मुकुंद टांकसाळे यांनी " नाही मनोहर तरी " या त्यांच्या पुस्तकामधे कट्टा ( लेखक संपादक विवेक परांजपे. ) या अनियतकालीकावर एक लेख लिहिला आहे. " कट्टा - एक बाष्कळ अनियतकालिक " या लेखामधील हा काही भाग.
लेखामधे सुरूवातीला म्हटल्याप्रमाणेच असे बाष्कळ विनोद तुम्ही enjoy करू शकत असाल तरच तुम्हाला हे पुढचे आवडेल अन्यथा तुम्ही कट्ट्याच्या वाटेला नं जाणच बरं.
कट्टा चा संस्थापक, संपादक, प्रकाशक, त्रासदायक विवक्यानोव्ह कोरोकोटीस्की (gupthair KGB) होता आणि उपसंस्थापक उपसंपादक, उपप्रकाशक, उपत्रासदायक यापुढे वेळोवेळी जी नावं प्रसिद्ध झालेली आहेत ती येणेप्रमाणे : मांजरेकरांचा मेघन, गद्र्यांचा मकरंद, वाडेकरांचा पब्या, गोडबोल्यांचा श्रीरंग, टांकसाळ्यांचा मुकुंद, बी. जे. तील काही आजारी डाॅक्टर्स, लिमयांचा मध्या, धारपांचा शंजू, गारंबीचा बापू, पवनाकाठचा धोंडी, मोहित्यांची मंजुळा, लोखंड्यांचे श्रीविष्णू, पाटलांची सून, जावयाची जात, ग्यानबाची मेख ई. (चुकभुल द्यावी घ्यावी)
(....)
कट्ट्याचा पहिलाच अंक दुसरा म्हणून काढला होता. आणि पहिल्या अंकाच्या " किंकाळिय " मधे संपादकिय खुलासा दिलेला आहे.
" कंसमामांना नारदमुनी मॅननी सांगितलं होतं " बाबा, कंसा रे, देवकीचा आठवा पोरगा तुझा मर्डर करणार हे आॅ इन्डीया रेडीओ वर देवांनी अनाऊन्स केलय. पण हे देव भारी डॅम्बीस. कशावरून आठवं पोरगं पहिल्यांदाच जन्माला घालणार नाही? तू आपलं पहिल्याच पोरापासून हत्याकांड सुरू कर कसा. " अशा रितीने कंसमामांनी तो सल्ला मानला.
" आम्हालाही नारदमुनी भेटले. म्हणाले " तू काहीतरी तिरकस, उभट प्रकार काढतोयस. नाही चालला तो प्रकार आणि आपटला तर, लोक म्हणणार की बघा, पहिल्याच अंकात आपटला. म्हणून तू आपला एकदम दुसरा अंक काढ आणि मग सावकाशीनं पहिल अंक काढ "
अर्थात " कट्टा " पहिल्या अंकात काही आपटला नाहीच, पण वैशाली परिसरात अधिकाधीक populer होत गेला.
कट्ट्याच्या अंकावर किंमत छापलेली असे. उदा : किंमत एका विल्स इतकी. टीप : सिगारेट पिनीए आरोग्यने घात्क छे! मराठी अर्थ : सिग्रेट ओढणे आरोग्याला घातक? छे!
परंतु ही किंमत वसूल करून, नं करून सारखीच. कट्टा बर्याचदा फुकट वाटण्यावर जातो म्हणून विवेक एकदा म्हणाला होता, " या वेळ्यच्या कट्ट्याला आपण " फुकट्टा " हेच नाव देऊ. "
(....)
कट्ट्याच्या पहिल्या अंकात " खोट्या जाहीराती " मधे हरवले सापडले सदरातील एक जाहीरात :
" ह्याच कट्ट्याच्या अंकातील पान चार हरवले आहे. कित्ती कित्ती शोधले सापडलेच नाही. तरी ज्यास सापडेल त्याने ओळख पटवून आणून देणे. त्यास " बादशाह ए पान्चार " हा किताब व एक रौप्यपदक देण्यात येईल होऽऽ ढुम ढुम ढुमाक. "
चार्-पाच पानी कट्ट्याच्या अंकात पहिल्या पानावरचा मजकूर " पान ११३ पहा " अशी सुचना करून अचानक संपवण्यात येई. कट्ट्याची एक गझल पुरवणी काढण्यात आली होती, त्या अंकाचे पान नंबर असे होते -
पान पुना स्पेशल मसाला, पान जाफरानी पत्ती, पान ३०० कतरी सुपरी, पान बनारस मीठा, पान मघई जोडी.
पट्टीच्या पान खाणार्यांना हा कट्टा वाचण्यापेक्षा " चघळत बसायला " अधीक आवडला असल्यास त्यात नवल नाही!
(....)
कट्ट्यात येणारा काही मजकूर आता आपण पाहू. कट्ट्यात " प्रश्न तुमचे - उत्तर युरी गागारीनचे " असं एक प्रश्नांना उत्तर देणारं सदर होतं. त्यातील काही प्रश्नोत्तरे :
चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर काय?
उत्तर : ते घासावे लागतील
चार पाय असून चालता येत नाही अशी कोण?
उत्तर : चारपाई
अहो युरीकाका, मी तुम्हाला कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?
उत्तर : तुम्ही मला पेचातच टाकले आहे. हो म्हणावे तरी पन्चाईत नाही म्हणावे तरी पन्चाईत. खरे तर तुमच्याच प्रश्नाला " प्रश्नराज " म्हटले पाहीजे.
(....)
कट्ट्याच्या दर अंकात एक कादंबरी " नग्न सर्पाचा डोळा " क्रमश प्रसिद्ध होत असे. तिची थोडीशी झलक :
" झुंबरराव कुळकर्णी हा हाॅन्ग्काॅन्गचा हिर्याचा व्यापारी विठ्ठलवाडी विमानतळावर उतरला तेव्हा घड्याळात तीन पस्तीसचे टोले पडले. दूर अंतरावरच्या एका व्यावसायीक ईमरती मधून एक चविष्ट पदार्थ हातात घेतलेली एक तरुणी बाहेर पडली. तिने काळ्या रंगाची साडी आणि चट्ट्यापट्ट्यांची बेलबाॅटम घातली असून तिच्या निळ्या डोळ्यांवर तिनं समुद्री रंगाचा गाॅगल घातला असल्याने तिच्या नैसर्गीक सौंदर्यात भर पडली होती. जरी तिचे वय साठ असले तरी ती झपझप पायर्या उतरून आली व तिने आपल्या पर्स मधून एक टाचणीच्या आकाराची ऊखळी तोफ काढली. त्यात मुगाएवढा गोळा घालून ती म्हणाली, " मला हे करतांना दुख होतय झुंबरलाल. " पुढच्याच क्षणी झुंबरलाल खाली कोसळला. आणि त्याच्या खिशातले हिरे एका क्षणात नाहीसे झाले... त्याच वेळी साहित्यपरिषदे समोरून येणार्या चार क्रमांकाच्या बसमधून स्टेनगन धडाडली आणि मरियम " थड " असा आवाज करून खाली कोसळण्याऐवजी चहावाला भय्या " लड " असा आवाज करून खाली कोसळला.... नंतर साहित्यपरिषदेसमोर लै शाळा झाली राव! कशी ते मी हाॅलंडहून आल्यावर सांगीन. "
(....)
कट्ट्यामधील था.पु. चाळे यांचे " पत्रा " साप्ताहीकातले लोकप्रिय सदर : " रेझर बाॅक्स "
था.पु.
हे असं का व्हावं? जीवनात आपण हौसेने दाढी करायला म्हणून जावं आणि रेझर ने जखम व्हावी. विळीवर भोपळा चिरायला घ्यावा आणि बोट कापावं. अशा वेळी मी तुमच्या कथा वाचते आणि माझं रडू दूर पळून जातं. (लहानपणी मी वरण भात सुद्धा कालवून खायची नाही म्हणून आई मला रागवायची.) था.पु., - तुमच्या सुंदर हस्ताक्षरातले पत्र येईल ना मला?
- वैशाली बोटकापे, पुणे.
या पत्राला था.पुंचे उत्तर
वैशू,
अगं, जीवनाची हीच तर खरी गम्मत आहे. दाढी करताना कापलं तर लगेच आफ्टर शेव लावायचं आणि ते झोंबत असतांना सुद्धा चेहरा हसरा ठेवायचा. भोपळा चिरतांना कापलं तर band-aid लावायचं आणि चेहर्यावर स्मितहास्य आणायचं. माझ्या तरी जीवनाचं मी हेच तत्वज्ञान केलय. तुला गम्मत सांगतो वैशू, लहानपणी मी वरणभात आमरसात कालवून खायचो म्हणून आई मला रागवायची. खुलली ना कळी तुझी हे वाचून? पूस बघू डोळे. तुझं ग्रिटींग कार्ड मी माझ्या टेबलाच्या काचेखाली अष्टविनायकाच्या फोटोशेजारी लावून ठेवलेलं आहे.
तुझा,
था.पु. चाळे