” आता या नंतर आपण कलोसियम बघणार आहोत. ”
रोम मधली आमची गाईड सोफियाने आपल्या मोडक्या तोडक्या इन्ग्लिश मधे सांगितले. पाच मिनीटातच एका अरूंद रस्त्यावरून बसने वळण घेतले.
आणि समोरच्या काॅर्नर वर झाडांच्या अधूनमधून एक तीन चार मजली, सिमेन्ट कॉक्रीट च्या राखी रंगाची पडकी गोलाकार ईमारत समोर आली आणि माझा अतिशय अपेक्षाभंग झाला
” हेच का ते कलोसियम च्याचा ज्याचा इतका गवगवा ऐकला होता ” असा विचार मनात आला. माझ्या डोळ्या समोर होते ते gladiator चित्रपटातले दैदिप्यमान असे वर्तुळाकार कलोसीअम आणि इथे तर समोर अगदीच अवकळा आलेली इमारत दिसत होती. संगमरवर तर कुठे नावाला पण दिसत नव्हते. नुसतेच दगड आणि विटा. थोड्या निराशेनी बस मधून उतरल्यावर आणि माझ्या बरोबरच रहा अशी सोफियाबाईंकडून कडक तंबी मिळाल्यावर ८-१० पायर्या उतरून रस्त्यावरून दिसलेली ती ईमारत आणखी जवळ येत गेली आणि तिथला इतीहास आठवून मनाला भिडत गेली. खाली काळ्याशार गुळगुळीत दगडांचा रस्ता, समोर पडके कलोसियम त्याच्या एका बाजुला एका ओळीत असलेल्या तुरूंगा सारख्या बरॅक्स. यामधे नक्की कुणाला डांबून ठेवत असतील? जनावरांना का गुलामांना? समोर एक चौकोनी पाया दिसतोय...इथे काय असेल पूर्वी? माझ्या डोक्यात हा प्रश्न आला आणि तेव्हाच तिकडे बोट दाखवत सोफिया सुरू झाली.
आत्ता समोर जो पाया दिसतोय तिथे पूर्वी सम्राट निरोचा ३७ मीटर उंचीचा पितळी पुतळा होता. दु यु नो निरो? Yएस द सेम निरो हू वाॅस प्लेयीन फिदल व्हेन रोमा वाॅज बर्नींग. दो मेनी से इत इस नो त्रू.
ई. स. ६४ मधे लागलेल्या आगीत अर्ध्याहून अधीक रोम जळून खाक झाले. विक्षिप्तपणा साठी प्रसिद्ध असलेला सम्राट निरो म्हणे तेव्हा आपल्या राजमहालातील गच्ची मधून जळत असलेले रोम बघत बसला. (रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता या गोष्टीला मात्र कुठलाही ऐतिहासीक पुरावाआधार नाही. उलट ईसवी सन ६४ म्हणजे आज पासून २००० वर्षांपूर्वी फीडल हे वाद्यच अस्तीत्वात नव्हते.) पुढे या बेचीराख झालेल्या जमिनीवर निरोने डोमस ऑरीआ म्हणजे सुवर्ण महाल बांधायला सुरूवात केली. नावात महाल असला तरी हा काही एकच राजमहाल नव्हता तर अर्ध्याहून अधीक रोमच्या जागेवर पसरली तिनशेहून अधीक महाल आणि दालने यात होती. याशिवाय ठिकठिकाणी असलेले बगीचे, कारन्जी आणि कृत्रीमरित्या बनवलेले एक मोठे तळे. आणि या डोमस ऑरया च्या प्रवेशद्वारी निरोने अगोचरपणाने उभा केला होता तो अतिभव्य स्वतचा पुतळा, सुर्यदेवाच्या रूपात निरोला दाखवणारा. प्राचीन जगातील सात आश्चर्यां मधील कलोझियस ऑफ र्होड्स मधील सुर्यदेवतेशी समानता दाखविणारा " कलोझियस निरोनिस " . पण सुवर्ण महालाचे आपले हे स्वप्न साकार झाल्यावर निरो जेमतेम काही दिवस जगला. ईसवी सन ६८ मधे आपल्या विरुद्ध झालेल्या बंडाळी मुळे हतबल होऊन निरोने आत्महत्या केली.
निरो नंतर राज्यावर वेस्पसीयन हा सम्राट आला.
विक्षीप्त नीरो चे राज्य संपलेले आणि
निरो काळातील स्मृती राहू नये म्हणून निरो ने बांधलेला सुवर्ण महाल डोमस आॅरीआ नामशेष करण्याचे काम सुरू झाले. ई.स.७० मधे निरो च्या मृत्यु नंतर २ वर्षानी सुवर्ण महालातील क्रुत्रीम तळे बुजवून त्या ठिकाणी वेस्पसीयन ने amphi theatre बांधायला सुरुवात केली.
५०००० हुन अधीक प्रेक्षक बसू शकतील असे हे amphi theatre बांधायला दहा वर्षे लागली. ई.स. ८० मधे त्याचे उदघाटान करण्यात आले तेव्हा त्याचे नामकरण झाले फ्लावियन amphi thatre . पुढे जवळ जवळ पन्नास वर्षे ते याच नावने ओळखले जात असे. पण निरो ई. स. ११५ च्या आसपास सम्राट हेड्रीअन ने निरो चा तो कलोझियस निरोनिस चा भव्य पुतळा इथे आणून बसवला. पण निरो ला सुर्यदेवतेच्या रूपात दाखविणार्या त्या पुतळ्याचे शीर उडवून! पुढे राज्यावर आलेल्या अनेक सम्राटांनी मग त्या धडावर आपले मस्तक डकवले! पण मग amphi theatre शेजारीच उभ्या असलेल्या या अतिभव्य कलोझिअस (म्हणजे भव्य मुर्तीदगड ई) मुळे या थिएटर ला कलोसियम असे नाव पडले.
तर या ठिकाणीहे amphi thatre बांधले जायच्या आधी रोम मधे कुठलेही असे पक्के आणि मोठे amphi theatre नव्हते. एरवीचे थीएटर म्हणजे एक स्टेज आणि त्या पुढे प्रेक्षकांना बसता येण्यासाठी केलेली आसन व्यवस्था. ग्रीक भाषेत amphi म्हणजे गोल तर यात मधे गोलाकार प्रांगण अणि त्या भोवती सर्व बाजूंनी बसण्या साठी केलेली व्यवस्था असलेले थीएटर (म्हणजे आताचे आपले स्टेडीयम!) अर्थात हे थीएटर कले साठी नसून क्रीडे साठी असे. आणि हे खेळ साधेसुधे नाहीत तर खर्या अर्थाने रानटी आणि क्रूर.
वाघ, सिंहां सारखी वेगवेगळी ज़ंगली श्वापदे आणि बंदीवसातील गुलाम यांच्या लढती हा प्रमूख खेळ. या शिवाय अश्वरथातील शर्यती सुद्धा तेव्हाच्या रोमन लोकात भलत्याच पाॅप्युलर. या सगळ्या झूंजीत विवीध आयुधे आणि लोखंडी शिरस्त्राणे घालून लढणारे गुलाम म्हणजे ग्लॅडीएटर्स.
त्यांना practice करायला या कलोसीयम च्या शेजारीच एक वेगळी ईमारत सुद्धा बांधली आहे. या क्रूर लढतींना सुद्धा धार्मिक आधार होता. म्हणजे काय तर एखाद्या महत्वाच्या प्रसंगी या झुंजी होत असत. जसे की एखादी मोठी लढाई जिंकल्यावर, राज्यरोहण प्रसंगी, मृत्यू प्रसंगी ई. आणि मग ती ती लढत jupitor, diana वगैरे देवतांना अर्पण केली जात असे. अशा महत्वाच्या वेळी रक्त वाहविले गेले म्हणजे या देवीदेवतांची कायम कृपा राहील म्हणून. (हे देवीला बळी प्रकार आणखी पण कुठेतरी वाचलेसे वाटतायत ना?) पण पुढे पुढे मात्र हे धार्मीक कारण कमी होऊन निव्वळ लोकांच्या मनोरंजनासाठी ग्लॅडीएटर्स ना लढवीले जाऊ लागले. कधी कधी एकाच वेळी ग्लडीएटर्स च्या आठ दहा जोड्या सुद्धा आपापसात लढायला सोडल्या जात. आणि मग ईतर सर्वांना युद्धात मारून जो एकटा जिवंत राहील तो विजेता. या शर्यती, लढती जिंकल्यावर मग त्या गुलामाला मिळत असे विजयाचा मोबदला म्हणून एक ठरावीक रक्कम आणि या पैशाच्या मोबदल्यात त्या गुलामाला विकत घेता येई स्वतचे "लिमिटेड" स्वातंत्र्य!
गुलाम, श्वापदे यांच्या मधील या लढती ई.स. ४०० पर्यंत चालू होत्या पण त्या नंतर यावर बंदी घातली गेली आणि मग कुठलाही उपयोग न उरलेल्या या कलोसीअम च्या अवकळेचे दिवस सुरू झाले. अनेक वर्ष दुर्लक्षीत राहीलेल्या कलोसीअम चा काही वर्षे लष्करासाठी उपयोग करण्यात आला. तर नंतर त्याच्या एका भागात एक चर्च सुद्धा बांधण्यात आले.
पुढे बाहेरून लावण्यात आलेले संगमरवर काढून ते सेंट पीटर्स बॅसीलीका साठी वापरण्यात आले. नीरो चा तो पुतळा तर कधीचाच वितळवून त्यातून लष्करासाठी आयुधे बनवण्यात आली होती. पण खुद्द कलोसिअम च्या इमारती मधे बसवलेले bronze वितळवून शस्त्रसाठा वाढविण्यात आला. त्यातून मधल्या तीनशे चारशे वर्षातील दोन भुकम्पांमुळे कलोसियम ची आणखी बरीच पडझड झाली
पण रेनेसान्सच्या - पुनरुज्जिवनाच्या काळात पुन्हा एकदा थोडी मेहेनत घेऊन कलोसिअम चे जे काय अवशेष शिल्लक आहेत त्यांचे जतन करण्याचे काम सुरू झाले. जे अजुनहि सुरू आहे.