Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
धबधबे आणि मी ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » कार्तिक » ललित » धबधबे आणि मी « Previous Next »

Dineshvs
Monday, November 28, 2005 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पाण्याचे लहानपणापासुन आकर्षण आहे. फ़िरायला लागल्यापासुन आवड जरा विस्तारतच गेली आणि आवडीनिवडी पण निर्माण झाल्या.
आयुष्यभर मला समुद्राचे सानिध्य लाभले. त्यामुळी दिल्लिकर जसे दरियाला बघुन हरखतात तसे माझे होत नाही. मला समुद्र तसा खास भावत नाही. त्याची अनेक रुपे मी बघितली, अनुभवली तरिपण मला तो अनाकलनीयच वाटतो. शिवाय समुद्राच्या पाण्यात शिरले कि माझ्या स्किनवर रॅश येते. त्यामुळे हल्ली पाय सुद्धा भिजवत नाहि मी.

नद्या माझ्या आवडत्या. एखादी संस्कृती जोपासायचे कार्य नदी करु शकते. आजहि अनेक मोठी शहरे, नदीच्या आधाराने वसली आहेत.

माझ्या प्रवासात मला कायम नद्या भेटत असतात. गोव्यात तर प्रत्येक पाच किलोमीटरवर एक नदी ओलांडावी लागते. देशावरच्या नद्या नेहमी गुढ वाटतात. त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. ब्रम्हपुत्र ( लोहित ) सारख्या काहि नद्यांचा तर पैलतीरहि दिसत नाही. त्यामानाने कोकणातल्या नद्या प्रेमळ वाटतात. पावसाळ्यातले काहि दिवस सोडले तर त्यांचे पाणी शंखनितळ असते. देशातल्याप्रमाणे गायी, म्हशी, बैलगाड्या आणि ट्रक धुणे पण क्वचितच चालते. एप्रिल मे मधे तर त्या बहुतांशी लुप्तच झालेल्या असतात. वाहत असेलच तर तो टिचभर ओहोळ मात्र मला नेहमीच मोहात पाडतो. शक्य असेल तर तिथे ऊतरुन पाय भिजवल्याशिवाय मी रहात नाही. आणि शक्य नसेल तरिहि माझे मन तिथेच रेंगाळत असते.

पण तरिहि काहि नद्या गुढ वाटतात. कावेरी सारखी नदी तर वाहते कि नाही हेहि कळत नाही, काहि ठीकाणी. आणि भडोच जवळची नर्मदा तर ओलांडताना संपतेय कि नाही असे वाटत राहते.

नदीपेक्षा मला धबधबे बघायला फ़ार आवडतात. एक जिवंतपणा असतो त्यात. सातत्य, शौर्य आणि बेफ़िकिरी सगळेच जाणवते मला त्यात. परिणामाची पर्वा न करता एखाद्या कार्यात झोकुन देणार्‍या व्यक्ति त्यात दिसु लागतात.

काहि बघितले, काहि बघायचे राहुन गेले. लाहनपणापासुन खंडाळ्याच्या घाटातला धबधबा बघत आलोय. शाळेत असताना पावसाळ्यात त्या रस्त्याने जाणे क्वचितच व्हायचे. पण अश्या काहि दुर्मिळ संधींच्या वेळी मात्र तो धबधबा खुणावत रहायचा. नविन हायवेवरुन पण तो बराच वेळ दिसत राहतो. अमृतांजन ब्रिज यायच्या आधी पण काहि धबधबे दिसत राहतात. मिलिंद गुणाजीने भटकंती कार्यक्रमात त्याचे छान दर्शन घडवले होते.

मुंबईत चिंचोटीचा धबधबा हा पण पावसाळ्यातले आकर्षण होता. बदलापुरचा धबधबा पण असाच नेहमी खुणावत राहिलेला. हे दोन्ही धबधबे किलर होते. गेल्या पावसाळ्यात मात्र बदलापुरच्या धबधब्याचा दरारा कमी झालाय.

पनवेलहुन मुंबईला जाताना खारघरनंतर ऊजव्या हाताला पांडवगडाचा धबधबा दिसु लागतो. त्याचे अस्तित्व पावसाळ्यापुरतेच असते. तो हि तसा किलरच. अनेक बळि गेलेत तिथे. अर्थात त्यात त्या धबधब्याचा अजिबात दोष नाही. बीयरच्या बाटल्या रिचवुन, अंगात मुळातच नसलेल्या पुरुषार्थाचे प्रदर्शन करायचा यत्न केल्याचा परिणाम असतो तो बहुदा.

भांडारदर्‍याजवळचा रंधा धबधबा हा पण एक देखणा धबधबा आहे. बहुतेक धबधबे आपण धबधब्याच्या पायथ्याशी ऊभे राहुन बघतो. हा मात्र वरुन खाली बघावा लागतो. हा धबधबा सरळ खाली कोसळत असल्याने, त्याच्या पायथ्याशी एक रांजण ( डोह ) तयार झालेय तसेच ऊसळणार्‍या पाण्यामुळे तिथे एक गुहा पण तयार झालीय. तिथे जाण्याचे धाडस कोणी करत असेल असे वाटत नाही. वरचा पाण्याचा प्रवाह अगदीच ऊथळ आणि निरुपद्रवी वाटतो. तिथे डुंबत असताना ईथे जवळ धबधबा असेल असे जाणवतहि नाही.

कल्याण मुरबाड रोडवरचा माळशेज घाटातला धबधबा मुंबईत फ़ार लोकप्रिय आहे. पावसाळ्यात झुंडीने लोक जातात तिथे आणि त्याला सार्वजनिक न्हाणीघराचे स्वरुप येते. ऐन पावसाळ्यात खुप ऊंचावरुन कोसळणारा आणखी एक धबधबा या घाटात दिसत राहतो. पण तो जरा लांब आहे, रस्त्यापासुन. सातार्‍याजवळ ठोसेघरला पण एक धबधबा आहे. तो बघायचा राहिलाय. तिथे पण काहि अपमृत्यु होत असतातच. समर्थांच्या सज्जनगडाच्या गुहेसमोर पण एक धबधबा आहे.

कोकणातल्या देवरुखजवळच्या मार्लेश्वराजवळ एक पाच टप्प्यात कोसळणारा धबधबा आहे. माझी आजी त्या जत्रेला नेहमी जात असे. तिथे जाऊन ती पुरणावरणाचा नैवैद्य करत असे. पण मला कधी जायला मिळाले नाही. या धबधब्याचा मिलिंद गुणाजीने काढलेला एक सुंदर फोटो, त्याच्या भटकंती नावाच्या पुस्तकात आहे. या फोटोत त्या धबधब्याचे पाच टप्पे अगदी नीट दिसतात.

आमचे मुळ गाव असणार्‍या राजापुरजवळच्या धुतपापेश्वर या गावी पण एक धबधबा आहे. पण तो सरळ खाली कोसळत नाही. खाली कोसळेपर्यंत तो विरुन जातो. अर्थात तो हि मी बघितलेला नाही. शिंद्यांचे मुळ गाव म्हणुन, तिवरे नावाचे एक गाव
सांगतात. तिथेहि एक धबधबा आहे. ( आता कळलं हि ओढ कुठुन आली ती ? ) तसेच कोल्हापुरजवळच्या मलकापुर गावाहुन कोकणात ऊतरायला अणुस्कुरा नावाचा घाट आहे, तिथेहि एक धबधबा आहे. हे मलकापुर म्हणजे माझे आजोळ. मजा म्हणजे याच नावाचे एक गाव कर्‍हाड तालुक्यात आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात पण आहे.

माझ्या नेहमीच्या प्रवासात पण अनेक धबधबे दिसत असतात. ( अंबोलि घाटातला, करुळ ( गगनबावडा ) घाटतला, परशुराम घाटातला, निवळीचा धबधबा असे अनेक. ) कधीकधी मी जागा असतो तर कधी गाढ झोपेत.

स्वित्झरलंडचा र्‍हाईन फ़ॉल पण मला आवडला. युरपमधला तो सगळ्यात मोठा असे माझा गाईड म्हणाला होता. मी ज्या दिवशी तिथे गेलो त्यादिवषी हि टुअर घेणारा मी एकटाच होतो. त्यामुळे माझ्या गाईडने अगदी तब्येतीने मला हा दाखवला होता. या धबधब्याच्या अगदी जवळ जाता येते. या धबधब्याच्या मधोमध असलेल्या एका खडकावर काहि काळ थांबता येते तसेच तिथल्या रेल्वेच्या ब्रिजवरुन तो धबधबा वरुनहि बघता येतो.
या सगळ्या तर्‍हेने मी तो अनुभवला होता.

केनयामाधे पण याल्ला या गावात एक मोठा धबधबा आहे. पण तिथल्या दाट जंगलामुळे फ़ारसे जवळ जाता आले नाही. आफ़्रिकेतला आणखी एक रौद्र धबधबा म्हणजे झैरे मधला व्हिक्टोरिअ फ़ॉल, त्याचे पण दर्शन अश्याच एका सिनेमात झाले होते.
सिंगापोरला मानवनिर्मित सगळ्यात मोठा धबधबा आहे. मस्कतम्धे पण कोर्निशला मानवनिर्मित धबधबा आहे. त्यासाठी चक्क समुद्राचे पाणी वापरलेय.

मी अजुन नायगाराचे नाव कसे घेतले नाही, याचा विचार करत असाल ना ? . नायगारा बघायचा तर त्याच नावाच्या सिनेमात. त्यात मर्लिन मन्रो आहे, पण तिच्यापेक्षा जास्त भर आहे तो नायगारावर. त्या सिनेमात जसे नायगाराचे दर्शन होते, तसे तिथे प्रत्यक्ष भेट दिल्यावर पण होणार नाहि कदाचित. या नायगाराने कुणाच्या प्रतिभेला कसे धुमारे फुटतील सांगता येत नाही. कादल नयगरा, व्यंडा वयगरा, अस ईक तामिळ गाणे मी ऐकलेय. कादल म्हणजे प्रेम, व्यंडा म्हणजे नको, आणि वयगरा म्हणजे --- जाऊ द्या. त्या मद्राश्यांची प्रतिभा, काय वर्णु ?
नायगारा सर्वात मोठा असा गैरसमज अनेकांचा असु शकतो, पण माझ्या माहितीप्रमाणे ब्राझिलमधला इग्वासु धबधबा, नायगारापेक्षा मोठा आहे. मीना प्रभुंच्या दक्षिणरंग पुस्तकात त्याचे फ़ार सुंदर वर्णन आहे. फोटोहि आहे.

मारुति चितमपल्लींच्या चकवा चांदणं मधे सहस्त्रकुंड धबधब्याचे पुसटसे वर्णन आहे.

म्हणजे एकंदर तुमच्या लक्षात आले असेलच कि मला धबधब्याची किती ओढ आहे ती. पणजी बेळगाव ( व्हाया अनमोड ) मार्गावरचा दुधसागर धबधबा, पण मला खुप दिवसापासुन खुणावत होता. खुप पुर्वी त्याचा फोटो बघितला होता. वास्को दा गामा ते लोंढा या मार्गावरच्या रेल्वेलाईनवर तो लागतो. तिथे सगळ्या गाड्या काहि क्षण थांबतात, हे पण वाचले होते. पण या मार्गावरुन जायची वेळ आली नव्हती कधी.

मित्रमैत्रिणींपैकी अनेकजणाना तो फ़क्त ऐकुन माहित होता.शेवटी टुरिझम डिपार्टमेंटकडे चौकशी केली. या दिसान वचुक मिळो ना, मागीर पयु, असे नेहमीसारखे उत्तर मिळाले. पण मी चिकाटी सोडली नाही. परत नेटाने चौकशी केली तर कळले कि पावसाळ्यात तिथे जाणे शक्यच नसते. पावसाळा ओसरला कि जाता येते.

शेवटी एकदाची संधी मिळाली. अनेकजणाना विचारुन बघितले. गोव्यातल्या मित्रमैत्रीणीना एखाद्या रविवारी घराबाहेर काढणे केवळ अशक्य. शेवटी एकला चलो रे, म्हणत गोवा टुरिझमचे बुकिंग केले.

मायबोलिवरच्या मित्रमैत्रिणीना पण साद घातली. आले असते रे पण --- ., मी तुमच्याबरोबर आहेच असे समजा, तिकडे आले कि नक्की जाऊ या --- मजा आहे बॉ एका माणसाची --- अशी उत्तरे मिळाली. ( मायबोलिकरच ते --- प्रतिक्रिया देणे म्हणजे डाव्या हातचा मळ त्यांच्या )

शेवटी एकदा आम्ही निघालो. जीटीसीची छान बस होती. बरोबर गाईड होतीच. या गाईड्स मुळे माहिती छान मिळते. एरवी रोजच्या बघण्यातला पणजी ते रायबंदर हा कॉजवे, आशियातल्या सगळ्यात मोठा हे मला कसे कळले असते ? ( खरे खोटे तिच जाणे. ) धूम सिनेमात शेवटी अभिषेक जिथे बोटीत दाखवलाय तो भाग म्हणजे हा कॉजवे. अशी व्यवहारातली ऊदाहरणे दिली तरच कळणार ना तुम्हाला ? .

आठवड्याच्या ईतर दिवशी पण ईथे रस्त्यावर माणसे दिसत नाहीत. रविवारि तर या भागात मानवाची वस्ती आहे कि नाही, अशी शंका येते. पण काल मात्र ओल्ड गोव्यातला भाग माणसानी फ़ुलुन गेला होता. येत्या रविवारी सेंट झेवियराचे फ़ेस्त आहे, त्या आधी नऊ दिवस नोविना होतो. ( भाविकांई लाभ घ्यावा हो. ) त्याची गडबड होती. चक्क डायव्हर्जन केले होते. एरवी ती दोन चर्च रोजच्या बघण्यातली. मला त्या आतल्या भागापेक्षा तिथल्या बागेत दिसणार्‍या फुलपाखरांचेच जास्त आकर्षण आहे.
पण या चर्चचा आतला भाग भारावुन टाकणारा आहे हे नक्की. अलिकडेच एक मायबोलिकरीण तिथे चक्क धर्म बदलुन घ्यायच्या गोष्टी करु लागली होती. हल्ली ती जरा कमी दिसते. खरोखर तिने बातिस्मा घेतलान कि काय, ते ती मेरीमाताच जाणे.

हा ओल्ड गोवा तालुका म्हणजे चर्चचा तालुका. काहि चर्च तर काहि नुसत्या कमानीच आहेत. क्रोकोडाईल खाडी ओलांडली कि फ़ोंडा तालुका सुरु होतो. ( स्थानिक नाव फ़ोणा ) . हा मात्र आहे देवळांचा तालुका. मंगेशी, शांतादुर्गा, म्हाळसा, नागेशी अशी एकापेक्षा एक देखणी देवळे ईथे आहेत. ईथेच फ़ार्मागुडी नामक गावी शिवाजीचा एक छोटा किल्ला होता, आता त्याचे गार्डन केलेय. अनमोड घाटातुन बेळगावला जाणार्‍या रस्त्याने तिथुन आणखी पुढे गेले कि मोले नावाचे गाव लागते.
बस त्याच्यापुढे जाऊ शकत नाही. तिथुन धबधब्यापर्यंत जायला जीप, ट्रॅक्स सारख्या वाहनाना पर्याय नाही. सरकारी टुअर असल्याने आमच्या डोक्याला ताप नव्हता. त्यांच्यातर्फेच जीपची व्यवस्था होते.

तिथुन एक किलोमीटरवर जंगलखात्याची हद्द सुरु होते. कॅमेरासाठी नाममात्र तिकीट काढावे लागते. पाण्याच्या पेट बॉटल्स असतील तर तिथेच ठेवाव्या लागतात. चेकिंग वैगरे होत नाही.

या दरवाज्यापासुन साधारण बारा किलोमीटर्स वर धबधबा आहे. बर्‍यापैकी दाटश्या जंगलातुन हा प्रवास होतो. एवढे अंतर कापायला जीपला पाऊण तास लागतो. वाटेत साडेतीनवेळा नदी ओलांडावी लागते. ( तीन मोठे प्रवाह, आणि एक छोटा ) जीप पाण्यातुनच नेतात. पाणी फ़ारसे खोल नाही, आणि स्वच्छ देखील आहे. पण म्हणुन त्यातला थरार काहि कमी होत नाही.

रस्ता बर्‍यापैकी रुळलेला आहे. पण जीपशिवाय कुठलेच वाहन जाऊ शकणार नाही. समोरुन जीप आली तर फ़ारशी अडचण होत नाही. एका बाजुला खोलखोल दरि आणि दुसर्‍या बाजुला ऊंच डोंगर असाहि प्रकार नाही. त्यामुळे हा प्रवास मजेत होतो.

चालकाशी एव्हाना दोस्ती झाली होतीच, त्याने ईथे वन्य प्राणी भरपुर आहेत असे सांगितले. पण त्यांच अस्तित्व जाणवत नव्हते. एरवी जंगलात वाटते तशी अनामिक भितीहि वाटत नव्हती.

तसे हे दिवस काहि बहराचे नाहित. त्यामुळे फ़ुले नव्हतीच. नाही म्हणायला मुरुडशेंगेची लाल केशरी फ़ुले नजरेच्या पातळीत होती. जरा वर नजर फ़ेकली तर वाकेरीचे तुरे वाकुल्या दाखवत होते. हे वाकेरीचे लालपिवळे तुरे मोहक दिसत असले तरी त्यांचा मोह टाळलेलाच बरा. याचे काटे बघुन या झाडाच्या जवळ जायला सुद्धा भिती वाटते.

आणखी एक झाड या परिसरात बर्‍यापैकी आढळते ते मोठ्या करमळाचे. फ़ुले फ़ळे नसताना झाडे ओळखणे कठिण असते, पण या करमळाची पानेच फ़ार वैशिष्ठपुर्ण असतात. जपानी पंख्याप्रमाणे घडी घातल्यासारखी याची लांबरुंद पाने कुठुनहि कक्ष वेधुन घेतात. याची फ़ुले पण फ़ार सुंदर असतात. छोट्या सफ़रचंदाएवढी फ़ळे लागतात याला. त्यावर बरीच मा.सल संदले असतात. हि फ़ळे खाता येतात. आंबटसर चवीची असतात. पण खुप जणाना हे माहित नसते. त्यामुळे फ़ळे मातीत मिसळुन जातात. पक्षी प्राणीहि खाताना दिसत नाहीत. कोल्हापुरला महावीर ऊद्यानात आहेत याचे झाडे. आता तुमच्या मनात असेल हि मोठी तर छोटी कोण ? तर छोटी करमळ म्हणजे स्टार फ़्रुट. हिरवट पोपटी रंगाचे हे फ़ळ शाळेच्या बाहेर असते विकायला बहुदा. बाहेरुन शिराळ्यासारख्या धारा असतात. दोन्ही करमळांची फ़ळे आंबट. आणि हाच एक बहुदा कॉमन गुण.

बघा झाडांचा विषय निघाला कि मी भरकटतो ते. तर हा असा टप्पा पार केला कि आपण गाडीतळावर येतो. ईथे खाण्यापिण्याची सोय आहे. मग ईथुन सुरु होतो तो एक छोटासा ट्रेक. वळणावळणाने ऊतरत, छोटे छोटे लाकडी साकव पार करत आपण धबधब्यापर्यंत पोहोचतो. येताना वाटेत त्याचे शिर दिसलेले असते. पण आता मात्र तो 1d समोर ठाके ऊभा आडवा 1d असा सामोरा येतो.

भारतातला दुसर्‍या क्रमांकाचा हा धबधबा ( पहिला जोग फ़ॉल्स, ईति गाईड ) तसा एका टप्प्यात नाही. पण खालुन पुर्ण धबधबा बघता येतो. ईथे मधुनच रेल्वेचा ट्रॅक गेलेला आहे. त्यामुळे थोडासा अडथळा येतो. ट्रेन जरी ईथे काहि क्षण थांबत असली तरी त्रेनमधुन हा पुर्ण दिसणार नाही. त्यातला मुख्य टप्पा हा खालच्या भागात आहे. वरुन कोसळल्यानंतर त्याला काहि फाटे फुटतात. आणि तो आणखी विस्तारत खाली येतो.

अगदी शेवटचा टप्पा हा एका मोठ्या दगडावरुन कोसळत असल्याने, त्याचा रंग अगदी शुभ्र होतो. खालचे पाणी मात्र निळेशार आहे. अगदी समोर बसल्यावर अंगावर तुषार ऊडतातच. पण ईथे सभ्यता आहे. अंग पुर्णपणे भिजत नाही. असे अंग पुर्ण भिजवायला जरा आत शिरावे लागते. ( अंगे भिजली जलधारानी, ऐश्या ललनांचे फ़ोटो पण काढले. त्यांच्या नकळत. ) धबधब्याचा जोश खालच्या कातळाने सोसल्यामुळे ईथे पोहणे तितकेसे धोकादायक नाही. थोडेफार कौशल्य असेल तर
खुषाल त्याला भिडावे.
या धबधब्याच्या ऊजव्या कोपर्‍यात तर अंघोळीसाठी सुरक्षित जागा आहे. एवढा विस्तिर्ण धबधबा मे अनेक अंगाने कॅमेराने टिपला. पाण्यापासुन अलिप्त राहणे मला शक्य झाले नाही. मग मीहि डुंबुन घेतले. छान फ़ोटो काढतोस, माझा पण एक काढ अशी चक्क विनंती केली तिथल्या एका फ़ॉरिनराने. तिथे भारतीय फ़ारच कमी दिसत होते.

पाय निघत नव्हता तरि परतणे भाग होते. ईथल्या प्रत्येक वळणावर स्क्रीनसेव्हरसारखे दृष्य दिसत होते. त्यातले बरिचशी टिपली मी. प्रिय असणारी फ़ुले आज गायब होती, पण मग माझ्या नजरेला वेगवेगळी मश्रुम्स, आणि किटक मोहवत होते.
झळाळत्या रत्नाप्रमाणे दिसणारे किटक, भले मोठे कोळी, तळहाताएवढी फ़ुलपाखरे, खुप काहि टिपता आले. आता काहि फ़ॉरिनरांशी दोस्ती झाली होती. हे, डिड यु गेट दॅट वन ? असे एकमेकाना सुचवत होतो. मला एक अगदी पाचु आणि सोन्याने मढवलेला वाटावा, अश्या किटकाने पोज दिली. तो बाकिच्यांच्या नजरेतुन सुटल्याने ते हळहळत होते.

परतीच्या वाटेवर अनेक वेळ हा प्रवाह रस्त्याच्या कडेने सोबत करतो. पावसाळ्यात आमची डुंबायला जाण्याची अनेक ठिकाणे या भागात आहेत.

जरुरिपुरता जेवणाचा ब्रेक घेऊन आम्ही तामडी सुर्ला च्या शिवालयाकडे निघालो. माझे अत्यंत आवडते हे ठिकाण. कदंबांच्या राजवटीतले म्हणजे जवळजवळ सातशे वर्षे पुरातन असलेले हे शिवालय आजहि दिमाखात ऊभे आहे. अगदी
आडबाजुला असल्याने ते परकियांपासुन सुरक्षित राहिले. एरवी ईथे न दिसणारे कोरिव काम या देवळात आहे.

आतल्या शिवलिंगाची आजहि पुजा होते. अशी पुजा होत असल्याने हे देऊळ आजहि पडझडीपासुन बचावले असा माझा कयास आहे. खजुराहोच्या देवळातली पुजा अर्चा थांबल्याने त्यांचा र्हेअस झाला. पण ती देवळे तांत्रिक पद्धतीने बांधली होती,
असेहि वाचण्यात आले. या बांधकामाचे वैशिष्ठ हे कि या देवळात भक्तीभावच निर्माण होत नाही. आणि केलेल्या प्रार्थनेचे फ़ळ देऊळ बांधणार्‍याला मिळते. विश्वास बसणार नाही, पण तुम्ही कुठल्याहि बिर्ला मंदिराला भेट दिलीत तर तुम्हाला हाच अनुभव येईल. ( मुंबईजवळ शहाड, हैद्राबाद, दिल्ली सगळीकडे हा अनुभव घेतलाय मी. देऊळ देखणे पण हात मात्र जोडावेसे वाटत नाहीत. ) तामडी सुर्लाचे शिवलिंग मात्र फ़ुलांच्या छानश्या सजावटीने नटले होते. वातावरण सात्विक करणारे नंदादिप होते. पुजार्‍याच्या परवानगीने त्याचे फ़ोटो काढले.

एखाद्या स्वप्नातल्या देवळाचा असावा असा या देवळाचा परिसर आहे. देवळासमोरच काहि पायर्‍या ऊतरुन गेले कि एक झुळझुळ वाहणारी नदी आहे. त्या नदीचा थोडे मागे जाऊन वेध घेता येतो.

पावसाळ्यात तर तिथुन हलुच नये असे वाटते. ईथे येणार्‍या अनेक मित्रमैत्रिणीना घेऊन जातो तिथे मी.
तुम्ही कधी येणार आहात ?



Nalini
Monday, November 28, 2005 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, भारतात आल्यावर नक्की येणार. किती सुंदर वर्णन केलत. अगदी सगळा परिसर डोळ्यासमोर उभा केलात.

Champak
Monday, November 28, 2005 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे एकंदर तुमच्या लक्षात आले असेलच कि मला धबधब्याची किती ओढ आहे ती....................... आलं आलं :-) एवढी प्रस्तावना केल्यावर रहातय थोडंचं!

Moodi
Monday, November 28, 2005 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश....

आता खरच रागावले मी तुमच्यावर पण हो तुमच कौतुक कराव तेवढ थोडच. प्रवासच वर्णन तुमच्याकडुन ऐकायला म्हणजे वाचण्यात जी मजा तीच आहे तिच प्रवासाची वाट पहाण्यात आहे.
आता रागवले का माहितय? धबधबा म्हणजे माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. खुप वेळा मनात येते की एखाद्या धबधब्यावरुन पाण्याच्या त्या प्रचंड दुधाळ लोटात आपणही समावुन वरुन उडी घ्यावी.
अर्थात हा येडेपणा न्युझीलंडमधल्या २ शहाण्यानी केला अन पुढचे विचारु नका.
मला अशी संधी कधी मिळालीच नाही, धबधबा पहायची हो!.

आता बहुतेक मान लुटलुटायला लागल्यावर ही संधी मिळेल.


Asawari
Monday, November 28, 2005 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्त्रिक देवळे :-) खजुराहो देउळ म्हणुन नक्कीच लक्षात रहात नाही :-) बिर्ला टेंपल मी बघितलेले नही पण थोडा विचार केला आणि वाटले generally देउळ देवाच्या नावाने असते इथे बिर्लाच्या नावाने आहे म्हणजेच त्यातच सर्व आले :-)

Bhagya
Monday, November 28, 2005 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, नेहमीप्रमाणेच हा लेख अप्रतीम. शिवालयाचे फोटो टाकणार का? म्हणजे मला मी बघितलं आहे का ते कळेल.

Bee
Monday, November 28, 2005 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुम्ही खूपच torture करता. आता वेळ कधी मिळेल ह्याची ओढ लागली आहे. देशात आलो तरी इतका वेळ नाही मिळत ही सगळी फ़िरण्याची हौस भागवायला. कायमचे भारतात येऊ तेंव्हा तुमच्या बरोबर हिंडाफ़िरायला आवडेल. तुमच्यासारखा गाईड पैसे देऊनही मिळणार नाही. नि मी तुम्हाला एक पै देणार नाही :-)

हे जे लिहिले आहे ते फ़क्त गोवा महाराष्ट्रातील काही भागांबद्दल झाले पण अख्खा भारत म्हंटले तर तुमचे हे वर्णन एक पुस्तक होईल. गुनाजिंचे ते भटकंती पुस्तक सद्या माझ्याजवळ आहे. त्यात थोडीफ़ार माहिती दिली आहे. तुम्ही लोणार, नागझरी, चिखलदरा ही ठिकाणे कधी बघणार अहात? चिखलदर्‍यातील सीमाडोह खूप प्रसिद्ध आहे. लोणार तर संशोधनासाठी एक चांगले स्थळ झाले आहे. अजूनही बरेचसे virgin category मधे मोडते.

काल वर्तमानपत्रात वाशिम जिल्याबद्दल वाचले. तिथे पाचहजार वर्षांपूर्वीचे तलाव आहे म्हणतात. एकाच जिल्यात तीन तलाव इतरत्र कुठे आढळत नाही. पण आमच्या सरकारनी नी नागरीकांनी ह्या तलावांना गटाराचे रूप दिले आहे. भारतात कितीतरी नद्या आहेत पण शहरात वाहणार्‍या नद्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. कुठल्याही शहरातून गेलेली नदी तिथल्या नागरीकांनी चांगली ठेवलेली नाही. फ़क्त अभिमान तेवढा बाळगतात पण करत धरत मात्र काहीच नाही. कुणीच नदीतला गाळ, जलकुंभ वनस्पती उपसवून टाकण्यासाठी शासनाकडे फ़िर्याद करत नाहीत.

वर तुम्ही वास्को दी गामाबद्दल उल्लेख केला.. कुठे आहे हा मार्ग?


Giriraj
Tuesday, November 29, 2005 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! दूधसागर!

हा धबधबा मी दोनदा पाहिला आहे. एकदा तर पूर्ण आत जाऊनही पाहिला आहे. एका सराईत पोहणार्‍याच्या कृपेनेच मला वार काढण्यात आले. पण मी काहीही रिचवले नव्हते. हे नक्की!
ज्या exact थिकाणी प्रवाह कोसळतो त्या जागी अतिशय खोल असा डोह आहे तर आजूबाजूला अगदीच उथळ म्हणजे चार फ़ुटाएव्हढेच पाणी आहे. या फ़सव्या प्रकारामुळेच मी डोहात ओढला गेलो होतो.मी दोनदा वर आलो आणि मदतीसाठी हात केला. पण कुणाला विश्वासच बसत नव्हता की मला पोहता येत नाही. एका मित्राला माहित होत पण तोही माझ्यसारखाच. शेवटी लांब पोहणार्या एका सराईताला त्याने खूण करेऊन मला बाहेर काढायला सांगितले. तिथल्या नेहमीच्या लोकांनी सांगितले की आत जाऊनही वाचणारा तूच एकटा असशील. कारण काही सराईत पोहणारेही त्यात बुडाले आहेत.माझ्या ऑफ़िसातल्या अका शिपायाच म्हणण अस की कुणा पोरीच कुंकू बरच बळकट आहे!
तर असा हा दूधसागर मी परत एकदा पाहून आलो. पोहायल शिकून पुन्हा त्यात उडी घ्यायची माझी ईच्छा आहे.बघू केव्हा जमत ते!


Yog
Tuesday, November 29, 2005 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह, दिनेश, नेहेमीप्रमाणेच, झक्कास!
गिरीभाऊ, नशीब तो शिपाई " टिकली " बळकट नाही म्हणला..
:-)

Kalpak
Tuesday, November 29, 2005 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही नुकताच कोकण दौरा केला. त्यातली दोन ठिकाण आवर्जून लिहावीशी वाटली.
पहीला निवळी धबधबा आणि दुसरा मार्लेश्वर, दोन्ही केवळ अप्रतीम
मार्लेश्वरचा निसर्गतर अवर्णनीय आहे.

सुधीर


Tanya
Tuesday, November 29, 2005 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश... धबधबा म्हणजे माझा weakpoint . त्यात तुम्ही केलेली वर्णन म्हणजे प्रत्यक्ष तिथे जाऊन तिथल्या प्रवाहात डुबकी मारुन आल्याचा आनंद!
लहानपणी, पावसाळयात, पुण्याच्या प्रवासात फक्त धबधबे पहायचे. पण प्रत्यक्ष अनुभव घेतला तो college च्या पहिल्या वर्षी, माळशेज गेलेल्या monsoon trek मध्ये. त्या पाण्याच्या प्रवाहात आपण सगळे काही विसरून जातो. college मध्ये असतानाच ठाण्याजवळ, ओवळा गावी, मैत्रिणिच्या farm house जवळ असलेल्या जंगलातील धबधबा(जो जास्त परिचीत नाही), अनुभवला तोही असाच.
धबध्यांचे आकर्षण हे माणसाला कायमचे. म्हणुन इथे, बर्डपार्कमध्ये, कृत्रिम धबधबा पाहुन इथल्या लोकांना आनंद होतो. मागे आम्ही मलेशियातील, जोहर बारु, जवळ 'waterfall' पहायला गेलो, तो आपल्या भुशी डम सारखा प्रकार होता, आणि पाण्याचा प्रवाह तर खूपच खालुन होता, आणि या 'waterfall' वर बरीचशी मंडळी तुफ़ान खुश होती.
जी मजा कोसळणारा धबधबा या शब्दात आहे, ती या waterfall मध्ये कधीच जाणवत नाही.

तुम्हा सगळ्यांबरोबर, आपल्याकडील निसर्गाची उधळण अनुभावयाला नक्की आवडेल.


Gs1
Tuesday, November 29, 2005 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मस्तच रे! शनिवारीच समर्थांच्या शिवथरघळीत जाउन आलो. तिथे धबधब्यात जाऊ देत नाहीत, पण बाजूला बसण्यातही मजा आहे..

धबाबा तोय उसळे, धबाबा तोय आदळे हे समर्थांनी उभे केलेले शब्दचित्रही खासच.


Ninavi
Tuesday, November 29, 2005 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, खासच.... नेहेमीप्रमाणेच.
एक प्रश्न्: मलकापूर तुमच आजोळ. तर तुमच्या आईच माहेरच नाव्/ आडनाव काय कारण ते गाव माझ्या सासूबाईंच माहेर. त्या माहेरच्या पेटकर.


Dineshvs
Tuesday, November 29, 2005 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi रागावलो तर मी पण होतो तुमच्या दोघांवर. पण आता वर्षभर वाट बघणार आहे.

Bee वास्को दा गामा म्हणजे जिथे गोव्याचा विमानतळ आहे ते गाव. कोल्हापुरहुन गोव्याला येणारी गाडी या मार्गाने येते. पण गाडीतुन धबधबा पुर्ण दिसत नाही.

गिर्‍या, GS1 तुमची आणि सगळ्यांची खुप आठवण काढली मी काल.

निनावि, माझ्या आईचे नाव शालिनी भोंसले, माझे मामा अजुन तिथे आहेत. येळाण्यात बेकरीवाले भोसले म्हणुन प्रसिद्ध आहेत ते. आजोबा राजवाड्यात कोठावळे होते.

आणि मित्रमंडळीना फ़ोटो पाठवले आहेत. मिळाले नसतील त्यानी मला ईमेल करावी.


Zelam
Wednesday, November 30, 2005 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमीप्रमाणेच सुरेख वर्णन.
जोग फॉल्स खरच छान आहे. तिथे ४ वेगवेगळे धबधबे आहेत.
खोपोलीजवळचा झेनिथ धबधबा पण सुंदर आहे किंवा होता मी पाहिला तेव्हा).
माळशेज घाटातला तो लांबून दिसणारा धबधबा काय सुंदर दिसतो!


Prajaktad
Wednesday, November 30, 2005 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश!नेहिमिप्रमाणेच खुपच सुंदर वर्णन!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators