|
Gs1
| |
| Monday, June 19, 2006 - 10:53 am: |
|
|
विकटगड ( पेब ) - माथेरान यंदा लवकर आला आला म्हणतांना अजूनही पाऊस हुलकावणीच देत आहे, पण सह्याद्रीत थोडा फार तरी असेल या आशेने रविवारी दिवसभराच्या ट्रेकसाठी शनिवारी १७ जुनला रात्री दहा वाजता कूल, आरती, मिहिर आणि मी असे चौघे पुणे रेल्वे स्थानकावर जमलो. अकराच्या पुणे मुंबई पॅसेंजरने छान झोपून नेरळला पोहोचायचे होते, आणि सकाळी ताजेतवाने होऊन चढाई सुरू करायची होती. पण श्री मर्फी म्हणतात त्याप्रमाणे सहसा एवढे सुरळीत काही होत नसते. ही पॅसेंजर आता पंढरपूरहून येते असे कळल्यावर जागा मिळणार की नाही असे वाटू लागले, आणि खरच गाडी आत घुसताही येणार नाही एवढे खचाखच भरून आली. मग सव्वाबाराच्या लोकलने थोडीशी झोप घेण्याचा प्रयत्न करत लोणावळ्याला गेलो.तिकडे दोनच्या सुमारास आलेल्या भरगच्च चेन्नई मेलने उभे राहून कर्जतला गेलो. जोरात पाऊस सुरू होता. फलाटावर जागा मिळेल तिथे वर्तमानपत्र पसरून बरीच वेगवेगळी ट्रेकर मंडळी झोपली होती, तर काहींच्या हास्यविनोदाच्या मैफिली रंगल्या होत्या. कर्जतला फलाटावरच थोडा वेळ काढून तीन चाळीसच्या पहिल्या लोकलने पहाटे चार वाजता नेरळला पोहोचलो. फलाटावरच्या बाकड्यांवर डुलक्या घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करून झाला. इथे मला रजनीश गोरे नावाच्या एका ट्रेकरच्या ब्लॉगमधल्या काही ओळी आठवतात. I have been doing this for a decade, and I have asked myself this question a thousand times before….why? Why do I have to spend a night sleeping on a railway platform, watching the dirty roof, while being devoured by mosquitoes? The answer is simple. It's the mountains. I love them. Is it a reason good enough to explain to the others? Obviously not! It's insanity for most of them. But hey! We need not ever justify our actions when they make us happy…and mountains make me happy…hence the mosquitoes. Besides this is getting a bit all too familiar. Deserted platforms, the occasional thunder of passing trains, boisterous groups and a silent night. It's one of the typical nights out on the platform before the day begins and we set out to the mountains. So here I am once again at Neral station on this season's first trek to Fort Peb... अक्षरश : माझ्या मनातलेच लिहिले आहे या माणसाने. तर शेवटी स्थानकाबाहेर पडलो, पाउस थांबला होता पण ढग मात्र गडगडत होते. नेरळ गावातून बाहेर पडण्याच्या मार्गावर एक प्रशस्त मारूती मंदिर सापडले. आत गेलो तर पुजारीबाबा झोपलेले होते आणि डोक्यावर चक्क पंखा चालू होता. अजून काय पाहिजे होते ? लगेच निद्राधीन झालो. पहाटे सहाला उठलो, आणि आवरून लगेच पेबकडे निघालो. नेरळकडे पाठ करून पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिले की समोर एक मोठी डोंगररांग दक्षिणोत्तर आडावी पसरलेली दिसते. त्यावर डावीकडे माथेरानचे विस्तीर्ण पहाडावरचे पठार दिसत होते, त्याच्या उजव्या बाजूला, आमच्या बरोबर समोर पेबचा माथा ढगात लपला होता आणि अजून उजवीकडे नाखिंडचे शिखर दिसत होते. पेब आणि नाखिंडच्या मधुन एक सोंड नेरळच्या दिशेने उतरली आहे. त्यावरून मोठे विद्युतमनोरे या सगळ्या आडव्या रांगेच्या पलिकडे गेले आहेत. तीच दिशा धरून चालायला सुरूवात केली. थोड्याच वेळात पाठीवर सूर्य तापला आणि चढण फारच दमछाक करणारी वाटू लागली. बरेच थांबे घेत खिंडीखालच्या पठारावर पोहोचलो. आता जरा ढग गोळा झाले आणि हवाही सुसह्य झाली. इथे सरळ मनोर्याच्या खिंडीकडुन नाखिंडला जाणारी वाट सोडुन, डावीकडे पेबच्या खिंडीत जाणारी वाट घेतली आणि एका ओढ्यातून बरेच चढत अखेर खिंड गाठली. शेवटच्या दहा मिनिटात ढग दाटून आले आणि पावसाचा सुखद शिडकावाही झाला. पश्चिमेकडुन येणार्या हवेच्या हव्याहव्याशा झुळुकी अंगाला भिडल्या आणि पलिकडच्या विस्तीर्ण भूभागाचा आणि डोंगररांग़ांचा नयनरम्य देखावाही डोळ्यासमोर उलगडला.
|
Gs1
| |
| Monday, June 19, 2006 - 12:39 pm: |
|
|
आमच्या डावीकडे टेकड्या टेकड्यांच्या टप्प्या टप्प्याने उंच होत गेलेला पेबचा माथा होता, त्यापलिकडे माथेरान उंचावलेले दिसत होते, त्याच्या उजव्या बाजूला विस्तीर्ण प्रबळगड आणि बाजूलाच पदरचा किल्ला. आमच्या मागे आलो तो ओढा थेट नेरळकडे वहात गेला होता. पण तसे सरळ जाता येत नाही कारण वाटेत तो खूपच मोठी उडी घेतो. वायव्येला चंदेरीचा अजस्त्र कातळ - सुळका, त्याच्या बाजूला म्हैसमाळ आणि त्याच्याही पलिकडे श्री मलंगगड. ईशान्येला दूरवर गोरखगड, मच्छिंद्र आणि मग सिद्धगडापासून करजतपर्यंत आलेली सह्याद्रिची एकसंध वाटावी अशी भिंत. या परिसराची सर्व श्रीमंती क्षणात उलगडुन दाखवणारी ही खिंड आहे. थोडा वेळ थांबून पुन्हा चढाई सुरू केली, मध्ये एक रॉक पॅचही ओलंडला आणि अर्ध्या तासात गडाच्या पोटातल्या गुहांजवळ आलो. प्रत्येक गडावरच्या गुहाही वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. नाणेघाटाच्या प्रशस्त गुहेचे तोंड संपूर्ण उघडे आहे, तर काही ठिकाणी दारे, खिडक्या कोरलेली असतात. इथे मात्र अजूनच वैशिष्ट्यपूर्ण होत्या. जेमतेम दीड फुटाच्या चौरस तोंडाचे भुयार, त्यातून सात आठ फूट रांगत आत गेले की मग पायर्या वा प्रशस्त गुहा असा प्रकार होता. पाण्याचे टाकेही अशाच रचनेचे होते. भुकेलेल्यांना थोपवून धरण्यात इथपर्यंत यश मिळाले होते. पण आता साडेअकरा वाजले होते. केळीची पावसाने धुतली गेलेली पाने तोडुन आणली, आणि जेवण सुरू केले. आरतीने चोख भोजनव्यवस्थेत आता प्रावीण्य मिळवले आहे असे मनोमन मान्य करत आधी खूप जास्त वाटलेले अन्नपदार्थ दहा मिनिटात फस्त केले. गडमाथा अजून दूर होता. त्यामुळे पुढे निघालो. एका अवघड ठिकाणी लोखंडी शिडी उभी करून ठेवली होती, तिचा लाभ घेत वर चढलो, आता अजून बराच वर भगवा ध्वज फडकतांना दिसत होता, मग वाट सोडली आणि सरळ ते टेकाड वर चढु लागलो आणि थोड्या प्रयत्नाने माथ्यावर दाखल झालो. तिथे कुठल्या तरी स्वामींच्या पादुका आहेत. माथ्यावर दहा मिनिटे विसावून थोडे पुढे गेलो तर एक आश्रम दिसला, तिथे पुर्वी रहाणार्या एका स्वामींचे शिष्य सध्या मुक्कामाला आहेत. त्यांनी पाणी दिले आणि खाली असलेले शंकराच्या देवळाजवळचे पाण्याचे एक टाकेही दाखवले. कातळाला बिलगून गेलेली माथेरानकडे जायची वाटही दाखवली. पाणी शेंदून बाटल्या भरून घेतल्या आणि माथेरानकडे निघालो तेंव्हा अडीच वाजून गेले होते.
|
Gs1
| |
| Monday, June 19, 2006 - 4:28 pm: |
|
|
पेबकडुन दक्षिणेकडे जात आम्ही माथेरानकडच्या खिंडीत उतरायला सुरूवात केली. वाटेत एका अवघड कड्यावर वीस वीस फूट उंचीच्या दोन शिड्या एकाखाली एक काटकोनात लावल्या आहेत. तिथुन उतरून माथेरानच्या पहाडावर दाखल झाल्यावर वाट त्या पहाडाला बिलगून दरीच्या काठाने जात रहाते, समोर माथेरानचा सनसेट पॉईंट दिसत होता. हवा अत्यंत अल्हाददायक होती, त्यामुळे भराभर चालत गेलो, एका ताSआत अजून एक शिडी पार करून घाटातल्या नेरळ माथेरान रेल्वे रूळांवर 155NM दगडापाशी दाखल झालो. वर माथेरान गावात जायचा बेत नव्हताच, मग रेलवे रूळांवरून नेरळच्या दिशेने निघालो. दरीच्या काठा काठाने जाणारा हा मर्ग गेल्या वर्षीच्या पावसाच्या तांडवात अक्षरश : धुवून गेला आहे. जागोजागी उखडलेले रूळ, काही ठिकाणी भूस्खलनामुळे दहा पंधरा फूट जमिनीखाली गाडले गेलेले, तर कधी तुटुन दरीतच अधांतरी लोंबकाळणारे. आणि एक दोन ठिकाणी तर रूळ तसेच पण खालची जमीन आणि स्लीपर्स गायब !! त्यावरून जाण्याची दहा हजाराची पैज लागली पण अखेर सूज्ञपणे माघार घेतली गेली, आणि खाली उतरून पुन्हा वर चढुन आलो. एकुणच तो हाहाकार बघुन निसर्ग एका क्षणात किती उलथापालथ करू शकतो याची भीतीदायक जाणीव झाली. माथेरानची खासियत असलेली ही पिटुकली रेलवेगाडी पुर्ववत व्हायला अजून किती वर्ष लागणार माहित नाही. दोन एक किमी चालल्यावर 134NM नेरळ माथेरान रस्ता लागला. आता मात्र आम्हाला पुण्याची गाडी पकडण्याचे वेध लागले होते, त्यामुळे टॅक्सीने नेरळ स्थानक गाठले आणि लगेच योगायोगाने सिग्नल लाल असल्याने मिळालेल्या कन्याकुमारी एक्सप्रेसने सात वाजता पुणे. पायपिटिचे पूर्ण समाधान देणारा ट्रेक पार पडला. ट्रेक ही चार पाच जणांच्याच गटाने करायची गोष्ट आहे, वीस - तीस जणांच्या झुंडीने नाही या आनंद पाळंदेंच्या विधानाची सार्थकता पुन्हा पुन्हा पटते, तसेच याही वेळी जाणवले. इथे गुहेमध्ये रहायची व पाण्याची उत्तम सोय आहे. इथल्या काही वाटा भर पावसानंतर मात्र चांगल्याच धोकादायक होतील असे वाटते. तेंव्हा काळजी घेणे आवश्यक. फोटो काढायलाच हवा होता असे खूपच क्षण आले या ट्रेकमध्ये पण कोणीच कॅमेरा आणला नव्हता. फोटोग्राफीची मनापासून आवड असलेला कोणीतरी बरोबर पाहिजे त्यासाठी. नाहीतर मला तरी हा छंद जडवून घेतला पाहिजे. आणि हो, आता पाऊस पाहिजेच !!!!
|
Dineshvs
| |
| Monday, June 19, 2006 - 4:57 pm: |
|
|
अरेरे माथेरानची गाडी बंद झाली का आता ? खुपवेळा गेलो आहे तिने. आम्हाला धडा पण होता, त्या ट्रेनवरचा. प्रबळगडावर मात्र मी खुप थरारक अनुभव घेतला होता. मुळात त्याचे रुपच फसवे आहे. तुम्ही अवश्य जा तिथे.
|
Moodi
| |
| Sunday, July 02, 2006 - 7:36 pm: |
|
|
पाऊस सुरु झालाय ना. मग हा लेख बघा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1698265.cms
|
Jo_s
| |
| Monday, July 03, 2006 - 5:12 am: |
|
|
gs मस्तच, काय लिहीलयस, खरच खुप धमाल आली असणार त्या माथेरानच्या गाडीनी मी ही खुपवेळा गेलो आहे. माथेरान मस्त्च आहे. महाबळेश्वरपेक्षा मला तेच आवडत. या माथेरान डोंगर रांगांच्या पलीकडे म्हणजे नेरळ्च्या विरुध्द बाजूला अनेक आदीवासी पाडे आहेत. त्यांच्या पर्यंत अजून सरकारी विकास पोहोचला नाही. त्यांच्यासाठी काम करणारी एक संस्था आहे. तिथे मी गेलो होतो. तिथेच पनवेलला पाणी पुरवणारं गाढेश्वर धरण आहे. लवकरच त्यावर लिहीन.
|
Bee
| |
| Monday, July 03, 2006 - 8:02 am: |
|
|
सुधिर, फ़ुलराणी बंद झाली आहे हे खरय का रे..
|
Dineshvs
| |
| Monday, July 03, 2006 - 5:03 pm: |
|
|
सुधीर, त्या गाढेश्वराजवळुन थेट माथेरानला रस्ता होणार होता. अर्धवट राहिलेय ते काम. पण रस्ता आहे तिथपर्यंत एस्टी जाते. Bee फुलराणी पेशवेपार्कात, अजुनहि चालतेय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|