दहा वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यातल्या 'डेक्कन'ला माझ्या दोन मित्रांबरोबर मी हा सिनेमा पाहायला गेले होते. चित्रपट tax free होता... साडेतीन रुपये तिकीट, संपूर्ण थेटरमधे आम्ही तिघे धरून जेमतेम १०-१२ माणसं असतील. सिनेमा संपून बाहेर आलो, तर धो धो पाउस कोसळत होता. 'डेक्कनच्या' बाहेर, hongkong लेनच्या सुरुवातीला एक चहाची टपरी असायची, तिथे चहा घेतला. पत्र्यावर वाजणारा पाउस, भर पावसात चहाच्या कपात पडणारे पाण्याचे थेंब आणि चहावाल्याच्या किटलीतून निघणारी वाफ़... तिघंही शांत.. आपल्याच नादात, एकटे.
तशीच पावसात भिजत घरी आले. घराच्या गेटमधून गाडी आत घेण्याच्या आणि park करण्याच्या style वरून माझे बाबा, मी पाहून आलेला सिनेमा हा 'बात कुछ जमी नही' पासून 'बर्यापैकी बरा' ते ' ultimate' ह्यातल्या कोणत्या category मधे होता हे बरोब्बर ओळखत असंत.
त्या दिवशी 'माचिस' पाहून आल्यावर दारातच 'काय, गुलजार ultimate ना!' अशी बाबांनी माझी नक्कल केली होती, आणि त्यानंतर जवळजवळ एक तास मी अखंडपणे 'माचिस' बद्दल त्यांच्यासमोर बडबड केली होती.
माचिस...
Operation Blue Star च्या पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा. १९४७ ची फ़ाळणी आणि इंदीरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ मधले दंगे हे दोन्ही अनुभवल्यानंतर 'पंजाब'मधे अनेक शीख तरूण आतंकवादी गटात सामील झाले ह्या विषयावरचा हा चित्रपट.
एक तर early 90s मधल्या हम है राही प्यारके, कभी हा कभी ना किंवा १९९५ मधल्या दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे ह्या सगळ्याच सिनेमापेक्षा 'माचिस' चा विषय खूप वेगळा होता. शिवाय कोशिश, आंधी, परिचय सारखे विषय 'तरलतेनं' हाताळणार्या, पिंडानं एक कवी असलेल्या गुलजारने 'माचिस' सारखा दहशतवादावर आधारलेला चित्रपट काढणं म्हणजे थोडी आश्चर्याची गोष्ट होती.
पण गुलजारच्या संवादांनी, त्यांच्या गीतांनी, एकूणच त्यांच्या दिग्दर्शनानी हा स्फ़ोटक विषयही खूप चांगला हाताळला गेला आहे. शिवाय खास गुलजारच्या सिनेमाला असलेला poetic touch देण्याचं काम माचिसमधे केलयं मनमोहन सिंग यांच्या कमेर्यानं.
कोणताही सिनेमा पाहताना माझं पहिलं लक्ष असतं ते सिनेमाच्या screenplay कडे.
माचिसची पटकथा आणि संवाद खूप विचारपूर्वक आणि चांगल्या रितीनं लिहीली गेली आहे असं मला वाटतं.
लेखकाला नुसतीच सिनेमाची सुरुवात नाही, तर शेवट काय करायचा आहे हे पण नक्की माहीत आहे हे जाणवतं. त्यानुसार सिनेमात घडणार्या घटना, त्यांचा क्रम, त्यासाठी केलेला flashback चा वापर खूप योग्य वाटतो. नाही म्हणायला, कृपाल आणि वीरा मन्नीकरनला केदारनाथच्या हत्येच्या मिशनसाठी जेव्हा भेटतात तेव्हा सिनेमा थोडा रेंगाळतो.. पण कुठेही विषयाला सोडुन भरकटत नाही ही माचिसची मोठी जमेची बाजू.
माचिसच्या पटकथेमधे संवादाइतकीच महत्व गाण्याच्या शब्दांनाही आहे, नव्हे, सिनेमात अनेक situations मधे ही गाणीच जास्त प्रभावीपणे त्या त्या वेळच्या परिस्थीतीशी आपली ओळख करून देतात.
'जला भी नही था देह का बालन कोयला कर गयी रात, और ना जलाये कोई याद ना आये कोई" मधला विरह काय किंवा 'एक छोटासा लम्हा है खत्म नही होता, मै लाख जलाता हू ये भस्म नही होता' मधली वेदना काय... सगळेच शब्द खूप 'सच्चे' वाटतात, कदाचित म्हणून एकदम 'दिल को छुनेवाले"!
माचिसमधल्या taking मधली मला आवडलेली गोष्ट म्हणजे नैसर्गीकपणा. अगदी चंद्रचूड सिंग सारख्या कोणत्याही angle नी 'हीरो' न वाटणार्या माणसाची मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड ते तब्बूची 'याद न आये कोई' किंवा भेज कहार पियाजी बुलाओ' ह्या गाण्यातली अतिशय natural expressions .
कोणाची तरी वाट पाहताना स्वत्:मधेच हरवून जाउन बसल्याबसल्या स्वत्:च्या हाताच्या तळव्याकडे बघणं, नकळत भिंतीचे पापुद्रे नखानं कुरतडणं, डोळ्यातलं पाणी थोपवण्यासाठी दीर्घ श्वास घेउन आवंढा गिळणं.... अतिशय natural , अगदी तुमच्या माझ्या reactions असल्यासारखं.
तब्बूची ह्या 'वीरा'नी तिला National Award मिळवून दिलंच, पण चांदनी बार आणि मकबूल सारखी चांगली projects सुद्धा मिळवून दिली असं मला वाटतं.
ओम पुरीचा 'सनातन' असाच खूप natural . एकूणच ओम पुरी हा माणूसच अभिनयाची, भूमिकेची खूप चांगली जाण असणारा माणूस आहे हे सतत जाणंवतं त्याची एकूणच body language , आवाज वापरण्याची आणि संवाद म्हणायची पद्धत नुसतं बघूनही खूप काही शिकण्यासारखं आहे.
माचिस मला आवडला कारण लहान लहान seenes मधून, गाण्यांच्या शब्दामधून "कधी directly तर बर्याच वेळा indirectly नुसती indications देत, न कळत आपल्यालाही विचार करायला वाव देत सिनेमाची कथा पुढे सरकते. खूप प्रसंग सांगता येतील, पण उदाहरणच द्यायचं तर हा एक सीन...
आतंकवादी गटात कृपाल (चंद्रचूड सिंग) खूप नवीन आहे. 'आपल्या मित्राच्या जखमांचा, त्या छळाचा बदला घ्यायचा आहे' ह्या पलिकडे त्याला काही माहीत नाहीये. त्याने अजून कधी बंदूक चालवली नाहीये, की बाॅंब बनवण्याबद्दल त्याला काहीही माहीती नाही. अशा गोंधळलेल्या मनस्थितीत असलेल्या त्याच्याबरोबर आहे सनातन (ओम पुरी). कधी गच्चीवर गप्पा मारताना, कधी नदीवर आंघोळीला गेले असताना, सनातन त्याला 'त्याचे स्वत्:चे विचार ' सांगत आहे, आणि ह्या संभाषणातून कळत्-नकळत कृपाल त्याच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रयत्न करत आहे.
"जब किसी आदमी साथ बिन्साफ़ी होती है, और होती चली जाती है, अकेले वो लढ नही पाता. तब वो अपनी तरह के और लोगोंको इकठ्ठा कर लेता है.....
लेकीन उसकी लडाई होती उसी बेइन्साफ़ी के खिलाफ़ है...
मै किसी आनेवाली नस्लोंके लिये नही लढ रहा हू... मुझे अपना हक चाहिये, और वो भी मेरे जिंदा रहते हुवे.... अभी इसी वक्त"
असं बोलणं सुरु असतानाच शेजारून एक ट्रेन जाते. ट्रेनच्या आवाजात आपला आवाज ऐकू यावा ह्यासाठी साहजिकच ओम पुरी चढलेल्या आवाजात बोलायला लागतो.
ट्रेन निघून जाते, त्या आवाजाने घाबरलेला एक ससा झुडुपातून बाहेर येतो आणि क्षणाचाही बिलंब न करता कृपाल बंदूकीनी त्या सशाला मारतो आणि ओम पुरीच्या चेहर्यावर स्मितहास्य.
हेच सगळे संवाद नुसते दाखवले असते, तर ते धर्मविरोधी भावना भडकवणारं एक typical भाषण वाटलं असतं. पण त्या ट्रेनच्या वापरामुळे एक तर चढलेला आवाज असूनही ते बोलणं 'भडक' वाटत नाही, शिवाय कृपालच्या मनातले धावणारे विचारही दर्शवतं. परिणामी आधी बंदूकीला हातही लावायला तयार नसलेला कृपाल 'आता' एका निष्पाप सश्याचा बळी घ्यायला सहजतेने 'तयार होतो'.
मला स्वत्:ला माचिसची गाणी जितकी गुलजारच्या शब्दांकरता आवडतात तितकीच विशाल भारद्वाजच्या संगीताकरताही. हरिहरनच्या base असलेल्या गंभीर पण तरीही soft आवाजाकरता, लताच्या आवाजापेक्षा तिच्या ह्या गाण्यातल्या expressions, mood करता, त्या 'तुम गये सब गया' मधल्या संजीव अभ्यंकरच्या आलापाकरताही.
फ़क्त ते 'चप्पा चप्पा' गाण्यासाठी अजून चांगल्या रितीने वातावरण निर्मिती केली असती आणि ' तुम गये सब गया" हे गाणं 'कृपाल "म्हणतोय" असं न दाखवता केवळ ' background ला' असतं तर अजून effect आला असता... असं आपलं मला नेहमी वाटत राहतं.
एक संगीतकार म्हणून विशाल ते आजचा विशाल भारद्वाज ह्या प्रवासाविषयी लिहायला मला अतिशय आवडेल. पण आत्ता इथे त्याला माझ्याकडून 'योग्य न्याय' दिला जाणार नाही असं वाटतंय..म्हणून त्याविषयी नंतर कधीतरी!
परवा सिनेमा पाहताना 'छोड आये हम वो गलिया' गाणं सुरु झालं आणि reflex action व्हावी त्याप्रमाणे मी म्हणून गेले ' अरे, हा तर आपला के.के'!
के.के. चा आवाज पहिल्यांदा कानावर पडला तो मचिस मधे. त्यावेळी internet वगैरे नसल्याने, आणि रेडिओवर ह्या गाण्याच्या गायकांच्या यादीत हरिहरन आणि सुरेश वाडकर यांच्या बरोबर नाव घेण्याइतका तो 'मुरलेला गायक' नसल्याने, गाण्याच्या सुरुवातीला ते वरच्या पट्टीत 'छोड आये हम वो गलिया' म्हणणारा कोणीतरी वेगळा गायक आहे हे कळत होतं पण त्याचं नाव माहीत नव्हतं. नंतर जेव्हा 'माचिस' च्या गाण्यांची कसेट विकत घेतली तेव्हा ह्या गायकाचं नाव K.Kay आहे असं समजलं. नंतर 'तडप तडप इस दिलसे आह निकलती गयी' मुळे हाच आवाज परिचयाचा झाला... आणि आज तर Kay Kay 'आपला' होउन गेलाय.
सुरेश वाडकरच्या आवाजाला मला अजिबात नावं ठेवायची नाहीत, पण का कोण जाणे त्याच्या कोणत्याही गाण्यात मला 'ओंकारस्वरूपा'चा भास होतो. म्हणजे 'लगी आज सावन की फ़िर वो झडी है....तुज नमो... तुज नमो' असे 'नसलेले शब्द' मला ऐकू येतात. माचिसच काय पण नुकत्याच म्हणलेल्या ओंकारा मधल्या 'जग जा रे जग जा' ह्या सुरेश वाडकरच्या गाण्यातूनही मला काही केल्या हे 'तुज नमो' वजा करता आलेलं नाहीये हे माझं दुर्दैव.
परवा 'माचिस' बघितला आणि वाळवंटात राहत असूनही पुण्याच्या 'त्या दिवशीच्या' पावसात मी परत एकदा भिजले... आपल्याच नादात, एकटी!
'डेक्कनला' माचिस बघून आल्यानंतर मी जो writeup लिहिला असता, तोच आज मी दहा वर्षांनी लिहीतीये. हे शब्द, ही वाक्य 'जशीच्या तशी' डोक्यात होती... फ़क्त ती कागदावर यायला दहा वर्ष लागली इतकंच!