|
Gs1
| |
| Wednesday, March 14, 2007 - 10:50 am: |
|
|
शनिवार दिनांक ३ मार्चला होळी पौर्णिमा येत आहे हे आधीच हेरून ठेवले होते. त्यात त्या रात्री खग्रास चंद्रग्रहण आहे हे समजताच तर कुठेतरी भटकंतीला जायचे हे नक्कीच केले. या वेळेला होळी, चंद्रग्रहण पहाणे असा एकूण बेत ऐकून बायकोने येण्यात रस दाखवला होता, पण दोनएक तास चढायचे आहे हे ऐकल्यावर मोहिमेस ताबडतोब दुरूनच शुभेच्छा जाहीर केल्या. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सव्वासहा वाजता पुण्याहून आम्ही सहा जण मनोजची मारुती ओम्नी घेउन निघालो. आगामी कार्यक्रम मध्ये जाहिरात देण्याचा फायदा म्हणजे ते वाचून केशवसुमार या शीघ्रविडंबनकारांनी संपर्क साधला आणि तेही सामील झाले. कूल आणि आरती होतेच, शिवाय आजवर तब्बल १८० किल्ले पालथे घातल्यामुळे सकाळच्या एका पुरवणीद्वारे प्रकाशात आलेली किर्तीही होती. रायगड जिल्हायतल्या सुधागड तालुक्याचे नाव ज्यावरून ठेवले आहे असा हा सुधागड पाली पासून बारा किमी अंतरावर आहे. पुणे, लोणावळा, खोपोली असा प्रवास करत रात्री पावणेनऊला पालीला पोहोचलो, खोपोली पाली हा पस्तीस किमीचा प्रवास जरा कंटाळवाणा होतो. तरी आता रस्ता बऱ्याच चांगल्या स्थितीत होता. चांदण्यान न्हायलेला सरसगड डोळे भरून पहातच पालीत प्रवेश केला. आजपर्यंतच्या गिरिभ्रमणात झालेल्या एकमेव अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. पालीच्या गणपतीचे दर्शन घेउन पुढे निघालो पालीहून एक रस्ता विळेकडे जातो. त्याच रस्त्यावर सहा सात किमीनंतरच एक फाटा डावीकडे जंगलात शिरतो. पाच्छापूरकडे. पाच्छापूर हे सुधागडाच्या पायथ्याचे गाव. तसा धोंडसे गावाहूनही एक सोपा पण लांबचा रस्ता सुधागडाला जातो. पाच्छापूरजवळ येताच सुढागडाचा आवाढव्य पहाड नजरेत भरतो. पूर्वी पातशहापूर असे नावा असावे असे वाचले होते. संभाजीराहे आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर याची याच गावी भेट झाली होती. पाच्छापूरला मोठी होळी पेटली होती, तिथून तसेच पुढे जात ठाकूरवाडीला शाळेजवळ थांबलो. रात्रीचे दहा वाजले होते पण लख्ख चंद्रप्रकाशात कबड्डीचे सामने अगदी रंगात आले होते. गडाला अगदी खेटूनच सह्यादृची मुख्य रांग आडवी पसरलेली दिसत होती. दोन वाटाडे बरोबर घेउन गडाची वाटचाल सुरू केली. गड चांगलाच उंच आहे, खड्या चढणीचे बरेच टप्पे आहेत. वर सापांचा सुळसुळाट आहे आसे ऐकले होते त्यामुळे प्रत्येकाकडे एक विजेरी असावी असा आग्रह धरला होता, पण चंद्राच्या अक्षरशः फ्लडलाईटसारख्या प्रकाशामुळे गरजच भासली नाही. पुण्याला पौर्णिमा कधी आली आणि गेली हेही कळत नाही. एक दोन टप्पे चढुन एका कातळाच्या पायथ्याशी आलो, तिथे वर जायला शिडी लावली होती. नवी शिडी चांगलीच भक्कम आहे, पण जुनी शिडी आणि खोदलेल्या पायऱ्या याही अवश्य जाण्यासारख्या आहेत. अजून एकदोन टप्पे पार केले, आणि गिरीभ्रमणात पडलेला खंड आणि वाढलेले वजन चांगलेच जाणवू लागले. दोन चांगलेच मोठे विश्रांतीचे थांबे घेउन, पाच्छापूर दरवाजाला पोहोचलो. वाट अगदी सुस्पष्ट आणि न चुकण्यासारखी होती, वाटाडे उगाच आणले असे वाटत होते. पण अजून बरेच चालायचे होते असे नंतर लक्षात आले. पाच्छापूर दरवाजावर उभे राहून खाली कोकणात बघू लागलो. खालच्या अंधारात दूरवर पाड्यापाड्यांवर धडधडुन पेटलेल्या होळ्या इवल्याशा ज्योतींएवढ्या दिसत होत्या, ती ठाकरांची, ही मराठ्यांची.. आमच्या बरोबरचा बारक्या माहिती पुरवत होता. सुधागडाच विस्तार प्रचंड आहे, अजून अर्धा तास चढुन गेल्यावर एक विस्तीर्ण माळ दिसला, आम्हाला पंतसचिवांचा वाडा गाठायचा होता, तो पार माळ ओलांडुन पलिकडे दाट झाडीत होता. गडावर आल्यावर नक्कीच वाटाड्याची गरज भासली असती. वरचेवर डागडूजी झाल्यामुळे वाडा सुस्थितीत आहे. आमच्या आधीच पालीचे काही ग्रामस्थ देवीच्या दर्शनासाठी येउन मुक्कामी थांबलेले होते, पण एक मोकळी भिंत आम्हाला 'ऍलॉट' करण्यात आली. रात्र दीड वाजेपर्यंत जेवणे आटोपली आणि मग बाहेर एक फेरफटका मारून तीनचा गजर लावून दोनच्या सुमारास झोपलो. तीन वाजता मी आणि कूल दुर्बीण घेउन माळावर येउन बसलो. ग्रहणस्पर्श झाला होता, थोड्याच वेळात मनोजही त्याच्या स्टँडसह कॅमेरा घेउन दाखल झाला, आणि मग किर्तीही आली. पुढे दीड एक तास तो सगळा ग्रहणाचा सोहळा बघण्यात कसे गेले ते कळलेच नाही, मध्येच कधीतरी आडवे झालो आणि जशी जशी पृथ्वीची सावली चंद्राला ग्रासू लागली तसे तसे लक्षावधी ताऱ्यांनी उजळून निघणारे आकाश एकटक बघत राहिलो. अशा वेळेला आकाशदर्शनातले काही कळणाऱ्या एखाद्या सहकाऱ्याची उणीव फार जाणवते. मला साधारण कुठलेही सात तारे सप्तर्षीसारखे दिसतात. ग्रहणात चंद्र पूर्ण गुडूप झालाच नाही काळसर तांबूस रंगात दिसत राहिला. ग्रहणाचा प्राणीसृष्टिवर काय परिणाम होतो का हे बघायचे होते, पण तसे काहीच आढळले नाही. गडावरच्या गाईही शांतपणे रवंथ करत आमच्या बाजूलाच उभ्या होत्या. सकाळी केशवाने गडबड करत उठवले. त्याने भाविकांशी संधान बांधुन सगळ्यांसाठी चहाची व्यवस्था केली होती आणि आम्हाला पोहे करण्यासाठी एक पातेलेही मिळवले होते. सुधागडावर सरपण अगदी विपुल आहे. बाहेरच चूल मांडली आणि केशवानेच गरम गरम कांदेपोहे तयार केले. ते फस्त करून गड बघायला बाहेर पडलो. सुधागड अगदी प्राचीन गडापैकी एक आहे, भृगू ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला अशी त्याची ख्याती, जवळपास अनेक लेणीही आहेत. राजधानी म्हणून सुधागडचाही विचार राजांनी केला होता असे इतिहास सांगतो. पंतसचिवांचा वाडा चांगलाच ऐसपैस आहे. काही भाग दुमजली आहे. वाड्यात पाणी नाही, पण आणून भरून ठेवायची सोय आहे. बाजूच्याच एका खोलीत एक कुटुंब वसतीला आहे, आणि वाड्याच्या मधल्या चौकात त्यांच्या कोंबड्या खेळत असतात. त्या बघून या बहुतेक भाविकांनी प्रसादासाठी आणल्या असाव्यात अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली होती पण तसे काही नव्हते. सरपण इतके विपुल की पहाटे थोडीशी थंडी बघून लगेच एक मोठी शेकोटी पेटवली होती तिथल्या पुजाऱ्याने. वाड्याच्या मागेच एक खोल कोरडी पण वैशिष्ट्यपूर्ण अशी चौकोनि विहिर आहे, तिच्या खोलवरच्या भिंती एकदम काळ्याठिक्कर दिसत होत्या, आत पूर्वी आग लागली असावी असा तर्क केला. बाजूलाच भोरेश्वराचे देऊळ आहे, पण गडावरील भोराईदेवीचे मुख्य देउळ जरा दूर आहे. गडाचा हा पारिसर दाट वृक्षराजीने व्यापला आहे, त्यामुळे या हिरवाईतून चालतांना उन्हातही गारवा जाणवतो. उत्तरेकडे थोडे उतरून गेलो आणि मजबूत तटबंदी दिसली, त्या तटबंदीतच मोठ्या कौशल्याने एक चोरदरवाजा लपवला आहे. भुयारासारख्या आत आत जाणाऱ्या त्या रस्त्याच्य भिंतीही विहिरीसारख्याच काळया बघून आश्चर्य्च वाटले. आणि आत शेवटपर्यंत जायचे तर त्या भिंतींना घासत जावे लागेल एवढे अरुंद ! मग मनोजने थोडे आत जाउन पाहिले तर ते हजारो काळ्या कुळकुळीत कोळ्यांचे पुंजके होते, आणि चाहूलीने बिथरून ते टपाटप जमिनीवर पडुन तुरुतुरू पळापळ करू लागले. तटबंदीच्या या भागात साधी आणि लंगूर अशा दोन्ही प्रकारच्या माकडांच्या टोळ्या होत्या, पण आम्हाला पहाताच त्यांनी दुऱ पळ काढणेच पसंत केले. पुन्हा वर चढून आलो आणि भोराईदेवीच्या प्रशस्त देवळाकडे आलो, समोर दीपमाळ आहे, देवीसमोर शंक्रासमोर नंदी असतो त्या ठिकाणी आणि तशाच पोझमध्ये वाघ आहे. देवळातही दहा वीस जण सहज झोपू शकतील एवढी जागा आहे. मागे एक गट इथे झोपला असतांना छतावरून एका उंदरासकट घोणस पडला होता. त्या लोकांनी त्याचे छायाचित्रण करून ठेवले आहे. देवळासमोर पुन्हा थोडे सपात माळरान आहे, आणि तिथुन सह्य्राद्रीच्या मुख्य रांगेचे खूप जवळुन दर्शन घडते. एकेमेवाद्वितीय अशी तेलबैलाची भिंत तर अगदीच समोर उभी ठाकलेली दिसते, तिथुन सवाष्णी घटाने उतरून सुधागडवर सात एक तासात येता येते. सुधागड कोकणातला किल्ला असूनही त्याचा माथा जवळ जवळ सह्यपठाराच्याच पातळीला भिडला आहे. वायव्येला पाहिले असता पालीचा सरसगड अगदीच ठेंगणा दिसतो, पण तो चढतांना काही तसे वाटले नव्हते. तेलबैलाच्या उजवीक्डे पिटुकला चौकोनी ठोकळा म्हणजे धनगड दिसतो. आणि त्याच्या बाजूला नवरानवरी. सह्याद्रीचा हा सगळा देखावा हे सुधागडाचे अजून एक खास वैशिष्ट्य. सुधागडावर धोंडसे गावाकडूनही एक वाट येते आणि त्या वाटेवर रायगडासारखाच सुरेख महादरवाजा लागतो असे वाचले होते, तो पहाण्यासाठी धोंडसेकडे उतरू लागलो. दहा पंधरा मिनिटे उतरल्यावर अप्रतिम गोमुखी भव्य प्रवेशद्वार लागले. हे पूर्वी बुजलेले होते पण मुंबईच्या काही गिरीयात्रींनी बरेच श्रम करून मोकळे केले असे ऐकले. पायऱ्यांवर सापाची एक अखंड कात सापडली, ताजीच असावी, डोळे सुद्धा स्पष्ट दिसत होते. मग़ आजूबाजूला पाहिले तर सापांच्या कातीच काती लटकत होत्या. वर चढून आलो, डावीकडच्या सह्यरांगांकडे बघत बघत दक्षिणेला टकमक टोकावर पोहोचलो, वाटेत विसाव्याला एका गर्द सावलीच्या झाडाखाली छान पार बांधला आहे. टकमक टोकाच्या बाजूला गडाचे अजून एक निमुळते टोक आले आहे, आणि या दोन्हीकड्यांमध्ये ध्वनी प्रतिध्वनींचा खेळ चांगलाच रंगतो. स्थानिक लोक त्याला बोलता कडा म्हणतात. आधी शिवरायांच्या नावाचा गजर केल्यावर मग एकमेकांच्या नावानेही शंख केला आणि परत फिरलो. गडाच्या पूर्व बाजूला चांगलाच मोठा तलाव आहे, ते जवळ गेल्याशिवाय लक्षात आले नव्हते. तलावात म्हशी मजेत डुंबत होत्या, आता उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता त्यामुळे आम्हालाही मोह आवरत नव्हता, पण तसेच खाली उतरू लागलो. जवळचे पाणी संपले होते, पाणी कुठे मिळेल ते नीट समजून घेतले. उतरतांना पाच्छापूर दरवाजाच्या वरच्या बाजूला कड्याला लगटून एक वाट गेली आहे, तिथेच उंबराखाली अति मधुर आणि थंड पाण्याचे एक टाके आहे, तिथे थोडा वेळ मुक्कामच ठोकला. ग्लुकॉन डी ची एक छोटी पार्टी करून पुन्हा खाली उतरू लागले त्याही वाटेवरचा एक आणि पश्चिमेकडचा एक असे दोनही बुरूज त्यातले भुयारी दरवाजे आणि नाळ हे सर्व बघण्यासारखे होते. साडेबाराला खाली उतरायला सुरूवार केली, उन्हात तापून तापून ठाकुरवाडीला पोहोचलो तर तिकडे दारु पिऊन धुळवड चालू होती. त्यांनी अडवून पैसे मागायला सुरूवात केली, त्यांना मनोजने बोलण्यात गुंतवले आणि बाकीच्यांनी खुष्कीच्या मार्गाने पायथ्याला उभी केलेली गाडी गाठली. रस्त्यातही दोन तीन ठिकाणी असेच रस्ता अडवून पैसे मागणे सुरू होते. खर तर गावाकडच्या लोकांचा असा अनुभव कधी येत नाही, नेहेमी प्रेमळ आदरातिथ्यच वाट्याला येते. पालीला पोहोचल्यावर किती पेले लिंबू, कोकम, आवळा, सरबत रिचवले त्याची गणतीच नाही. लोणावळ्याला अन्नपूर्णामध्ये जेवून सातच्य आत घरात पोहोचलो, ते रहाण्याची उत्तम सोय, मुबलक पाणी, विपुल सरपण, गडावर आणि आजूबाजूलाही पहाण्यासारखे बरेच काही अशा सर्व वैशिष्ट्ट्यांमुळे आम्हाला आवडलेल्या या सुधागडावर पुन्हा कधीतरी रहायला यायचे बेत करतच. मनोजने काढलेले काही फोटो
|
Milindaa
| |
| Wednesday, March 14, 2007 - 11:57 am: |
|
|
मजा आली वाचून. बघू, मला कधी यायला जमतंय ते
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:22 pm: |
|
|
GS1 त्यादिवशी आठवण काढलीच तुम्हा होती सगळ्यांची. नेहमीपेक्षा बर्याच विस्ताराने लिहिले आहेस, त्यामुळे सगळे छान डोळ्यासमोर उभे राहिले. दोन्ही लिंक्स दिसत नाहीयेत.
|
Cool
| |
| Wednesday, March 14, 2007 - 6:45 pm: |
|
|
दुसऱ्या दिवशी आम्ही पुर्ण गड पालथा घातला, रायगडाच्याच महाद्वाराचा धाकटा भाउ शोभावा असा एक महादरवाजा सुधागडाला आहे, या महादरवाज्याच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. याच महादरवाजातच आम्ही अजुन एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली. तिकडे अनेक सापांनी सोडलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या कात बघायला मिळाल्या, त्या एवढ्या स्पष्ट दिसत होत्या की त्यावरील डोळ्याच्या खोबणी सुद्धा ओळखु येत होत्या. सुधागडावर फुरसे आणि घोणस अशा विषारी जातीच्या सापांचा सुळसुळाट असतो असे ऐकुन होतो, या कात बघुन त्यावर शिक्कामोर्तब केले. प्रत्यक्षात त्यातील एक जरी प्राणी नुसता समोर आला असता तर काय असा विचार करुन सुद्धा काटा येतो, सुदैवाने तसे काही झाले नाही. सुधागडावरुन फिरतांना तेलबैला आणि धनगड यांचे मोहक दर्शन होते. त्याच बरोबर सरसगड सुद्धा सुंदर दिसत रहातो. सुधागडाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे बोलते कडे, अर्थात इको पॉइंटस. आवाजाचा एवढा सुंदर प्रतिसाद मिळतो, की आपण आश्चर्य चकीत झाल्यावाजुन रहात नाही. बऱ्याच दिवसापासुन कुठलाही ट्रेक झाला नव्हता, पावसाळ्यानंतर हिवाळा पुर्णपणे वाया गेला होता. त्यामुळे होळीला चंद्रग्रहणाच्या रात्री सुधागडाला ट्रेक करायचा आहे, हे ऐकुनच मन प्रसन्न झाले. शब्दात लिहिता येणार नाही एवढा आनंद या ट्रेकने दिला. दुरवर पसरलेल्या गावांमधुन दिसणारी होळी, स्वच्छ चंद्रप्रकाश. चंद्र तर एवढा मोहक दिसत होता की, कुणालाही कविता सुचावी. एवढे अप्रतिम दर्शन देणारा चंद्र डोळ्याचे पारणे फेडणारा होता. चंद्रग्रहणाचा दिड तास तर एक एक क्षण जपुन ठेवावा असाच होता. सर्वत्र पसरलेला प्रकाश, सुधागडावरील माळरान, सोबतीला गाई गुरांच्या हंबरण्याचा आवाज, मधुनच एखाद्या टिटवीनं ओरडुन जाणं, अशात हळुहळु चंद्रग्रहणाला सुरुवात, सपाट धरणीवर आडवे होउन आम्ही दुर्बिणीतुन त्या निसर्गाच्या चमत्काराचा आस्वाद घेतोय. आज लिहितांना सुद्धा अंगावर काटा येतोय, असे खुप कमी क्षण जगायला मिळतात. रोजच्या घाई गडबडीत आपण या सर्व स्वर्गीय गोष्टींना विसरुनच जातो, आणि अशा शांत वेळी निसर्गच आपल्याला हाताला धरुन त्याचा आस्वाद घ्यायला शिकवतो. संपुर्ण चंद्रग्रहण लागल्यावर, आकाश ताऱ्यांनी भरुन गेले होते. एरवी फार कमी वेळेला दिसणारे ताऱ्यांनी आभाळ गच्च भरले होते. दिड दोन तास त्या मोहक वातावरणात काढल्याने ट्रेक सार्थ झाल्या सारखे वाटत होते, पण दुसऱा दिवस तर बोनस ठरला. सुंदर आणि प्रसन्न सकाळी, चवदार पोह्यांचा आस्वाद घययला मिळाला. त्यानंतर चोरदरवाजा ते महादरवाजा अशी गडाची सफर. त्यातच समोर आपल्या विशिष्ट आकारासहीत मस्त दर्शन देणारा तेलबैला आणि दुरवर पसरलेली सह्याद्रिची रांग. याच रांगेवरुन सह्याद्रीचे महाराष्ट्रभुमीवर किती विशाल छत्र आहे याची कल्पना येउन जाते आणि याच सह्याद्रिच्या कुशीत आपला जन्म झाल्याबद्दल अभिमानाने उर भरुन येतो, उन्हात डोळ्यांना सुखावणारी सुधागडावरची झाडे. सुधागडावरची झाडे फारच डौलदार आहेत, दोन्ही बाजुला प्रशस्त पसरलेली असतात. कडक उन्हातुन गेल्यानंतर अशी झाडे काय आनंद देत असतील हे अनुभवच सांगु शकेल. बोलत्या कडावरुन येणारा प्रतिध्वनी विचार करायला लावतोच. मग त्याच बोलत्याकड्यावरुन खड्या आवाजात गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी जोरदार मारलेली आरोळी अजुनही कानात घुमत नसली तरच नवल. सुखाचे एवढे सगळे सोहळे एकत्र अनुभवुन आलो आणि पुढच्या अनेक दिवसांसाठी दैनंदिन व्यवहारातील संकटाना समोर जाण्याचे उंदड बळ मिळाले. कुणालाही संधी मिळाल्यास कधीही सोडु नका असा हा ट्रेक.
|
Bee
| |
| Thursday, March 15, 2007 - 6:11 am: |
|
|
ते छायचित्रण बघून अंगावर सरसरून काटा आला माझ्या.. सहीच!!!! तुम्ही लोक खूप शूर अहात खरे तर.
|
Psg
| |
| Thursday, March 15, 2007 - 11:54 am: |
|
|
GS आणि कूल, मस्त लिहिलं आहेत.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 15, 2007 - 4:25 pm: |
|
|
सुभाष, जिवंत आणि खरेखुरे साप बघायचे तर माझ्याकडे ये रे. आम्हाला साप कितीवेळा आडवे जातात, का आम्ही त्याना आडवे जातो, ते गिर्याला विचार. आणि तुला नेमके कसले कौतुक आहे रे, सापांचे कि त्यानी टाकलेल्या कातीचे ? कारण असे आहे बघ, ज्या नगरात सध्या वास्तव्य आहे ना तुझे तिथे तुला काती दिसणार नाहीत, पण कात टाकलेले साप सदैव आजुबाजुला दिसतील. खी खी खी. दिवे घ्या रे.
|
Kk_8
| |
| Friday, March 16, 2007 - 1:55 pm: |
|
|
Masta re!! nice narration GS ani Kool
|
Cool
| |
| Friday, March 16, 2007 - 6:53 pm: |
|
|
अलभ्य लाभ, KK आपलं मायबोलीवर स्वागत, तुमचे अनुभव ऐकायला आम्ही आतुर आहोत, तर होउ दे मग सुरुवात...
|
Itsme
| |
| Saturday, March 17, 2007 - 4:54 am: |
|
|
कुल, मला एक खर - खर सांग .... चंद्र मोहक दिसत होता की चंद्रात दिसणारा मुखचंद्र ?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|