Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
धनगड - तेलबैला ...

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » धनगड - तेलबैला « Previous Next »

Gs1
Thursday, June 01, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनगड - तेलबैला


Gs1
Thursday, June 01, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शनिवार, सत्तावीस मे. मी आणि धुमकेतू अशा दोघांनीच एकच्या लोणावळा लोकलने आमचा प्रवास सुरू केला. आम्हाला 'भांबुर्डा' या धनगडाच्या पायथ्याच्या गावाला जायचे होते. लोणावळ्याला गेल्यावर बारा आणि साडेचार अशा दोनच एस्टी आहेत असे कळले. बाकी कुठलेच वाहन तिथे जात नाही.

लोणावळ्यावरून एक रस्ता बोरघाटातून खोपोलीकडे जातो, तर एक तसा अपरिचित रस्ता सह्याद्री पठाराच्या कडेकडेने भुशी धरण, नौदलाचे आय. एन. एस. शिवाजी असे करत अँबी व्हॅलि -आंबवणे जातो. आंबवणेपर्यंत रस्ता तर सुरेख आहेच, पण उजव्या बाजूला अनेक ठिकाणी पठार संपून, तीन हजार फूट खाली कोकणची भूमी दिसत राहते. इथेच लायन् पॉईंट, शिवलिंग दर्शन असे पर्यटकांची गर्दी होणारेही काही पॉईंट आहेत. अशी सर्व शोभा बघत आमचा प्रवास सुरू झाला, वाटेत घुसळखांबचा फाटा लागला, इथुनच तुंगच्या पायथ्याला रस्ता जातो, मग आले पेठ शहापूर, जिथे मागच्या पावसाळ्यातल्या ट्रेकच्या रम्य आठवणी जागवत लोभस कोराईगड उभा होता.

आंबवण्याच्या अलिकडे बस उजवीकडे वळली आणि दाट जंगलाने वेढलेले घाट चढु लागली, आता सगळा अपरिचित, निर्जन भाग सुरू झाला होता. हा खडबडीत रस्ता असाच भांबुर्ड्यच्या पुढेही वांद्रे, वडुस्ते मार्गे मुळशीच्या जलाशयाच्या मागच्या बाजूने जात ताम्हीणी घाटाला मिळतो. एका दांडग्या डोंगररांगेने आमचे पुढचे सर्व दृश्य व वाटही अडवली होती, ती चढुन बस एका उंच खिंडीत आली आणि समोरचा देखावा उलगडला. दृष्याची नायिका होती
तेलबैलाची विलक्षण भिंत.

आमच्या उजव्या बाजूला पाच सात किमी दक्षिणोत्तर लांबीचे घाटमाथ्यावरचे पठार पसरले होते, नागमोडी रेषेत ते संपून त्याचे कडे खाली कोकणात दोन तीन हजार फूट कोसळलेले दिसत होते, पठाराच्या कडेला पण मधोमध एकमेव आडवा पहाड तीन चारशे फूट उंचावला होता आणि त्या पहाडावर पाचशे फूट लांब, तेवढ्याच ऊंच, आणि पंधरा फूट रुंद अशा दोन जुळ्या भिंती जेमतेम मधली खाच दिसावी अशा एकमेकांना खेटुन उभ्या होत्या. सह्याद्रितले हे एकमेवाद्वितीय असे डोंगरशिल्प बराच वेळ बघत राहिलो, तोपर्यंत बस मुख्य रस्ता सोडुन उजवीकडे पायथ्याच्या तेलबैला गावाकडे वळली होती. तिथुन परत फिरून पुन्हा मुख्य रस्त्याला आली आणि पुन्हा सरळ भांबुर्डे गावाकडे निघाली.

आता समोरच नवरानवरीचे डोंगर आणि त्याच्या पश्चिमेकडे आटोपशीर असा धनगड दिसत होता, त्याच्या बाजूलाचा काही अंतरावर तेलबैलाच्या भिंतीआड अस्ताकडे झुकलेला सूर्य दिसत होता, सहज डावीकडच्या खिडकीकडे पाहिले आणि फक्त घनदाट काळोख ! क्षणभर काय आहे ते कळलेच नाही, आणि मग लक्षात आले की डावीकडच्या भागात दूरपर्यंत काळेकुट्ट ढग दाटुन आले होते. भांबुर्डे आले, बसम्धुन उतरलो, धनगडाच्या पायथ्याच्या येकोले या गावाकडे भराभर चालत निघालो. समोर कणाकणाने अस्तास जाणारा सूर्य, पाठीवर आजवर पाहिले नव्हते एवढे काळेकुट्ट ढग आणि दूरवर कडाडणाऱ्या विजा. येकोले म्हणजे पायथ्याच्या झाडीत लपलेले जेमतेम चार उंबऱ्यांचे गाव आहे. गावकऱ्यांनी आपुलकीने चौकशी केली, आता रात्रीचे, पावसाचे गडावर जाउ नका असा सल्ला दिला. आणि इथेच शाळेत रहा, गरम गरम भाकरी खा असा प्रेमळ आग्रहही केला, मला थोडा मोहही झाला, पण तसेच वर निघालो. होऊ घातलेला अंधार आणि येऊ घातलेला पाऊस यामुळे वाट दाखवायला वर यायला काही कोणी तयार होईना, पण वर गुहा आहे, पाणीही असेल असे कळले. दोन पोरांनी दिशा दाखवली, शिवाय नवरानवरी आणि धनगड याच्या खिंडीत पोहोचायचे अशी खूणगाठ बांधून निघालो. जंगल चांगलेच दाट होते, पण वाटही मळलेली होती, खिंडीजवळचे गारजाईचे देउळ आले आणि पाण्याचे टपोरे थेंब पडू लागले, न थांबता पावले उचलू लागलो आणि खिंडीत पोहोचलो. आता पुढची वाट शोधणे आले, ती आडव्या कातळातून आहे हे माहित होते पण कोकणाच्या बाजूच्या की पुर्वेच्या हे काही लक्षात येईना, पश्चिमेकडे जाउन पुढे वाट नाही असे लक्षात येऊन मग पुर्वेकडे आडवे निघालो, थोड्याच वेळात एक उद्ध्वस्त प्रवेशद्वार लागले, त्यातल्या दगडधोंड्यातून गडावर दाखल झालो, गड्माथ्याच्याच कातळात दोन गुहा खोदलेल्या होत्या, बाजुलाच एक पन्नास फुटी शिळा कातळाला तिरपी रेलून उभी होती मधल्या भागात वटवाघळांची वसाहत असावी असे दिसत होते.

घराचे छप्पर अंगणातही पुढे यावे, तसे गुहेपुढे अंगणात आठ फुटापर्यंत वरच्या तळाचे छप्पर होते. या अंगणातच आम्ही मुक्काम ठोकला. आजूबाजुचे थोडे सरपण गोळा करून बसतो न बसतो तोच मुसळधार पाऊस सुरू झाला. पाठीमागे टेकून बसलो होतो तो धनगडाचा कातळ, उजवीकडे नवरानवरीचे डोंगर, डावीकडे थोडे दूर आम्ही बसने ओलांडली ती डोंगररांग, समोर दहा वीस फुटांवर खाई, त्यात घनदाट जंगल, त्यापलिकडे झाडीतच लपलेले येकोले गाव, अजून पलिकडे डोंगरदऱ्यामध्ये घुसलेले मुळशीच्या पाण्याचे एक टोक, नजर जाईल तिथे कुठेही एकसुद्धा दिवा नाही आणि या सर्वावर गडगडत बरसणारा पाउस अशी सुरेख मैफलच जमली होती. धुमकेतू हा बराच अनुभवी गडी, त्यामुळे आमचीही गिरिभ्रमणाच्या, वाट चुकण्याच्या, अनगड जागी काढाव्या लागलेल्या रात्रींच्या, जंगली श्वापदांच्या अशा गप्पांची मैफल रंगली. मग आम्ही दोघेच कुठे येऊन पडलो आहोत हे लक्षात येऊन थोडी भीतीही वाटून झाली. जवळच्या एकुलत्या एक मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणे आटोपली. आणि लगेच ती मेणबत्तीही आटोपली. समोर दहा पंधरा काजवे बागडत होते, ते बघत ' अरे किती काजवे आहेत इथे !' असे म्हणत मी सहज उभा राहिलो आणि जे दृष्य बघितले ते कधीच विसरू शकणार नाही.

खाली दरीतल्या रानात, झुडुपांच्या एका पुंजक्याआड एकदम दहा वीस ट्युबलाईट झगमगाव्यात तसे हजारो काजवे क्षणभर प्रकाशमान होत होते, मग त्या पलिकडच्या पुंजक्याआडचे मग त्या पलिकडच्या आणि मग अजून पलिकडच्या...रानातल्या प्रकाशाचा हा 'खो' द्यायचा अविस्मरणीय खेळ बघण्यात किती वेळ गेला कुणास ठाउक, आता रात्र चांगलीच झाली होती. आम्ही आलो त्या उजवीकडच्या खिंडीतून आणि डावीकडे धनगडाच्या पलिकडुन असे दोन्ही बाजूने धुके वर येउ लागले आणि बघता बघता सारे ओळखीचे झालेले डोंगर, जमीन, आकार त्याने गिळुन टाकले. मग थोड्या वेळाने वाऱ्याने त्याला पळवले तोच ढगांची कुमक येउन दाखल झाली. आता सोबतीला खालच्या जंगलातून अविरत येणारे कीटक, पशु, पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज. फार थंडी नव्हती, पण सुरक्षितता म्हणून शेकोटी पेटवली, थोडे कष्ट, पण मग धडधडुन पेटली. मग कधीतरी तासा दोन तासानी एक एक घुटका घेत चवीने जगलेली ही रात्र झोपेच्या कुशीत संपवली.

पहाटे उठलो, माथ्यावर जायचे तर एक रॉक पॅच ओलांडावा लागतो, पण दोर नव्हता. तरी धुमकेतू बरेच प्रयत्न करून वर गेला आणि तिकडुन दिसणारे चौफेर देखावे बघुन परतला. जवळ जवळ पळतच उतरू लागलो कारण साडेआठची लोणावळा एस्टी पकडुन तेलबैलाला जायचे होते. वाटेत पुण्याचाच गिरीकूजन नावाचा सहा जणांचा गट भेटला, ते रात्री गावात थांबले होते. बस चुकलीच, पुढची आणि शेवटची अडीचला आणि ती पकडुन तर लोणावळ्याला जायचे होते. चालत निघालो, दोन तासात आठ-नऊ किमी चालून वाटेतली जांभळे, करवंदे खात तेलबैला गावात पोहोचलो. तिथुन दोन भिंतींमधल्या खाचेत जाता येते, खाच जेमतेम पाच सहा फुटांची, वर वर रुंदावणारी. खाचेतून पलिकडे कोकणात डोकावुन बघता येते. पाच मिनिटे विश्रांती घेउन चढाई सुरू केली, गावातलीच नवनाथ आणि दिनेश ही दोन मुलेही आली आमच्याबरोबर. वर भैरोबाचे देऊळ आहे आणि थंडगार पाण्याचे टाके आहे. कोकणचा मुलुख, पालीचा सरसगड यांचे सुरेख दर्शन घडते आणि खालून उगवलेल्या सुधागडाचा माथा तर तेलबैलाच्या खालच्या पठाराला इतका बिलगलेला आहे की, पठारावरुन धावत जाऊन थेट सुधागडाच्या माथ्यावर उडी टाकावी असे (दुरून) वाटते. खाचेच्या वर प्रत्यक्ष भिंतीवर चढण्यासाठी इथे प्रस्तरारोहणाच्या मोहिमा, शिबिरे होतात. सर्व साधने वापरूनच अनुभवी लोक चढु शकतात.

इथुन एका पायवाटेने कोकणात उतरता येते. तोच आमचा मूळ बेत होता, पण बस चुकल्यामुळे बदलला आणि परत फिरलो. परतीची अडीचची बस ही तेलबैलाला येत नाही असे कळले म्हणजे आता पुन्हा फाट्यापर्यंत तीन चार किमीची पायपीट आवश्यक होती. बस चुकायच्या भीतीने भराभर गेलो आणि दाट जंगलातल्या खिंडीखालच्या त्या फाट्यावर दोनलाच जाऊन थांबलो. पायपीट संपल्याच्या आनंदात जवळजवळ सारे पाणी संपवले, नवे कपडे घातले आणि जंगल अनुभवत बसून राहिलो. किती सुंदर आणि विविध झाडे, फुले, पक्षी असे म्हणण्यावरच माझे अडाण्याचे वर्णन संपते, दिनेशसारखा मित्र बरोबर असेल तर त्या सर्वांना नावे प्राप्त होतात आणि बरीच माहितीही मिळते.

तीन वाजले तरी भांबुर्ड्याहून एस्टी येईना. थोड्या वेळाने तिकडुन सकाळचीच ट्रेकर मंडळी येतांना दिसली आणि त्यांनी आज लोणावळ्याहूनच बस आली नाही ही बातमी दिली. आता चार तास घाटातून चालत आंबवणेला जाणे आणि तिथे काही मिळते का हे बघणे याला पर्याय नव्हता. आम्ही पुन्हा चालण्याचे कपडे चढवले, सर्व जण एकत्र निघणार तेवढ्यात वर बस घरघरली. लोणावळ्याहून आली होती अखेर, अर्ध्या तासात परत येतो सांगून बस पुढे गेली. तोपर्यंत काय करावे हा प्रश्न एका सापाने सोडवला, आणि एका झुडुपावर अगदी जवळून मनमुराद त्याचे कसरतीचे खेळ दाखवले.

बस आणि मग सिंहगड एक्सप्रेसने घरी परतलो ते आदल्या रात्रीच्या क्षणांची मनात उजळणी करतच..

मी न काढलेले काही फोटो.


तेलबैला1
तेलबैला2
तेलबैला3
तेलबैला4
धनगड

Vinaydesai
Thursday, June 01, 2006 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसाळा सुरू झाला नाही तोच?.. :-)

वाचून तिथे जाऊन आल्या सारखं वाटलं...
लिहित रहा...


Cool
Friday, June 02, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वा..

अरे मी लोणावळ्याला Join केले असते की तुम्हाला..

एकुणच खुपच मज्जा केलेली दिसतेय..



Dineshvs
Friday, June 02, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 अरे जेवढी तु आठवण काढतोस तेवढी मी पण काढतो, पण सध्या

पडिले दुरदेशी, मज आठवे मनासी

अशी अवस्था आहे. तरिपण जमवुया कधीतरी.


Rachana_barve
Friday, June 02, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow सही GS1 लकी आहात तुम्ही. सहीच.. मस्त लिहिल आहे

Prashantkhapane
Monday, June 12, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chala mhanje Dhumketu saheb ahet mhanaayche kuthe tari...
mahit chaan :-)

Kedarjoshi
Saturday, June 17, 2006 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS सही यार. यार या साठी भारतातच पाहीजे.
तु महाबळेश्वर पोलादपुर मार्गावर गेलास का? समर्थ या मार्गाने चिपळुन ला उतरायचे म्हनुन मी माझा एक मित्र, या मार्गाने पोलादपुर च्या जवळपास गेलो (पायी) त्याची आठवण झाली. वाटेत प्रतापगड व जावळी लागते. आजही ही वाट दुर्गम आहे.


Jo_s
Sunday, June 18, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जि एस ग्रेट
काय वर्णन केलय. सुंअदर


Suyog
Monday, June 19, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

just saw tel bail on google earth, superb!

Gs1
Monday, June 19, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद सगळ्यांना. कधीही एखादा रविवार मोकळा असेल आणि आमच्याबरोबर यायचे असेल तर जरूर संपर्क करा.


Dhumketu
Tuesday, June 20, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा उशीरच झाला लिहायला. मध्ये २ रविवार येऊन गेले आणी gs चा एक ट्रेकही झाला...
बरेचसे gs ने लिहीले आहेच..
त्या रात्री बर्‍यापैकी झोप घेतल्यावर घनगडावर जाण्यासाठी तयारी सुरु केली... पाऊस पडल्यामुळे रॉकपच ओला झाला होता. शेवाळे खचीतच नव्हते... पण हंटर शुज धरून ठेवत नव्हते... तिथे आधी शिडी वा खांब असावेत अशा खुणा होत्या. पण त्याचा ग्रीपला काहीच उपयोग नव्हता. बराच वेळ प्रयत्न केल्यावर एकदाचा बर्‍यापैकी दगड सापडला. तसा रॉकपच अवघड नाही.. पण एका ठिकाणी जरासा पुश देऊन वरचा दगड पकडावा लागतो.. तिथे काही पिटॉन्सही (खिळे) होते...
रॉकपच ओलांडल्यावर काही गुहा आणी पाण्याची टाकी आहेत.. पाण्याची चव ठीकठाक आहे.. गुहेच्या डावीकडील बाजूने वाट गडमाथ्यावर जाते. आधी तिथे पायर्‍या असल्याच्या स्पष्ट खुणा दिसतात. घसार्‍यावरून चढत वरती वाट जाते. घसार्‍यावरही बरेचसे मोकळे दगड पडले आहेत.. पाउस पडल्यामुळे घसारा बर्‍यापैकी दबला गेला होता.. उन्हाळ्यात पाय घसरण्याची शक्यता आहे... वरती दर्‍अवाजाच्या पायर्‍या पुरत्या ढासळल्या आहेत..
दरवाजातून वरती गेल्यावर कोकणाचे दर्शन घडते. घनगडालाच लागून सुधागड दिसतो.. एक उडी टाकली तर सुधागडाच्या वरती पडू इतका तो जवळ आहे. दुरवर सरसगडाचे दर्शन घडते.. डावीकडे लांबवर ताम्हीणी घाट दिसतो.. उजवीकडे तैलबैला... माथ्यावर सपाटी अशी नाही.. एक जोते दिसले. खोदीव पाण्याची टाकी होती पण कोरडी.
गडाला एक प्रदक्षिणा मारून खाली उतरायला निघालो.. खाली gs वाटच पाहात होता. उतरताना gs ला पुढे जायला सुचवले कारण ८ वाजलेले होते आणी ८:३० ची st पकडायची होती.
खाली उतरून शेताडातून धावत्-पळत गेलो.. पण शेवटी st चुकलीच.. मग निवांत पाणी भरून चालत तैलबैलाला निघलो.

डोंगरयात्रा च्या मुखपृष्टावर आनंद पाळंदें चे छायाचित्र आहे ते ताम्हीणी घाटातून काढले आहे. त्यांच्या मागे जो डोंगर दिसतो तो तैलबैला आहे.. ताम्हीणी घाटातून जाताना रायगड च्या हद्दीत प्रवेश केल्यावर उजवीकडे तैलबैला दिसायला लागतो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators