रात्रीचे साडे अकरा झाले असावेत. वहिनी अजून ग्लानीतच होत्या. त्यांच्या मनावर कुठल्यातरी गोष्टीचा प्रचंड ताण जाणवत होता. पण एवढा ताण कशाचा? सुमावन्संच्या मृत्यूचा? पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे ऐन तारुण्यात सुमावन्सं वारल्या असणार. कशाने?
" जान्हवी, पाणी देतेस थोडं? " वहिनींनी मारलेल्या हाकेने मी दचकले. उठून त्यांना पाणी नेऊन दिलं. वहिनींचे डोळे पाणावले होते.
" पोरी, उगाच माझ्यापायी तुला इतका त्रास.... " त्या पुढे बोलू पाहत होत्या पण मी त्यांना अडवलं.
" वहिनी जेवता का थोडं? शारदा काकू ( हे मला माळी काकांनी सांगितलं होतं... त्या जहागिरदारांच्या स्वयंपाकीण बाई होत्या.) येऊन करून गेल्यात सगळं. "
" तू जेवलीस? " खरं तर त्या सगळ्या विचित्र वातावरणात मला जेवणदेखील गेलं नव्हतं. भूकदेखील मरून गेली होती पण वहिनींना बरं वाटावं म्हणून मी होकारार्थी मान डोलावली.
" मला भूक नाहीये गं. मी थोड्या वेळाने दूध घेईन. सुमावन्स जेवल्या का? " मला पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं. काय बोलावं सुचेना.
" .... तुला मी विक्षिप्त, डोक्यावर परिणाम झालेली वाटत असेन नं? " वहिनी एकदम उद्गारल्या.
" सगळे असंच समजतात. माझी मुलं, इथले नोकर, डॉक्टर.... सगळेच! पण सुमावन्सं अजून इथे वावरताहेत हे सत्य आहे. या घरातून मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही कारण त्यांनी.... त्यांनी मला रोखलंय. त्या मला इथून जाऊ देणार नाहीत. कारण त्यांच्या आत्महत्येला मी जबाबदार आहे.... त्याचीच शिक्षा..... " वहिनींना बोलता बोलता दम लागला. माझं डोकं सुन्न झालं होतं. वहिनींची वाक्यं माझ्या मेंदूपर्यंत पोचत नव्हती. सुमावन्संनी आत्महत्या केली होती? आणि वहिनी म्हणत असतील ते खरं असेल तर त्यांचा आत्मा????? देवा रे... कुठून मला बुद्धी दिलीस हे घर बघायला यायची? माझा काय संबंध या सगळ्यांशी? कोण कुठल्या वहिनी आणि त्या त्यांच्या सुमावन्सं.... मरू दे. मी एक क्षणही इथं थांबणार नाही. मला अंधाराची भीती वाटत नव्हतीच. रिक्षा घेतली तर पंधरा मिनिटांत गेस्ट हाउसवर पोचेन, अशा विचारांच्या तिरीमिरीत मी एकदम उठले. वहिनी श्रांत होऊन उशीला पाठ लावून डोळे मिटून बसल्या होत्या. त्यांच्या त्या करूण चेहर्याकडे मला बघवेना. मी निघून जायचा विचार रद्द केला. याचं दुसरं कारण की, पन्नास वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दलचं कुतुहल मला अडवत होतं. मी वहिनींजवळ जाऊन बसले. माझी उत्सुकता जाणूनच की काय त्यांनी बोलायला सुरुवात केली.
" .... अवघी वीस वर्षांची होते मी या घरात लग्न होऊन आले तेव्हा. जहागिरदारांचं घराणं नावाजलेलं होतं. सासरे या भागातले नावाजलेले जमीनदार. भरपूर शेती, वाडवडलांची गडगंज संपत्ती... कशाला कशाला म्हणून काही कमी नव्हती. सासर्यांना ही दोनच मुलं... आमचे हे आणि त्याहून धाकट्या सुमावन्सं. जहागिरदारांच्या तीन पिढ्यांतली एकटी मुलगी म्हणून सुमावन्संना फ़ुलासारखं जपायचे. घरचं वैभव, सुंदर रूप, जोडीला हे घरचे लाड... सुमावन्सं अहंकारी झाल्या नसत्या तर नवल!
सगळ्या घरावर त्यांची अनिर्बंध सत्ता होती. प्रत्येकाला त्यांचा हुकूम मानावा लागे. अगदी मलासुद्धा. सुमावन्सं माझ्याहून दोन वर्षांनी लहान.. मला राग राग यायचा त्यांचा. आपण का म्हणून यांचं ऐकायचं असं वाटायचं. पण तक्रार करायची सोय नव्हती. घरात सुमावन्संच्या विरुद्ध ब्र काढलेला देखील खपत नसे.
हळू हळू सुमावन्संविषयीची चीड वाढत गेली मनात.... मी वाट पहात होते; त्यांना कशा रीतीने माझ्यासमोर नमवता येईल याची.... अखेर ती संधी एकदा मला मिळाली. एका संध्याकाळी उशिरा बागेतली चमेलीची फ़ुलं काढून आणायला सासूबाईंनी सांगितली म्हणून मी तिकडे गेले. तेव्हा लगतच्या आंब्याच्या झाडापाशी उभं राहून कोणीतरी बोलतंय असं मला वाटलं.
....त्या सुमावन्सं होत्या. आणि त्यांच्यासोबत एक तरुण उभा होता. सुमावन्संचं प्रेम होतं त्याच्यावर. दोघं लग्नही करणार होते म्हणे! पण ते त्या काळी तरी शक्य नव्हतं. तो मुलगा रघुनाथ परजातीचा होता. सासरे किंवा हे कोणीही सुमावन्संना हे लग्न करू दिलं नसतं.
" वहिनी, तुझ्या पाया पडते. घरात कोणाला हे सांगू नकोस गं. कळलं तर ती लोक जीव घेतील माझा.... " नेहमी स्वतःच्या तोर्यात वावरणार्या सुमावन्सं आज माझ्यापुढे अगदी लाचार झाल्या होत्या. मी.. मला काहीच सुचत नव्हतं. डावात चाचपडत असताना एकदम हुकमाचा एक्का हाती यावा तसं झालं. आता सुमावन्संना माझ्यापुढे नमून राहावं लागणार होतं.
...त्यानंतर सुमावन्संनी माझ्यावर हुकूम गाजवणं थांबवलं. त्या माझ्याशी फ़ारशा बोलतही नसत. त्यांना लग्नाची चिंता लागून राहिली असावी. त्यामुळे दिवसरात्र आपल्या खोलीत त्या बसून राहायच्या. एक दिवस सासूबाईंनी दिलेली काहीतरी वस्तू मी त्यांच्या खोलीत ठेवायला गेले; तेव्हा त्या मूकपणे रडत होत्या. मला एकाएकी त्यांची दया आली. मी जाऊन त्यांच्या पाठीवर मायेने हात ठेवला.
" वन्सं, काय हो काय झालं? "
उत्तरादाखल त्यांनी माझ्याकडे नुसतं नजर उचलून पाहिलं. किती असहाय्य दिसल्या त्या तेव्हा. माझ्या मनात एकाएकी काहीतरी आलं.
" वन्सं, हे किंवा मामंजी इतकंच काय सासूबाईदेखील तुम्हाला त्या मुलाशी लग्न करू द्यायच्या नाहीत. तुम्ही त्याचा विचार सोडून द्या वन्सं. " वन्संनी एकदम चवताळून माझ्याकडे पाहिलं. माझी तशी फारशी चूक नव्हती. एका पारंपारिक कुटुंबात वाढलेली मुलगी मी. मला घराच्या उंबरठ्यापलिकडंच जगदेखील ठाऊक नव्हतं. आई वडील मोठे भाऊ यांच्यासमोर तोंडदेखील न उघडणारी मी; वन्संना तोंड द्याव्या लागणार्या संकटांची कल्पना करून खरोखर हादरले होते.
" वहिनीऽऽऽ... " सुमावन्सं कडाडल्या.
" तुम्हाला काय कारण आहे माझ्या खासगी बाबींत सल्ले द्यायचं. तो सर्वस्वी माझा प्रश्न आहे आणि मी बघेन तो कसा सोडवायचा ते. तुझ्यासारख्या अडाणी बाईने त्यात लक्ष घालायचं काम नाही. "
वन्संचे शब्द मला चरचरून झोंबले. न जाणो कुठून माझ्यातदेखील बोलण्याचं बळ आलं.
" वन्सं, तुमच्या या प्रकरणाबद्दल मी घरात बोलले तर काय होईल माहितेय नं? " माझा आवाज माझ्या नकळत खुनशी झाला होता. वन्सं एकदम चपापल्या.
" खबरदार वहिनी... याबद्दल एक शब्दही कुठं बोलतात तर. कुठून त्यादिवशी तुमच्या दृष्टीस पडले असं झालंय मला. की पाळत ठेवूनच होतात माझ्यावर देव जाणे! " सुमावन्संच्या आधीच्या स्वभावाने उसळी घेतली होती.
" अस्सं... मग मी देखील दाखवून देईन तुम्हाला... मी काय करू शकते ते. " मी रागाने धुमसत त्या खोलीबाहेर पडले.
माझ्या मनात कसंही करून आता हे घरच्यांच्या कानावर घालणं हा एकच गोष्ट होती. त्या गोष्टीच्या भल्याबुर्या परिणामांचा विचार करायला माझं चित्त थार्यावर होतंच कुठे? त्याच रात्री हे ऑफ़िसातून परत आल्यावर मी ते सारं त्यांच्या कानावर घातलं.
.... जहागिरदारांच्या घरावर जणू वीज कोसळली. कितीही लाडक्या असल्या तरी सुमावन्संना या एका बाबतीत कुणीही ऐकणार नव्हतं. मामंजी संतापले. वन्संना त्यांनी त्याच खोलीत कोंडून घातलं. रोज त्यांना जेवण खाण, लागलं सवरलं त्याच खोलीत नेऊन दिलं जायचं. सासूबाई आणि ह्यांनीदेखील त्यांच्याशी बोलणं टाकलं. इकडे माझा जीव तुटत होता. अजाणता मी केवढी मोठी चूक करून बसले होते याची जाणीव मला दुसर्या दिवशी वन्संचा चेहरा पाहताच झाली. मी त्यांचं जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेले.
" वन्सं जेवता ना? " मी भीत भीत विचारलं.
ताडकन नजर वर करून त्यांनी माझ्याकडे बघितलं. बोलल्या काही नाहीत. पण मी उभ्या उभ्या गारठले. काय नव्हतं त्या नजरेत... राग, तिरस्कार, अश्रू, दुःख, निराशा, असहायता..... मी त्यांचे पाय पकडले.
" वन्सं माफ करा हो.... माफ करा मला. मी चुकले हो वन्सं... विचार नाही केला तुमचं काय होईल याचा. "
" जाऊ दे वहिनी.. हेच होतं नशिबी माझ्या. त्यात तुमचं तरी काय चुकलं? " कुठेतरी शून्यात बघत त्या भकास आवाजात म्हणाल्या.
दिवसेंदिवस त्या खंगायला लागल्या. जेवेनात. राग, मारणं, समजूत सगळे उपाय थकले. सार्या घरावर या गोष्टीचं सावट होतं अहोरात्र. आधीचा आनंद जणू लोपलाच!
..... त्याही दिवशी रात्री मी वन्संचं जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेले. सासूबाई आणि मामंजी गावाला गेले होते. हे बाहेर बैठकीच्या खोलीत कुणाशीतरी बोलत बसले होते. मी खोलीची कडी काढून आत शिरताक्षणी वन्संनी मला एक जबरदस्त हिसडा दिला आणि त्या गच्चीकडे धावल्या. मीही कशीबशी उठून त्यांच्यामागोमाग धावले. वन्सं कमानीकडे जात होत्या. मला एका क्षणात लख्खकन कारण उमजलं. मी जिवाच्या आकांताने त्यांना हाका घालू लागले, थांबायला विनवू लागले. पण त्या आपल्या निश्चयापासून ढळल्या नाहीत. कमानीपासच्या गच्चीच्या कठड्यावरून स्वतःला खाली झोकून देण्याआधी त्या गर्रकन वळल्या आणि मला म्हटल्या....
" मला या घरातून जाऊ दिलं नाहीस. तुलादेखील या घरातून कधीच बाहेर जाता येणार नाही. " बस्स! त्यांनी आपलं आयुष्य संपवलं.
...... यानंतर जवळ जवळ दहा वर्षं लोटली. जहागिरदारांनी सुमावन्संवर केलेल्या अन्यायाची पुरेपूर किंमत चुकवली. सासूबाई लाडक्या लेकीच्या दुःखाने झुरून झुरून वारल्या. मामंजींनी तेव्हापासून स्वतःला अहोरात्र देवपूजेत गुंतवून घेतलं. कुणाशीच बोलेना झाले. दिवसरात्र सुमावन्संसाठी रडत राहिले. हेदेखील सुमावन्संच्या मृत्यूचं दुःख आयुष्यभर वागवतच जगायला लागले. तशातच ह्यांची बदली नागपूरला झाली. मी आनंदले. नवीन जागी नवं आयुष्य सुरु करायचं म्हणून खूश झाले. या शापित वास्तूतून अखेर माझी, माझ्या कुटुंबाची सुटका होणार होती. आमचा जायचा दिवस जवळ येत होता. सामानाची बांधाबांध सुरु होती. तेवढ्यात ते अघटित घडलं आणि केवळ.. केवळ मलाच जाणवलं.... " वहिनी क्षणभर थांबल्या.
" ........सुमावन्सं परतल्या होत्या.
.... माझी वाट त्यांनी अडवून धरली. मी नागपूरला जाऊ शकले नाही. त्यांनी म्हटलं होतं तसं मी कधीच या घरातून जाऊ शकले नाही. त्यांचं आयुष्य मी उध्वस्त केलं. मला शिक्षा भोगणं भाग आहे. डॉक्टर्स म्हणतात त्या guilt complex मुळे मला असले भास होतात. ते खरं नाहीये, पोरी... त्या आहेत. इथेच आहेत. माझ्यावर पहारा ठेवून आहेत. ते माझं प्राक्तन आहे. "
वहिनी बोलायच्या थांबल्या. त्यांच्या थकलेल्या चेहर्याकडे पहाताना माझ्या मनात एकाच वेळी कणव आणि चीड दाटून आली. ही कसली शिक्षा आणि तीही अजाणतेपणी घडलेल्या चुकीपायी?
.... सकाळचे सहा वाजायला आले होते. बाहेर हलके हलके उजाडायला लागलं होतं. माझ्या मनात काय आलं देव जाणे, मी एकदम वहिनींना हाताला धरून उभं केलं.
" वहिनी, सोडा ती समजूत. तुम्हाला इथे राहून अशा पद्धतीने घुसमटताना पाहू शकत नाहीये मी. चला... आत्ता, या क्षणी या जागेतून बाहेर पडा. चला, मी आहे तुमच्यासोबत. जवळ जवळ खेचतच मी त्यांना जिन्यावरून खाली आणलं. मुख्य दरवाजाकडे चालवलं. माझा इरादा पक्का होता. त्या गैरसमजातून मी त्यांना बाहेर काढणार होते. त्यांना त्या बंगल्यातून बाहेर काढणार होते. त्यांच्यासारख्या मोठ्या मनाच्या बाईने एका चुकीपायी आपलं संपूर्ण आयुष्य त्या घराशी जखडून घेऊन काढावं हे मला पटण्यासारखं नव्हतं. सुमावन्सं गेल्या होत्या, सुटल्या होत्या.... मात्र यांच्या कपाळी आयुष्यभराची वेदना, दुःखं लिहून गेल्या होत्या.
मी मुख्य दरवाजा उघडला. जोरात हवेचा झोत आत आला. वहिनींची चाल मंदावली. आणि त्या हवेच्या झोताने की काय देव जाणे, बैठकीच्या खोलीतला सुमावन्संचा भलाथोरला फोटो खाली कोसळला. काचेचा चक्काचूर होऊन इकडे तिकडे तुकडे उडाले. वहिनींचा जाता पाय उंबरठ्यातच अडला. मी तेव्हापावेतो दरवाजाबाहेर पोचले होते. फोटो पडल्याचा आवाज झाल्यावर मी मागे वळले. वहिनी उंबरठ्याच्या आतच उभ्या होत्या. त्यांच्या चेहर्यावर काही वेगळेच भाव होते. त्यांनी एकवार मागे वळून त्या फोटोकडे बघितलं.
" बघ तुला सांगितलं होतं ना...... माझी त्या शापातून मुक्तता होणं नाही. मला जाता येणार नाही. " त्यांच्या चेहर्यावर एक चमत्कारिक हास्य होतं. मला माहीत होतं; आता त्यांना खेचूनदेखील त्या वास्तूच्या बाहेर आणता येणार नाही. सुमावन्सं ते होऊ देणार नाहीत. त्या होत्या की नाहीत? ह्याची शहानिशा करायची माझ्यात ताकद उरली नव्हती. डोकं बधीर झालं होतं.
त्या वळल्या आणि परतू लागल्या. बाहेरच्या गार वार्यात मी कितीतरी वेळ गोठल्यासारखी तशीच उभी होते.
समाप्त