|
Zulelal
| |
| Monday, December 03, 2007 - 12:27 pm: |
|
|
दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला. हवेतच हात झटकून तो ताजातवाना झाला, आणि त्याला भुकेची जाणीव झाली. आईबाप आणि हरवलेल्या बहिणीची आठवण कायमची पुसून शंकर फलाटाकडे धावला आणि त्याने गर्दीसमोर हात पसरला. पुरसे पैसे जमताच स्टॉलवरून घेतलेल्या वडापावच्या चवीत तो हरवून गेला... ...त्या दिवसापासून शंकरला मुंबईच्या रेल्वे फलाटांचं वेड लागलं. फलाटावर उतरताच त्याच्याच वयाच्या एकदोन जणांशी शंकरनं दोस्तीचा हात पुढे केला आणि जगण्याच्या युक्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली. गर्दीसमोर हात पसरून झाले, की सात वर्षांचा शंकर रुळांवरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायच्या आणि त्या विकून येणाऱ्या पैशातून मित्रांबरोबर बिडी-सिगारेटच्या धुरात भूतकाळ विसरायचा. कधी भीक मिळाली नाही, तर पॉलिशच्या रिकाम्या डब्यांमधले "सोल्यूशन' ठसका लागेपर्यंत हुंगायचा आणि त्या नशेतच दिवसभर तहानभूक विसरायचा... कधी "व्हाईटनर' हुंगून त्यात बुडून जायचा... कधी हातात चार पैसे जास्त खुळखुळले, तर "गुटख्या'ची "पार्टी' करायचा, आणि रात्री पुलाखालच्या अड्ड्यावरची "हातभट्टी' झोकायचा... "छत्रपती शिवाजी' टर्मिनस, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, दादर, वांद्रयाच्या फलाटावर देशाच्या चारी दिशांनी येणाऱ्या गाड्यांच्या गर्दीतून शंकरसारखी शेकडो मुलं रोज दाखल होतात, आणि मिनिटामिनिटाला उसळणारी बिनचेहऱ्याची गर्दी त्यांना सहज सामावून घेते... एवढ्या "मॅक्झिमम सिटी'ला रोज भर पडणाऱ्या अशा शे-दोनशे पोराटोरांच्या गर्दीनं काहीच फरक पडत नसतो. मुंबईच्या रस्त्यांवर, रेल्वे स्टेशनांवर, सिग्नलजवळ आणि फूटपाथवर असे हजारो शंकर वर्षानुवर्षे आपले अस्तित्वहीन आयुष्य ढकलताहेत. मुंबईच्या लोकसंख्येच्या आकडेवारीत त्यांना स्थान नाही. त्यांच्याजवळ "नागरिकत्वा'चा पुरावा नाही, आणि "माणूस' असल्याचाही दाखला नाही. "बाळाचा पहिला हक्क' असलेला "जन्माचा दाखला' नाही, आणि कोणत्याही मानवी संस्कृतीशी त्यांचं नातं नाही. केवळ दोन पाय, दोन हात, कुठलीतरी भाषा, आणि मेलेलं, पण मानवी मन एवढीच "माणूसपणा'ची लक्षणं असलेली हजारो मुले "उद्याच्या अंधारा'त स्वतःला ढकलून देऊन वावरताहेत. मनच नसल्याने माणुसकी नाही आणि माणूसपणाशी संबंधच नसल्याने माणसाच्या सुखदुःखांशीही देणघेणं नाही, अशा या मुलांच्या व्यवहारांवर माणसांच्या जगानं गुन्हेगारीचा शिक्का मारला असला, तरी "गुन्हेगारी' या शब्दाचा अर्थ त्यांना मात्र माहीत नाही. कारण ते तर त्यांचं 'जगणं' आहे. हरपलेल्या भूतकाळासोबत अनेकांनी आपली नावंही पुसून टाकली आहेत, आणि "काळ्या धंद्यांचं भांडवल' म्हणून अनेकांनी नकळत आपल्या आयुष्य त्या दुनियेला निमूटपणे अर्पण केलं आहे. हातपाय तुटलेली, नजरा हरवलेली अपंग मुले म्हणजे कुणाच्या तरी "धंद्या'चं भांडवल असतं. जमलेला पैसा संध्याकाळी कुठल्यातरी भाईच्या हातात ठेवला तरच आपल्या पोटात काहीतरी पडेल या आशेनं ही मुलं गर्दीत "वळवळत' असतात. एखादा कुणीतरी "पाकीटमारी'चं "कसब' मिळवतो, आणि कधी पकडला गेला, तर तोंड बंद ठेवून अर्धमेला होईपर्यंत मारही खातो. कुणी फेरीवाल्यांच्या मालाला गिऱ्हाईक मिळवण्यासाठी जिवाच्या आकांतानं ओरडायचं काम पत्करतो, तर कुणी पाण्याचा धंदा करणाऱ्या टोळीत सामील होऊन रुळावरच्या बाटल्या स्टेशनवरच्या नळाखाली भरून गाडी सुटतासुटता गिऱ्हाईकाच्या गळ्यात मारून "गंडवायचा' धंदा स्वीकारतो. व्हाईटनर, सोल्यूशन आणि "पावडर'च्या नशेत बुडालेला कुणी नकळत स्वतःची किडनीदेखील गमावून बसतो आणि खंगत खंगत मरणाला कवटाळतो... एखाद्या "नशीबवाना'स मात्र, अनपेक्षितपणे नव्या आयुष्याची, "माणसांच्या जगा'ची वाट सापडते... सावत्र आईच्या माराच्या भीतीने आणि आपल्या हातून लहान बहीण हरवल्याच्या भयाने सातव्या वर्षीच रस्त्यावरच्या जगात दाखल झालेल्या शंकरला सुदैवाने पुन्हा "माणसांच्या जगा'ची वाट सापडली आहे. वाट चुकलेल्या मुलांना जगण्याचा अर्थ समजावून देणाऱ्या "समतोल फाऊंडेशन' नावाच्या एका संस्थेला आता सामाजिक जाणीवांची साथ मिळू लागली आहे. "भविष्य' आणि "आयुष्य' अशा शब्दांची ओळख व्हायच्या आधीच, कदाचित अपघातानेच रस्त्यांवर फेकल्या गेलेल्या मुलांच्या जीवनातील अंधार पुसण्यासाठी "समतोल'च्या मदतीला समाजातील "माणुसकी' अनेक हातांनी सरसावली आहे. "समतोल फाऊंडेशन'च्या, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र रेल्वे स्टेशनांवर ठिय्या मारून बाहेरगावांतून पळून मुंबईत आलेल्या मुलांची विस्कटलेली आयुष्ये सावरण्याचा संकल्प सोडला आणि या मुलांसाठी आशेचा किरण उगवला. अशा शेकडो मुलांचे "समतोल'शी नाते जुळले आहे. "समतोल'च्या "मनपरिवर्तन शिबिरा'त अनेक मुलं नव्या आयुष्याला सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. नशेबाजी, चोरी, भीक मागणे हेच ज्यांचे जीवन, अशा अनेकांना आता त्यापासून मुक्ती मिळाली आहे, आणि त्यांनी पुसलेला भूतकाळही पुन्हा जागा झाला आहे. माणसांच्या जगाबाहेर, रस्त्यावर जगणाऱ्या या मुलांची मेलेली मने पुन्हा "जिवंत' होऊ लागली आहेत... दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरचं "घर' सातव्या वर्षीच सोडलेल्या शंकरला आज चौदाव्या वर्षी पुन्हा घराची ओढ लागली आहे, पण आता त्याच्या आईबापांचाच ठावाठिकाणा लागत नाही... "समतोल'ने अलीकडेच अशा काही मुलांच्या आईबापांशी संपर्क साधला आणि मूल हरवल्यामुळे विस्कटलेल्या अनेक संसारांमध्ये नवा उत्साह संचारला. "स्पर्श' करणाऱ्या एका क्षणाने काही जणांची ताटातूट संपविली आणि "समतोल'च्या आधाराने पुन्हा उभे राहिलेल्या अनेकांना पुन्हा आपापल्या घराची ओढ लागली. "शिबिरात मला रोज आंघोळ करायला मिळायची'... हे कुणा "शाहरूख'चे, इवल्या आयुष्यात कधीच न मिळालेल्या आनंदाच्या कल्पनांना शब्दरूप देणारे उद्गार "माणसांच्या जगा'ला अंतर्मुख करून सोडणारे आहेत... समाजातील माणुसकीच्या आधारामुळे "समतोल'च्या कामाला आज दिशा मिळाली असली, तरी हे काम सोपे नाही. कायद्याच्या कचाट्याबरोबरच, या कामात "समतोल'ला सुरुवातीला काळ्या धंद्याच्या दुनियेच्या धाकालाही सामोरे जावे लागले. पण चांगल्या कामाची खात्री झाली, की आधाराचे हातही भक्कम होतात, याचा अनुभव या काळात "समतोल'ने घेतला आहे. आता रेल्वे स्टेशनवरच्या "कायद्याच्या रक्षकां'चाही पाठिंबा "समतोल'ला मिळाला आहे. त्यामुळे अशा मुलांना पुन्हा माणसांच्या जगात आणण्याचे काम सोपे झाले आहे. अनेक मुलांना न कळत्या वयातच स्वीकारलेले रस्त्यावरचे आयुष्यच आवडू लागते, आणि माणसांच्या जगात यायला ती राजी होत नाहीत. अशा मुलांमधले मन "जागे' करण्याचे काम ही संस्था करते. रस्त्यावरच्या मुलांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी अनुदाने मिळवून काम करणाऱ्या बिगरशासकीय संस्थांची- "एनजीओ'ची- मुंबईत कमतरता नाही. "समतोल'ला मात्र फक्त समाजातील संवेदनशीलतेचा आधार मिळाला आहे. "माणुसकीची शक्ती' समतोलच्या पाठीशी उभी आहे. या शक्तीच्या आधारावर आजवर अनेक चुकलेल्या, हरवलेल्या जिवांना आपल्या हरवलेल्या मायेची पाखर पुन्हा मिळाली. या पुनर्भेटीचा प्रत्येक क्षण हाच "समतोल'ला आधार देणाऱ्या शक्तीला नवे खतपाणी घालत असतो.वर्षानुवर्षे व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या माणसांच्या जगापासून दुरावलेल्या या मुलांच्या भविष्याच्या दिशा आता उजळल्या आहेत... अशा अनेक कोमेजत्या कळ्या आश्वस्त भविष्याच्या जाणीवांनी निःश्वास टाकू लागल्या आहेत... ("समतोल'चा संपर्क क्र.- ०२२- २५४५२६४४, ९१-९८९२९ ६११२४)
|
Ashwini
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:22 pm: |
|
|
झुलेलाल, अतिशय मोठं काम केलं आहेस. अश्या स्वरूपाचे काम करणार्या संस्थेच्या मी बरेच दिवस शोधात होते. त्यांची आणखी माहिती तू देवू शकशील का? contact info म्हणजे नाव, पत्ता इ.? website नसावी बहुतेक. कारण google search करून सापडली नाही. २ articles मिळाली मात्र, संस्थेच्या कार्याविषयी माहिती देणारी. त्याच्या writer ला मी email पाठवली आहे. इथून funds raise करून देण्याची जबाबदारी माझी. फक्त ते योग्य व्यक्तीच्या हातात गेले पाहीजेत एव्हढाच माझा concern आहे. त्यादृष्टीने आणखी माहिती मिळाली तर बरं होईल.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 05, 2007 - 8:15 pm: |
|
|
अश्विनी मलाही काउंट कर. झुलेलाल तुम्ही त्या संस्थेचे कार्यकर्ते आहात का? त्यांचा अंकाउट नंबर bank डिटेल्स मिळाले तर आर्थीक मदत करुन थोडाफार हातभार मी ही लावेन.
|
Sunidhee
| |
| Wednesday, December 05, 2007 - 10:16 pm: |
|
|
झुलेलाल, अश्विनिप्रमाणे मी पण अशी काम करणारी संस्था शोधत आहे. १-२ नावे मिळाली पण त्या संस्था चर्च चालवत होत्या. त्यात चूक आहे असे नाही पण मन दोलायमान झाले की तिथे हातभार लावावा की नाही.. ही संस्था तशी वाटत नाहीये. मी सुद्धा funds उभे करायला मदत करु शकते. तुम्ही जर भारतात असाल तर तुम्ही किंवा कोणी जबाबदारी घेऊ शकाल का की रक्कम योग्य त्या दिशेलाच जाईल ह्याची? तर अजुन माहीती कळवा. कोणाचे आइ-वडील जर भेटले नाहीत तर संस्था काय करते? तुमचे खूप आभार हे लिहिल्याबद्दल.
|
Preetib
| |
| Wednesday, December 05, 2007 - 11:12 pm: |
|
|
even i am interested in fund rasing so let me know the details also.
|
झुलेलाल. मला स्वत्:ला या संस्थेसाठी वेळ द्यायला आवडेल. तुम्ही प्लीज मला याबाबत मार्गदर्शन करू शकाल का? तुम्हाला मी एक मेल केलेली आहे
|
Zulelal
| |
| Sunday, December 16, 2007 - 11:02 am: |
|
|
ही संस्था मुंबई-ठाण्यात काम करते. तळमळीचे कार्यकर्ते ही या संस्थेची शक्ती. शिबिरात राहिल्यानंतर पुन्हा घराची ओढ लागलेल्या काही मुलांना त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्याच्या एका कार्यक्रमास मी हजर होतो, म्हणून या संस्थेच्या कामाची खरी ओळख पटली. समतोल विषयीची संपूर्न माहिती इथे देण्याइतकी तांत्रिक माहिती नसल्यामुळे, इच्छुकांपैकी नंदिनी यांना मी मेलवर ती पाठविली आहे. त्यांच्याकडून किवा मला मेल केल्यास मी रिप्लायद्वारे ती फॉरवर्ड करू शकेन.
|
Ashwini
| |
| Monday, December 17, 2007 - 5:54 pm: |
|
|
झुलेलाल, मी तुम्हाला ईमेल केली आहे. तसेच मला त्या article च्या लेखिका अर्चना शर्मा यांच्याकडून पण रिप्लाय आला आहे. कुणी एक विजय जाधव म्हणून व्यक्ती ही foundation चालवते. पण याव्यतिरिक्त त्यांनाही त्यावेळी फार माहिती नव्हती. त्या परत मला ईमेल करणार आहेत. तुमच्या ईमेलची पण वाट पाहाते.
|
Sunidhee
| |
| Monday, December 17, 2007 - 10:27 pm: |
|
|
झुलेलाल, नंदिनी, अश्विनी, मला पण ह्या बद्दल काही माहिती मिळाली तर मेल करा प्लिज. माझा id आहे पहा माझ्या profile मधे..
|
Sunidhee
| |
| Thursday, December 20, 2007 - 7:12 pm: |
|
|
अश्विनी, झुलेलाल, मेल मिळाली. तुम्हाला उत्तर दिले आहे. खूप चांगली माहिती आहे झुलेलाल. नंदिनी तुला पण मेल केलीये.
|
|
|