|
Aj_onnet
| |
| Wednesday, February 01, 2006 - 12:32 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बर्याच दिवसापासून पुणे सातारा प्रवासात, सातारा जवळ यायला लागले की एक गोष्ट लक्षात यायची. पाचवड गावाजवळुन दिसणारा वैराटगड पहायचे खूप दिवस stack वर होते. बसने जाताना दर वेळी हा किल्ला जवळचा असुनही पहायचा राहील्याची रुखरुख रहायची. मग ह्या रविवारी इतर सगळ्यांची timing adjust होण्याची वाट बघण्यापेक्षा आम्ही दोघा मित्रांनीच मोहीम फत्ते करायची ठरवले. हा किल्ला वाई प्रदेशात मोडला जातो. महाभारत काळात हा प्रदेश विराटनगरी म्हणून ओळखला जायचा. पांडव अज्ञातवासात असताना शेवटचे काही महीने ह्याच भूमीत राहीले होते. ह्या परिसरातील काही लेणी पांडवानी खोदल्याची आख्यायिका आहे. ह्याच मातीत भीमाने कीचकाच वध केला. तर ह्याच विराटनगरीचा एक रक्षक किल्ला म्हणजे वैराटगड. ह किल्ला पाचवड वाई रस्त्यावर आहे. सातारा पुणे रस्त्यावर सातार्यापासुन अंदाजे २० ते २५ किलोमीटरवर पाचवड हे गाव लागते. तिथून एक वाईला जाणरा रस्ता फुटतो. तिथून चार एक किलोमीटरवर आसले हे गाव आहे. तिथून गडाच्या पायथ्याकडे एक पाय वाट जाते. ह्या आसले गावाच्या पुढे एक किलोमीटरवर शंकरनगर नावाचे गाव आहे. तिथूनही गडाच्या पायथ्यापर्यन्त मजबूत गाडी जाईल अशी वाट आहे. दुसरी वाट थेट गडाच्या पायथ्यापर्यंत नेत असल्याने शक्यतो तोच मार्ग अवलंबावा. प्रथमदर्शनी किल्ला फारच सोपा वाटतो. आम्ही तर, जास्तीत जास्त एक तास चढायला एक तास उतरायला, दिड तास किल्ल्याचे निरीक्षण करायला. अन एक तास जाण्यायेण्याचा गाडीचा प्रवास असे नियोजन केले होते. त्यानुसार सकाळी घरातून नऊ वाजता निघून दीड दोनला घरी जेवायला परतायचे असा बेत होता. आम्ही आसले गावात गाडी एकाच्या शेतातील खोपट्यात ठेवली अन एक पाउलवाट पकडली. उजव्या बाजूला कालव्याच्या पाण्यावर पोसलेली नारळा आंब्याची मोठी बाग अन दुसर्या बाजूला उजाड टेकडी ह्यातील एका छोट्या पायवाटेवरुन आम्ही मार्गक्रमण सुरू केले. त्या टेकड्यांच्या मधून अनेक ओहोळ खाली कृष्णेला मिळायला धावत होते. आता अर्थातच ते कोरडे होते. तिथल्या भुस्तराच्या विशिष्ट रचनेमुळे ते ओहोळ खुप खोलपर्यन्त झीज करत गेले आहेत. नेहमी हे ओहोळ मध्यम खोलीचे असतात अन खुपसे 'v' आकारात असतात. त्यामुळे ते काही ठिकाणाहून तरी आरामात ओलंडता येतात. पण इथे ते खूपच खोल अन कमी रुंदीचे आहेत. काही ठिकाणी तर ते पाच सहा फूट रुन्द तर पन्धरा वीस फूट खोल आहेत. आम्ही बिचारे काही लांब उडीत तज्ञ नसल्याने दर घळीच्या कडे कडेने कुठे ती ओलांडायला मार्ग दिसतो का ते पाहत फिरत होतो. एक दोन ओहोळ तसे पारही केले. एका ओहोळात तर आम्हाला साळींदराचे काटेही सापडले. तेंव्हा सावधपणे सभोवार पाहीले. पण ते आसपास नव्हते. अन्यथा आम्हाला पळता ' घळी ' थोडी झाली असती! मग शेवटी वैतागून सरळ त्या किल्ल्याच्या विरुद्ध बाजुला चालायला सुरुवात केली. वाटेत त्या ओहोळावर बांधलेले बंधारे लागले. अश्या दोन बंधार्यावरून मार्गक्रमण करून आम्ही शेवटी परत वर किल्ल्याकडे सरकत पाय्थ्याशी पोहोचलो. वर उल्लेखलेली शंकरनगर गावातून येणारी वाटही तिथेच येवून पोहोचते. तिथे शेतात काही बायामाणसं काम करत होती. त्यांना मार्गाबद्दल थोडी माहीती विचारली. पण ते लोक अंदाजानेच वाट सांगत होते. फक्त सगळ्यांचे एका गोष्टीवर मात्र एकमत होते की एक अशी पायवाट आहे, जीला जर नीट धरून चालले तर न चुकता माणुस एका तासात गडावर पोहचेल. पण ती पायवट नक्की कोणती अन ती कुठून सुरु होते ह्यावर त्यांचे ठाम मत नव्हते. शेवटी त्यानी सर्वानुमते आम्हाला ' जा असेच टेकडी टेकडीने वरच्या सोंडेपर्यंत. तिथे तुम्हाला ती वाट सापडेलच. ' असा मार्ग दाखवला. त्यांनी चार पाच जणांचा एक गट एका तासापुर्वी असाच ' मार्ग ' दर्शन करून ' वर ' पाठवल्याचे त्यांनी सांगीतले. आमचा अगोदरच एक तास त्या घळ्या ओलंडण्यात गेला होता. आणि अजुन वेळ घालवन्यात हशील नव्हते. त्यामुळे आम्ही जवळची टेकडी चढायला सुरुवात केली. कायम गावकर्यांनी दाखवलेल्या त्या सोंडेकडे लक्ष ठेवून होतो. आता अकरा वाजून गेले होते. पण उन फारसे लागत नव्हते. त्यामुळे दम अन तहान फारशी लागत नव्हती. थोडे वर चढल्यावर आम्हाला तो वरचा गट दिसला. आम्ही त्यांना हाका मारल्या. पन बहुधा त्या वार्यावर विरून गेल्या असाव्यात. सुदैवाने अजून कुणी गडावर वणवा पेटवला नव्हता. त्यामुळे थोड्या हिरव्या थोड्या वाळक्या अशा झुडपातून आम्ही चाललो होतो. एका टप्प्यावर पोहोचलो अन आम्हाला एक पायवाट दिसली. बहुधा गावकरी म्हणतात ती भाग्य रेखा हीच असावी अशी मनाची समजूत घालून आम्ही त्या वाटेने पुढे सरकलो. मधून मधून दगड जरा ठिसूळ आहेत. त्याठिकाणी अश्या छोट्या माती खड्यांच्या कणांनी वाट थोडी घसरडी झाली आहे. ती वाट मधून दगडातून तर मधून झुडपातून अशी त्या सोन्डेकडे चालली होती. मध्येच छोटे पुरूषभर उंचीचे पाषाण हाता पायांच्या पकडीने पार करायला लागत होते. पण एकूण वाट तशी चांगली आहे. अन आम्हाला ती follow करण्यावाचून पर्यायही नव्हता. थोड्या वेळात आम्ही दुसर्या टप्प्यावर आलो. आता आम्ही निम्म्याहून जास्त गड चढला होता. इथून काही अंतर सागाची दाट झाडी होती. वाळक्या पानाचा सडा पडला होता. त्यात ती पायवाट मधूनच लुप्त होत होती. ह्या टप्प्यावरून गडाची तटबंदी बर्यापैकी नजिक भासत होती. असेच एक दोन दगडी टप्पे पार करून गेल्यावर आम्ही तट्बंदीच्या अगदी जवळ पोहोचलो. गडाला तीस चाळीस फूट उंच नैसर्गिक तटबंदी आहे. त्यावर दहा एक फुटाची बांधीव तट्बंदी आहे. आम्ही तटाच्या उजव्याबाजूची पायवाट पकडली. आता तो उंच काळाभोर पाषाणी तट डावीकडे होता अन आम्हाला थंडगार सावली देत होता. ह्या तटाच्या तळाशी काही पाण्याची टाकी आहेत. ती आतून एकमेकांना जोडलेली आहेत. ती गडावरील पुजार्यांच्या नियमीत वापराने बरीच स्वच्छ आहेत. त्यातील पाणी एकदमच थंडगार होते. अन तेव्हढेच नितळही. ती पाच टाकी पाच पांडवांनी खोदल्याचे नंतर पुजारीबुवांनी आम्हाला सांगीतले.
|
Aj_onnet
| |
| Wednesday, February 01, 2006 - 12:51 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्या टाक्याच्या कडेने थोडे पुढे गेल्यावर आम्हाला पायर्या लागल्या व त्या चढतच आम्ही गडावर प्रवेश केला. एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे की गडाला प्रवेशद्वार नाही. कदाचित शत्रूने ते पूर्ण उध्वस्त केले असावे वा कालाच्या ओघात ते नष्ट झाले असावे. दोन छोटे बुरुंज अजून शाबूत आहेत. हेही नसे थोडके. ह्या पायर्यापासून थोडे खाली गेले असता एक गुहा आहे. तिला जेमतेम एकच माणुस आत जावु शकेल असे प्रवेशद्वार आहे. आत शिरायचा मार्ग वळणावळणाचा आहे. आमच्याकडे विजेरी वा मेणबत्ती नसल्याने आम्ही काही आत प्रवेश करून पाहिला नाही. कदाचीत गुप्त मसलती साठी ती जागा पूर्वी वापरली जात असावी. गडावर गेल्यावर लगेचच उजव्या हातला दक्षिणमुखी मारूतीचे एक मंदीर आहे. मागच्या पावसात आलेल्या जोरदार वादळी पावसाने गडावरच्या बहुतेक सर्व मन्दीरान्चे अन त्यांच्या छतांचे नुकसान झालेले आहे. गडाच्या दक्षिणेला असलेल्या एका गावातून आलेल्या एका जोडप्याने त्या भग्न मंदीरात एक उदबत्ती लावली. ती त्या मंदीराचे मंदीरपण क्षणात परत घेवून आली. त्या जोडप्याशी चर्चा केल्यावर कळले की त्यांच्या कुडाळ ह्या गावातूनही गडावर यायला वाट आहे. त्या गडावर गगनगिरी महाराजांचे शिष्य राहतात. हे लोक त्यांचेच भक्त होते. अन पौष अमावस्येनिमीत्त, दर्शनाला आले होते. त्यांच्या बरोबरच आम्ही उत्तर तटबंदीने वैराटेश्वराच्या देवळाकडे निघालो. वाटेत दोन तीन छोटी तळी आहेत. त्यात अजून पाणी टिकून होते. पण बरेच हिरवट दिसत होते. त्या काठी आम्हा अगोदर आलेला तो गट बसला होता. त्यातील काही जण चक्क त्या तळ्याकाठील वाळुत शख शोधत होते. मला तर वाटले की इथे ते शंख महादेवाला वहायची प्रथाच आहे त्यामुळेच ते लोक एव्हढ्या भाविकतेने अन एकाग्रतेने शंख जमवत आहेत. पण त्यातील एकाने सजावटीसाठी तो ते शंख गोळा करत असल्याचे सांगीतल्यावर मग माझे सगळे ' शंखा ' निरसन झाले. ते सगळे वाईहून आले होते. अन त्यातील दोघे तिघे चित्रकलेत पदवी शिक्षण घेत होते. तेच त्यांच्या शंखाच्या संग्रहाचे रहस्य होते. त्यांच्या बरोबर मग आम्ही किल्ल्याच्या पुढील दर्शनाला निघालो. किल्ल्याच्या पुर्वतटाजवळ वैराटेश्वराचे देवळ आहे. मुळ आराखडा अन पाया बराच भव्य दिसतो. पण आता छोटे मंदीरच शिल्लक आहे. पितळी नागराजाने वेढा घातलेली एक शंकाराची सुंदर पिंड आपली नजर खिळवून ठेवते. नजीकच शंकर पुत्र गणपतीचीही शेंदरी मूर्ती आहे. मंदीराचे अंतरंग खूपच स्वच्छ अन प्रसन्न आहे. मंदीराबाहेर पडल्यावर त्याच्या जोत्यावर आम्हाला एक खूप छान घडलेली कासवाची मुर्ती आढळली. कदाचित जुन्या वैभवशाली मंदीराची ती एकमेव निशानी शिल्लक असावी. ह्या मंदीराजवळच त्या गगनगिरी महाराजांच्या शिष्याचा मठ आहे. तिथे जावून तिथल्या पुजार्यांशी गप्पा मारल्या. त्यांनी तटाखालच्या टाक्यातील थंड पाणी प्यायला दिले. नंतर त्यांच्या मठातील महाराजांच्या प्रतीमांचे, एकमुखी दत्ताचे, भगवान शंकराच्या मुर्तिचे दर्शन घेतले. बर्याच किल्ल्या वा डोंगरावरील देवळे वा गुहा ह्या कुठल्या ना कुठल्या महाराज वा फकीरांनी बळकावल्या असतात. दरवेळी त्या महाराजांचे दिखाऊ महाराजपण अन भक्तांचे आंधळे भक्तपण पाहुन माझी चिडचिड होते. इथे मात्र फारसे प्रस्थ न दिसता त्या लोकांनी जपलेले साधे पावित्र्यच मनास भावून गेले. आता आमचा group चांगला सहा सात जणांचा झाला होता. मग सर्वांनी उत्साहाने सर्व तटबंदी अन सभोवतालचा निसर्ग डोळ्याखाली घातला. किल्ल्याची विविध वैशिष्ट्ये, वळणावळणाच्या तटबंदीची भक्कमता अनुभवली. त्यात आम्हाला किल्ल्यातून दक्षीणेकडे उतरणारी एक चोरवाट्पण आढळली. तटात असलेल्या दगडांच्या नैसर्गिक भेगेतून जेमतेम एक माणुस खाली तीस पस्तीस फूट उतरू शकेल एव्हढीच ही वाट होती. त्यात वटवाघळांनी बस्तान ( खरे तर bat स्तान ) बसवले होते. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला अजून एक तेव्हढ्याच उंचीचा डोंगर आहे. त्याला कोणतीही तटबंदी दिसत नाही. किल्ल्याचा एकच दरवाजा अन खूप नजीक तेव्ह्ढ्याच उंचीचा डोंगर ह्या ' दुर्गु ' णामुळे कदाचित हा किल्ला मह्त्त्वाचा मानला जात नसावा. अन त्यामुळे त्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. बहुधा हा किल्ला फक्त टेहळणी साठीच वापरला जात असावा. किल्ल्याची अपुरी तटबंदी त्याचीच दर्शक आहे. पण ह्या किल्ल्यावरून वाई जावळी अन सातारा असे सर्व मुलुख नजरेच्या टप्प्यात दिसतात. पांडवगड, चंदन वंदन, अजिंक्यतारा, कल्याणगड, जरंडा, अश्या भल्या मोठ्या किल्ल्यावर व मांढरदेवी अन पाचगणीच्या पठारावर इथून नजर ठेवता येते. त्यामुळे कदाचीत ह्याचे महत्व देश अन कोकण ह्यांच्या सीमारेषेवर असलेल्या या भागावर व वाटांवर टेहळनीसाठीच जास्त असावे. किल्ल्यावर इमारतींच्या वा दारूगोळ्याच्या कोठारांचे अवशेषही फारसे सापडत नाहीत. त्याचेही हेच कारण असावे. किल्ल्यावरून कृष्णेचे खोरे छान दिसते. तिच्या उपनद्या, अन कालवे ह्यांची नागमोडी वळणे अन त्याला सोबत करणारी हिरवाई ह्याचे एकमेकात विणलेले जाळेच जणू. उस वा ज्वारीवर डोलणारी हिरवीगार शेते, त्यातच मध्ये वाळलेल्या हरभर्याने भरलेल्या शेतांचा पिवळा पट्टा वा रिकाम्या शेतांचा काळा पट्टा अशी तिरंगी सजावट दिसत होती. एव्हाना अडीच वाजून गेले होते. पुर्वीच्या plan नुसार आम्ही दीड वाजता घरी जेवायला पोहोचणार होतो. त्यामूळे आम्ही खाण्याचे फारसे काही घेवून आलो नव्हतो. आता प्रचंड भुक लागली होती. घरच्यांनी एकदोनदा फोन करून अन आमची सद्यस्थिती ऐकुन, आमच्या नियोजनाची फारच कौतुकही करून झाले होते. पण आमच्या सुदैवाने तो वाईचा group बर्यापैकी तयारीने आला होता. त्यांनी आम्हाला जेवणाचे आमत्रण दिले अन मग आम्हला त्यांचा आग्रह मोडवला नाही! वैराटेश्वराच्या मंदिरावर छताच्या खाली एक छोटेखाणी बैठक केली आहे. तेथेच आम्ही आमची पंगत जमवली. घेवडा बटाट्याची तिखट भाजी अन तेल तिखट ह्या वाईकरांच्या साध्या मेनूवर आम्ही जोरदार ताव मारला. नंतर गार वार्यात जरा पडुन गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने चार च्या सुमारास तो परिसर स्वच्छ करून आम्ही परत गडाकडे मोर्चा वळवला. आता पोट भरले असल्याने मग इकडे फोटो काढ तिकडे फुलपाखराच्या मागे जा. असे काहीबाही करत आम्ही परत एकदा तटबंदीला फेरा मारला अन उतरायची वाट पकडली. पायवाट थोडी मुरुम मातीची अन तीव्र उताराची असल्याने जरा संभाळुनच जावे लागत होते. कसेबसे तोल अन पायाचा वेग सावरत आम्ही खाली पोहोचलो. ते शेतकरी अजुनही शेतात काम करत होते. त्यान्च्या मार्गदर्शनामुळे सुखरूप मोहीम पार पडल्याने त्यांचे आभार मानले. अन परत त्या घळी चुकवत माघारी आसले गावत पोहोचलो. वाईचा group मधूनच वाट सोडुन दुसर्याच गावात उतरला. तिथून त्यांना वाईला बस मिळणार होती. जाता जाता ते पुढच्या रविवारी पांडवगडाला येण्याचे आमंत्रण देवून गेले. आसले गावात भवानीचे एक जुने हेमाड्पंथी देवूळ आहे. तिथे दर्शन घेतले. ते काळ्या पत्थरातील देवुळ गावकर्यांनी लाल पिवळ्या oil paint ने रंगवलेले पाहून परत चिड्चीड झाली. इथे काही भिन्तीवर oilpaint नेच महाभारतातील चित्रे काढली होती. किल्ल्यावरच्या मोडक्या मारुती मंदीरावरील पोपडे उडालेल्या भिंतीवर आपले नाव कोरनारे महान का एव्हढ्या भक्कम काळ्याभोर पाषाणशिल्पांवर बटबटीत रंगाने महाभारत चितारणारे महान हा प्रश्न काही अजून सुटला नाही. तो मनात घोळवत अन वाटेतल्या काही रसवंती गृहास भेट देत आम्ही सातार्याला संध्याकाळी सहाला घरी पोहोचलो. दुपारी जेवायला घरी पोहोचायचे आश्वासन देवून प्रत्याक्षात संध्याकाळच्या चहाला पोहोचल्यावर, घरी जे काही भव्य स्वागत झाले ते काय वर्णावे!
|
Moodi
| |
| Wednesday, February 01, 2006 - 1:00 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अहाहा!! अजय बर्याच दिवसानी तुझ्या भटकंतीविषयी वाचायला मिळाले. सहसा आडवाटेला असणारे हे किल्ले अन गड भरपूर आहेत, पण पुरेश्या सुविधांचा अभाव अन एकांत यातुन मग अश्या मोहीमा खरेच यशस्वी झाल्याचे वाचुन आनंद होतो. लगे रहो. सातार्याजवळचे अन पुणे ते कोल्हापूर टप्प्यातील गड आता तुझ्या हवाली.. घेवड्याची भाजी!!!... आठवण खुप येते रे मस्त रसदार भाजी अन तीळाची खमंग चटणी ![](/hitguj/clipart/sad.gif)
|
Naatyaa
| |
| Wednesday, February 01, 2006 - 7:39 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Ajay, vruttant chhan ahe.. avadala..
|
Charu_ag
| |
| Wednesday, February 01, 2006 - 8:28 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा अजय! आमचेही दुर्गभ्रमण घडवलेस.
|
Aj_onnet
| |
| Tuesday, February 14, 2006 - 10:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैराटगड
|
Aj_onnet
| |
| Tuesday, February 14, 2006 - 10:52 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तटबंदी
|
Aj_onnet
| |
| Tuesday, February 14, 2006 - 10:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कालवा अन हिरवीगार शेते
|
Aj_onnet
| |
| Tuesday, February 14, 2006 - 11:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
![kaasav](/hitguj/messages/644/103413.jpg)
|
Champak
| |
| Tuesday, February 14, 2006 - 11:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
.. .. .. saheech he re!
|
Ammi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 11:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वाह एजे मस्त फोटो घेत्ले आहेस.. सही मजा आलेली दिसतेय..
|
मस्तच!
|
Simeent
| |
| Tuesday, February 14, 2006 - 12:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Wow, amazing!!!!! सौन्दर्य हे बघनार्याच्या द्रुष्टीत असते हेच खरे. नाहीतर मातीचा ढिगारा म्हनजे गड असे समजनार्याच्यी सन्ख्या काही कमी नाही.
|
Cool
| |
| Monday, July 24, 2006 - 6:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
२२-२३ जुलै ला हरिश्चंद्रगड करायचा असे सर्वानुमते (एकमताने नव्हे) ठरले होते, मात्र मर्फीच्या नियमाला अनुसरुन ठरवल्याप्रमाणे होउ शकले नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी तो बेत टाळावा लागला (यात विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही). पण तरी सुद्धा निदान एक दिवस तरी सत्कारणी लागावा असा विचार करुन शनिवारी वैराटगडावर जाण्याचे ठरले (हे मात्र एकमताने). सकाळी सहा वाजता स्वारगेट स्थनकावर सर्वांनी यायचे असे ठरले होते, त्याप्रमाणे आरती, भक्ती, मिहिर आणि कूल असे चार जण जमले. मात्र त्यातच सकाळी सहा वाजता जी.एस. ने फोन करुन आपल्याला बेदम 'ताप' आलेला आहे असे कळवले (येथे ताप शब्दावर श्लेष असावा का ?). मग जमलेल्या मंडळींनी वैराटगड की चंदन वंदन या मधुन वैराटगडाला पसंती दिली. आणि कर्नाटक सरकारची सातार्याला जाणारी बस पकडली. जोरदार पाउस सुरु होता, आणि वाटेत कात्रज घाटापासुनच आम्हाला निसर्गाची आमच्या वर कृपा होणार हे लक्षात आले. वाटेत तुडुंब भरुन वाहणार्या नीरा नदिच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. वाईपासुन जवळच असलेले शंकरनगर हे गाव वैराटगडाच्या पायथ्याशी आहे. तिथे जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गावरील कुठलिही गाडी पकडुन भुईंज च्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरावे, तिथुन आसले किंवा शंकरनगर ला जाण्यासाठी बस, खासगी वाहने असे पर्याय उपलब्ध आहेत (बस भाडे रुपये ४). आम्ही बस हा पर्याय निवडला. या बसचे कंडक्टर फारच सौजन्यशील निघाले, आम्ही कुठे जाणार आहोत याची चौकशी करुन लगेच बस मधे असलेल्या एका मुलाला आम्हाला रस्ता दाखवुन देण्याची सुचना केली. पाचवड वरुन साधारण पाच्-सात मिनिटातच आम्ही आसले गावी उतरलो, कंडक्टर ने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा आम्हस्ला रस्ता दाखवुन देण्यासाठी थोडेसे पुढे आला. खरं म्हणजे शंकरनगरला उतरुन डावीकडे जाणारी मोठी वाट पकडली तर थेट गडापर्यंत कुठेही न चुकता जाणे होते, पण नेहमी वाट चुकणे असा अलिखित नियम असल्यामुळे आम्ही आसले गावातील मंदिराच्या बाजुने निघालो आणि रस्ता चुकलो. एका कॅनल च्या बाजुने बराच वेळ चालत गेल्यानंतर तो ओलांडुन आम्ही गडाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. आता गडाच्या पायथ्याशी पोचल्यनंतर मात्र पुढे वाट दिसेना म्हणुन मग दुरवर दिसणार्या एका घराकडे जावुन रस्ता विचारावा आणि पुढे जावे असे (सर्वानुमते) ठरले. त्या घरी पोचताच तिथल्या दोन तिन कुत्र्यांनी आमचे जोरदार स्वागत केले, आणि त्या आवाजाने बाहेर घरमालकीणीने आम्हाला रस्ता दाखवला. त्यांनी दाखवलेल्या रत्यावरुन आम्ही मार्गाक्रमण सुरु केले. आता पावसाचा जोर थोडासा ओसरला होता पण आम्ही अगोदरच ओलेचिंब झालो होतो त्यामुळे त्याचे विशेष काही वाटले नाही. आता समोर बर्यापैकी उंच वैराटगड दिवस्त होता. त्याची एक सोंड अगदी काटकोण त्रिकोणाच्या कर्णासारखी तिरकी होत गेलेली होती दुसर्या बाजुने आम्ही चढायला सुरुवात केली, दोन टेकड्या पार करुन आम्हाला तिथे पोचायचे होते. साधारण तासाभरात आम्ही दुसर्याटेकडिवर येउन पोचलो आता आम्हाला डावीकडे आणी उजवीकडे सुरेख दृश्य दिसत होते. रिमझिम पाउस थांबला होता आणि दुरवर धंगाचे विविध खेळ सुरु होते. खाली दिसणारी शेते हिरवाईने नटलेली दिसत होती. ज्या पठारावर आम्ही उभे होते ते तर भान हरपुन टाकत होते. स्वच्छ वातावरण, मोकळी हवा, डोळे भरुन पहावे असे सौंदर्य, शब्दात पकडने कठीनच. आमचा इथवरच चढणं सार्थ करणारा ते एकुन वाटावरण होते. अशा सगळ्या वातावरणात आम्हई थोडा वेळ रेंगाळलो.आणि मग पुढे वाटचालिस सुरुवात केली, काही ठिकाणि निसरड्या दगडांपासुन रस्ता मिळवत आम्ही गडाच्या मोठ्या कातळाच्या समोर उभे राहिलो. त्याच्या उजव्य बाजुने परिक्रमाकरत गडात प्रवेश करावा लागतो. वाटेत दोन्-तीन पाण्याचे टाके दिसले. गडाच्या शेवटच्या पायर्या चढुन गडात प्रवेश केला. या गडाला दरवाजा सदृश्या काहीही दिसले नाही. गड आटोपशिर आहे दोन पाण्याचे तळी, एकुण तीन देवळे. दोन हनुमानचे आणि एक वैराटेश्वराचे. पैकी वैराटेश्वराच्या देवळातच आम्ही थांबण्याचे ठरवले होते. इतर गडावर तत्पुरत्या स्वरुपाची झाडे आढळतात पण या गडावर मात्र वड पिंपळ अशी दिर्घायुषी झाडे होती. पाउस थांबुन आता जोराचा वारा सुरु झाला होत आणि तो जास्तच झोंबत होता. म्हणुन पटकन मंदिरात जावुन जेवणाची तयारी केली. भक्तीने बरेच जण येणार अशी शक्यता असल्यामुळे पहाटे लवकर उठुन स्वयंपाक बनवुन आणला होता. या कष्टाळुपणाबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले (अर्थातच मिहीरचे सुद्धा), आरतीने सुद्धा मस्त स्वयंपाकाची तयारी ठेवली होती. एकुण सदस्य संख्या चारच असुनही जास्त स्वयंपाक उरणार नाही अशी सर्वांची (का कुणास ठावुक) खात्री होती. उसळ, पराठे, बटाट्याची भाजी, चटनी असा मस्त मेन्यु होता, त्यावर सर्वांनीच आडवा हात मारला. जेवण संपत आलेले असतांनाच एक आस्चर्य घडले. शंभु महादेवाची पिंड आम्ही जेवायला बसलो तेंव्हा कोरडी होती त्याच्या भोवताली पाणी गोळा होण्यास सुरुवात झाली होती. पाणी येण्याच्या कुठलाही मार्ग नसल्याने हे पाणी कुठुन येत असावे यबद्दल आस्चर्य वाटत होते. देवाचा कोप असावा की जीवंत झरा याबद्दल थोडीशी चर्चा देखील झाली. बराच वेळ निरिक्षण केल्यावर आढळले की महादेवाच्या पिंडीच्या बाजुला एक फरशी फुठलेली असुन त्यामधुन पाणी येत होते. जेवण संपवल्या नंतर गडाची परिक्रमा करायला सुरुवात केली. थंडगार हवेतुन गडाच्या तटबंदीवरुन चालायला आम्ही सुरुवात केली. आजुबाजुला दिसणारे दृश किती किती साठवावे असा प्रश्न पडत होता. हिरवळीने गच्च भरलेले डोंगर, त्यावरुन वर्यात डोलणारी झाडे, पाण्याने भरलेली शेते, काही ठिकाणची काळी माती, रंगाची नुसती उधळण झाली होती. सोबतीला मोराचे आवाज, पक्षयांचे आवज सर्वच केवळ अविस्मरणिय. वातावरण मोकळे झाल्यमुळे आम्ही आजुबाजुचे गड ओळखण्याचे प्रयत्न केले, त्यात आम्हाला फक्त चंदन्-वंदन ओळखता आले (इथे सर्वांना परत एकदा जी.एस. ची कमी भासली). तटबंदीवरुनच आम्ही गडाच्या मुख्य वाटेकडे पोचलो आणि गड उतरायला सुरुवात केली. उतरतांना मजेत खेळत, वातावरणचा आनंद लुटत तासाभरत गडाच्या पायथ्याशी शंकर नगरला येउन पोचलो. पाचवडा कसे जावे या विचारत असतांनाच एक त्रक्टर येतांना दिसला आणि त्यानेच पाचवड पर्यंत जायचे ठरले. रत्याने जातांना सर्व बाजुने गडाचे सुरेख दर्शन घडले. पाचवड ला पोचल्या बरोबर पुण्याला जाणारी गाडी मिळवुन साडे सहा पर्यंत पुण्यात परत आलो. मनाला ताजंतवानं करणारा हा अजुन एक ट्रेक अतीव समाधान देउन गेला.
|
ले झकास कुल... तुमची मोहिम अखंडीत चालु राहो...
|
Aj_onnet
| |
| Monday, July 24, 2006 - 1:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सही रे कूल! मला परत एकदा जावून आल्याचे समाधान मिळाले! माझा अनुभव इथेच लिहलाय /hitguj/messages/644/102712.html?1139921643 mods हे दोन बिबी एकत्र कराल काय?
|
done
|
>>>> आरती, भक्ती, मिहिर आणि कूल असे चार जण जमले. हंम! ही नाव लक्षात ठेवली जाणार हेत! >>>> मात्र त्यातच सकाळी सहा वाजता जी.एस. ने फोन करुन आपल्याला बेदम 'ताप' आलेला आहे असे कळवले यावर विश्वास बसत नाही! की हा राजकीय ताप होता? ddd लेको भारीच फिरुन आलात की!
|
Bee
| |
| Tuesday, July 25, 2006 - 8:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अजय, खूपच छान रे.. तो कालवा आणि हिरवी गार शेते, तो फोटो नेमका कुठला आहे ते सांग तर..ती शेते अगदी तुकड्यातुकड्यांनी शिवलेल्या गोधडींच्या आकाराची दिसत आहेत आणि तो कालवा एखादी वाट असावी असेच वाटले. इतका हिरवागार भाग आहे तुमच्याकडचा? आणि हा कासव पाषणाकृती आहे का? मज्जाच रे.. खूप खूप मिस होते आहे..
|
Aj_onnet
| |
| Tuesday, July 25, 2006 - 10:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बी, तो फोटो कृष्णा नदी अन तिच्या कालव्यांनी बहरलेल्या वाई पाचवड दरम्यानच्या भागाचा आहे. ते फोटो फेब्रुवारीतील आहेत. कूल आताचे फोटो टाकेलच. आता तर हा भाग एकदम हिरवा असेल! हो, ती कासवाची मुर्ती पाषाणाचीच आहे!
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 25, 2006 - 5:25 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे वा, दोन्ही वर्णने एकत्र वाचायला मजा आली. दोन्ही ग्रुप आपलेच असल्याने, आणखीनच मजा आली.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|