माझा 'श्वास' – १
"आपल्याला इ-टीव्ही साठी एक टेलिफिल्म करून द्यायची आहे. स्पंदन या स्लॉटसाठी. त्या आंधळ्या मुलाच्या गोष्टीवर." एक दिवस संदीप ने सांगितले. ऑक्टोबर २००१ मधली गोष्ट ही. त्याआधी महिनाभर त्याने मला आंधळ्या मुलाची गोष्ट ऐकवली होती. तेव्हा मी नुकतीच परत आले होते भारतात आणि आता काम सुरू करायचे, चांगले कामच करायचे अश्या विचारात होते. होणार्या नवर्याबरोबर एकत्र काम करण्यासाठीही उत्सुक होते.
त्या गोष्टीतला विचार खूपच छान होता. आणि संदीप ज्या पद्धतीने तो विचार पुढे यावा यासाठी ती treat करू पहात होता ते खूपच interesting वाटत होते.
माधवी घारपुरे यांच्या काही कथा त्यांनी संदीपकडे वाचायला पाठवल्या होत्या. त्यातली संदीपला potential वाटलेली ही एकमेव गोष्ट. य गोष्टीत एक सच्चा आणि enriching अनुभव देण्याच्या शक्यता संदीपला जाणवल्या होत्या. मग संदीपने या गोष्टीबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा असं कळलं की पुण्यातले प्रसिद्ध कर्करोगतज्ञ व सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर हे त्यांच्या सुरूवातीच्या काळात जेव्हा मुंबईत टाटा’ मधे होते तेव्हाचा त्यांचा हा अनुभव आहे.
तर अश्या ह्या कथेवर आधारीत एक टेलिफिल्म करायची आहे. साधारण डिसेंबर मधे शूट असेल, असं संदीपने सांगितल. आणि लवकरच आम्हाला कळल की इ-टीव्ही ने तो स्लॉटच बंद केलाय. त्यामुळे आता ती टेलिफिल्म होणे नाही.
असंच होत होतं संदीपच्या बाबतीत दर वेळेला. हाती येतेय असे वाटतंय तोच समोरून काम निघून जावे असे प्रत्येक project मधे होत होते.
पण संदीपला मात्र या कथेने, यातल्या अनुभवाने घेरून टाकले होते. इतक्या सहजासहजी हे project सोडून द्यायला तो तयार नव्हता. त्यामुळे या कथेवर feature film करावी असे त्याच्या मनाने घेतले.
साधारण डिसेंबर २००१ च्या सुमारास अरूण (नलावडे) आणि संदीप यांच्यात बोलणे झाले की एखादी छोट्या बजेटची फिल्म असेल तर करता येण्यासाठी आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यावर संदीपने ही आंधळ्या मुलाची गोष्ट अरूणला सुचवली. दोघांचेही ही फिल्म करायची असे ठरले.
संदीप संशोधनाच्या कामाला लागला. डॉक्टरांचा मूळ अनुभव, कॅन्सर, हॉस्पिटल, लहान मुलाचे भावविश्व, तो गावाकडचा होता पण गाव कुठच हे ठरवणं… एवढ्या सगळ्या गोष्टींवर अगदी खोलात जाऊन संशोधन करायची गरज होती. 'तेवढं नाही केलं तर ते खरखुर कसं वाटणार. त्य कथावस्तुची dignity कशी पाळली जाणार? त्यामुळे ते करायलाच हवे' इतका साधा सोपा approach होता संदीपचा.
मार्च २००१ मधे आमची engagement झाली. ठरलं होतं आधीच फक्त घरच्यांसाठी सोपस्कार पार पडले. त्याच वेळेला या गोष्टीवरच्या फिल्म साठी चक्र जोरात फिरायला लागली होती.
संदीप दिवसचे दिवस पुण्यात येऊन रहात होता डॉ. शैलेश पुणतांबेकरांना भेटण्यासाठी. ते बिचारे पडले बिझी सर्जन आणि कर्करोगतज्ञ. पेशंटस, ऑपरेशन्स यातून एका सिनेमासाठी ते किती वेळ देऊ शकणार होते. त्यामुळे अनेकदा ठरलेल्या appointments cancel व्हायच्या. पण संदीप चिकाटीने थांबून रहायचा त्यांच्यासाठी. मला आठवतंय अशी कधी ठरलेली meeting cancel झाली की मी जाम चिडायचे, ‘ते असं कसं करू शकतात?’ म्हणून.. पण तोवर मला त्यांचे आयुष्य माहित नव्हते. आणि आता माहित झाल्यावर त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल फारच आदर वाटतो.
मे २००२ मधे आमचं लग्न झालं. या मधल्या वेळात संदीप त्या संशोधनात इतका गुरफटायला लागला होता की मला वाटल ह्याला लग्नासाठी दोन दिवस तरी काढता येणारेत की नाही! मग तेव्हढ्यात मलाही एक छोटं project मिळालं होतं मुंबईमधे त्यामुळे मी लग्नासाठी वेळेत पुण्यात पोचणार आहे की नाही अशी भिती मला वाटायला लागली. पण तस काही न होता आम्ही वेळेत पोचलो आणि लग्न झालं. लग्नाच्या आधी २-३ दिवस डॉक्टरांकडे संदीप गेला होता. त्यांनी त्याला सांगितले की 'असं कर आता २४ तारखेला तू ये. त्यादिवशी तुला अजून काही पेशंटस भेटतील.' संदीप हो’ म्हणता म्हणता थांबला (बहुतेक माझा चिडलेला चेहरा आठवून…) आणि म्हणाला, "२४ च्या ऐवजी नंतर थोडे दिवसांनी चालणार नाही का?" डॉक्टरांना कळेना याला काय झालं अचानक. त्यांनी विचारलं, "का?" "नाही एक छोटासा problem आहे. त्याच दिवशी माझं लग्न आहे, त्यामुळे जमणार नाही." (पण नसेल नंतर शक्य, तर मी येईन थोडा वेळ काढून.. हे वाक्य त्याने भितीनेच गिळले असावे..) डॉक्टर हसू लागले. "कृपया पुढचे १५ दिवस तरी येऊ नका इथे." असा दम दिला असावा त्यांनी कारण लग्नानंतर चक्क १०-१२ दिवस संदीप त्यांच्याकडे गेला नाही.