एक छोटीशी भागमभाग...
एकादा दिवस असा उगवतो. माझ्या घरी कुणी पाहुणे येणार असतात, आणि ते घरी पोहोचायच्या आधी मला घरी पोहोचायची घाई असते. खरं तर ते सगळ्या कुटुंबाचेच मित्र असतात, पण पाहुणे घरी पोहोचले तरी घरच्या मालकाचा पत्ता नाही हे मला काही पटत नाही, म्हणून मी ऑफिस मधून जरा लवकरच निगह्तो.
दर शुक्रवार प्रमाणे माझ्या कन्येचा क्लास ठरलेला असतो. नशीब क्लास माझ्या मित्राच्या घरी असतो, आणि मी त्याला गुगलवर 'आज जर लवकरच येतो, जरा लवकर परत जायचं आहे,' असा मेसेज टाकतो. कन्या, तिचा भला थोरला की-बोर्ड आणि मी गाडीत बसून निघणार, येवढ्यात बायकोला काही वाणसामानाची लिस्ट आठवते. क्लास सुरू झाल्यावर नाहीतरी मी मित्राच्या घरी तासभर बसणार, तेवढ्या वेळात मी थोडी खरेदी करून टाकावी म्हणून ती तिची छोटीशी लिस्ट माझ्या हाती देते. तिलाही घरातली कामं आटपून, धाकटीला बास्केटबॉल प्रॅक्टिसला सोडायचं असतं.
मित्राचं घर काही फार लाम्ब नसतं, फक्त तिथे पोहोचल्यावर मला पंधरा वीस मिनिटात माझी इतर कामं उरकायची असतात. मित्राची बायको पटकन चहा टाकते. घरून निघताना मला चहा प्यायला वेळच झालेला नसतो. खरं तर चहाची तल्लफ वगैरे नाहीय मला, पण बाहेर मस्त पाऊस पडत असताना एखादा कप चहा प्यायला माझी हरकत नसते. आणि चहाची पाच मिनिटं धरूनही मला फारसा उशीर होणार नसतो, म्हणून मी चहा साठी थांबतो. चहा दिल्यावर 'येताना आमच्या साठी पण दुध घेऊन ये' या तिच्या विनंतीला मान देऊन मी माझ्या वाणसामानाच्या यादीत पटकन नोंद करून बाहेर पडतो.
नवीनच सुरू झालेली भारतीय गोर्सरी (वाणसामानाचं दुकान), त्यांच्या घरापासून दोनच मिनिटावर असते, फक्त तिथे जायला Left-Turn नाहीय, हे तिथे पोहोचल्यावर मला दिसतं. काही वर्षांपूर्वी मी त्या भागात रहात होतो, तेव्हा त्या दुकानाला left-turn होता, हे मला माहीत असतं, पण नियम तोडून पोलीसांची आफत ओढवून घेण्यापेक्षा मी दुसरा मार्ग सोधायला निघतो. फार नाही पण एक दोन मिनिटं उशीर होणार असतो.
भारतीय ग्रोसरी नवीनच सुरू झालेली असल्यामुळे, तिथे कुठल्या भागात काय मिळतं ते मलाच नाही तर त्या दुकानातल्या कामगारांना देखील माहीत नसतं, त्यामुळे माझ्या यादीतली एक एक वस्तू मिळवायला मला दुकानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सतरा वेळा फिरवलं जातं, आणि तरी भांडी धुवायची साबण पावडर आणि तेल मला कुठ्ठे म्हणजे कुठे सापडत नाहीत. या प्रकारात माझी वीस पंचवीस मिनिटं सहज मोडतात, आणि तरी माझी यादी पूर्ण झालेली नसते. उरलेल्या वस्तू पटकन मिळवाव्यात म्हणून मी पटकन मित्राच्या बायकोला फोन करतो, आणि ती मला 'इथे नाही तर WaWa* मध्ये मिळेल' असा सल्ला देते. घाई घाईत मी तिकडे निघतो.
वावाच्या दाराशी गाडी येताच गाडीतलं पेट्रोल संपल्याचा दिवा पेटायला लागतो आणि आता मला यापुढे पेट्रोल पंपावर जायलाच हवं याची जाणीव होते. या 'वावा' मध्ये पूर्वी बर्याच सटरफटार गोष्टी मिळायच्या पण गेल्या दहा वर्षात मॅनेजमेन्ट बदलून आता तिथे फक्त 'कॉफी, सांडविच, आणि खाण्याचे पदार्थ' मिळतात हे आत शिरल्यावर लक्षात येतं. घड्याळाचा काटा थोडा वेगानेच फिरायला लागल्याची जाणीव मला होते, पण तेल, साबण शोढण्यासाठी आता मोठ्या ग्रोसरीला जाण्याशिवाय पर्याय नसतो.
तिथून अजून दोन मैल गेल्यावर Shop N Stop आहे, मी तिकडे जायला निघतो. नशीबाने त्याच दिशेला एक पेट्रोल्पंपही असल्याचं आठवतं. या दुकानातही मला हव्या असलेल्या गोष्टी कुठे आहेत त्या शोधायला वेळ जाऊ नये, म्हणून तिथल्या एका कन्येकडे मी मदत मागतो, आणि ती मला पूर्ण दुकान फिरवून शेवटी दोन टोकाला ठेवलेल्या दोन्ही वस्तू शोधून देते. काऊन्टरवरची कन्या दुकानात कोणीच नसल्यामुळे, आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारायला गायब झालेली असते. ती येऊन बील, पैसे वगैरे सोपस्कार पार पाडते, पण घेतलेल्या वस्तू पिशवीत भरून ध्यायचे कष्ट मात्र घेत नाही. साबणाचा डबा काखेत मारून, मी तेलाची बाटली तशीच हातात घेतो, आणि दरवाजाकडे पळ काढतो, तेवढ्यात मला Cash Machine दिसतं. आठवड्याची Cash तिथूनच काढावी म्हणून मी खिशात हात घालतो, तेवढ्यात हातातला साबणाचा डबा सटकतो. गळणार्या पावडरीला आळा घालायला परत दुकानात शिरून पिशवी आणणावीच लागते. मिनिट काटा आता सेकंद काट्यासारखा वाटू लागतो.
गाडीत बसल्या बसल्या मी पेट्रोल पंपाकडे सुसाट सुटतो. पंपा वरचा सरदार आधी एका गाडीवाल्याशी पाच दहा मिनिटं गप्पा मारून माझ्या गाडीकडे येतो, तेव्हा त्याचे पंजाबी भाषेतले सुसंवाद सेलवर चालू असतात, ये मधून मधून येणार्या 'पैण दी....' वगैरे शब्दांमुळे लक्षात येतं. क्रेडिटकार्डावर पैसे देऊन मी निघेपर्यांत मिनिट काटा अजून बरीच घरं पुढे गेलेला असतो. निघताना लक्षात येतं की, तिथून बाहेर पडायला फक्त एकच रस्ता असतो, पण त्या रस्त्यावर ट्रफिक जॅम. मला खरं तर त्या रस्त्यावर येऊन, U-Turn मारायला जागा हवी असते, पण एका ट्रकने ती जागा अश्या हुशारीने अडवलेली असते की मला अजून एक दोन मैल पुढे जाऊन परत फिरण्याला पर्याय नसतो.
एवढं करून मी मित्राच्या घरा जवळ येतो, तेव्हा चांगला तास होऊन गेलेला असतो, त्याच्या घराजवळ Visitor Parking full झालेलं असतं, पाऊस वाढलेला असतो, आणि मला गाडी अजून लाम्ब लावावी लागणार असते. घड्याळाच्या काट्यावर मात करत मी धावत पळत त्याच्या घरी पोहोचतो, कन्येला तिच्या keyboard सकट गाडीत घालतो, आणि घाई घाई गाडी चालवत घरी येतो..
येणार्या पाहुण्यांना उशीर झालेला असतो, आणि मित्राच्या घरासाठी आणलेला दुधाचा कॅन माझ्याच गाडीत राहिलेला असतो......
(* WaWa नावाचं एक स्टोर आहे इथे)
समाप्त...