"ये दोस्ती हम नही छोडेंगे" हे गाणे अमिताभ आणि धर्मेन्द्र नी गायलेलं नाहीये, ते महमंद रफ़ी ने गायलेय" असे माझा मित्र म्हणाला आणि मी
उडालोच.
आता याच्या तपशीलात चूक असली तरी 'तेव्हा' ते माहीत नव्हते.
ही गोष्ट आम्ही ८-१० वर्षाचे होतो तेव्हाची आहे. त्यावेळी अमिताभ त्याची गाणी स्वत: गात नाही हे आमच्या दृष्टीने नवीन होते. नशीब! तेव्हा तो मारामारीही स्वत: करत नाही हे आम्हाला अजून कळले नव्हते. अभिनय वगैरे तेव्हा फारसे कळतही नव्हते. पण अमिताभ ची जादूच अशी होती की आम्ही तरीपण त्याचे चित्रपट बघायला गेलोच असतो.
आणि तो गात नाही हे आम्हाला कळेपर्यंत तो खरोखरच गायला(ही) लागला होता.
खरंतर सुरुवातीला जेव्हा अमिताभ गाजू लागला तेव्हा त्याला फारशी गाणी नसायची. हे म्हणजे त्याचे जेव्हा खास 'अमिताभ' स्टाईल चे चित्रपट गाजू लागले तेव्हा एखादे तुरळक 'कभी कभी' मधले गाणे सोडले तर 'ज़ंजीर', 'दीवार', 'शोले', 'नमक हराम', वगैरे चित्रपटांत त्याला अगदी अपवादानेच गाणी असत.
त्यामुळे अमिताभसाठी कोणत्या पार्श्वगायकाचा आवाज आहे? असा प्रश्नच नव्हता.
त्याआधीच्या काही चित्रपटांत त्याला गाणी होती, पण ते जुन्या वळणाचे चित्रपट होते: 'एक नज़र', 'अभिमान' इत्यादी.
यश चोप्राच्या 'त्रिशूल', 'काला पत्थर' मधे सुद्धा त्याच्या वाट्याला एखादेच एखादेच कडवे आले.
पण नंतर किशोरची गाणी 'अमर अकबर अंॅथनी', 'परवरीश', 'डॉन' पासून येऊ लागली आणि मग अमिताभ-किशोर हे एक पक्के समीकरण झाले. किशोरचा आवाज अमिताभच्या व्यक्तिमत्वाला अगदी फिट्ट बसायचा (आणि मला वाटते यात किशोरचे कौशल्य जास्त आहे. याचे आणखी चांगले वर्णन 'योग' च्या बीबीवर ऑगस्ट ४, २००५ च्या लेखात आहे.) आणि त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची अमिताभची गाणी फेमस झाली. कोणतीही हीरॉईन बरोबर नसताना, कसलाही रोमंॅटिक पणाचा लवलेश नसताना ही अमिताभची एकट्याची किंवा दुसर्या एखाद्या हीरोबरोबरची गाणी जितकी गाजली तितकी त्याआधी किंवा नंतर कोणाचीही गाजली नसतील. 'अरे दीवानो मुझे पहचानो','खैके पान बनारसवाला','रोते हुए आते है सब','हम प्रेमी प्रेम करना जाने','बने चाहे दुश्मन जमाना हमारा','अपनी तो जैसे तैसे','तेर जैसा यार कहॉ','पग घुंगरू' ही अशी काही गाणी.
तेव्हा किशोरची ही दुसरी इनिंग्ज चालू होती आणि अमिताभच्या बहूतेक चित्रपटांतल्या 'मैत्री' वगैरेच्या गाण्यात किशोरचा आवाज अमिताभला असायचा आणि बिचारे विनोद खन्ना, शशी कपूर, शत्रूघ्न वगैरेंना थोडा दुय्यम रोल त्या गाण्यात मिळायचा. याला अपवाद म्हणजे 'ये दोस्ती' आणि 'मोहब्बत बडे काम की चीज है'. 'कस्मे वादे' मधे सुद्धा 'मिले जो कडी कडी' मधे असेच होते, पण तो 'दुसरा' अमिताभ असल्याने आर्डीने मुद्दाम तसे केले असेल (रणधीर ला किशोर).
यात रफ़ी वगैरेंना दुय्यम लेखायचा उद्देश नाही, पण ती गाणी जरा 'action' टाईपची असल्याने किशोरचा जोर स्वाभाविकच जास्त असायचा.
हे सगळे 'शराबी' पर्यंत चालले. पण मधेच मनमोहन देसाईने 'रफ़ीसारखा गातो' म्हणून शब्बीर कुमारचा आवाज अमिताभसाठी 'कूली' मधे वापरला आणि मग मनमोहन देसाईच्या पुढच्या चित्रपटांतील अमिताभची गाणी क्वचितच किशोरची होती. ते चित्रपटही पुढे पांचट झाले आणि गाण्यांतलीही मजा गेली.
माझ्या दृष्टीने किशोरचा प्लेबॅक बंद झाल्यावर अमिताभची गाणी पूर्वीसारखी राहिली नाहीत. या दोघांचे शेवटचे लोकप्रिय गाणे म्हणजे 'अंधेरी रातोंमे'. अमिताभची ती खास इमेज जाण्याचे कारण त्याच्या चित्रपटांचा दर्जा घसरला हे खरे होते, पण किशोरच्या आवाजातली गाणी नसणे हे ही असावे.
अमिताभच्या पार्श्वगायकांपैकी किशोर सर्वांत मुख्य. बाकी एकूण १९ इतर गायक आत्तापर्यंत अमिताभसाठी गायले आहेत
त्यांच्याबद्दल पुढच्या लेखात...