पाश्चात्य शास्त्रीय संगीताच्या दुनियेत जगातलं २ किंवा ३ क्रमांकाचं हे प्रेक्षागृह. इथे गाणं तर सोडाच पण त्या प्रेक्षागृहाला नुसती भेट देणं हे काशीयात्रेला गेल्याचं पुण्य मिळवून देतं म्हणतात.
http://en.wikipedia.org/wiki/Symphony_Hall,_Boston
प्रेक्षागृह खच्चून भरलं होतं. आपली थोडीशी चूक झाली तरी नाक वर करून चालणारे बोस्टनवासी "बोस्टन ब्राह्मण" मला कच्चा फाडून किंवा New England Choudar मधे घालून खाणार याची पूर्ण कल्पना होती. कलेच्या प्रांतात अटलांटिकच्या या बाजूला बोस्टनची ख्याती पुण्यासारखी आहे. Afterall it is called "The hub of universe." बोस्टनवासियांच्या पसंतीला उतरल्याशिवाय तुम्हाला गाता येतं असं समजत नाही. आणि त्यातही सिंफनी हॉल मधे गाणं म्हणजे सवाई गंधर्वमधे गाण्यासारखं.
गाणं होतं मोझार्ट नं १७७६ साली साल्झबर्ग मधे लिहिलेलं Litaniae de venerabili altaris sacramento in E flat
http://www.mozartproject.org/compositions/k_243__.html
असं म्हणतात तेंव्हाच्या पारंपारिक संगीताच्या नियमांना झुकारून, प्रेक्षकांपर्यंत गाणं नेण्यासाठी मोझार्टनं केलेला हा बंडखोरपणा होता. वर दिलेल्या दुव्यावर असलेली या गाण्याची अधीक माहिती वाचण्यासारखी आहे. हे गाणं तसं म्हणायला सोपं आणि सोप्या पट्टीतलं. (E Flat) . गाण्याची निवड कळल्यावर बोस्टनचे समीक्षक लांडगे मला "अजून बच्चा आहे" म्हणून सोडून देतील किंवा फारतर मी अजून सिंफनी हॉल मधे गाण्याच्या लायकीचा नाही म्हणून अनुल्लेखानेच मारतील अशी आशा तेंव्हा माझ्या मनात डोकावून गेली. पण कुठल्याशा ऐतिहासिक प्रसंगाचा वारसा त्या ऐतिहासिक सभागृहात आपण चालवत आहोत याची धुंदीच जास्त होती.
गाण्याला सुरुवात झाली आणि ते संपलं देखील. खरंतर मी घेतलेल्या जागांपैकी एकही आज मला आठवत नाही. आठवतं ते गाणं संपल्यानंतरची दोन सेकंदाची संपूर्ण शांतता आणि सुमारे चार हजार रसिकांनी, सिंफनी हॉलचे छप्पर उडवेल असा केलेला टाळ्यांचा कडकडाट. लोक इथेच थांबले नाहीत तर उठून उभे राहून standing Ovation ही दिले.
स्वस्तुतीचा दोष पत्करून आणि शपथपूर्वक सांगतो यातला शब्द आणि शब्द खरा आहे.
त्याचं असं झालं, कार्यक्रमाचा संचालक (conductor) ग़्रॅंट लेलविनने मोझार्टच्या श्रोत्यांपर्यंत हे गाणं नेण्याच्या मूळ हेतूला आणखी पुढे नेवून सभागृहात बसलेल्या आम्हा चार हजार रसिकांकडुन ते गाऊन घेतलं
![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
आज त्याच सभागृहात "व्यासपीठावर" माझ्या मुलीचा कार्यक्रम आहे.मुख्य कार्यक्रमातला एक छोटासा भाग म्हणून. तिला शुभेच्छा देताना मी म्हणालो"तू छान गाशील याची मला खात्री आहे. लोक उगीचच सिंफनी हॉल चा बाऊ करतात. अगदी व्यासपीठावर नसलो तरी तिथून काही फुटावर मी आत्मविश्वासाने गायलो आहे. आहे काय त्यात एवढं. शेजारी कुणी बेसूर गाणारं नसेल एवढी काळजी घे म्हणजे झालं. "