पुण्यचा लेख वाचून अनेक जुने प्रसंग ताजे झाले.
लहानपणापासून मला कुत्री, मांजरी, बकरी, मासे, वगैरे वगैरे पाळता येतील त्या सगळ्या प्राण्यांचे जबरदस्त आकर्षण होते. अगदी लहानपणी समोरच्या घराचे बांधकाम सुरु झाल्यावर त्या वाळूत सापडलेल्या शिंपल्याच्या पेट्या, खारट पाणी एका बरणीत घेऊन त्या त्यात सोडल्या होत्या. आशा ही होती की शिंपल्यातला प्राणी वाढेल आणि मग तो मला मोती देईल. पण कुजल्याचा वास सुटल्यावर आईला त्याचा सुगावा लागलाच.
अमच्या कोलनीमध्ये एक काळ्या रंगाची कुत्री फ़िरत असे. तिच्या काळ्या रंगामुळे आम्हा मुलांनी तिला ब्लकी असे नाव दिले होते. मी तिच्यासाठी डब्यातला एक तुप साखरेचा पोळीचा रोल जपून ठेवायचे आणि संध्याकाळी घरी परतल्यावर तिला खाऊ घालायचे. तिला अनेक पिल्ल झाल्यावर त्यातल एक काळभोर कुत्र्याच पिल्लू घरीच आणल. पण आईच्या विरोधामुळे मला ते परत कराव लागले ती गोष्ट वेगळी.
आमच्या घराजवळच एक शेत होते ते नक्की कसले होते ते अजूनही माहित नाही. पण अधून मधून तिथली २-३ कणस तोडून आणून मग गवत पेटवून हुरडा करायचा हा क्रम कधी चुकवला नाही. अशाच एका दिवशी त्या शेतकर्याच्या बकर्यांच्या कळपातले एक गोजीरवाणे पिल्लु देखिल असेच मी आणि माझ्या मैत्रीणीने मागच्या मागे पळवले. घरी माझ्या तर नक्कीच चालले नसते पण तिच्याही चालणार नाही ह्याची पक्की खात्री असल्याने आम्ही ते मैत्रीणीच्या शेजारच्या नविन होणार्या घरात बांधून ठेवले. बरोबर आणलेला हिरवा पाला, पाणी, दुध इतक लहान पिल्लु नक्की काय खातं माहित नसल्याने सगळ्या गोष्टी त्याच्या समोर ठेवल्या. आणि मग ते कसे मोठे होईल मग आपण काय काय करू एकत्र अशा स्वप्नराज्यात कधी झोप लागली ते कळलच नाही. पहाटे पहाटे आमच्या घरावर थाप पडली आणि बाबा आत आले ते चिडूनच. मी घाबरून ऊठल्यावर खुलासा झाला. तो शेतकरी पिल्लु बराच वेळ शोधत होता. आणि त्या पिल्लानेही रात्रभर बे बे केल्यामुळे मैत्रीणीच्या घरच्यांना कळून चुकले आणि मग बरच नाटक. माफ़ी मागून वगिअरे त्या शेतकर्याला कसेबसे परत पाठवले पण त्यानंतर माझे जे बौद्धीक घेतले गेले ते अजूनही चांगलेच लक्षात आहे.
पण इतके करूनही प्राणी पाळण्याची हौस काही फ़िटली नाही. आई तिच्या परीने विरोध करत राहिली आणि मीही माझ्या परीने.
अशाच एका दुपारी शाळेत जाताना रस्त्यात मला एक लहानसे पिल्लु दिसले. अजून निट डोळे पण उघडले नव्हते तिने. पावसात चिंब भिजल्याने थरथर कापत ते तिथेच उभे होते. रिक्षा वगैरेच्या खाली येईल की काय भितीने मी त्याला घट्ट जवळ घेतले आणि घरी नक्कीच आई आणु देणार नाही माहित असल्याने मी त्याला घेऊन आमच्या नविन घराच्या बांधकामाच्या साईटवर गेले. तिथे एक स्लॅब पडलेला होता. शिवाय काही काम करणारी लोकं पण तिथेच रहात होती. मी आणि माझ्या एका मैत्रीणीने त्याला स्वcच पुसले. नामकरण देखिल केले. तिच्या मोत्यासारख्या पांढर्या शुभ्र रंगामुळे तिला आम्ही पर्ली असे नाव दिले. तिला गरम गरम दुध पाजले. आता तिला चांगलीच हुषारी आली होती. रोज शाळेतून आले की सायकलवरून थेट इथे यायचे. तिला खाऊ पिऊ घालायचे आणि तिच्याबरोबर खेळायचे. तिने १५ दिवसात आम्हाला इतका लळा लावला होता आणि ती इतकी हुषार होती की तिने पंजा देणे, पळत जाऊन बॉल आणणे सगळे वगिअरे १५ दिवसात आत्मसात केले होते. हळू हळू पावसाळा वाढतच होता. एके दुपारी मला माझ्या मैत्रिणीचा फ़ोन आला. पर्ली हलत नाहीये. निपचीत पडली आहे. आम्ही बाबांन सगळे सांगितले. बाबांनी लगेच गाडी काढली आणि तिला प्राण्यांच्या दवखान्यात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरने सांगितले की शक्य नाही काही करण तिचे रक्त गोठले आहे थंडीने. ती वाचणार नाही. आम्हाला काय करावे सुचले नाही. घरी घेऊन येताना तिला जपून मांडीवर ठेवले. तिने मांडीवरच आमच्याकडे बघत प्राण सोडले. ह्या घटने नंतर मला परत कुत्रा पाळायचा धीर झाला नाही. अजूनही वाटते तिला मी तिथे उचलले नसते तर कदाचित ती जिवंत असती. मला फ़ारशी माहिती नसल्याने इतक्याशा पिल्लाने आपला जीव गमावला. अनेक प्रसंग आले बर्याचदा मोह होतो एखादे लहानसे पिल्लु घरी घेऊन यायचा पण पर्ली आठवली की ते जमत नाही..