|
Gs1
| |
| Monday, April 23, 2007 - 1:11 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कर्नाळा आणि सांकशी ..
|
Gs1
| |
| Monday, April 23, 2007 - 1:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल आणि पेणच्या मध्ये थम्स अप च्या अंगठ्याच्या आकाराचा एक सुळका आकाशात डोकावत असतो. पुण्याहून मुंबईला येतांनाही पनवेलच्या अलीकडे डाव्या हाताला दिसतो. हाच तो कर्नाळ्याच्या किल्ल्यावरचा जैत रे जैत ने प्रसिद्धी मिळालेला सुळका. याच्या पायथ्याशी एकेकाळी दिमाखदार आणि नांदते असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. शनिवार, २१ एप्रिल. प्रसाद आणि वैभवच्या मैफिलीला जायचे आणि तसेच थेट निघायचे असे ठरले होते. एक सुंदर मैफल मनात घोळवतच रात्री साडेनऊच्या सुमारास कूल, आरती आणि फदिसह पनवेलकडे निघालो.नंदिनी आठ वाजल्यापासूनच पनवेलला येऊन थांबली होती. तिला घेऊन, वासुदेव बळवंत फडक्यांचे शिरढोण ओलांडून कर्नाळा अभयारण्याशी मध्यरात्री पोहोचलो. जिथे थांबत होतो तिथेच लुटारूंपासून सावध राहा, गाडी थांबवू नका अशा सूचना कवटीच्या चित्रासह बघून हबकलोच. त्यात मुंबईहून येणारे तीन जण आले नाहीत, आणि मनोज, कीर्ती सकाळी येणार होते. म्हणजे उरलो आम्ही पाच जणच, कर्नाळ्याला बऱ्याचदा आलेल्या सुमितचा अभयारण्याबाहेरून जाणारी वाट शोधायला सल्ला घेतला. अभयारण्यातून जाणारी वाट सरळ होती, पण तिथून रात्री जायला परवानगी नाही हे माहीत होते. थोडा वेळ शोधाशोध करून शेवटी पहाटे वर जायचा निर्णय घेतला. ट्रेक सुरू केल्यापासून एक फार मोठा फायदा झाला आहे, राहायचे कुठे असा प्रश्नच पडत नाही. आम्ही अगदी सराईतपणे जवळचे कुठलेही एखादे गाव आणि त्यातले पाठ टेकता येईल इतपत देऊळ वा शाळा शोधून बिनदिक्कतपणे मुक्कामच ठोकतो. त्या काळापुरत्या का होईना गरजा एकदम कमीच होऊन गेल्या आहेत. महामार्गाने तसेच पुढे जात एक बळवली नावाचे गाव गाठले. तिथे गावाबाहेर व्याघ्रेश्वराचे एक छान ऐसपैस देऊळ शोधून रात्री एकच्या सुमारास लगेच पथाऱ्या पसरल्या. पहाटे साडेपाचला उठून लगेच कर्नाळा पायथा गाठला आणि अभयारण्यातल्या वाटेने चढाई सुरू केली. जवळ जवळ अर्धा रस्ता उत्तम जंगल आहे त्यामुळे उन्हाळ्यातही जाता येईल असा किल्ला आहे, वाट सुळक्याच्या डाव्या बाजूच्या धारेला येऊन मिळते आणि मग आपण उजवीकडे वळून सुळक्याकडे चढू लागतो. वातावरण ढगाळ होते, त्यामुळे नंतरही फारसे ऊन नाही जाणवले कुठे. हा धारेवरचा मार्ग पूर्व आणि पश्चिमेचे छान देखावे दाखवत राहतो. माणिकगड आणि त्याचा बाजूचा सुळका तर एकदम जीवधन - खडा पारशासारखेच दिसतात या कोनातून. प्रवेशद्वाराच्या अलीकडेच कर्णाई देवीचे देऊळ होते. वाचीव माहितीवर विश्वासून मी आधी रात्री याच देवळात मुक्काम करण्याचा बेत आखला होता, पण प्रत्यक्ष देऊळ पाहून तिथे आम्हा सर्वांना थोडीशी दाटीवाटीच झाली असती असे वाटले कारण देऊळ दोन फूट बाय दोन फूट बाय दोन फूट एवढेच होते. कर्नाळ्यावर बरेच बुरूज, त्यातले दरवाजे आणि बांधकामे आहेत. मधोमध सुळका आहे आणि त्याच्या पोटात मोठमोठी टाकी आहेत. आणि कपाऱ्यात तीच प्रसिद्ध मधमाश्यांची पोळी लटकली आहेत. ५० मीटर उंच अशा या सुळक्यावर प्रस्तरारोहण करून जाता येते. दक्षिणेकडे एक सुटा पहाड कौशल्याने बांधकाम करून किल्ल्याला जोडून घेतला आहे. ते कसब बघण्यासारखे आहे. तासाभरात किल्ल्याची प्रदक्षिणा करून पुन्हा खाली उतरू लागलो. जंगल बरेच जुने असल्याने वाटेत बऱ्याच मजबूत वेली आपली टारझनसारखी लोंबकळण्याची हौस भागवून घ्यायला उपलब्ध आहेत. गंमत म्हणजे या पक्षी अभयारण्यात पहाटे केवळ एक पक्षी दिसला. तासाभराची छोटी चढाई, झाडे, गारवा यामुळे हे सहलीला यायलाही चांगले ठिकाण आहे. पायथ्याशी मनोज आणि कीर्ती वाटच बघत होते. महामार्गावरच हॉटेल कर्नाळा आहे, तिथे उत्तम न्याहारी केली. आशा भोसलेपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेक नामवंतांचे तिथे स्तुतिपर अभिप्राय लावले होते. पदार्थही क्षणभर विश्रांतीपेक्षा फारच चांगले होते. प्रवास सुरू केला. नंदिनीचे कथाकथन ऐकत पुन्हा पेणच्या दिशेने जात बळवली गाठले, बळवलीला डावीकडे वळलो, गाव संपताच मातीचा कच्चा रस्ता सुरू झाला आणि टेकाडांवरून वळणे घेत घेत सात किमी नंतर सांकशीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बद्रुद्दिन दर्ग्यापाशी पोहोचला. जसे साधारणातः नेहमी बघायला मिळते त्याप्रमाणेच तिथली पुरातन मंदिरे भ्रष्ट करून त्यांच्याच शिळा वापरून हा दर्गा उभारला आहे, अतिक्रमण हळू हळू वाढवत मोठमोठी बांधकामे उभी केली आहेत. आत मुक्कामाला मुस्लिम बांधवांची बऱ्यापैकी गर्दीही होती. सांकशीच्या किल्ल्यालाही आजूबाजूच्या गावातले लोक आता बद्रुद्दिनचा किल्ला म्हणू लागले आहेत. वर किल्ल्यापर्यंत एक छोटी पाईपलाईन टाकून किल्ल्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण टक्क्यांतले सारे पाणीही खाली आणून या बांधकाम आणि इतर उपयोगासाठी वापरले जात आहे आणि टाकी कोरडी करून टाकली आहेत. त्या पाइपच्या कडेने जाणाऱ्या पायवाटेने वर निघालो. आता मात्र ऊन चांगलेच भाजून काढत होते. किल्ला काही फार उंच नाही, अर्ध्याच तासात माथ्यावर पोहोचलो, किल्ल्यावर काही फारशी तटबंदी, बुरुज अथवा बांधकाम नाही. सांकशीचे वैशिष्ट्य लेण्यांसारखी कोरून काढलेली गुहांमधली पाण्याची टाकी. शेवटच्या टप्प्यातच ही टाकी सुरू होतात, काही जोडटाकी आहेत, तर काहींमध्ये कोरीव खांब आणि झरोके आहेत, काही एकाच्या डोक्यावर एक आहेत. माथ्यावर आलो आणि सुसाट वारे अंगाला भिडले. टळटळीत उन्हातही एकदम थंड वाटले. गडमाथ्यावरही जिथे जागा मिळेल तिथे टाकी खोदली आहेत, त्याशिवाय गोल चौकोनी असेही कितीतरी खड्डे त्या पाषाणात खोदले आहेत. टाक्या आणि गुहांचे हे गुढरम्य संमेलन हेच या गडाचे एकमेव वैशिष्ट्य आहे. पश्चिमेकडे नजर फिरवली तर मध्ये एकाही डोंगररांगेचा अडथळा नसल्याने धरमतरची खाडी आणि समुद्राचेही दर्शन घडते. माणिकगड आणि कर्नाळाही दिसत असतातच. सर्व गुहांमध्ये यथेच्छ डोकावून खाली उतरलो, बळवलीत कारल्याचे बरेच वेल होते. एका शेतातून कारले खरेदी झाली. परतीच्या प्रवासात एक ट्रेलर उलटल्याने गोवा महामार्ग ठप्प झाला होता. मग रसायनी आपटा मार्गे पनवेल गाठले, हाही खूप छान रस्ता आहे, नदीच्या कडेने आहे, पण नदीत रसायनीचे पाणी सोडले आहे हे लक्षात घेऊन पाण्यात उतरायचा मोह टाळला. या रस्त्याने जाताना चंदेरी, प्रबळगड, इर्षाळगड यांचे अगदी इतके मनोरम दर्शन घडते की आम्ही गाडी थांबवून काही काळ न्याहाळत राहिलो. पुढच्या रविवारी जोडून येणाऱ्या सुट्टीचा लाभ घेत सिंधुदुर्ग जिल्हा दर्शनाला जायचे या उन्हाळ्यातल्या बहुधा शेवटाच्या भटकंतीचे बेत आखतच पुणे गाठले.
|
Dineshvs
| |
| Monday, April 23, 2007 - 5:55 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कर्नाळा हा अगदी शाळेत असल्यापासुनचा ओळखीचा. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतुमधे बघुन झाला. माझ्या साठी ओलांडलेल्या आईवडिलाना पण वर घेऊन गेलो होतो. मुंबईपासुन जवळच असल्याने, सुट्टीच्या दिवशी बरीच गर्दी असायची तिथे. पण दारु पिऊन धिंगाणा घालणे एवढाच हेतु असल्याने, वरती चढणारे फारच थोडे असायचे. पुर्वी पायथ्याशी दोन हॉटेल्स होती. आता ती पाडली आहेत. समोर वनखात्याचे काहि बंगले आहेत. पुर्वी त्यात राहता येत असे. आता तशी सोय आहे का ते माहित नाही. पण काहि अंतरावर काहि राहण्याजोगी हॉटेल्स आहेत. तिथे जवळच एक नर्सरी आहे. मला तो भाग पावसाळ्यात खुप आवडतो. अनेक अमरी ( ऑर्किड्स ) असतात तिथे त्या काळात. क्रायसोफ़ॉयलमची झाडे आहेत तिथे बरिच. भुईचाफा पण खुप फ़ुलतो. उन्हाळ्यात मधमाश्यानी पाठ पण धरली होती एकदा. पायथ्याच्या आजुबाजुला काहि छोट्या नद्या आहेत. पुर्वी तिथे स्वच्छ पाणी असायचे. एक छोटा बंधारा होता. तिथे डुंबता यायचे. सगळ्यात आकर्षण होते ते तिथल्या पिंजर्यातल्या पक्ष्यांचे. वेगळ्या जातीची कबुतरे, घारी, घुबड, भारद्वाज असे बरेच पक्षी होती. तिथे एक राजा नावाचा मोर होता. पिंजर्यासमोर लोक जमले कि तो पिसारा फ़ुलवुन नाचायला लागायचा, ऋतु कोणताहि असो. नाचुन झाले कि जाळीजवळ येऊन अंगाला हात लावुन घ्यायचा. अगदी हुकमी फोटो काढता यायचे त्याचे. काहि हरणेहि होती तिथे. पण मुक्त अवस्थेत काहि बुलबुल सोडले तर ईतर पक्षी कधीहि दिसले नाहीत. नाही म्हणायला सुळक्याच्या मागच्या बाजुच्या दरीत काहि घारी उडताना दिसायच्या. आपण मात्र घारींच्या वर असायचो. त्याच दरीतुन वर उसळणारा पाऊसहि अनुभवलाय मी. त्या टाक्यात पुर्वी अतिशय थंडगार पाणी असायचे. वाटेत कुठेच पाणी नसल्याने, त्या पाण्याची गोडी काहि औरच होती. त्यात टाक्यात उतरुन पाणी काढुन द्यायचे काम नेहमी माझ्याकडे असायचे. तीन वर्षांपुर्वी आम्ही तिघेजण संध्याकाळी वर चढुन गेलो. सुर्यास्त बघितल्यावर येताना खुपच काळोख झाला. जवळ मोबाईलशिवाय प्रकाशाचे दुसरे साधन नव्हते. वाट चुकलो. आरडाओरडा करत खाली उतरलो आणि मग फ़ॉरेस्ट ऑफ़िसरचा भरपुर ओरडा खाल्ला. आता मात्र बस वा रेल्वेने येताजाता तो सुळका बघुन, पुर्वीच्या आठवणी काढतो. तसा तो सुळका बर्याच दुरवरुन दिसतो. वाशीच्या पुलावरुनच काय, माझगावहुन देखील दिसतो. पण ढग आले तर पायथ्याजवळुन देखील दिसत नाही.
|
Dhumketu
| |
| Tuesday, April 24, 2007 - 4:14 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
देवळाच्या समोर कट्टा आहे त्यावर झोपलेलो आम्ही... वरती कड्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आहेत...पण पोळी भरपुर म्हणून पाणी जपुन काढावे...
|
Itsme
| |
| Tuesday, April 24, 2007 - 6:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, घार आम्हालाही दिसली, पण एकच. म्हणजे एकुणच तिथे पक्षी कोणालाच दिसत नाहीत तर. घाणेकर सरांचे म्हणणे आहे की. काही लोक उगीचच बोटे मोडतात पक्षी दिसले नाहीत म्हणुन. असो एक सुंदर द्रुश्य मात्र डोळे भरुन बघीतले. अगदी हाताच्या बोटा एतकीच लांबीची खारीची चिमुकली बाळे झाडाच्या नाजुक - नाजुक फाद्यांवर शिवणापाणी चा खेळ खेळत होती. आमच्या अंगणातल्या रामफळाच्या झाडावर असंख्य खारी आहेत पण इतके छोटे पिल्लु कधी नजरेस पडले नव्हते. अगदी मोहक द्रुश्य होते. दिनेश, खारीचा निवार्याचे ठिकाण काय असते , घरटे , बीळ की अजुन काही ? (सहज उत्सुकता म्हणुन)
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 24, 2007 - 6:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
itsme खारी पण घरटेच बांधतात. माझ्या घराच्या खिडकित आहे ते. अगदी मऊ, एकाच प्रकारचे गवत वापरतात त्या. हे घरटे सगळीकडुन गोल असते ( म्हणजे पक्ष्यांप्रमाणे वरुन उघडे नसते ) पण या घराना छोट्या छोट्या खिडक्या असतात. रात्री सगळे घरट्यात झोपले, कि शेपट्या बाहेर आलेल्या दिसतात.
|
खरंच त्या खारीचा खेळ इतका मस्त चालू होता ना की त्या भरात आम्हाला पक्षी न दिसल्याचे काहीच वाटले नाही घार उडताना मात्र सही दिसत होती. कदाचित top view ने पहिल्यादाच पाहिल्यामुळे असेल पण एकदम रुबाबदार उडत होती.
|
GS1, Dinesh, खुपच छान ओळख करुन दिलीत तुम्ही कर्नाळ्याची...पुढच्या भारत-भेटीत मी पण येईन तुमच्याबरोबर trek ला.. Itsme, तुमच्या घरी मांजरी आहेत का? कदाचित त्यामुळे खारीची पिल्ले खाली येत नसतील.... ![:-O](/hitguj/clipart/proud.gif)
|
Cool
| |
| Tuesday, April 24, 2007 - 7:05 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जी.एस. छान वर्णन.. नेहमीप्रमाणेच मस्त झाला ट्रेक.. Itsme, तुमच्या घरी मांजरी आहेत का? कदाचित त्यामुळे खारीची पिल्ले खाली येत नसतील >>> त्यापेक्षा, खारुताई खाली ये - पण नीट ये, पाणी घे - पण हळु घे असे शब्द ऐकावे लागल्यामुळे नसतील येत पिल्ले खाली.. ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
cool, एक दम जबर्या....
|
Itsme
| |
| Wednesday, April 25, 2007 - 4:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, (नेहमीप्रमाणेच) फोटो असेल तर नक्की पाठवा ... cool आणि cenderella .... .
|
GS, अजून पूर्ण वाचले नाही... वेळ मिळाला हा आणि आधीचेही (अलिकडचे काही वाचायचे राहिलेले) वृतांत वाचेन. अतिशय छान (रंजक आणि अनेक फायदे असणारा) असा छंद( / passion ) जोपासत असल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन ('तुमचे' म्हणजे आदरार्थी नाही . जे नेमाने जातात दुर्गभ्रमणासाठी त्या सर्वांचे ! )
|
त्यापेक्षा, खारुताई खाली ये - पण नीट ये, पाणी घे - पण हळु घे असे शब्द ऐकावे लागल्यामुळे नसतील येत पिल्ले खाली.. >>>>>>>>>>>>>>>. कूल. एकदम सही...
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 25, 2007 - 10:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आरती, अगं मी माझ्या लहानपणी गेलो होतो ना, म्हणजे त्याला किती युगं लोटली असतील बघ. त्यावेळी डिजिटल कॅमेरा वैगरे नव्हता. पण कर्नाळ्याचे काहि फोटो मायबोलीवर होते पुर्वी. आपले बरेच फोटो माझ्याकडे राहिलेत, जे तूम्ही बघितले नाहीत. BTW माझ्या घरात खारी मनसोक्त हुंदडत असतात.
|
Itsme
| |
| Thursday, April 26, 2007 - 4:48 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश मला कर्नाळ्याचे नाही, खारीच्या घरट्याचा फोटो बघायचा आहे .... ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Dineshvs
| |
| Thursday, April 26, 2007 - 4:26 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ओह, आहे अजुन घरटे खिडकीत. खारीला तीक्ष्ण दात असतात. आणि ती पिल्ले, घरट्याचेच गवत चावुन खाली टाकतात. घरात सगळा कचरा !!
|
Sayuri
| |
| Sunday, April 29, 2007 - 10:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझ्या मैत्रिणिच्या घरीने खारीने उंदराप्रमाणे उच्छाद मांडला होता! (कपडे कुरतडणे वगैरे). बाकी क्लासिक वर्णन! खासच. btw अलिकडील 'भटकंती' मध्ये, नगरजवळ असलेला 'रांजणकुंडे' नावाचा भौगोलिक चमत्कार दाखवला. (बहुतेक ठिकाणाचे नाव 'निघोज' किंवा असंच काहीतरी होतं) कोणि जाऊन आलंय का तिकडे?
|
Dineshvs
| |
| Monday, April 30, 2007 - 3:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लोकसत्तामधील, गेल्या वर्षीच्या दगडांच्या देशा, या लेखमालेत त्याचा उल्लेख होता. प्रवाहामूळे, दगड गोलगोल फ़िरुन अशी कुंडे तयार झाली, असे लिहिले होते. नगरकराना, जास्त माहिती असेल.
|
Phdixit
| |
| Friday, May 11, 2007 - 5:03 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
परतीच्या वाटेवर कर्नाळा
![](/hitguj/messages/644/125609.jpg)
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|