एका ( न झालेल्या ) GTG चा वृत्तांत !
बे एरीया मधली मंडळी तशी थोडी उत्साहीच. त्यात सगळीच हाय-टेक वाली त्यामुळे Identity Theft ह्या बद्दल भलतीच जागरुक. (अगदी आपले नाव पण कळु देत नाहीत, सेलफोन देणॆ तर लांबच). सगळेच मोठे लोकं , ह्या लोकांना नविन ओळखी करुन चार चौघात मिसळावे (मराठीत याला social होणे म्हणत असावेत), याचा कमी पणा वाटत असावा, मग तो म.मं. चा कार्यक्रम असो की एखादे GTG.
तरीपण हितगुजकरांचे GTG दर एक-दोन महिन्यातुन एकदा होत असते. ह्या ही वेळी शनिवार-रविवार/ दुपारी –संध्याकाळी/ ५०%- १००%/ देशी –चायनीज रेस्टॉरंट असे करत करत एकदाचे ठरले. GTG ची तारीख वेळ आणि ठिकाण जाहीर झाले.
सात वाजता भेटायचे होते, अंबर रेस्टॉरंट, माउंटन व्ह्यु माहीत होतेच तरी परत एकदा पत्ता संकेत स्थळावरुन घेतला. सौ ने पण इतके लांब जातोच आहेस तर ग्रोसरीची लिस्ट हातात दिली. पाच वाजता bay area बी बी चेक केला. ठरलेल्या प्लॅनमधे काही बदल नव्हता. वाटेतली सांगितलेली कामे करुन बरोबर ६:५५ ला अंबर ईंडीयन मधे पोचलो.
देशी तिथे कोणीच दिसत नव्हते. म्हणुन मी स्वागतकक्षातल्या माणसाकडे चौकशी केली. त्याने reservation ची लिस्ट पाहुन सांगितले की आत अजुन कोणीच देशी नाही आणि ५ लोकांचे सात वाजताचे एक reservation हे मि. फ्री यांच्या नावावर आहे. मी फ्री नावाचा कुठला आयडी आहे का हे आठवुन पाहिले आणि बाहेर वाट बघत बसलो. मी नुसताच उभा आहे हे बघुन तिथे असलेल्या स्वयंसेवकांनी मला बोन मॅरो डोनर बद्दल माहीती देवुन एक फॉर्म दिला. तिथे येणारे सगळे लोक मायबोलीकर तर सोडाच पण मायभुमीकर पण नव्हते.
७:३० झाले तरी तिथेच उभा पाहुन , रेस्टॉरंटच्या मालकाने कितीची वेळ होती सगळेच देशी लोक होते का इ. माहीती विचारली आणि म्हणाला ८.०० वाजे पर्यंत येतील, मी तुमच्या नावाने ८ वाजताचे reservation लिहतो. जाता जाता त्याने परत विचारले तुमचे अंबर ईंडीया ठरले होते की अंबर कॅफे. अंबर कॅफे ही त्यांनी पुर्वीच्या सरोवना भवन च्या जागी नविन branch चालु केली आहे असे सांगितले. त्या भागातला नसल्यामुळे मला हे GK असायचे कारण नव्हते आणि जाणकार लोकांपैकी कोणीच सांगितले नाही.
७:४५ च्या सुमारास एका मित्राला फोन करुन तो बीबी चेक करायला सांगितला. त्यात फक्त ‘माउंटन व्ह्यु चे अंबर’ येवढेच लिहले होते आणि क्ष चा ६:४३ चा मेसेज पण सांगितला. आता थांबण्यात अर्थ नव्हता आणि त्या अंबर कॅफे मधे ८:०० वाजता जाउन बघण्यात अर्थ नव्हता. गाडी पाशी येउन मायबोलीतल्या सर्व राखीव शब्दांचा आधार घेत भावना व्यक्त केल्या व आभार प्रदर्शन संपवले आणि पुढील सर्व GTG ना शुभेच्छा देत ५०-६० मैलाच्या परतीच्या प्रवासाला निघालो.
-------------------------------------------------------------------------------------------------------
वरील वृत्तांत ऎकवल्यावर मिळालेल्या काही प्रतिक्रीया :
# काय तर तुमची मायबोली … (हा हा हा …)
# तुला काय म.मं कमी पडले आहे का तिकडे कडमडत गेलास ते?
# तुला अगोदरच सांगितले होते, नको जाउस म्हणुन. ओळख ना पाळख काय GTG करणार आहात?
# मै असे GTG को कभी नही attend करता हुं, ये सब business वाले लोगोंका काम है.
(मराठी आणि business वाले ?) अपने फॅमिली के साथ रहना better है.
# Is it common in you community? असे विचारत एका गोऱ्याने त्याचा अनुभव सांगितला. (आणि तो माणुस पण मराठीच होता.)