Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वर्धनगड - महिमानगड ...

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » वर्धनगड - महिमानगड « Previous Next »

Gs1
Monday, July 17, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



रविवार, १६ जुलै. पुढच्या शनिवार रविवारी विशेष ट्रेक असल्याने या रविवारी जरा साधाच प्लॅन करायचा होता. कूल, आरती, क्षिप्रा, मिहिर, भक्ती, गौरव, चैतन्या आणि धुमकेतू असे नऊ जण सातच्या पुणे सातारा विनाथांबा एस्टिने सातार्‍याला पोहोचलो. वाटेत भुईजजवळ डावीकडे चंदन वंदन तर उजवीकडे वैराटगड खुणावत होते. पण तसेच पुढे गेलो कारण या दोनपैकी एकीकडे जायचा कार्यक्रम बदलून सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या दोन किल्ल्यांना जायचा बेत केला होता.

सातार्‍याला थोडी पोटपूजा करून, पुसेगाव बसने तसाभरात वर्धनगड गावात उतरलो. गावात सुरूवातीलाच दोन तोफा एका चौकात दिमाखात ठेवल्या आहेत, वर भगवा फडकतो आहे.

वर्धनगडाची लक्ष वेधुन घेणारी गोष्ट म्हणजे माथ्यावर दिसणारी अत्यंत सुरेख अशी नागमोडी वळणे घेत गेलेली एकसंघ तटबंदी आणि त्याआडुन डोकावणारे वर्धनीदेवीचे मंदिर.

गावातून एक सोपी वाट वर चढत गेलेली दिसते. मध्ये मध्ये पायर्‍याही बांधलेल्या आहेत, व काही उत्साही लोकांनी दगडांवर किती पावले चाललो हेही लिहून ठेवले आहे. ४२०व्या पावलाला बसण्यासाठी एक सुरेख दगड आहे सावलीतला.

धुमकेतू पटापटा उड्या मारत आम्ही साधारण अर्ध्या रस्त्यात असतांनाच वर तटावर पोहोचला सुद्धा. सुंदर बांधणीच्या दरवाजातून आम्हीही पाऊण तासात गडावर दाखल झालो. फार सुरेख वारा होता. पण पाउस नाही.

आरती, भक्ती, मिहिर दरवाजात काही काळ रेंगाळले आणि त्यांना एका सापाच्या पिल्लाने बराच काळ दर्शन दिले. वर्णनावरून घोणस असावा असे वाटते.

गडाच्या मधोमध एक टेकडी आहे आणि देउळ सुद्धा आहे, पण तिथे नंतर जायचे ठरवून चार फूट रुंदीच्या तटबंदीवरून गडाला प्रदक्षिणा घालायला सुरूवात केली. ही प्रदक्षिणा हा कुठल्याही किल्ल्यावरचा सर्वात मस्त भाग असतो. वर यायच्या मुख्य वा छुप्या अवघड वाटा, संरक्षणाची नैसर्गिक व्यवस्था, त्यातल्या त्रुटी भरून काढण्यासाठी केलेले विशिष्ट बांधकाम, आजूबाजूच्या वेगवेगळ्या गावांना वा दुसर्‍याच डोंगरांना जाऊन मिळणार्‍या सोंडा दुर्बिणीतून बघणे, मनातल्या मनात या सगळ्यावरून वर खाली जाऊन येणे यातली गंमत न्यारीच आहे. शिवाय आजूबाजूचे डोंगर, जलाशय, दूरवर त्या त्या दिशांना दिसणारे किल्ले हेही सर्व दिसत रहाते.

मान तालुका हा ( नगरसारखाच ) अत्यंत दुष्काळी भाग आहे, पण पावसामुळे सर्वत्र सुंदर दृश्य बघायला मिळत होते. पोपटी हिरवी पठारं तर डोळ्यांना इतकी सुखावत होती की पाय आपोआपच रेंगाळत होते.

बर्‍याच ठिकाणी अशा जागा आहेत की जिथुन खाली उतरता येईल असे वाटते. कदाचित त्यामुळेच एवढी भक्कम तटबंदी बांधली असावी.

या भागात सह्याद्रीच्या मुख्या रांगेसारखे छातीत धडकी भरवणारे उंच सुळके नाहीत की खोल दर्‍या नाहीत. पण जे काही बुटके डोंगर आहेत त्यांचाच वापर शिवाजिमहाराजांनी विजापूरपासूनच्या संरक्षणासाठी करुन घेतला. वर्धनगड, महिमानगड, वारूगड, संतोषगड अशी चार किल्ल्यांची फळीच आहे या भागात.

प्रदक्षिणा पूर्ण होताच टेकडी चढलो, वाटेत पाण्याचे टाके आहे. पण पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. हनुमानाचे एक छोटे देउळ आहे आणि माथ्यावर वर्धनी देवीचे मोठे देऊळ आहे.
देवळात, शिवाजीमहाराज विश्रांतीसाठी या गडावर आल्याचा उल्लेख आहे. गावकर्‍यांना किल्ल्याचे कौतुक आहे, देवळातही राबता आहे, यथाशक्ती निगा राखली जात आहे हे बघुन बरे वाटले.

पाच दहा मिनिटे विश्रांती घेऊन खाली उतरलो. दहिवडी बस पकडुन अर्ध्या तासात महिमानगड थांब्याला उतरलो. साधारण दोन किमी चालून महिमानगड गावात पोहोचलो. गड उंचीला फार नाही पण माथ्याचा कातळ मात्र थोडा अक्राळविक्राळ दिसतो, थोडीफार तटबंदी शाबूत आहे.

आता चांगलेच उन पडले होते, पण अर्ध्या तसात गड चढुन वर आल्यावर वरच्या वार्‍यामुळे तेवढे जाणवेनासे झाले. शिवाज़ी महराजांनी बांधलेल्या या किल्ल्यावर महाराजांच्या तर काही खुणा उरल्या नाहित मात्र एका दर्ग्याचे अतिक्रमण झाले आहे. पक्के बांधकाम करणे जोरात चालू आहे. गावातही मुसलमानाम्चे ब्राबल्य जाणवले. अर्थात दर्ग्यात कोणीच नसल्याने आम्हाला मात्र त्याचा जेवायला चाम्गला उपयोग झाला. भरपूर चालणे झाल्याने सर्वांनाच कडकडुन भूक लागली होती. जोरदार पंगत झाली आणि नंतर कूल आणि आरतीने सातार्‍याला घाई घाईत घेतलेले आंबेही खाल्ले. दर्गा स्वच्छ करून, मग थोडा वेळ थंड वार्‍यात गडावरच्या लुसलुशीत हिरवळीवर लोळण्याचा आनंद लुटला आणि खाली उतरलो. गावातल्याच एका विहिरीवर ताजेतवाने होऊन मुख्य रस्त्यावर आलो.

पुढे संतोष वा वारूगड करण्याचा विचार वेळेअभावी सोडुन द्यावा लागला. दिनेश सातार्‍यात भरपुर भिजून परतीच्या मार्गाला लागले होते त्यामुळे त्यांना सातार्‍यात भेटण्याचा प्लॅनही बारगळला आणि पुन्हा सातारामार्गे पुण्याला परतलो.

स्वत्:ची गाडी घेउन पहाटे पाचला निघालो तर धावपळ करत एका दिवसात चारही किल्ले बघुन होतील. संतोषगडासाठी पुसेगाव फलटण मार्गावरील ताथवडे येथे जायचे, तर वारूगडाच्या पायथ्याशी गिरमे हे फलटणजवळचे गाव आहे.









Indradhanushya
Friday, July 21, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>स्वत्:ची गाडी घेउन पहाटे पाचला निघालो तर धावपळ करत एका दिवसात चारही किल्ले बघुन होतील.
चालेल चालेल... GS कधी ते सांग... :-)

पावसाळ्याची पुरेपुर मज्जा लुटतायं लेको...


Cool
Sunday, July 23, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान तालुका हा ( नगरसारखाच ) अत्यंत दुष्काळी भाग आहे>>
निषेध निषेध निषेध!!! नगर जिल्याची जाहीर बदनामी करणार्‍यांचा निषेध..

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators