'देव' या विषयावर बराच वादविवाद चालू आहे, त्यानिमित्ताने माझी मते:
अहं ब्रम्हाऽस्मि|
कुठून तरी माझे कल्याण व्हावे, इथे या जगात, नि कदाचित् मेल्यावर काही असेल, स्वर्ग वगैरे (इतके लोक म्हणतात, कोण जाणे खरच असेलहि!) तर तिथेहि माझे कल्याण व्हावे अशी इच्छा. मग ते कसे होईल याचे मार्ग शोधणे.
जगात दिसणार्या, किंवा माहिती असलेल्या सगळ्या गोष्टींहून काऽहीतरी भव्य, दिव्य असावे. की ज्याच्या हातात माझे भले करणे शक्य आहे.
त्यासाठी 'देव', 'चैतन्य', 'परमात्मा', नावाचे काहीतरी समजा, नि मग काहीतरी करून त्याला 'प्रसन्न' करा.
या सगळ्या कल्पना पूर्वी (हजारो वर्षांपूर्वी?) कुणाला तरी सुचल्या. नि त्यांनी बर्याच लोकांना त्या पटवल्या. त्यामुळे आपोआपच त्यात काही तथ्य असावे असे वाटते. त्यातले आपण काय मान्य करायचे नि काय नाही, हे परत आपल्यावर अवलंबून. ते लोक हुषार असल्याने त्यांनी असेहि सांगीतले की त्या 'देवाची' अनुभूति ज्याची त्यालाच कळते, नि त्या देवाला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमचा विश्वास असेल, तर त्या मार्गांचा अभ्यास करा, नसेल तर नका करू. त्यामुळे ते सिद्ध करण्याची जबाबदारी कुणावरच नाही. कुणि त्यांचे म्हणणे मान्य केले नाही, तरी त्यांना काही वाटणार नाही!
म्हणून आपली (भारतातल्या हिंदूंची) वृत्ति अतिशय सहनशील. त्याचा गैरफायदा इतर लोक घेतात, नि तोहि 'धर्माच्या' नावावर, म्हणून आजकाल परत एकदा, इतकी हजार वर्षे जे खरे नि चांगले मानले त्याची परत एकदा खात्री करावी किंवा काहीतरी नवीन मार्ग शोधून काढावा, म्हणून सारे वादविवाद.
जोपर्यंत स्वत: सुखी असावे असे वाटत रहाते, तोपर्यंत लोक निरनिराळ्या गोष्टी शोधत असतात. भारतातल्या अनेऽक लोकांना देव, वगैरे पटते. पण जगातले इतर अनेक लोक याला चक्क थोतांड म्हणतात! नि इतर धंदे करतात!