१. काही दिवसांपूर्वी लोकसत्तेच्या लोकमुद्रा या पाक्षिक पुरवणीत एक झकास लेख वाचला - ' कलाप्रांतातले ठकसेन ' . पैशाच्या लोभापायी काही कलाकारांनी भन्नाट क्लृप्त्या शोधून फसवाफसवीचे काय काय उद्योग केले आणि अशी काही प्रकरणं उघडकीला आल्यावर काही अस्सल कलाकृतींवर अकारण संशयी नजरा कश्या रोखल्या जाऊ लागल्या याचं रंजक वर्णन करणारा लेख आहे हा!
२. वि^ंबल्डनच्या वलयामुळे आणि ' गांगुली पहिल्याच चेंडूवर बाद ' असल्या टुकार बातम्यांनी भारतीय प्रसारमाध्यमांत रकाने भरून येत असताना, तिथं जर्मनीत चाललेली फिफा कॉन्फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धा काहिशी झाकोळून गेली. पण वीकेंडला त्यातले ब्राझिल - जर्मनी आणि मेक्सिको - अर्जेंटिना हे उपांत्य सामने इएसपीएन - स्टार स्पोर्ट्सवर पाहिले.. झकास मजा आली! ब्राझिल - जर्मनी सामन्यात अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. दोन वेळा ब्राझिलने आघाडी घेतली आद्रियानो, रोनाल्दिन्यो), पण दोन्ही वेळा जर्मनीने दोन - तीन मिनिटांतच बरोबरी साधली पोदोल्स्की, बालाक). पण अचानक शून्यातून संधी निर्माण करुन आद्रियानोनं ब्राझिलसाठी तिसरा गोल नोंदवला. या झटक्यानंतर मात्र जर्मन टीमचा नवखेपणा ब्राझिलच्या धडाक्यापुढे दिसू लागला; पण जर्मनीच्या सुदैवानं स्कोर ३ - २ एवढाच राहिला. कालची दुसरी सेमीफायनल मेक्सिको आणि अर्जेंटीनात झाली. ९० मिनिटं काही चमकदार आक्रमणं - प्रतिआक्रमणं वगळता मिडफिल्डमध्येच शह - काटशहाचा खेळ चालला होता. अतिरिक्त वेळेतही १ - १ अशी बरोबरी राहिली. पेनल्टी शूट^आऊटमध्येही ५ - ५ बरोबरी! शेवटी सडनडेथमध्ये रिकार्दो ओसोरिओची किक अर्जेंटाईन गोलकीपर जर्मन लुक्सनं अडवली अन पुढच्याच किकवर कांबिआसोनं अर्जेंटिनासाठी विजयी गोल नोंडवला. अर्जेंटिना ६ - ५ ने जिंकले. आता बुधवारी अंतिम सामना आहे. ब्राझिलचं आक्रमण आणि अर्जेंटाईन मिडफिल्ड प्ले यांच्यातली झुंज कोण जिंकेल? बघू..
फिफा कॉन्फेडरेशन्स कप ब्राझिलनं घेतला! खास झाल्या कालच्या मॅचेस! ब्राझिल - अर्जेंटिना फायनल ब्रझिलनं धडाकेबाज खेळत ४ - १ अशी जिंकली. आद्रियानोनं दोन गोल, काका, रोनाल्दिन्यो यांनी प्रत्येकी एक गोल लगावले.. दोन्ही हाफच्या पहिल्या पंधरा^एक मिनिटांतच हे चमत्कार. त्यांच्या मिडफील्ड आणि बचावफळीनं देखील रेकेल्मे, सोरीन यांना ब्लॉक करून मोलाची कामगिरी केली. त्यामुळं बॉल पझेशन ब्राझिलपेक्षा जास्त राखूनही अर्जेंटिनाला फारशा धोकादायक चाली रचता आल्या नाहीत. ' बिग आर ' , रोबेर्तो कार्लोस वगैरेंशिवाय खेळूनही ब्राझिलनं आपली ताकद दाखवून दिली.
त्या^आधी ब्रॉंझपदकासाठीची मॅच यजमान जर्मनीनं मेक्सिकोविरुद्ध ४ - ३ एक्स्ट्रॉ टाईममधे अशी जिंकली. मला पहिला हाफ(जर्मनी २ - मेक्सिको १) पाहता आला नाही. दुसर्या हाफमध्ये जर्मनीनं वेगवान आक्रमणं चालूच ठेवली होती. हुथनं तिसरा गोलही नोंदवला. पण बोर्गितिनं मेक्सिकोला दोन वेळा बरोबरी मिळवून द्यायला हेडरनं जे दोन गोल केले ते थक्क करणारे होते!! काहीच्च्या काही.. पुन्हा पुन्हा रिप्ले पाहतानाही प्रत्येकवेळी तेवढंच आश्चर्य वाटत राहिलं. शेवटी ९० मिनिटात ३ - ३ बरोबरी झाल्यानं एक्स्ट्रॉ टाइम देण्यात आला. त्यात बालाकनं फ्री किकवर अफलातून गोल केला आणि जर्मनीनं ब्रॉंझपदक घेतलं.
अश्या रीतीनं रंगीत तालीम तर संपली. आता फिफा वर्ल्ड कप २००६, जर्मनी काऊंटडाऊन सुरु...
चित्रकार सातवळेकरांचं परवा निधन झालं. त्या अनुषंगाने ' महाराष्ट्रातील कलावंत - आदरणीय आणि संस्मरणीय ' या चित्रकार बाबुराव सडवेलकर लिखित पुस्तकातील त्यांच्यावरील लेखातील काही अंश : *******************************************
" ..बॉंबे स्कूलमधील सर्वांत गाजलेला व आजही काही अंशी रसिकमान्य असलेला चित्रप्रकार म्हणजे व्यक्तिचित्रण. १८८० पासून सतत आठ दशके महाराष्ट्रात व्यक्तिचित्रणामध्ये निष्णात असे अनेक चित्रकार होऊन गेले. विशेष म्हणजे त्या प्रत्येकाने आपली अशी खास शैली निर्माण केली, जी त्यांची चित्रे पाहताच ओळखता यावी. पेस्तनजी, त्रिंदाद, आगासकर, हळदणकर ( पिता - पुत्र), भोंसुले, आचरेकर, माळी, देऊसकर अशी अनेक नावे सांगता येतील. त्याच श्रेणीतील एक ज्येष्ठ चित्रकार - ज्यांनी स्वतःची अशी एक खास शैली निर्माण केली आहे - म्हणजे माधवराव सातवळेकर.. चित्रकलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास, कला व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव व तंत्रविषयक त्यांच्या जाणिवेतला गहिरेपणा या गुणांमुळे त्यांची कला उत्तरोत्तर संपन्न होत गेली आहे. आजच्या कलाजगतातील नवकलेचं स्तोम वाढत असतानाही कलारसिक माधवरावांच्या कलेला दाद देतात, यावरून त्यांच्या कलेतील श्रेष्ठ कलागुणांची प्रचिती यावी. "
" माधवरावांच्या व्यक्तिचित्रांतील एक महत्त्वाचा गुण म्हणजे चित्रित केलेल्या व्यक्तीचे हात, पाय यासारखे अवयव बारकाईने निरीक्षण करून रचनात्मकतेने त्यांचे केलेले अचूक चित्रण; याबाबतीत त्यांची चित्रे अजोड आणि अभ्यसनीय आहेत. तुलनात्मकेतनं पाहताना माधवांच्या चित्रांत स्वैरपणे दिलेले ब्रशचे फटकारे आढळत नाहीत. त्यांच्या चित्रांत सखोल विचारांती अचूक असा एकेक रंगाचा पॅच देत चित्र घडवत गेल्याचा भास होतो. पण तसं करताना रंगाची शुद्धता कुठेही ढळल्यासारखी वाटत नाही. "
" माधवरावांना आवडणारा दुसरा चित्रप्रकार म्हणजे नित्य जीवनामध्ये दृष्टीस पडणार्या वस्तुमात्रांचे रचनात्मक चित्रण करणे. ज्याला इंग्रजीत 'Genre' ( मूळ फ्रेंच शब्द) म्हणतात ती चित्रपद्धती. त्यामध्ये नित्य जीवनातील घटना, जुने ऐतिहासिक अवशेष, ग्रामीण जीवन, झाडे, पाने, फुले यांचे स्थिरचित्रण असते. घरात वावरणार्या स्त्रियांचे विविध रुपात माधवरावांनी चित्रण केल्याचे आढळते. अगदी दुपारच्या वेळी वामकुक्षी घेणारी स्त्री ही त्यांच्या चित्राचा विषय होऊ शकते. मांडूमधील जुने अवशेष, गुजरातमधील जनजीवन आणि त्याचप्रमाणे पूर्व आफ्रिकेतील केनिया, युगांडा, झांझिबार इत्यादी देशांतील रंगीबेरंगी वेशातील कृष्णवर्णीय लोकांची त्यांनी रंगवलेली चित्रे तितकीच आकर्षक वाटतात. त्यांच्या त्या चित्रातील लाल, पिवळा, निळा असे काहीसे भडक रंग पाहताना फ्रेंच चित्रकार पॉल गोगॅंची चित्रे आठवू लागतात. "
(चित्रसंदर्भ : ' महाराष्ट्रातील कलावंत - आदरणीय आणि संस्मरणीय ' लेखक : चित्रकार बाबुराव सडवेलकर)
चार वर्षं फुटबॉलचाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण काही तासांवर येऊन ठेपलाय! भारतीय प्रमाणवेळेनुसार ९.३० वाजता म्युन्शेनमधल्या 'फिफा वर्ल्ड कप स्टेडियम' मध्ये जर्मनी आणि कॉस्टारिका यांच्यातील लढतीने या स्पर्धेचा किक - ऑफ होणार आहे. ९ जून ते ९ जुलै.. आता १ महिनाभर धम्माल!!
वर्ल्ड कपचा पहिला आठवडा सही गेला. जर्मनी, इंग्लंड, अर्जेंटिना, ब्राझिल अपेक्षेप्रमाणे पहिले दोन सामने जिंकून दुसर्या राऊंडमध्ये निश्चित झालेत. सगळ्या नाहीत, पण काही मॅचेस ईएसपीएनवर लाइव्ह पाहता आल्या. त्यापैकी पुन्हा - पुन्हा आठवाव्याश्या वाटलेल्या काही गोष्टी : १. ट्युनिशिया - सौदी अरेबिया मॅच! २-२ अशी ड्रॉ होऊनही शेवटच्या काही मिनिटांपर्यंत चुरशीची लढत! सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या सौदी अरेबियाने उत्तरार्धात मुसंडी मारत बरोबरी साधली. मॅचच्या ८० + मिनिटांमध्ये सौदीकडून दुसरा गोल झाला; आणि ट्युनिशियावर दडपण आलं. पण ९० मिनिटांनंतरच्या इंज्युरी टाइममध्ये ट्युनिशियानं बरोबरीचा गोल डागला!! २. अर्जेंटिना वि. सर्बिया - मॉंटेनेग्रो : अर्जेंटिना ६ - ०! सर्बिया - मॉंटेनेग्रो जरी कमकुवत संघ असला तरी ६ गोल मारणं खरोखर जबरदस्त कामगिरी आहे. आणि त्या ६ गोलांपैकी कांबिआस्सोने केलेला गोल तर हाईट होता - २४ पासेसमधून ती चाल घडत गेली; त्याचा असंख्य वेळा रिप्ले बघतानाही या 'काहीच्च्या काही' गोलचं कौतुक वाटत राहिलं. ३. मेक्सिको - अंगोला : ही मॅच पाहिली नसेल तर ०-० अशी स्कोरलाईन वाचून मॅच नीरस झाल्याचं वाटू शकतं. पण अंगोलाच्या गोलकीपर रिकार्डोनं मेक्सिकोची आक्रमणं फोल ठरवताना जी अफलातून कामगिरी केली ती खरोखर प्रेक्षणीय होती.. लाजवाब! ४. चेक प्रजासत्ताक - घाना : कम्माल मॅच! घाना चेक प्रजासत्ताकाला २ - ० असं अपसेट करतील अशी शक्यता वाटली नव्हती. घानियन खेळाडूंचा जिगरबाज खेळ आणि त्यांचा विनोदी नवखेपणा(पंचांनी शिट्टी वाजवायच्या आतच त्यांच्या खेळाडूने अतिउत्साहात पेनल्टी किक मारून स्वतःवर यलो कार्ड ओढवून घेतलं... ) यामुळे अगदी झकास मनोरंजन झालं!