|
चलऽऽऽ धन्नो ! आज तेरी बसंती की इज्ज्त का सवाल है ! ‘शोले’ किती वेळा पहिला ? गणती नाही ! किती वेगवेगळ्या प्रकारे त्याचा विचार केला ? मोजदाद नाही ! तो शेवटी एक चित्रपट आहे.. एक व्यावसायिक चित्रपट आहे .. आत्यंतिक यशस्वी, एक वेगळेच वलय असलेला, पुन्हा न होऊ शकणारा पण तरीही शेवटी एक चित्रपट आहे ! आफ्टर ऑल इट्स अ मूव्ही ! तरीही … तरीही एका मोठ्या क्लायमॅक्स ची सुरुवात होताना .. म्हणजेच बसंती गावाबाहेर वीरुची तळ्याच्या काठी वाट पहाताना गब्बरच्या टोळीतले डाकू तिला गाठतात तेव्हा .. जेव्ह्या त्यांच्या अभद्र प्रतिमा तळ्याच्या पाण्यात उमटलेल्या दिसून वीरुच्या स्वप्नात रमलेल्या तिला खाडकन जाग येते तेव्हा … आणि चपळाईने ती तिच्या टांग्याच्या दिशेने पळते तेव्हा .. आपल्या लाडक्या धन्नो घोडीवर चाबूक चालवून ती तिला साकडं घालते तेव्हा … टु बी प्रिसाईज, ती जीवाच्या आकांताने ‘चल धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है !’ म्हणते तेव्हा … तेव्हा… प्रत्येक वेळी ... माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतं ! हाताच्या मुठी वळल्या जातात .. ‘रौंटे खडे हो गये’ असा काहीतरी अनुभव येतो .. दर वेळी तशाच अंगाला झिणझीण्या येतात आणि मी आर. डी. च्या पार्श्वसंगीतात थडथडणारा पं. सामताप्रसाद यांचा तबला ऐकू लागतो .. श्वास रोखून तो पाठलाग पाहू लागतो ! प्लीज. डोन्ट गेट मी रॊंग ! माझ्यासारख्याच इतर सामान्य लोकांप्रमाणेच मीही पहायच ते आणि पहायच तेव्हा पहातोच ! हिडीसपणा आणि कल्पना दारिद्र्य नसलेले उन्मादक गाणे किंवा प्रसंग हिंदी चित्रपटाच्या चौकटीचा भाग म्हणून काहिही वावगे न वाटता इतर कुणाहीप्रमाणे एन्जॉय करतोच ! लाऊड, बटबटीत हिंसा किंवा अतिप्रंसग हे खोटे आहेत, चित्रपटाचा भाग आहेत हे उमजण्याच्या वयानंतर प्रगती करत करत आता शांतपणे चॅनल चेंज करुन त्या प्रसंगापासून ‘डिटॅच’ होऊ शकतो ! पण ह्या प्रसंगात असं काय आहे कळत नाही ! काहीतरी होत हे खरं ! आणि प्रत्येक वेळी ! का ? हेमा मालिनी बसंतीच वाटते म्हणून ? का अधाशी, रानटी डाकू तिच्या मागे लागल्याची नॅचरल रिऍक्शन म्हणून ? का मेलोड्रॅमॅटीक, स्टाईलाईज्ड तरीही जमून गेलेल्या प्रसंगाला दिलेली नकळत दाद म्हणून ? माहीत नाही ! पण कदाचित अजून काहितरी असतं / आहे ह्या प्रसंगात, जे दर वेळेला भिडतं ! काय? चल धन्नो !!! बास ! दॅट्स इट. धिस इज ‘द’ मोमेन्ट ! धन्नो ! ‘भाऽऽऽग’ ! अगं माझ्या पाठी हे लांडगे लागलेत ! बाई, तुला आजवर आपल्या हाताने मोठं केलं, ओला चारा खाऊ घातला, मायेने कुरवाळल ! आज आत्ता त्या सगळ्याच मोल मला हव आहे.. माफ कर मला अशी वसुली केल्याबद्दल ! पण काय करु ? आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है ! कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो ! आर या पार ! हे हे, ते ते सगळ सगळ केल, कष्ट उपसले, डोक चालवल, काळजी घेतली, नियम पाळले … त्याचं फळ आत्ता, ह्या क्षणी हवय ! नाहीतर सगळ व्यर्थ ! बसंती फाटलेल्या आवाजात चित्कारते ‘भाऽऽग !’ विचार करु नकोस बाई, विश्वास ठेव माझ्यावर आणि पळत सुट. रस्ता जाईल तिथे ! वाट फुटेल तिथे ! दगड धोंडे, काटेकुटे ह्याची पर्वा न करता, उर फुटेपर्यंत फक्त पळत सुट ! तुझ्या मालकिणीची अब्रू धोक्यात आहे ! ह्या पेक्षा मोठ कारण तुला काय हवयं ? आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है ! धन्नो मन लावून धावू लागते… तिच्या नालेला ठेचाळत मागे जाणार्या एकेका दगडाकरता एकेक मात्रा घुमवत तबला थिरकु लागतो ! ते आहेतच मागे ! आता ही कुठे जाते ? हीला गाठायचीच आणि सरदाराला खूश करुन टाकायचे ह्या मस्तीत, ह्या जिद्दीने घोडेस्वार मागे लागलेलेच असतात.. टांग्याला हात घालायचा प्रयत्न करत .. एक तर पोचतोही टांग्यात .. पण बसंती प्रसंगावधान राखून टांग्याच्या एका बाजूचा दिवा त्याच्या टाळक्यात हाणते ! तो घरंगळतो बाजूला … पाठलाग चालूच आहे ! अजून संकट सरलेलं नाही .. श्वास आहे तोपर्यंत धावायच आहे धन्नो ! माझ्याबरोबर टांग्याच ओझ वहात, मागे घोड्यांवर बसलेल्या जनावरानां मागे टाकायच आहे… माझा वीरु येईलच तोपर्यंत ! (तो निघालाही आहेच ! धनगर पोराने दाखवल आहे त्या दिशेला .. ज्या दिशेला टांगा आणि त्या मागून घोडेस्वार गेले आहेत ! झपाट्याने झणाणणारं गिटार वाजतय … मनाला थोडी उभारी देणारं .. पण, तरीही शेवटी धोक्याचं संगीत मिसळतय त्यात … ) इकडे धन्नो धावत्ये .. सर्व शक्ती एकवटून धावत्ये ! आणि … एका खडकाला आपटून टांगा कलंडतो .. टांग्यापासून सुटून धन्नो पुढे जाते ! पण तिचं भान सुटलय ! डोक्यात एकच लक्ष्य त्या मुक्या जनावराच्या … धावायचयं ! मालकिणीला सोडवायचयं ! आणि त्यासाठी … धावायचयं ! ह्या एकाच वेडाने संमोहीत झाल्यासारखी धन्नो धावत पुढे निघून जाते ! जणू काही हा नव्यानेच धक्का बसल्यासारखा मी उदास होतो ! ‘भाऽऽग’ च्या वेळी आलेल्या झिणझीण्या अजून गेलेल्या नसतात ! … .. काही वेळाने वास्तवात परत येतो .. अफकोर्स ! आफ्टर ऑल इट्स जस्ट अ मूव्ही !!!
|
Chinnu
| |
| Sunday, December 18, 2005 - 5:56 pm: |
|
|
राहुला, फ़ारच touching रे!
|
Kandapohe
| |
| Sunday, December 18, 2005 - 8:56 pm: |
|
|
राहूल सुंदर!! कालच बघीतला होता त्यामुळे आणखीन त्रास झाला. असाच त्रास जयाच्या पत्रिकेत बहूतेक वैधव्यच होते की काय हा विचार केला की होतो. पण एक सांगावेसे वाटले शोले इज नॉट जस्ट अ मूव्ही!!
|
Kusumita
| |
| Sunday, December 18, 2005 - 9:32 pm: |
|
|
ख़ुपच छान लिहीले आहे!very touching!
|
राहुल............. खरंच शोले खुपच छान चित्रपट आहे. कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा बघताना तू जसं म्हणतोस तसा दरवेळी नविनच वाटतोय तो पिक्चर..... आणि केपी म्हणतात तसं जयाच्या नशिबी असंणारं वैधव्य आणि तिच्या चेहर्यावरचे भाव ........ हं..... तू सगळ्या आठवणी जाग्या केल्यास...... मस्त लिहिलं आहेस
|
Rar
| |
| Monday, December 19, 2005 - 1:02 pm: |
|
|
जबर्या.... हे असं कोणी movie बद्दल लिहिलं की ' आपल्या team मधली ' लोकं भेटल्याचा आनद होतो. गेल्या ३ दिवसात मी पण ४ वेळा शोले पहिला. पण अमिताभच्या एका scene साठी. रात्री अमिताभ mouth organ/harmonica वर ती जबर्या senti tune वाजवत असतो त्यासाठी. packing करताना मला माझ्याकडे असलेला harmonica सापडलाय. so almost दीड वर्षानी ' ती tune ' परत वाजवतीये मी...सही वाटतयं. सध्या मला असं झपाटलंय ते ' सरकार ' नं. दोन दिवसातून एकदा तरी मी तो movie पाहत आहे, आणि दरवेळी नवीन काहीतरी सापडल्याचा आनंद होतोय!
|
Manmouji
| |
| Monday, December 19, 2005 - 11:51 pm: |
|
|
माझे कही मित्र अमिताभचे प्रचड fan होते. त्यांची चर्चा म्हणजे १)दीवार मध्ये तो matador चा पडदा कसला उघडतो. २)अंधा कानुन मध्ये रस्ता कसला ओलांडतो.
|
|
|