Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
साहित्य.. एक अभ्यास( भाग १) ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » ललित » साहित्य.. एक अभ्यास( भाग १) « Previous Next »

Pama
Friday, December 23, 2005 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहित्य म्हणजे नेमके काय? एखाद्या साहित्य प्रकाराला कथा, कादंबरी म्हणायचे कि ललित, कवितेचा वृत्त, यमक असले म्हणजे तिला कविता म्हणायचे का? असे काही प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. त्या दृष्टीने थोडे विवेचनात्मक, थोडे अभ्यासात्मक, आणि काही प्रमाणात सैधांतिक व तांत्रिक अशा प्रकारचे लिखाण करण्याचा प्रयत्न करतेय.
हा विषय फार व्यापक आहे आणि त्या मानाने माझा अभ्यास फार थोडा. त्यामुळे अनावधानाने, नजरचुकीने किंवा अभ्यासाच्या कमीने काही चुका वा काही गोष्टी राहून गेल्यास कृपया सांभाळून घ्या. प्रश्न असल्यास जरूर विचारा. मी माझ्या कुवतीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन अथवा मायबोलीवर अनेक जाणकार आहेत त्यांच्याकडून आपण सगळेच शिकून घेऊ.
----------------------------------------------------------

आज आपण साहित्य वाड्गमय आणि काव्य हे शब्द अनेक वेळा सारख्याच अर्थाने वापरतो.
वाड्गमय जे वाणीने बद्ध आहे ते.
' Literature is a production of Language '
ही वाड्गमयाची अथवा साहित्याची मूलभूत लक्षणव्याख्या. म्हणजे साहित्य या प्रकारात भाषा' अत्यंत महत्वाची आहे.
साहित्य ही एक कला आहे. प्रत्येक कलेला आविष्कारासाठी एक माध्यम लागते. जसे चित्रकलेसाठी रंग कुंचला ही माध्यमे आहेत, शिल्पकलीसाठी दगड, धातू इत्यादी माध्यमे आहेत.
तसेच भाषा हे साहित्याचे माध्यम आहे.
म्हणजे अपण असे म्हणूयात की' साहित्य हे भाषेच्या माध्यमातून अविष्कृती करण्याची कला आहे.'
'Art of language is the expression, representation and communication of experience through language'
ही व्याख्या पाहिली तर अजून एक घटक लक्षात येतो तो म्हणजे 'experience' अथवा' अनुभव'.
आता वरील सर्व घटकांचा विचार केला कि हे लक्षात येत कि एखादी साहित्यकृती म्हणजे साहित्यकाराच्या जीवनानुभवाचे भाषेच्या माघ्यमातून केलेले अविष्करण.
आता या साहित्यकाराला हे जीवनानुभव कुठून मिळतात? तर ते सभोवलाच्या परिस्थितीतून मिळतात.
म्हणजेच, साहित्यकार हा आपल्या आजू बाजूच्या परिस्थितीतून/ वातावरणातून आपल्या कलाकृतीचा' आशय' आथवा' बीज' शोधतो. आणि म्हणूनच " साहित्य हा जीवनाचा आरसा आहे " असे म्हटले जाते.

लेखक अनेक साहित्यप्रकारांमधून एक साहित्यप्रकार निवडतो व आपल्याला अभिप्रेत असलेला आशय त्यात ओततो. यातही अभिव्यक्त पहात असलेला आशय, त्या आस्गयाचा मुख्य ग्राहक म्हणजेच वाचक वा श्रोतुवर्ग आणि अभिव्यक्तीचे प्रचारमाध्यम- उदा: मुद्रण, रंगभूमी,चित्रपट, आकाशवाणी इ. विचारात घेऊनच साहित्यप्रकार निवडतो. वाचक आपल्या आवडीनुसर आपल्याला पाहिजे त्या प्रकारात रस घेतो. समीक्षकही अमूक एक कलाकृती कोणत्या प्रकारात मोडेत हे लक्षात घेऊनच त्या अनुरोधाने त्याची समीक्षा करतो. एकूणच वाचक लेखक- आणि समीक्षक यांच्या अपेक्षेने साहित्यप्रकाराचे विवेचन योग्य ठरेल.

साहित्यप्रकारांचे वर्गीकरण अनेक जणांनी अनेक प्रकारे केल आहे.
कधी ते साहित्यप्रकाराच्या बाह्यरूपावरून केलेले दिसतात( कविता, नाटक इ.) तर कधी ते अंतरंगाचा विचार करुन( आत्मचरित्र, सुनित, गझल इ.)

ग्रीक साहित्यशास्त्राने महाकाव्य( Epic ) व शोकात्म नाटक( Tragedy ) असे दोन वर्ग मानले आहेत. पुढे यात भावकाव्याचीही भर पडली. महाकाव्य ही शौर्याची गाथा, नाटक ही शोकात्म कथा आणि भावकाव्य ही वैयक्तिक हर्षखेदाची अभिव्यक्ती अश्या दृष्टीने या वर्गीकरणा कडे बघितल तर साहित्याच्या बाह्यरुपाबरोअरच अंतरंगाचाही विचार केलेला दिसतो.

संस्कृत साहित्यशास्त्रानी वाड्गमयप्रकाराचे वर्गीकरण वेगळ्या प्रकारे केलेले दिसते. सर्वच ललित वाड्गमयाला- मग ते गद्य असो वा पद्य,' काव्य' ही व्यापक संज्ञा वापरलेली आहे. या काव्याचे पुन्हा श्राव्य आणि प्रेक्ष असे दोन भाग त्यांनी कल्पिले आहेत.
श्राव्य मधे महाकाव्य, आख्यायिका, कथा इ. प्रकार समाविष्ट केले आहेत.
प्रेक्ष काव्याचे प्रेक्ष पाठ्य आणि प्रेक्ष गेय असे वर्ग केले आहेत. प्रेक्ष पाठ्य मधे नाटक, प्रकरण, नाटिका इ. वारा प्रकार अंचा समावेश आहे.

आज जे साहित्यप्रकार आपल्याकडे रूढ आहेत आणि त्यांचे वर्गीकरण असे करतात...
१. नाटक( सुखात्मिका, शोकात्मिका, फार्स इ.)
२. कथाकाव्य( महाकाव्य, खंडकाव्य, आख्यानकाव्य इ.)
३. भाव काव्य( भावकविता, सुनित, विलापिका, हायकू इ.)
४. कथा- कादंबरी( कथा, लघुकथा, दीर्घ कथा, कादंबरीका इ.)
५. चरित्र( च्रित्र, आत्मचरित्र, आठवणी, प्रवासवर्णन, व्यक्तेचिर इ.)
६. ललित लेख(निबंध, ललित निबंध इ.)

प्रत्येक साहित्यप्रकाराची लक्षणे साहित्यशास्त्र मानते. प्रत्येक कलाकृतीचा एक आकार असतो,रूप असते, आकृतीबंध असतो. कलाकृतीचे सौंदर्य तिच्या या रूपात, घटात, आकृतीबंधात सामावलेले असते. अशा अनेक कलाकृतींचे वेगळेपण लक्षात येण्यासाठी त्यांचे वर्गीकरण आवश्यक असते.



(कमश)



Pama
Friday, December 23, 2005 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात वाड्गमयप्रकार अस्तित्वात कसे आले?
लेखकाला जे सांगायचे आहे ते आस्वादक आहे असे गृहीत धरून अभिव्यक्त केले जाते,असे प्राचीन काळातील वाड्गमयाचे निरिक्षण करताना दिसते. आणि आस्वाद हा इंद्रीय माध्यमांच्या द्वारे घेतला जातो.
आपण विश्वाची अनुभूती पंचेंद्रीयांच्या द्वारा घेतो. या पचेंद्रीयांपैकी दोन इंद्रीयेच जास्त कार्यक्षम असतात. रसना, घ्राणेंद्रीय व स्पर्श यांच्या बाबतीत वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्काशिवाय आस्वाद घेणे शक्य नाही. पण डोळे आणि कान हे लांबूनही आस्वाद घेऊ शकतात. म्हणून कलेच्या क्षेत्रात ही दोन इंद्रीय जास्त महत्त्वाची ठरतात. आणि म्हणूनच कलेच्या क्षेत्रात दोन भाग मानले जातात- दृश्य आणि श्राव्य.
नृत्य शिल्प, चित्र यासारख्या कला दृश्य विभागात येतात, तर संगीत शब्द हे श्राव्य विभागात येतात. नाटकासारख्या कलेत या दोन्हीचा समावेश आहे.
स्रवातीच्या काळात श्राव्य भागच जास्त दिसतो. महाकाव्ये सुरवातीला ऐकवली जात. पुढे मग वाचनासाठी लिहिले जाऊ लागले. म्हणून मग पद्य आणि गद्य अशी वर्गीकरणे झाली.

वाद्गमयप्रकाराचे तंत्र-
प्रत्येक वाड्गमयप्रकाराच्या रचनेचे एक विशिष्ट तंत्र असते. ही बांधीलकी त्या वाड्गमयप्रकाराला सांभाळावीच लागते.
कवितांना पूर्वी वृत्ताचे, यमकाचे बंधन होते. बंडखोर कवींनी ही बंधने झुगारून देण्याचा प्रयत्न केला. मुक्तछंद उदयास आला, पण त्यालाही एक ताल-ठेका असतोच, भावनांची आंतरिअक लय असते. केवळ पद्याच्या ओळी कशाही तोडून एकाखाली एक लिहिल्या म्हणजे मुक्तछंदातील कविता होत नाही, म्हणजे तीही तंत्रानुगामी असतेच.
उदा : गुलमोहर मधील कविता बगितल्या की लक्षात येईल, याच महिन्यातील निनावीची वार्धक्य, खुळेपण, किंवा वैभवच्या जवलपास सगळ्याच कविता यमकाचे बंधन पाळतात. पण कर्पेची'दान' मुक्तछंदात असली तरी तिला एक लय आहे.
कथा कादंबरीला एक आरंभ, मध्य शेवट किंवा अगदी तंत्राच्या भाषेत म्हणायच झाल तर गुंतागुंत, निरगाठ आणि उकल असे रचनेचे बंधनसते. यात नवनवे रचनातंत्रांचे प्रयोग होत असतातच. गुलमोहर मधली कुठलीही कथा बघा, हे तीन भाग दिसतातच. प्रयोगाच्या दृष्टीनी बघितली तर दिवाळी अंकातील GS ची' करणी' ही बघा.

आशयानुगामी वाड्गमयप्रकार-
कलाकृतीत आशय किती विस्ताराने व कशा प्रकारे अभिव्यक्त करायचा आहे त्यानुसार वाड्गमयप्रकार ठरतात.
एखादा आशय जर गोळीबंद पद्धतीने व्यक्त करायचा असेल तर कथा हा प्रकार सोयीचा आहे. या उलट आशयाची व्यापकता, विस्तृतता, खोली, आवाक मोठा असेल तर कादंबरी हा प्रकार अधिक सोयीचा होईल.
एखाद्या रूबाया,कणिका यातल्या आशयाची कादंबरी होवू शकणार नाही. जीवनातील सर्व संदर्भ कवेत घेणार्‍या व्यापक आशयासाठी महाकाव्य किंवा कादंबरीसारखा वाड्गमयप्रकारच सोयीचा पडेल. अर्थात एखादा समर्थ लेखक एखाद्या आटोपशीर वाड्गमयप्रकारातून व्यापक आशय व्यक्त करू शकतो. मराठीत जी. ए. कुलकर्णी यांचे नाव या संदर्भात घेता येण्यासारखे आहे.

कलावंताला काय सांगायचे आहे-
आपल्या वृत्तीप्रवृत्तीला जवळचा वाटणारा वाड्गमयप्रकार कलावंत अविष्कारासाठी निवडतो.
पण आपल्याला काय सांगायचे आहे हे कलावंताला मनात आधी ठरवावे लागते. किंबहुना ते ठरल्याशिवाय लेखक लेखनाला प्रवृत्तच होवू शकत नाही. आशयबीज सापडल्यावर मग आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे ते त्याच्या मनत ठरते. म्हणजे आशयबीजाच्या विस्ताराचा आराखडा प्रथम त्याच्या मनात स्पष्ट तयार होतो. आशयानुरूप व स्वतच्या वृत्तीप्रवृत्तीनुरूप वाड्गमयप्रकार हा ओघानेच आला.
थोडक्यात सांगायचे तर, आशयाचे बीजभूत गुणधर्म, कलावंताची वृत्तीप्रवृत्ती व त्याच्या प्रतिभेची कुवत आणि वाड्गमयप्रकाराचे संकेत, या सर्वांच्या मिश्रराणातून घाटाची, आकृतीबंधाची किंवा त्या कलाकृतीच्या form ची निर्मिती होते.

वाड्गमयप्रकाराचा विचार करताना मुळात आकृतीबंधाची किंवा form ची कल्पना तशी साधी, एकेरी नाही हे लक्षात घेतल पाहिजे.
चला उदाहरण बघू : कविता हा एकच वाड्गमयप्रकार घेतला तरी कुसुमाज्रजांची कविता, मर्ठेकरांच्या कवितेपेक्षा वेगळी आहे असे आपण म्हणतो. तिचा बाज वेगळा पोत वेगळा असे म्हणतो्ए असे म्हणणे म्हणजे आपण form च्या संबंधीत म्हणतो असे लक्षात घेतले पाहिजे.
शिवाय हे बघा, कुसुमाग्रजांच्या अहिनकुल' या कवितेत नाट्य आहे असे आपण म्हणतो, किंवा जी. ए. कुलकर्णींच्या कथेला कादंबरीचा आवाक आहे अस म्हणतो.
याचाच अर्थ असा होतो की, कथेत काव्यात्मकता असू शकते, कवितेत नाट्य असू शकते, किंवा नाटकात काव्यात्मकता असू शकते.
म्हणजे कुठल्याही एका वाड्गमयप्रकारात दुसर्‍या वाड्गमयप्रकाराची वैशिष्टे असू शकतात.
म्हणजेच form ची संकल्पना ही लवचिक आहे असे मानायला पाहिजे. एखादा समर्थ कलावंत या साचे बंद मर्यादा ओलांडून नवीन श्रेष्ठ कलाकृती निर्माण करू शकतो आणि त्यातूनच नवा form उदयाला येऊ शकतो.


साहित्याच्या निर्मिती प्रक्रीयेबद्दल ही बरीचशी तांत्रिक माहिती झाली. हा सार्‍याचा प्रपंच या साठी कि एखादी कलाकृते वाचताना तिचा अधिक योग्य तर्‍हेने आस्वाद घेऊ शकू.


Pama
Friday, December 23, 2005 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सार जरा तांत्रेकच झाल. यापुढे जाऊन कथा कादंबेरीचे बद्दल थोड लिहिण्याचा प्रयत्न करणार होते. शिवाय, कथा, कादंबेरी, नाटक अशा सगळ्याच साहित्य प्रकारांचा आतापर्यतचा थोडक्यात इतिहास असही काहीस लिहाव अस वाटत होत. पण हे अर्थात मला वाटतय. हे फार कंटाळवाण वाटत असेल तर पुढचा बेत रद्द करीन.किंवा काय लिहाव हे कुणी सुचवल्यास त्या नुसार लिहिन.:-)

Surthorat
Saturday, December 24, 2005 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा तुम्ही बेत रद्द न करता जरुर लिहा.
अशी माहिती वाचायला नक्कीच आवडेल, कारण बर्‍याच साहित्यप्रकारांची तांत्रीक माहिती मला नाही.

साहित्यप्रकारांचा इतिहास लिहितांना वेगवेगळ्या साहित्यीक चळवळी आणि त्यांचा एकुणच साहित्यावर तसेच समाजावर झालेला परिणाम तसेच याउलट समाजातील विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण झालेले साहित्यप्रकार किंवा साहित्यीक चळवळी याबद्दल वाचायला आवडेल.


Yog
Monday, December 26, 2005 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pama,
छान विषय निवडलाय अन छान लिहीलय. deinitely useful, so keep writing on this.. only suggestion is if there are some specific references that would be more important or would be a good reading in your openion, then mention them if possible.

Ramachandrac
Monday, December 26, 2005 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा,
विषय खुप छान आहे, तुम्ही लिहलही सुरेख, फक्त एक नम्र सुचना, एखादा प्रकार समजावुन सांगताना विस्त्रुत उदाहरणे द्यावीत. उदा. तुम्ही लिहल आहे की कुसुमाग्रज आणी मर्ढेकर यांच्या कवितेतील बाज किम्वा पोत वेगळा आहे, पण हे जरा आणखी थोडेसे विस्त्रुत करुन लिहले, तर खुपच छान होइल.


Pama
Wednesday, December 28, 2005 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरजीत योग, रामचंद्र.. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. पुढचा भाग जरा जास्त उअदाहरांसह लिहिण्याचा प्रयत्न करीन. मराठी पुष्कळ type करायला वेळ लागतो आणि चुका होतात,म्हणून जरा हळूहळू लिहीन.

असो, रामचंद्र, तुमच्या प्रश्नाच उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय.
खर म्हणजे कुठल्याही दोन कविता जरी बघितल्या,( त्या अगदी एकाच कवीच्या असल्या तरी) तरी त्या वेगवेगळ्या वाटतात. अर्थात एखादे कविता दुसर्‍या एखाद्या कवितेची आठवण करून देते असही आपण म्हणतो. त्यामुळे जर दोन कविंच्या काव्य शैलीची तुलना करायची झाली, किंवा त्यांच्यातील साम्यभेद बघायचे झाले तर ते केवळ प्रत्येकाची एकएक कविता उदाहराणास घेऊन समजावणे कठीण आहे. त्यासाठी दोन्ही कवींच्या बर्याच काव्यांचा अभ्यास करायला हवा.
कुसुमाग्रजांची,' दूर मनोर्‍यात',' पृथ्वीचे प्रेमगीत',' स्वप्नांची समाप्ती'.. ह्या कविता बघा,
काही ओळी जशा

काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितिजाच्या दारापाशी उभे दिवसाचे दूत'

किंवा

नवलाख़ तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरत
परि स्मरते आणिक करते व्याकूळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात.

या सार्‍या कवितांमधली तरलता बघा, अविष्काराची सहजता बघा. त्यांच्या अधीच्या युगातील कवितेचा साचेबंदपणा, वृत्ते, प्रतीकांची वोजना या सगळ्यापासून वेगळी होती.
आता या नंतर मर्धेकरांना तर तर' नवकवी'च म्हणतात. आशय आणि अभिव्यक्तिच्या बाबतीत पूर्णतहा भिन्नत्व दिसत. त्यांची' पिपात मेले ओल्या उंदिर ही तर प्रसिद्धच आहे कविता
किंवा

गणपात वाणी बीडी पितांना
चावायचा नुसतीच काडी
म्हणायचा अन मनाशीच की
ह्या जागेवर बांधीन माडी

या दोन्हीतील अविष्कार शैली पहा.
एक लक्षात घेण गरजेच आहे कि या उदाहरणांमधे आशय भिन्नत्व आहे. मी वेगळेपण अगदी स्पष्ट दिसेल अशी उदाहरण दिली आहेत. बाकीच्या कवितांमधे हे वेगळेपण इतक्या सहज दिसेलच असे नाही.

जर या कवींच्या अणखी कविता वाचल्या तर ते जास्त योग्य प्रकारे लक्षात येईल.( culture bb वर जाऊन वेगवेगळ्या कवींच्या कविता वचून बघा, म्हणजे प्रत्येकाच्या अविष्कार पद्धतीतील वेगळॅप्ण लक्षात येण्यास मदत होईल)

मला प्रश्नाच उत्तर द्यायला किती जमलय माहीत नाही. पण याची काही मदत झाली का सांगा.



Ramachandrac
Thursday, December 29, 2005 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, धन्यवाद, तुम्ही खुपच सुरेख समजावुन सांगितले आहे. माझा याविशयावर काहीच अभ्यास नाही, पण आवड खुप आहे, तुमच्यामुळे हा विशय समजायला खुप मदत झाली, आणखी काही शंका असल्यास तुम्हाला परत त्रास देइन आता पुढच्या पोस्टची वाट पहात आहे.

Devdattag
Thursday, December 29, 2005 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, फारच उपयोगी ठरेल हे लिखाण..
मला कल्पना आहे ह्याचा आवाका फ़ार मोठा आहे.. पण जर प्रत्येक साहित्यप्रकाराचे जरा विस्तृत विश्लेषण केल्यास विशेष उपयोगी ठरेल.. मुख्यत: माझ्यासारख्या साहित्याची आवड असलेल्या आणि जाण नसलेल्यांना.
उदा. जर काव्य प्रकारात हायकू, भावकाव्य, गजल किन्वा ललित लेखनात लघु निबंध, स्फ़ुटलेख वगैरे.
ह्या बीबीवर शक्य नसल्यास कोणी काव्य अलंकार आणि व्रुत्त ह्याबद्दल माहिती देउ शकेल काय?


Sarang23
Thursday, December 29, 2005 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप लिहायच ठरवल होत पण मग कंटाळा आला. खरच खुप वेळ लागतो टायपींगला! फक्त एक सुचवु पहातो. पमा विषय खुप मोट्ठा आहे. फक्त शिवाजी महाराज, संभाजी, कृष्ण, कर्ण यांच चरित्र लिहिण्यासाठी लेखकांनी १०-१० वर्षे अभ्यास केला. मग अशा विषयासाठी किती अभ्यास लागेल!?
आणि थोडक्यात आढावा घेणे म्हणजे तर सगळ्यात कठिण काम. मला अस वाटत की इथे लेखीकेची भरपुर गल्लत झाली आहे. हे पटवुन देण्यासाठीदेखील मला किमान १०० एक पान अभ्यासपुर्ण लिहावी लागतील. पण एक महत्वाच की सगळ सापेक्ष असत. आत असा विषय मांडताना चुका होण्याचा संभव असतो हे ही मान्य केल तरी शब्दलिहीण्यासाठी आधी अक्षर माहिती पाहीजे,
१. त्याचप्रमाणे इथे व्याकरण आल कुठुन ते लिहिल पाहीजे.
२. मग सर्वात प्राचीन मराठी( इथे ज्ञानेश्वरांच उदाहरण घेतल तरी चालेल.) संदर्भ लागतील.
३. त्या अनुशंघाने आता आपण आहोत तिथे कसे आलो याचा आढावा घेण गरजेच आहे.
४. त्यात महत्वाची उदाहरण देण अतिशय मह्त्वाच आहे. तेही अपवाद दाखवुनच(जी चुक स्व. श्री सुरेश भट यांनी गझल समजावुन सांगताना वेळोवेळी केली आहे.)
५. मग रुढ व्याकरणाची मुस जवळुन दाखवण्याच प्रयत्न व्हावा.
६. मग छंद काव्य वगैरे आधुनीक प्रकार! जी ए यांच्या कथांना रुपक कथा म्हणतात तो हि आधुनीक प्रकार होय. कथेत खुप प्रकार असतात. ते सगळे नमुद करावे लागतील.
७. असच कविता, ललित आणि सगळ्याच वर्गिकरणाबाबत!
८. इतिहास-वाटचाल-नवनवोन्मेश-वर्तमान आणि भविष्य अशा प्रकारे लेखन झाल तरच ते प्रभावी ठरेल. त्यात एकुण सगळच साहित्य समावेशुन घेतल पाहीजे आणि अस होण शक्य नाही त्यामुळेच बर्‍याच वाचकांची गल्लत होइल.
थोडस विषयांतर करुन लिहितो...
आताच मी मनोगत वरच साहित्य पाहुन आलो( अर्थात फक्त गझल!) मुळात आपल्या मराठी लोकांना आपल्या कवितेच गमकच माहीत नाही तर हा नविन काव्य प्रकार कसा झेपणार? आधी गझलचे बन्धनच माहीत नाहीत तर ते कुठल्याही गझलसद्रुश कवितेला गझल म्हणुन वाहवा देणार. आणि मग एकाचा मित्र त्याच्या अशा नगझल ना दाद देतो आणि सगळ्यांचीच फसगत होते. किमान जे शिक्षणेच्छु वाचक आहेत त्यांची तरी दिशाभुल होते. प्रथम कुठलाही काव्य प्रकार सादर करताना तो कविला तरी पुर्णपणे माहीत असण गरजेच आहे! इथे गझलच्या नावाखाली कविता लिहीणार्‍यांनी तरी याची दखल घेतलेली असते की नाही कोणास ठावुक? मग गझल सादर करण्याचा त्यांचा असा अट्टाहास का?
कित्येक महाभागांनी मला अस सांगीतल की उर्दु गझल मध्ये जी मजा आहे ती तुमच्या मराठी गझल मध्ये नाही पण त्याच कारण त्या काव्यप्रकाराविषयीच अज्ञानच नाही का?
बर्‍याच जणांनी तर याबाबत इतकी पराकोटीची उदासीनता दाखवली की मी त्या व्यक्तींशी बोलणे आणि बोललच तर मराठीत बोलणे टाळले. पण तेही त्यांना आवडले. मराठी वाचुन आमच काही आडत नाही अस म्हणणारे लोकही माझ्या नशीबी आले याचा सल मनात राहील तो वेगळाच. मग मायबोलीसारखी सुखद झुळुक मनाला समजुत घालते.
मराठीचा लोप म्हणजे एका स्वर्गाचा लोप आहे आणि तो करु पाहणारेही आपणच आहोत हे ते लोक कधी समजुन घेतील?

आणि म्हणुनच जितकी म्हणुन योग्य माहीती देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करण गरजेच आहे. मी पमाच्या धाडसाच कौतुक करतो पण त्याचबरोबर सावधानतेचा इशाराही देतो. कुणाचेही पाय खेचण्याचा हेतु मनात न ठेवता हे लिहील आहे ते फक्त माझ्या नव्हे आपल्या मातृभाषेच्या उत्कर्षासाठीच हे समजुन घ्या अशी कळकळीची विनंती आहे!
पमा साहित्यीक चर्चा करुन मगच अशा विषयावर लिहीशील तर अधिक छान खुमारी येईल अशी एक प्रांजळ आणि कळकळीची विनंती आणि या लेखासाठी शुभेच्छा!!!


Pama
Thursday, December 29, 2005 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारांग, तू योग्य ते लिहिल आहेस. मी सुरवातीलाच म्हटल आहे कि या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्यामनानी माझ ज्ञान कमी. त्यामुळे जो भाग मला माहीतच नाही, किंवा ज्या विषयी माझ अजिबातच ज्ञान नाही असा भाग घेण आणि त्याबद्दल काहीही लिहिण मी पूर्णपणे टाळल आहे. शिवाय ज्यावर मी लिहिल आहे त्यात चुका सुधारू नये, किंवा अधिक विस्तृत पणे दुसर कुणी लिहू नये अस मुळीच नाही. मी सुध्दा साहित्याची एक विद्यार्थिनी आहे आणि कितीही शिकले तरी साहित्य शिकून झाल अस कधीच होणार नाही. शिवाय तू म्हणतोस त्याप्रमाणे किती लेखक कवींबद्दल किती उदाहरण देऊन लिहिणार! मी तर कित्येक लेखक कवींचे साहित्य अजून वाचलेलेच नाही. कित्येक साहित्यिक तर मला माहीतच नाहीत. माझी स्मरणश्क्ति तितकी प्रभावी नाही आणि मी जिथे राहते तिथे references मिळण्याचे प्रमाण शुन्य आहे. घरात जितक बोलतो तेव्हढच काय ते मराठी एकायला बोलायला मिळत.
आणि हो, अस असूनही मी या विषयावर लिहिण्याच धाडस मात्र केलय. कारण मराठीत असतील नसतील तितके सर्व साहित्यप्रकार समजावून सांगणे किंवा तू दिलेल्या सगळ्याच मुद्द्यांची सखोल माहिती देण हा माझा हेतू नाही. अर्थात ते करता आल तर पूरी मायबोली कमी पडेल त्यासाठी.
फक्त ज्ञानेश्वरांच उदाहरण देऊन काही समजावायच म्हटल तरी ते मुळीच शक्य नाही. पण मग याचा अर्थ असा व्हावा का कि जे साहित्याची उपासना करत नाहीत किंवा साहित्याचा अभ्यास करत नाहीत त्यांना या बद्दल पुसटशी सुध्दा कल्पना नसावी? आपण पुस्तकं वाचतो, जी वाचतो त्या विषयाची आपल्याला सखोल माहीती असते का? किंवा तो विषय माहीत असल्याशिवाय आपण एखाद्या विषयावर काही वाचतच नाही का? आपण वर्तमान पत्रात अनेक विषयांवर लेख वाचतो, त्या सर्वांबद्दल आपल्याला सगळच माहीत असता का? या सार्‍या प्रश्नांची उत्तर नाही असच आहे. या वर्तमानपत्रातल्या लेखांइतकीच माझ्या लिखाणाची व्याप्ती आहे. त्या पलीकडे नाही. इथे मला पुस्तक लिहायचे नाही, त्यामुळे मी जमेल तितक्या मुद्द्यांना हात लावण्याचा प्रयत्न करीन. समग्र साहित्याबद्दल लिहायच झाल तर तो एक कधी न संपणारा लेख होईल.
तू म्हणतोस त्या प्रमाणे गझलचच उदाहरण घेऊ. एकणारा आणि वाचणारा हा गझल समजणारा किंवा त्याची माहीती असणाराच असेल अस नाही.' कानाला जे बर वाटत ते आम्ही एकतो', अशी जर सर्व सामान्य रसिकाचे उत्तर असेल तर मी ते स्वीकारीन. तुला गझल म्हणजे काय हे माहीत नाही, किंवा गझल हा काय प्रकार आहे याच तुला ज्ञान नाही तेव्हा तू एकू नकोस अस आपण म्हणतो का? पण हेच जर त्याला अगदी पुसटस जरी कुणी सांगितल कि नेमक गझल म्हणजे काय? फार कशाला मला देखील गझल या प्रकाराची फारशी तांत्रीक माहीती नाही. पण कुणी दिल्यास मला आवडेल.
दुसर्‍या एका गोष्टीची कबूली द्यायची म्हणजे तू म्हणतोस त्या महाभागात मी देखील आहे. मला देखील मराठी पेक्षा उर्दू गझल आवडतात. पण हा सर्वस्वी माझ्या आवडी निवडीचा प्रश्न नाही का? हे १००% मान्य के मला त्याची तांत्रिक माहिती नसेल, पण आशयाची अभिव्यक्ति जितक्या खोलवर जाऊन उर्दूत झालेली दिसती तितकी मराठीत नाही, हे माझ मत आहे.
कादंबरीचे विविध प्रकार सांगून जमल्यास त्या प्रकारांत काय असते ते सांगून मी थांबेन. प्रत्येक कादंबरी प्रकाराची सखोल चर्चा करणे माझ्या अवाक्या बाहेरचे आहे.
मी तर म्हणेन कि या लेखाच्या अनुषंगाने येणार्‍या काही साहित्य विषयक बाबींचा तुझ्या सारख्या व्यासंग्यांनी पुढाकार घेऊन अजून सखोलत लिहिल तर काय बहार येईल! एकातून एक निघत जाणार्‍या विषयांवर ज्याचा त्या विषयाचा अभ्यास आहे त्यानी सर्वांच्या ज्ञानात भर घातली तर कुणाला आवडणार नाही ते!
साहित्यिक चर्चे बद्दल बोलायच झाल तर कुणाशी करू इथे, या भिंतींशी कि त्या दाराशी? माझ्या लेखावरून जी चर्चा होईल, चुका निघतील, सुधारल्या जातील, उदाहरणे मिळतील, तीच एक प्रकारे साहित्यिक चर्चा नाही का? अश्या प्रकारचा उपक्रम अजून तरी मायबोलीवर झालेला मला बघण्यात नाही. तुझ्या सारखेच साहित्यिक चर्चा करायला पुढे आले तर इथेच साहित्यिक चर्चा घडून येईल.
या जागी मी लिहिणार आणि बाकिच्यांनी वाचायच आणि ठीक आहे, नाही चुकतय इतक म्हणून थांबण अभिप्रेत नाही, तर त्या विषयावर मते मांडणे, चर्चा करणे अभिप्रेत आहे.
मी सर्वच वाचकांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते कि इथे नुसत वाचू नका तर प्रश्न विचार, महीती लिहा, चर्चा करा, तरच या लेखाचा उपयोग. मी ज्या विषयांवर लिहिण्याच प्रयोजन केल होत ते म्हणजे समग्र साहित्य नाही, तस करण माझ्या आवाक्यात नाही. पण मला ज्या ज्या विषयांवर सांगावस वाटत तेव्हढे साहित्याचे अंश आहेत हे लक्षात असू द्यावे.



माझी admin ला विनंती आहे कि हा विषय culture मधे नवीन BB उघडून तिथे अधिक योग्य वाटत असल्यास तिथे हलवावा. म्हणजे तिथे सर्वांनाच लिहिता येईल आणि चर्चाही करता येईल, शिवाय एकसंघ राहील, शोधावा लागणार नाही.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators