित्र ???


तेरेखोलनंतर उत्तरेकडचा पहिला किल्ला म्हणजे रेडीचा यशवंतगड, झटणं वाटेत मँगेनीजच्या खाणी दिसतात. किल्ल्याजवळच्या किनाऱ्यावर गाडी लावून दहाच मिनिटात आपण किल्ल्यात पोहोचतो, या भागातल्या सर्वच सागरी किल्ल्यांचे वैशिष्ट्य असलेले विस्तीर्ण खंदक प्रथम इथेच पाहिले. बांधकामाचे भरपूर अवशेष तर शिल्लक आहेतच, पण त्यातही विशेष म्हणजे गडाच्या उंचच उंच भिंतींवर वडाच्या मुळांनी विणलेले जाळे. हे सारे नक्षीकाम पुढे याच भिंती पाडणार याने एकीकडे अस्वस्थ वाटले तरी त्याचे सौंदर्य नक्कीच भुरळ पाडणारे आहे. गडावर बाकी झाडेही भरपूर आणि त्याबरोबरच लंगूर टोळ्यांचा मुक्त संचारही. बुरुजावरून होणारे समुद्रकिनाऱ्याचे दर्शनही अफाट. आता हा किल्लाही लीला हॉटेलच्या ताब्यात चालला आहे असे कळले. किनाऱ्याकडून पुन्हा किल्ल्यात शिरले की एक गणपतीचे छोटेसे देऊळ आहे. शिवरायांनी ताब्यात घेतल्यावर त्याचे यशवंतगड असे नामकरण झाले असावे यात काही शंका नाही. रेडीलाच आहे जांभ्या दगडातला महागणपती, वीस एक वर्षापूर्वी एका खाण कर्मचाऱ्याला स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यानुसार गावकऱ्यांनी डोंगर खणला, तेव्हा हा प्रचंड गणपती जांभ्या पाषाणात कोरलेला आढळला, अजून खाली खोदले असता, त्याला साजेसा असा मोठा मूषकही आढळला. मग आजूबाजूचा सर्व भाग खोदून काढून इथे मंदिर बांधण्यात आले आहे.भडक रंग देऊन मूर्तीच्या मूळ सौंदर्याला मात्र गालबोट लागले आहे. जवळच प्राचीन नवदुर्गेचे देऊळही आहे.

रेडीच्या नितळ पारदर्शक समुद्रात पाय ओले करून निघालो, आणि मग आरवली, शिरोडा, मोचेमाड, सागरतीर्थ या वाटेतल्या समुद्रकिनाऱ्यांचे कधी दूरूनच दर्शन घेत तर कधी दहा मिनिटे पाण्यात जात असे पुन्हा वेंगुर्ल्याला पोहोचलो. वेंगुर्ल्याला एक डचांनी व्यापार आणि संरक्षण यासाठी बांधलेला भुईकोट उर्फ डचांची वखार आहे. पण अगदी जवळ राहणाऱ्या स्थानिकांनाही त्याची माहिती नाही. डचांची वखार असे आम्ही विचारताच आपापसात चर्चा करून त्यांनी आम्हाला काहीतरी खरेदी करायचे आहे असा निष्कर्ष काढला. वखार एकूण धोकादायक स्थितीत आहे, आत प्रवेश करू नये असा लावलेला फलक हीच काय ती त्या वखारीची सरकार घेत असलेली दखल. आक्रमक म्हणून आले असले तरी तीनशे वर्षापूर्वी असे परक्या देशात जाऊन बस्तान बसवायचे या धडपडीचे वखार बघताना कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. सुदैवाने कुठलाही धोका न होता वखार बघून बाहेर पडलो.


bhgave

भोगवेचा किनारा, किल्ले निवतीवरून दिसणारा.

पुन्हा उत्तरेकडे प्रवास सुरू. एम एस एच ४ सागरी महामार्ग असे भारदस्त नाव असलेल्या या रस्त्यावर समोरासमोरून दोन गाड्या आल्या तर जाऊ शकत नाहीत इतपत रुंद असा हा रस्ता आहे, पण फारशी वर्दळ नाही आणि बघावे तिकडे निसर्गाचा वरदहस्त, त्यामुळे आम्हाला हा प्रवास खूपच आवडू लागला होता. एका छोट्या घाटात गाडी जरा कडेला घेतली आणि टपोरी करवंद, काजूफळं, रातंबे यांचा रानमेवा मनसोक्त लुटला. आता कस एकदम कोंकणात आल्यासारखं वाटलं. सहज हाताला येतील अशा कैऱ्यांनी लगडलेले आम्रवृक्ष तर पावला पावलाला दाटले होते. पाटपरूळ्याला दहा मिनिट थांबून दक्षाचं घर बघितलं, आणि मग निवतीचा समुद्रकिनारा गाठला, पण किल्ले निवती पुढे आहे असे कळल्याने थोड्याच वेळात परत फिरलो, आणि अजून पुढे जाऊन किल्ले निवतीच्या पायथ्याशी पोहोचलो. गाडीतून उतरलो, पंधराच मिनिटात किल्ल्याचा माथा गाठला. एका खोल खंदकाने किल्ल्याचा डोंगर बाजूच्या डोंगरापासून फार कौशल्याने वेगळा केला आहे, किल्ल्यावर करवंद आणि जांभळांची लयलूट आहेच आणि खंदकातून उगवलेल्या झाडांवर मुंग्यांनी कष्टपूर्वक बांधलेली पानांची घरटी पण बघण्यासारखी, आधी एकच दिसले, मग दुसरे आणि मग कितीतरी आहेत असे लक्षात आले. बुरुजावरून दिसणारे भोगवे समुद्रकिनारा आणि अथांग सागर हे तर भान हरपून बराच वेळ तिथेच बसण्यास भाग पाडणारे. भोगव्याच्या किनाऱ्यावर सहज उतरता येऊ शकते, तसा मोहही होत होता, पण तीन वाजून गेले होते आणि सर्व जीव अगदी भुकेले झाले होते.

निवतीवरून उतरलो आणि देवबाग ओलांडत मालवण गाठले. चैतन्य भोजनालयात अप्रतिम मालवणी जेवणाने तृप्त झालो, बाकीचे सहा जीव शाकाहारी असले तरी मी मात्र माझी वाट पाहणाऱ्या कोळंबी, पापलेट इत्यादी मत्स्यजीवांना निराश केले नाही. सागरकिनारा हेही असेच चांगले भोजनालय आहे असे कळले.

sindhu
सिंधुदुर्गाच्या तटाला धडका देणारा सिंधुसागर.

साडेपाच झाले होते, आता वाट धरली सिंधुदुर्गाची, शिवरायांनी स्वतः शून्यातून उभ्या केलेल्या मोजक्या किल्ल्यांपैकी हा एक. यांत्रिक बोटीने जावे लागते आणि किल्ला पाहून सव्वा तासात बोटीत परत यावे लागते. साडेतीन किमी परिघाचा हा किल्ला पूर्ण बघायला या वेळेत मग जरा धावपळच करावी लागते. शिवरायांचे एकमेव मंदिर या किल्ल्यावर वसलेले आहे, एवढेच नाही तर त्यांच्या हाताचे व पायाचे ठसेही याच किल्ल्यावर आहेत. बाकी गोड्या पाण्याच्या विहिरी, दोन फांद्यांचा माड, सलग तटबंदीवरून चालण्याची मौज अशी बरीच आकर्षणे आहेत. सूर्यास्त होता होता सिंधुदुर्गावरून परतलो, आणि तारकर्ली गाठले. तारकर्ली किनाऱ्यावर पूर्वी एमटीडीसी चे तंबू निवास होते, पण आता छान प्रशस्त वातानुकूलित कॉटेजेस आहेत. तासभर समुद्रकिनाऱ्यावर बसून गावात आलो आणि इथल्या वातावरणातली अंघोळीची निकड लक्षात घेऊन देवळातला मुक्काम एका बंगला कम गेस्ट हाऊसवर हालवला, जेवायला बाहेर जायचेही त्राण शिल्लक नव्हते, जवळचेच थोडेफार खाल्ले आणि चि. बबडूच्या फोनची वाट बघत जरा लवकरच गाढ झोपी गेलो.

(क्रमशः)
छायाचित्रे : प्रसाद, कूल, फदि

malvan
मालवणचा सूर्यास्त

Gs1
Wednesday, May 09, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर, लेखाचे शीर्षकात चूक झाली आहे ती दुरुस्त करून द्यावी, तेरेखोल ते विजयदुर्ग पाहिजे ते सिंधुदुर्ग झाले आहे.

Lampan
Wednesday, May 09, 2007 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी गाडी ह्या रस्त्याला लागणार लवकरच .. मस्तं ट्रिप केलीत
आताच्या आता गाडीवर बसुन निघावं वाटतंय . हे समुद्र वगैरे बघीतलं कि कासाविस व्हायला होतं


Cool
Wednesday, May 09, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यशवंतगडाच्या भिंतीतले एक झाड >>>
एखाद्या भुत लागलेल्या माणसाला झाड का म्हणतात ते आत्ता कळाले

खुप लिहिण्यासारखं आहे, वेळात वेळ काढुन मी addition नक्की करणार, अगोदर तु पुर्ण करुन घे


Zakasrao
Thursday, May 10, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला माहित होत तुम्ही गेल्याच आणि कोल्हापुरात हॉटेल शोधत होतात ते पण ते उशिरा कळाल मला. गिरि बोलला होता.
मि विचार करत होतो कि अजुन कस वर्णन आल नाही. फ़ोटो छान आहेत. वर्णन देखील मस्त. अजुन फ़ोटो असतील तर लिन्क द्या.


Nandini2911
Thursday, May 10, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त फोटो आहेत समुद्राचे. घरी जावंसं वाटायला लागलय.. :-)

Dhumketu
Thursday, May 10, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कूल, त्या झाडाला भुत लागलेले आहे का? मला फ़क्त झाडच दिसत आहे..

Giriraj
Thursday, May 10, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लम्पन,कधि भेटतोस सांग.. यांनी मला न नेताच केलेले ट्रेक दुचाकीवरून करायची विचार करतोय मी!

वडा-पिंपळाच्या झाडाला भूतं लागतात असे ऐकले होते. आज पाहीले!!:-)


Itsme
Thursday, May 10, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए टिपी करु नका रे, त्याला पुर्ण लिहुद्या, नाहीतर झाडावरचे 'ते' भुत खाली येइल ... :-)

Savyasachi
Thursday, May 10, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविंद, अप्रतीम फोटो रे...

Dineshvs
Thursday, May 10, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी हिही सहल हुकली तर. असो, माझेच गाव हे. सिंधुदुर्ग किल्ल्यासाठीच एक पुर्ण दिवस द्यायला हवा होता.
सगळ्यानी लिहा.


Cinderella
Thursday, May 10, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1, खुपच छान...फोटो पण मस्त आले आहेत...तुम्ही आता "नेहेमीचे यशस्वी कलाकार" झालात..दुर्गभ्रमण आणि वर्णन दोन्हींत...पण वर्णनाची खुप वाट बघावी लागली यंदा...देवगड हापुस ची सुस्ती काय....:-O

sorry, ह्या वेळेस पाहुण्यांच्या गडबडित होते त्यामुळे फोन केला नाही...पण माझे काही मार्गदर्शन नसताना तुम्ही सगळ्यांनी (गुणी बाळांनी) एव्हढी मोठी मोहिम पार पाडलित ह्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे...मुले आता मोठी झाली म्हणायचे...:-O

ता. क. :- वरील विधानातील "शैली" ही पूर्णतः काल्पनिक (न)आहे. कोणा मायबोलि करांच्या शैली / शैला शी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग न समजता दिवे घ्यावेत :-O

Phdixit
Friday, May 11, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


यशवंतगडा वरुन टिपलेला समुद्र किनारा

Gs1
Friday, May 11, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोमवार ३० एप्रिल.

सकाळी थोडे आरामात म्हणजे सात वाजता उठलो. आजची सकाळ समुद्रात डुंबायला राखीव ठेवली होती, त्याप्रमाणे तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन दोन तास यथेच्छ डुंबून घेतले. अंघोळी उरकून पुढचा प्रवास सुरू केला. पुन्हा एकदा मालवण गाठले, आणि सिंधुदुर्गाच्या अवतीभवती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले किनाऱ्यावरचेच सर्जेकोट व राजकोट हे दोन कोट बघायला गेलो. आता फारसे अवशेषही शिल्लक नाहीत या किल्ल्यांचे, आणि मासे वाळत घालणे हाच त्यांचा प्रमुख उपयोग उरला आहे. सर्जेकोटाच्या आसपास शिंपले मात्र बरेच सापडतात. गवताचे काटेरी चेंडूही सापडले, त्यांचा उगम काही कळला नाही.

मग जायचे होते सिंधुदुर्गाच्या अगदी पुढ्यातल्या पद्मदुर्गावर, ओहोटीच्या वेळेस एका वालुकादांडाने पद्मदुर्गापर्यंत जाता येते असेच सगळीकडे वाचले होते, पण प्रत्यक्षात चांगलेच खोल पाणी होते. चौकशी करता चुनामी आली तेव्हा हा मधला पूर्ण वालूकादांड वाहून गेला असे कळले. मग एक बोट ठरवली आणि पद्मदुर्गावर दाखल झालो, इथे तर शंखशिंपल्यांचा खजिनाच मांडलेला होता. गडाच्या छोटेखानी दरवाज्यातून आत गेलो, देवळानजिक तटबंदीवर एक भगवा फडकत होता आणि देवळातही दिवा तेवत होता, म्हणजे रोज कोणीतरी येत असावे इकडे. मग लगेच शंखशिंपले गोळा करण्याकडे मोर्चा वळवला.

मालवणात परतलो, पुन्हा एकदा चैतन्यला जेवून थोड्या वेळासाठी सागरी महामार्गाची साथ सोडून थोडे आतल्या बाजूला (म्हणजे पूर्वेकडे) मसुरे गावाकडे निघालो. तासाभराच्या अंतरावर असलेल्या मसुरे गावानजिकच एका जेमतेम तीनशे फूट उंच अशा टेकडीवर भरतगड आहे. महाराजांनी इथे किल्ला बांधण्याचा विचार पाणी सापडले नाही म्हणून सोडून दिला होता, पण नंतर वाडीकर सावंतांनी भरतगड बांधला. पायथ्यापासून पंधराच मिनिटात पायवाटेने डोंगर चढून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. तटबंदी मजबूत आणि बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. संपूर्ण गडावर दाट आमराई आहे, आणि चव्हाण नावाच्या एका माणसाच्या ताब्यात ती आमराई आहे. आपण आंब्यांना हात तर लावत नाही ना यावर लक्ष ठेवून एक रखवालदारही बसलेला असतो. बुरूजावरून खाडीचे आणि पलीकडचा भगवंतगडाचे दृश्य दिसते. भरतगडाचे विशेष आकर्षण म्हणजे तिथली विहीर, भल्या मोठ्या चौकोनी तोंडाच्या या ताशीव विहिरीवर एक रहाट बसवला आहेच, पण प्रशस्त पायऱ्यांनी विहिरीत शंभर एक फूट खाली उतरून गेले की मग आत अजून एक रहाट बसवला आहे. तिथे एक भुयारही आहे.


bharat
भरतगड आणि भगवंतदरम्यानची खाडी.

भरतगड उतरलो, दोन तीन किमी पुढे जाऊन खाडीच्या किनाऱ्यावर गाडी लावली. पलीकडचा तिरावर भगवंतगड दिसत होता, आणि आम्हाला तिकडे घेऊन जाणारी 'तर'ही त्याच किनाऱ्यावर होती. तरवाला अर्ध्याच अंतरापर्यंत आला, आणि आम्ही तिथपर्यंत जेमतेम गुढघाभर पाण्यातून चालत गेलो. बांबूने तर ढकलत भगवंतगडाकडे प्रवास सुरू झाला, आजूबाजूला जे अप्रतिम सृष्टीसौंदर्य होते ते आतापर्यंत पाहिलेल्या सागरी सौंदर्याला लाजवेल असे होते. केरळ बॅकवॉटर्स म्हणून हेच फोटो देतात का असे कोणीतरी म्हणाले ते खरेच वाटावे एवढे सुंदर. त्या तरवाल्याच्या शांत, समाधानी आणि सात्त्विक चेहऱ्याकडे पाहताना माझ्या मनात हा इथल्या वातावरणाचा परिणाम की काय असे वाटून गेले. पुढच्या वेळेला पुन्हा फक्त भरतगड, भगवंतगड इथे राहण्यास यायचे असे ठरवूनच टाकले. पलीकडे पोहोचलो, झाडे आणि शेतातून वाट काढत भगवंतगडाचा पायथा गाठला, लगेच वर चढायला सुरुवात केली, पुन्हा एकदा जेमतेम पंधरा मिनिटाची चाल, वर छोटेसे देऊळ आणि घनदाट झाडी. माकडाच्या टोळ्या मात्र दाण दाण झाडावरून उड्या मारून कोण आलंय याची वर्दी पोहोचवत होत्या. सूर्यास्त होऊ लागला होता, आणि कितीतरी पक्षीही आपल्या विविध आवाजांसह लगबग करत परतीच्या प्रवासात गर्क होते. आम्हीही उतरलो, पुन्हा एकदा तर, आणि मग गाडी गाठून पुढचा प्रवास सुरू केला.

सागरी महामार्गावरच्या आचरा येथे थेट नेणारा शॉर्टकट एका गावकऱ्याने सांगितला, त्या रस्त्याने निघालो, आणि वाटेत लागले कांदळगाव. इथे शिवरायांनी स्थापन केले रामेश्वराचे देऊळ आहे, आणि समोरच त्यांनी लावलेला आणि आता विशाल झालेला वटवृक्ष आहे. गावकऱ्यांनी हे सारे विशेष कौतुकाने जपले आहे. पुढे आचऱ्याला गेलो, तिथेही रामेश्वराचे प्रसिद्ध असे पुरातन मंदिर आहे. उत्तम कलाकुसर असलेला देवळाचा काही भाग मात्र अतिउत्साहाने ऑईलपेंट लावून भडक करून टाकला आहे. पुजाऱ्याने आमची आपुलकीने चौकशी केली आणि पुढे कुणकेश्वरास जाणार कळल्यावर तिकडे फोन करून भक्त निवासात राहण्याची सोयही करून दिली. आचऱ्याला सीरॉकमध्ये जेवून प्रवास पुन्हा पुढे सुरू केला, पुढे एका ठिकाणी रस्ता चंद्रकोरीसारखा समुद्राला वळसा घालू पाहत होता आणि चंद्रकोरीच्या बरोबर विरुद्ध टोकाला कुणकेश्वराचे देऊळ उभे होते, ती जागा बघूनच आम्ही खूश झालो. भक्त निवासात दोन खोल्यांचा ताबा घेतला, आणि गप्पा टप्पा, पत्ते वगैरे करून निद्राधीन झालो.


deul

[ट्रेकिंगमुळे देवळांकडे बघण्याची दृष्टीच बदलून गेली आहे. असे एखादे देउळ पाहीले की 'अरे वा मुक्कामाला छान आहे' असेच विचार मानात येतात.]

मंगळवार एक मे.

सकाळी कुणकेश्वराचे दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. साधारण अर्धा किमी पुढे गेल्यावर मागे वळून पाहिले तेव्हा आकाशात बरेच काळे ठिपके दिसले. नीट बघितले तर लक्षात आले की समुद्र आणि आकाश एकमेकात इतके बेमालूम मिसळले होते आणि समुद्र अक्षरशः पंधरा अंशात उचलल्यासारखा दिसत होता की ते आकाशच वाटत होते, आणि ते काळे ठिपके म्हणजे होड्या होत्या. दृष्टिभ्रमाचा हा एक अनोखाच प्रकार अनुभवायला मिळाला. देवगडास पोहोचलो, गाडीचे छत पूर्ण भरून पुन्हा आत दोन खोके ठेवावे लागले एवढी देवगड हापूस आंबा खरेदी झाली.

देवगडाच्या किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत गाडी जाते. एकेकाळी फुरसे सापांसाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला. पूर्वी दगडादगडाखाली फुरसे सापडायचे पण सगळे त्या हाफकिनच्या लोकांनी लस बनवायला पकडून नेले अशी माहितीही गावकऱ्याने दिली. किल्ल्यावर दीपगृह आहे, पण तिथे आत प्रवेश नाही. पुन्हा एकदा सागराचे दृश्य, आणि तटबंदीवरून फेरफटका मारून खंदकांची बांधणी बघण्यासारखी आहे. समोरच्या पठारावर बऱ्याच पवनचक्क्याही उभारलेल्या आहेत.


vijay buruj

समुद्रात घुसलेले विजयदुर्गाचे बुरूज

आता आमचा प्रवास सुरू झाला तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या विजयदुर्गाकडे. या सफरीतले सर्वोत्तम ते असे शेवटी राखून ठेवलेले आहे याची पुरेशी कल्पना नव्हती विजयदुर्गावर पोहोचेपर्यंत. गडाच्या दरवाज्यात पोहोचतो न पोहोचतो तेच आपल्याला समोरच्या उंच बुरुजावर सामोरा येतो डौलाने फडकणारा एक अतिविशाल असा तिरंगा. भक्कम तटबंदीतून वळणावळणाचा प्रवास करून मुख्य दरवाज्यात पोहोचतो. समोरच लहानमोठे असे कितीतरी तोफगोळे मांडून ठेवले आहेत. दोन बाजूला समुद्र आणि एका बाजूला खाडी अशा तिन्ही बाजू पाण्याने वेढलेल्या या किल्ल्याचे वैभव म्हणजे त्याची बहुपदरी तटबंदी आणि त्यावरचे भक्कम बुरूज, हे सर्व म्हणून की काय तटबंदीतून काढलेली भुयारे. महाराष्ट्रातले जवळ जवळ सर्व सागरी दुर्ग पाहिले आहेत, पण बांधणीत विजयदुर्गाला तोड नाही. अगदी सिंधुदुर्गही नाहीच आणि जंजिराही नाही. विजयदुर्गाची परिक्रमा जवळ संपत आली होती आणि तृप्त होऊन बुरुजावरून चालत होतो तेव्हा खाडीच्या मुखाशी समुद्रात काहीतरी हालचाल दिसली, नीट पाहिले तर चक्क डॉल्फिन, आधी एक दिसला , मग जोडीने उडी मारून झाली, मग बराच मोठा कळप जलक्रीडेत मग्न होता, आणि आम्ही बुरुजावरच बैठक मारून त्यांना बघण्यात. पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातला किनारा दिसत होता, ती सहल करताना सुरुवात पुन्हा विजयदुर्गापासून करायची ठरवून थोडे अनिच्छेनेच परत निघालो.


rameshvar
रामेश्वराची खोदीव वाट

विजयदुर्गाजवळच रामेश्वराचे एक प्राचीन देऊळ आहे. एकूण इथे बरेच रामेश्वर आहेत. या देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड कातळातून काढलेली उतरती खोदीव वाट. देऊळही छान आहे. कोंकणातल्या देवळांची, घराच्या दारापुढच्या तुळशी वृंदावनांची एक खास पद्धत आहे, खूप रंगीबेरंगी आहेत आणि छान दिसतात. फक्त जुनी सुंदर काळ्या पाषाणातली देवळे रंगवण्याचा अट्टहास नको असे वाटते.

परतीचा प्रवास सुरू झाला. बारमाही वाहणारा नापणे धबधबा वेळेअभावी सोडून दिला आणि गगनबावडा घाट चढून मग रस्ता थोडा सोडून गगनगडावर दाखल झालो. गडाचा ताबा सध्या गगनगिरी महाराजांच्या मठाकडे आहे आणि त्यांनीही तिथली अवाढव्य गुहा, शिल्पे यांची रंगवून यथामती वाट लावली आहे. पण बाकी व्यवस्था, स्वच्छता, पाण्याची सोय इत्यादी छान ठेवले आहे. बालेकिल्ल्यावर नाथपंथीय गैबीनाथांची समाधी आहे, पण ती गैबी पीराची मानून बळकावण्याचा जो उद्योग मुस्लिम बांधवांनी आरंभला आहे, त्याला तरी या मठामुळे काही प्रमाणात आळा बसला आहे.

बालेकिल्ल्यावरही तिरंगा फडकत होता. प्रत्यक्ष घाटमाथ्यावरच्या किल्ल्याचा रुबाब काही वेगळाच असतो, खोल तुटके कडे चहूबाजूला त्याच तोलामोलाचे पर्वत, सह्याद्रीची भिंत, त्यातून खाली खाली उतरत जाणारी घाटवाट हा सगळा डौलच न्यारा. गगनगडावर हे सारे वैभव ट्रेकिंग न करणाऱ्यांनाही फारशी पायपीट न करता बघायला मिळते.

सूर्यास्ताला ध्वज उतरताना शिवरायांचा जयजयकार करून गगनगडाचा निरोप घेत आमच्या सफरीची सांगता केली आणि बारा किल्ले, दहा पंधरा देवळे, आणि सिंधुदुर्गाचे कितीतरी लोभस सागरकिनारे असा सारा ऐवज नजरबंद करून रात्री एकच्या सुमारास पुण्यात पोहोचलो.


nivati
[निवतीचा खडक आणि समुद्र, हे आणि असे कितीतरी सुंदर एकांतातले सागरकिनारे या सफरीत अनुभवले.]


Gs1
Friday, May 11, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ता.क. : चल म्हटले की कुठे असे न विचारता आधीच पाठीला सॅक लावून तयार असलेला कूल आणि दर वेळेला 'आता मी पुन्हा कधीही तुमच्याबरोबर ट्रेकला येणार नाही' अशी प्रतिज्ञा करून पुढचा शनिवार उजाडला की स्वत्:हूनच 'खायला काय काय आणायच आहे ? ' असे विचारत येणारी आरती या माझ्या सहडोंगरयात्रेकरूंचे प्रत्येकी ५१ किल्ले / डोंगरयात्रा पूर्ण झाल्या, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.


Cinderella
Friday, May 11, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा...तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन :-)

Phdixit
Friday, May 11, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कुणकेश्वराचे मंदिर

Phdixit
Friday, May 11, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकीचे फोटो इथे आहेत .....

Dineshvs
Friday, May 11, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS छानच झाली कि तुमची सहल. गवताचे काटेरी चेंडु ? किती मोठे होते ते ? धोत्र्याची सुकलेली फळे, घुबडाने थुकलेल्या गोळ्या किंवा सुकलेला केंड मासा हेही असु शकते ते.
राजकोटात पंधरा वीस वर्षांपुर्वी वस्ती होती. पण तिथे गोड पाणी नाही. सगळ्या मालवणात ते नाही, फ़क्त किल्ल्यावर आहे ते. किल्यात राणीची वेळ म्हणुन एक सुंदर जागा आहे.

नापणे धबधबा रस्त्यापासुन फारसा दुर नाही. सहज जमला असता. कणकवलीच्या जवळहि आहे धबधबा. खारेपाटणवरुनही, भूईबावडा घाटातुन वर येता आले असते. तिथेही वळणावर एक चंद्राकार नदीचे पात्र आहे.
आणि सिंड्रेला, केवळ तांत्रिक कारणासाठी मी GS ला बाळ म्हणत नाही बरं. बाकि सगळी बाळं माझ्या डोळ्यादेखतच मोठी झाली. होताहेत.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators