|
दोस्तानो, बर्याच दिवसानी(महिन्यांनी) गोष्टीरुपाने आपली भेट घ्यायला आलेय. नेहमीप्रमाणे समजुन घ्याल ही खात्री!
|
गेले चार दिवस नुस्तं भकास वाटत होतं. रितेपण मलाच नाही सर्वानाच जाणवत होतं. सखीचा चेहरा डोळ्यासमोरुन हलता हलत नव्हता. तिचे शांत समाधानी हासू, तिचे वेदनेने तुडुम्ब भरलेले तरीही शांत डोळे , स्वतः असहाय्य असून देखील शेवटपर्यंत दुसर्याचा विचार करणारा स्वभाव सारं कसं जीवाला घायाळ करुन जात होत. कशी गंमत आहे नाही नियतीची? किती पराधीन जिणं तिने आमच्या दोघींच्या वाट्याला दिल. सगळ कळत असून, समोर दिसत असुन एकमेकींसाठी आम्हाला काहीच करता येऊ नये ? नुसत्या विचारानी सुद्धा डोक्यात तिडिक येत होती, दुःखाचे कढ आवरत नव्हते जाताना सखीने निक्षुन सांगितल होत की मागच्या गोष्टी विसरून जा, जीवाला त्रास करुन घेऊ नको, तुझं म्हणुन तू एक स्वतंत्र जीवन जगायला शीक, तुझं अस्तित्व जप. मी केलेली चूक तू करू नकोस better late than never. सखे , सगळं कळतय ग पण या क्षणाला काहीच सुचत नाहीये. तुझा हात घट्ट धरुन तर इतका प्रवास केला मी आणि या पुढे ….. नाही ग नाही कल्पनाही सहन होत नाही. पण मी वचन पाळेन, तुझ्यासाठी तेव्हढ तरी करायचा प्रयत्न मी नक्कीच करेन. गेले कित्येक वर्ष तू आणि मी म्हणजे एक अतूट जोडी, आपल्या मैत्रीमुळे म्हण किंवा तुझ्यामुळे माझं आणि माझ्यामुळे तुझं असह्य जीवन सुसह्य झालं होत. एकमेकींकडे पाहून तर जगलो आपण! ही मैत्री कधी झाली …. तितकसं तारीखवार आठवत नाही पण मी प्राथमिक शाळेत होते तेंव्हा! नेहमीप्रमाणे कुठल्यातरी छोट्याशा चुकीवरुन आबांनी मला अपमानकारक शिक्षा केली होती. तशा आबांच्या सर्वच शिक्षा मनाला आणि शरिराला ताप देणार्याच असत हे नंतर अनुभवाने कळू लागल. पण त्यावेळी पहिलीच वेळ होती. मला अजुनही स्पष्ट आठवतय आबा मला परसात सर्वांच्या समोर झाडूने मारत होते . मी कळवळुन रडत होते , दादा कोपर्यात केविलवाणा उभा होता, मला तर कशाबद्दल मला मार मिळतोय हे ही नीट समजत नव्हत. माझा रडण्याओरडण्याचा आवाक ऐकुन तू धावत आलीस, तू काही बोलणार एव्हढ्यात बाहेरून कोणाची तरी हाक आली म्हणुन आबा बाहेर गेले तू मला जवळ घेऊन कुरवाळत राहिलीस. नंतर असे प्रसंग वारंवार घडू लागले कुठली गोष्ट चूक, कुठल्या गोष्टीबद्दल कधी आणि किती मोठ्ठी शिक्षा होईल हे सांगताच यायचं नाही. दादा माझ्या पेक्षा आठ वर्षानी मोठा, पण तो आधीपासूनच जरा नाजुक, अशक्त होता आणि अबोलही त्यामुळे त्याला जास्त मार पडायचा नाही. मी लहान, अल्लड आणि थोडीशा हट्टी! म्हणजे हट्ट तसे फ़ार मोठे नसायचे कधी पेपरमीट तर कधी नवीन रिबीन एव्हढेच! आबांच्या अशा रागीट, तिरसट स्वभावापुढे आज्जी तर हतबलच झाली होती. आमच घर अगदी रस्त्याला लागून (दवाखान्याला लागुनच आत आमच घर होत), आमच गावही छोटस, त्यात आईआबा दोघे डाॅक्टर - त्यामुळे सर्वजण आम्हाला ओळखत. एकदा आबानी असचं कशावरून तरी संतापून दादाला घराबाहेर उभ केल ते पण उपाशी, येणारेजाणारे बघू लागले विचारू लागले पण आबाना त्याच काही नव्हत. दादा अपमानाने आणि भीतीने थरथर कापत उभा होता. त्यावेळी आज्जी आमच्याकडे उपचारासाठी म्हणुन आली होती. तो प्रकार पाहुन तिने हायच खाल्ली. मरताना तिने आबा.कडुन एकच शेवटची इच्छा व्यक्त केली होती की बाळला उपाशी ठेवू नकोस आणि राणीला मारू नकोस. दादाला ती लाडाने बाळ म्हणायची आणि मला राणी! त्यानंतर काही दिवस दादाला मारणं किंवा उपाशी ठेवण बंद झालं पण तेव्हढ्याने काही भागल नाही. व्रतवैकल्य, देवाला कौल लावणे असले सगळे प्रकारही झाले पण आबांचा स्वभावच तिरसट आणि अप्पलपोटा असल्याने फ़ारसा काही फ़रक पडला नाही. दादा बारावीनंतर चांगले मार्क मिळवून पुढील शिक्षणासाठी परगावी गेला आणि आबांच्या तावडीतून सुटला. मी तेंव्हा जेमतेम चवथी पास होऊन पाचवीत मोठ्या शाळेत जाण्याच्या तयारीत होते दादा दूर गेल्यावर माझा एक हक्काचा सोबती कमी झाला पण वेळोवेळी सखी असायची. सखीलाही काही कमी त्रास नव्हता पण माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने बरीच मोठी असल्याने ती गप्प राहून सगळ सावरुन घेत मला सावरायला सज्ज असायची. तिने कधीसुद्धा मला एकट टाकलं नाही आणि मी मात्र वेळ आल्यावर तिला एकटी टाकून निघुन गेले …… नाही तिनेच तस करायला लावलं
|
खरंतर बालपण किती रम्य, खोडकर, बेफ़िकिर किंवा निरागस असायला हवं नाही का? पण आमच्या नशीबात हे सगळे शब्द कोणीतरी लिहिता लिहिता पुसुन टाकल्यासारखे झाले होते बालपणात ' दहशत ' हा शब्दच सारखा डोकावू पहात होता . हो, त्याला धाक म्हणणं फ़ारच मवाळ ठरेल. आबांचा विक्षिप्तपणा दिवसेंदिवस नवनवे रूप धारण करत होता, वयानुसार वाढतच होता. ते फ़ारच unpredictable वागू लागले होते . कोणालाही, कधीही, काहीही बोलत . अशाने हळूहळू पेशंट तर कमी झालेच पण आमच्या घरी येणार्या माझ्या मोजक्या मित्रमैत्रिणीही दुरावू लागल्या. सर्व पेशंट्स ची जबाबदारी आई वर पडू लागली. माझी आई कमालीची हुशार, शांत आणि मनमिळावू होती. पण आता घरातलं आणि दवाखान्यातलं सारं आटपता आटपता तिची पुरेवाट होऊ लागली. ती पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती . त्यातुनही कधी वेळ मिळाला की ती मला छान छान गाणी म्हणुन दाखवायची, म्हणायला शिकवायची. तो एकच विरंगुळा - तिच्यासाठी आणि माझ्यासाठीही! आईचा आवाज खुपच गोड होता, ती गाणं म्हणू लागली की खूप प्रसन्न दिसायची, एक लाघवी, मोहक हसू तिच्या ओठावर पसरायच. तिच ते सात्विक रूप मला खूप भावायच, वाटायच आईने असच गात रहाव आणि मी पहात रहाव तिच्याकडे अगदी एकटक! माझे खूप लाड करायची आई - मुलगी म्हणुन असेल किंवा शेंडेफ़ळ म्हणुन असेल . मला नेहमी आश्चर्य वाटायच की एव्हढी कर्तबगार, मनमिळावू बायको असून आबांना कधीच तिचा कुठलाच गुण दिसत कसा नाही, भावत कसा नाही. पण हळूहळू समजु लागल की की हे सगळे गुण तिच्यासाठी वरदान न ठरता शाप ठरले होते . आबा गरीब कुटुम्बातून कष्ट करुन, पडेल ते काम करुन, रात्रीच्या शाळेत शिकुन मोठे झाले . खेड्यातुन शहरात गेल्यावर ज्या काय अडचणी येतात त्या सोसत, पार करत डाॅक्टर झाले . बुद्धी तल्लख पण लहानपणी बरीच आजारपणं काढल्याने शरिर फ़ारस बलवान नाही पण काटक प्रक्रुतीचे ! आईचं तसं नाही ती शहरात, त्यातल्या त्यात सधन कुटुम्बात वाढलेली, हुषार! आबांच आणि तिच लग्न म्हणजे प्रेम उर्फ़ परिचय विवाह म्हणा हवा तर! लग्न झाल्यापासुन तिचं माहेर तिला कायमचं तुटलं होतं . तरी तिने छोट्याशा गावात सासूबरोबर, नवर्याबरोबर टुकीने संसार सुरु केला. कष्ट करुन प्रॅक्टिस फ़ळाला आली, आईच गावात नाव झालं . आबांच्या गावात आबांपेक्षा लोक तिला नावाजू लागले . आणि इथेच नशीबाचे फ़ासे फ़िरले ! तशी ती शांत, समंजस असल्याने तिने कधीच या गोष्टीना संसारात डोकावू दिल नाही . पण आबांचा आधीच तापट असलेला स्वभाव त्यात आता तर अहं दुखावला गेल्याने किंवा त्याना inferior complex वाटू लागल्याने असेल ते फ़ारच violent होऊ लागले . तसे ते आईला हात लावत नसत, पण कुठल्याही कारणावरुन माझ्यावर राग काढत, मला धोपटून काढत, कुठे जाऊ देत नसत, कुणाच्यात मिसळू देत नसत. लोकांसमोर, पेशंटसमोर आईच्या नावाने अर्वाच्य शिव्या, घाणेरडे आरोप - वाट्टेल ते बोलत.. आज्जीच्या म्रुत्युनंतर आणि दादाच्या परगावी जाण्यानंतर घरातलं वातावरण कधी सुधारलच नाही. सततची चिडचिड, दोषारोप, वाद याने मी अगदी कंटाळून जायचे. कितीतरी वेळा पाठच्या दारी बसून एकटीच मनसोक्त रडायचे . इतर मैत्रिणींच्या घरचं वातावरण किती खेळकर, साधं पण आनंदी असायचं पण मला तिथे जायलाही बंदी! मग अशावेळी मी आणि सखी! त्यामुळेच की काय तिची आणि माझी मैत्री एकदम घट्ट झाली, वयातल अंतर हळूहळू अद्रुश्य झालं . तारुण्याची नवी चाहूल जेंव्हा मला लागू लागली तेंव्हा माझ्या मनातले , शरिरातले बदल माझ्या आधीच सखीने टिपले . तिने वेळोवेळी योग्य माहिती दिली, काही गोष्टी स्वतःच्या अनुभवातून पटवून दिल्या. कधी ती स्वतःचे तारुण्यातील अनुभव उलगडुन दाखवायची तर कधी उपदेश रुपी बोध्कथा ऐकवायची पण का कोण जाणे तिच्या उपदेशाचाही कधी कंटाळा आला नाही. कधीकधी वाटतं ती माझ्या आयुष्यात आली नसती तर मी नक्कीच वहावत गेले असते किंवा वेडी झाले असते कदाचित कुठल्या अनावर क्षणी आत्महत्येचा विचारही केला असता. कारण दुनिया काय एक भुलभुलैया - त्यात माझ्यासारखी सुंदर भोळी मुलगी, कोणालाही सहज भुरळ पाडणारी म्हणजे शिडात वारं भरलेली होडी! कोणीतरी आपल्याकडे आकर्षित होतय ही भावनाच मुळी एव्हढी नवी आणि हवीहवीशी वाटत होती. घरी प्रेम, आनंद मिळत नसला की बाहेरचच सगळं छान वाटायला लागतं . वयही वेडं असतं भल्याबुर्याची तेव्हढी समजही नसते . आबांनी आमचं ' पालनपोषण ' मधला फ़क्त पालनाचा भाग कर्त्यव्य म्हणुन पूर्ण केला. पोषण मग ते शारिरीक असो वा मानसिक ते त्यांच्या गावीच नव्हतं . ‘ हम करे सो कायदा ’ अस जरी असलं तरी कुठलाही निर्णय घ्यायची वेळ आली की ते आईला पुढे करायचे मग दादाला मेडिकल ला घालायच की नाही किंवा मला नोकरी करु द्यायची की नाही, लग्न कोणाशी जमवायच वगैरे वगैरे . Upper hand त्यांचा असला तरी सगळी धावपळ ते आईला करायला लावत, स्वतः लाम्बून पहात असत. त्यातून काम झाल नाही किंवा निर्णय चुकला की सगळं खापर आईच्या डोक्यावर फ़ोडून शिव्या द्यायला हे रिकामे ! त्याच्या कथा ते कधी लोक जमवून तर कधी ओरडून जगाला सांगायचे . आई मात्र कधीच उलटून बोलायची नाही किंवा घरच्या गोष्टी बाहेर सांगायची नाही. आम्ही आबांवर चिडलो तर ती आम्हालाच समजावायची. असे काही पूर्वीचे प्रसंग सांगायची ज्यातून आबांचा चांगुलपणा, कर्तुत्व आमच्या निदर्शनाला येईल. तसे आबा गावातल्या खूप लोकांच्या सम्पर्कात असायचे . बर्याच जणांना त्यानी आर्थिक मदतही केली होती, गरीबाना मोफ़त औषधपाणीही करत, असत कधी कोणाला लग्नाला, शिक्षणाला मदत करत असत पण स्वभाव पहिल्यापासून विक्षिप्तच! कधी कोणाचं कौतुक करतील आणि कधी पाण उतारा करतील सांगताच यायचं नाही. मला आणि दादाला संगीताची मनापासून आवड होती, आईमुळेच असेल कदाचित. आम्ही शिकतही होतो. दादा व्हायोलिन, बासरी खूप छान वाजवायचा. दादा सुट्टीला घरी आला की आम्हाला पर्वणी! आबा बाहेर गेले की आमची मस्त महफ़िल रंगायची कधी संगीताची तर कधी गप्पांची! मी, दादा, आई खूप गप्पा मारायचो, सगळी कामं सोडुन एका काॅटवर नाहीतर टेबलाभोवती तासंतास बसायचो. दादा काॅलेजातल्या खूप गमतीजमती सांगायचा, मग आई पण खुलुन आपले अनुभव, गॅदरिंग, फ़िशपाॅंड्स सगळं काही सांगायची. मला ऐकत रहावसं वाटायचं. आबा आले की सारं काही पूर्ववत - सामसूम! एकाच घटनेबद्दल आबांच्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया असत. कधी हळू आवाजात मी आत गाणं गुणगुणत असले की म्हणायचे गाणं कसं आवाज मोकळा सोडून खुल्या दिलानं म्हणावं, मी जर म्हंटल की पण बाहेर पेशंटला त्रास … तर म्हणायचे ' अग, त्रास कसला उलट त्यालाही बरं वाटेल, तो आपलं दुखणं काही काळ विसरून जाईल. ' तर कधी मनमोकळेपणी गावं तर तर दवाखान्यातुन तरातरा येऊन एक लगावून द्यायचे . मी लहान असल्याने जास्त काळ आबांजवळ राहिले , त्यानी शिक्षणाला नोकरीला कशालाच मला बाहेर जाऊ दिल नाही. त्यामुळे त्यांचा सहवास मलाच जास्त मिळाला. सहवासाने प्रेम वाढतं म्हणतात पण आबांच्या बाबतीत बरोबर उलट झालं .
|
cछान आहे. पुढ्च्या ची वाट बघते आहे.
|
मी तो दिवस कधी कधीही विसरणार नाही. मी सहज म्हणुन घरात शिरले आणि सखीला नको त्या अवस्थेत पाहिलं . मी अक्षरशः गलितगात्र झाले . माझा अभेद्य किल्ला कोणीतरी फ़ोडू पहातय असं वाटलं अगदी! आणि तेंव्हाच एक चमत्कार झाला. मी सखीला कमरेला घट्ट धरुन मागे खेचलं , गॅस बंद केला, सगळ्या खिडक्या उघडल्या . तिला मायेने जवळ घतेलं तिचे डोळे पुसले समजुत काढली, सांत्वन केलं , शरिराबरोबरच मनावरही मलमपट्टी केली . मला जे जे म्हणुन तिच्यासाठी, तिला शांत करण्यासाठी करता आलं ते सर्व मी केलं . आयुष्यात पहिल्यांदाच मी तिची ‘ सखी ’ झाले . माझं हे नवीन रूप पाहून सखी तर अवाकच झाली. मी तिला समजुन घेण्याएव्हढी, किंवा तिला सावरण्याएव्हढी मोठी झाले या गोष्टीवर तिचा विश्वासच बसेना. ती खूप आनंदली! त्यादिवशी पासून तिने आपली सगळी कथा, व्यथा माझ्यासमोर मोकळ्या मनाने मांडायला सुरुवात केली. तिलाही त्यामुळे हलकंहलकं वाटू लागलं . दादाने पुढे मानसशास्त्रातच पदव्युत्तर अभ्यास करायचं ठरवलं . त्याला सुद्धा आबाच कारणीभूत असावेत. कारण त्यांच्या वागण्याचा अंदाज आम्हाला कोणालाच बांधता यायचा नाही. कदाचित दादा काहीतरी उपाय शोधून काढेल ही वेडी आशा! त्यात दादाने स्वतः मुलगी पसंत करुन लग्न ठरवलं . त्या वेळेला आबानी घराची नुसती युद्धभूमी करुन सोडली होती. आईच जबाबदार असल्यासारखे ते सतत तिला वाट्टेल ते बोलत होते . तू आत्ताच्या आत्ता जाऊन लग्न मोड असाच घोषा त्यानी लावला होता. आई म्हणजे काय बळीचा बकरा, त्यांच्या आदेशानुसार तिने प्रयत्न केला पण दादा काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याने लग्न केलच, आबानाही तो प्रथमच उलटून बोलला. आईला या सगळ्या रामायणाचा एव्हढा त्रास झाला. हे सगळं बघुन मी मनोमन ठरवलं काहीही झालं तरी love marriage करायचं नाही. तेंव्हा मी नुकतीच काॅलेजमधे प्रवेश करणार होते . दिवस फ़ुलपाखरी होते , माझं आरशातलं रूप मलाच भुरळ घालत होत. वाटतं होतं छान छान ड्रेस घालावेत, मैत्रिणींबरोबर तासंतास गप्पा माराव्यात, फ़िरायला जावं, प्रेमकथा वाचाव्यात. पण यातलं काहीच आपल्या नशीबात नाही हे स्पष्ट दिसतं होतं आणि बंडखोरपणे असं काही करायचा प्रयत्न केला तर आपल्यापेक्षा जास्त आईला त्रास होणार हे ही कळत होत. मी आकर्षक दिसू नये म्हणुन आबा स्वतः माझ्यासाठी ढगळं , फ़िक्या रंगाचे , बेताचे कपडे आणतं . पण त्यातही माझं सौंदर्य खुलुन दिसायचच, मग जर का रस्त्यावरच्या एखाद्याने मागे वळून माझ्याकडे पाहिल्याचा आबाना संशय जरी आला तरी ते नाही नाही ते बोलत. असल्या सगळ्या प्रसंगानी आईच ह्रुदय तिळतिळ तुटायचं . कधी कधी तर मला वाटायच की हा खरचं माझा जन्मदाता आहे ? मुली तर बापाच्या एकदम लाडक्या असतात असं मी पाहिलं होत , मग माझ्याच बाबतीत हे असं का ? त्यानंतर मधे कधी घरी एकदोन प्रेमपत्र आली, जणू तो माझाच गुन्हा होता अशी शिक्षा मला मिळाली. आबा माझ्या नावाने गावभर कंठशोष करू लागले . आता स्वतः वडिलच मुलीच्या अब्रुचे धिंडवडे काढू लागले तर लोकांना अफ़वा पसरवायला मुभाच! घरातल्या सर्वांचच अशाप्रकारे खच्चीकरण करण्यात त्याना काय सुख मिळायचं देव जाणे ! कधी कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, कधी ट्रिपला जायचं नाही. मग इतकं निराश वाटायचं केवळ आईच्या तोंडाकडे पाहून सहन तरी किती करायचं ! तरुणपणी ज्या गोष्टींची हूरहूर वाटावी, नवलाई अनुभवावी, उत्सुकता वाटावी त्या गोष्टींविषयी हळूहळू तिटकारा वाटू लागला. भावना बोथट झाल्या. तरी सखी परोपरीने मला खुलवायचा खूप प्रयत्न करायची, जणु काही तेच आता तिच्या आयुष्याचं ध्येय होतं !
|
Jhuluuk
| |
| Tuesday, March 06, 2007 - 5:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ही सखी म्हणजे नायिकेची आई होती काय.... btw good going अभिश्रुती
|
Disha013
| |
| Tuesday, March 06, 2007 - 6:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मलाही तेच वाटतेय. तुझी लिहिन्याची शैली फ़ार छान आहे अभिश्रुती.
|
Jhuluk,humm! let's see as it goes. Thanks! BTW this is based on the true story and I am not writing it for the sake of writing. I want to create awareness about the 'hidden facts/problems' which are not seen/observed easily.
|
दादा मेडिकलला असताना आणि माझं शालेय जीवन संपताना एक गोष्ट माझ्या आणि आईच्या लक्षात येऊ लागली ती म्हणजे आबा काही दिवस एकदम उत्साहात असतात, त्यातल्या त्यात सुसह्य वागतात आणि काही दिवस एकदम आळसात, गप्प पडून नाहीतर कुठल्याही गोष्टीवरून वाद घालत आणि त्याचा शेवट मला मारण्यात violent होण्यात किंवा आईवर नको नको ते आरोप करण्यात होत असे . अशी स्थित्यंतर नक्की कधी कुठल्या कारणाने घडतात हे शोधण्याचा, तर्क करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण हातात निश्चित असं काही सापडायचं नाही. पण कधी त्यांच वागणं बदलणार याचा अनुभवनाने आम्हाला अंदाज येऊ लागला. त्यामुळे दोन महिने सुसह्य गेले की पुढे नरकयातना ठरलेल्या. एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती आबाना कसलासा न्यूनगंड होता आणि म्हणुनच की काय कोणाचीही सुत्ती केली मग ती मोलकरणीच्या एखाद्या कामाची असो वा दादाच्या बासरीवादनाची, त्यावर त्यांची काहीतरी मुक्ताफ़ळ ऐकायला मिळायचीच. जर तो काळ ‘ सुसह्य ’ सदरात मोडत असेल तर ते आपण कसे या पेक्षा जास्त कष्ट केलेत किंवा चांगलं काम करतो हे रंगवून सांगत किंवा आपल्याला संगीताचं स्वराच ज्ञान किती आहे हे सिद्ध करायला पेटीवर तीच तीच गाणी वाजवून दाखवत (त्याना स्वरज्ञान होतच त्याबद्दल वाद नाही पण दादाच्या बासरीवादनाची सर कशालाच नव्हती आणि शेवटी तो त्यांचाच मुलगा होता.) आणि जर का तो काळ ‘ असह्य ’ या सदरात मोडणारा असेल तर आईने मोलकरणीना कसं डोक्यावर बसवलय, त्यांच्याशिवाय तिचं पानच कसं हालत नाही, आई कशी मोठ्याघरी वाढलेली लाडाची मैना होती , मी प्रसंगी तिला पोळ्या सुद्धा कशा लाटून दिल्या वगैरे … नाहीतर या बासरीवादनामुळे दादाच्या करिअरची कशी वाट लागणार आहे . मी कसा तुमच्या शिक्षणासाठी खस्ता खातोय आणि तुम्ही कसे छंदीफ़ंदी आहात, आईच या सगळ्याला कशी कारणीभूत आहे वगैरे . नंतर नंतर तर दादा सुट्टीला पण जास्त दिवस यायचा नाही, आला तरी आबांशी बोलण्याचा फ़ंदातच पडायचा नाही. पण हळूहळू दादाला आणि आबांच्या एका डाॅक्टर मित्राला आबांचा प्राॅब्लेम हा मानसिक आहे असा दाट शंशय येऊ लागला. मी काॅलेजमधे असताना एकदा अशाच काही कारणाने आबांवर खूप चिडले होते आणि आईजवळ वाट्टेल ते बोलत होते ,’ तू कशी ग रहातेस इतकी वर्ष अशा माणसाबरोबर, काय अर्थ आहे इथे रहाण्यात? किती म्हणुन अन्याय सहन करायचा, काही चुक नसताना सर्वांसमोर वाट्टेल ते बोलुन घ्यायच अगदी वीट आलाय मला ह्या सगळ्याचा, कुठेतरी पळून जावं असं वाटतय पण तुला एकटीला टाकून जाववतही नाही. चल, आपण दोघीही जाऊ निघुन म्हणजे तरी याना किम्मत कळेल आपली. ’ . आई शांतपणे सारं ऐकुन घेत होती, मनोमन तिला माझं चिडणं पटतही होत पण अतिशय कनवाळू स्वरात आणि करुणेने भरलेल्या डोळ्याने ती एकच वाक्य बोलली, ‘बरं नाही आहे ग त्याना राणी! मी नाही समजुन घेतलं तर कोण घेणार?’ मला अजुनही तिचा तो चेहरा आठवतो. कुठुन आली एव्हढी सहन्शक्ती आणि समजुन घेण्याची वृत्ती! मला ते सगळंच मानसिक आहे हे अजिबात पटायचं नाही, आजही पटतं नाही शेवटी माणसाचा मूळ स्वभावच चिडचिडा असेल तर तो स्वभावही ५०% जबाबदार आहेच. असो. मला राहून राहून वाटातं की किती विचित्र जोड्या बनवतो नाही देवही! माझी आई सतत न बोलता कष्ट करणारी, मातीचही सोन करणारी, शांत, शहरात वाढलेली, उच्चशिक्षित तरी साधी, सधन घराण्यात वाढलेली तरी सहनशील आणि समंजस, आहे त्या परिस्थित सुख शोधणारी, प्रेमळ अगदी पाषाणाला पाझर फ़ुटेल असं बोलणारी! आणि वडिल, गरिबीत छोट्या गावात, कष्टात वाढलेले असुनही पराकोटीचे अप्पलपोटे , प्रसंगी आपली शेखी मिरवायला खोटं बोलणारे , आईची कारण नसताना निंदा करणारे , सदैव कुठल्या ना कुठल्या कारणाने कावलेले , कधी स्वतः समाधानी, आनंदी नाहीत आणि आम्हालाही आनंद देऊ शकले नाहीत ! दादानेही एकदा शांतपणे त्याना समजवलं आणि मुम्बईला येऊन डाॅक्टरचा सल्ला घ्या असं परोपरीनं सांगितलं त्यांच्या मित्रानेही सांगितलं . पण ते मानायलाच तयार नाहीत. तुम्ही सगळे जण मिळून मला वेडं ठरवायला निघलाय, मग काय तुम्हाला रानं मोकळं वगैरे नाही नाही ते ऐकवलं . ही गोष्ट डाॅक्टर असून आपल्या कशी लक्षात आली नाही असं आईला सारख वाटू लागलं . मग हळूहळू लग्नानंतरच्या सगळ्या अनाकलनीय गोष्टींचा तिला उलगडा होऊ लागला. आबा तेंव्हा कधीकधी दोन दोन महिने दम लागतोय म्हणुन दिवसदिवस पडून रहायचे , नुसते पेज पिऊन दिवस काढायचे आणि एक दिवस एकदम खडखडीत बरे होऊन, सगळी काम दुप्पट जोमाने करायला लागयचे . कधीकधी पेशंटना नको इतकं समजावून सांगायचे तर कधी हाकलून लावायचे . आई मात्र माझ्यापासून काही लपवायची नाही. सगळ्या गोष्टी मी, आई आणि दादा मोकळेपणी बसुन बोलायचो. पण आबांची परिस्थिती काही सुधारायची चिन्ह नव्हती. त्यात दादाच्या लग्नानंतर त्यानी पंधरा दिवस उच्छाद मांडला होता. हे सगळं सहन न होऊन आईला पहिला हार्ट अटॅक आला. मग मात्र काही दिवस आबा घाबरले होते (कुठेतरी मनाला टोचतं असेलच) आईची व्यवस्थित देखभाल करू लागले . मी एकदम मोठ्ठी झाले सखीच्या सल्ल्याने, मार्गदर्शनाने घरची सगळी कामं उरकुन काॅलेजला जाऊ लागले .
|
Jhuluuk
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बाप रे! जर ही खरे घडले असेल, तर त्या माउलीची आणि दोन्ही भावंडाची खुप कणव वाट्तेय ग श्रुती... मानसिक आजार वेळेवर उपचार नाही केले तर फार मोठा होउ शकतो.. पुढे आबांना उपचार मिळाला कि नाही? waiting for next post..
|
Princess
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:48 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अभिश्रुती, छान लिहितेय ग. ही सत्यकथा आहे का? तसे असेल तर झुळुकला अनुमोदन... कित्ती वाईट असेल त्या मातेची अवस्था.
|
पुढे काॅलेजच्या शेवटच्या वर्षी एके दिवशी मी सर्व तयारी करुन आई आबाना सांगुन निघाले . आबाही बर्या मुडमधे होते येताना मला काही औषधं बाजारातुन घेऊन ये म्हणाले आणि मला काही हवं असेल तर तेही घे असं म्हणुन जास्तीचे पैसे हातावर ठेवले . काॅलेजवरुन घरी आलेतर काही वेगळाच प्रकार. आईचं तोंड पाहूनच काहीतरी बिनसलय याचा अंदाज येइपर्यंत आबानी मला थाडकन थोबाडीतच मारली! हे सगळं एव्हढ अनपेक्षित होत की काही कळायच्या आत मी मटकन खालीच बसले . नंतर त्यांच्याकडुनच कळलं की एका माणसाने दादाची ओळख सांगुन त्यांच्याकडे माझ्या लग्नाचा विषय काढला.आणि मला तुमची मुलगी आवडते आणि मी तिला मागणी घालायला आलोय वगैरे वल्गना केल्या. ह्यातलं काहीही मला आणि दादाला दोघांनाही माहित नव्हतं . पण हे सगळे दिवे मीच कसे लावलेत, माझ्या रुपाचं मी कसं भांडवलं करतेय, दादाचाही कसा सगळ्याला पाठिंबा आहे , स्वतःचं वाटोळ करुन बसलाच आहे अस आणि बरच काही ते दोन तास बडबडत राहिले . ते एकदम खवळले की काय करायचं हे आम्हाला समजायचचं नाही. सकाळी जाताना बरा असलेला माणुस काही तासात एकदम एव्हढा कसा बदलतो हे एक न सुटणार कोडच होतं . पुढे पास विद्यार्थ्यांच्या यादीत माझं नावं आलं नाही, मला खात्री होती की मी पास होणारच पण आबानी परत तमाशा केला पण मी हट्टाला पेटून आईच्या संमतीने विद्यापीठाकडे परत पेपर तपासणीसाठी अर्ज केला आणि पासही झाले . पण तेव्हढ्या दिवसात आबानी एकदाही माझ्यावर विश्वास दाखवला नाही की धीर दिला नाही. उलट असचं होणार हे त्याना कसं आधीच माहितं होतं माझ्याकडुन त्यांची काही अपेक्षाच नव्हती, शेवटच्या वर्षी मी कशी नुसती मजा मारली वगैरे मलाच नाही तर गावं गोळा करुन ते ऐकवीत होते . दरम्यान मलाही काही वाटेनासं झालं मी बॅंकेची परिक्षा दिली आणि पास झाले . चला एकदाची सुटका झाली म्हणुन मी त्या गावी काही मैत्रिणींबरोबर राहू लागले . सुरुवातीचा काळ ट्रेनिंगचा होता, पहिल्यांदाच बाहेर रहायचा अनुभव हवाहवासा वाटतं होता. आता कुठे चार लोकांशी मोकळेपणी बोलता येत होतं, रुममेट्स बरोबरही छान मेतकुट झालं होत. सखीला इकडच्या गमती, अनुभव पत्राने कळवत होते . ती पण आनंदाने उत्तर पाठवत होती. मोकळा श्वास जीवनाला किता आवश्यक असतो याची पहिल्यांदा जाणीव झाली. आबांच्या घरात आमची वाढं होऊच शकली नाही. We just couldn’t get the space to grow, air to breath. ती घुसमट किती जीवघेणी होती हे प्रकर्षाने जाणवू लागलं तरी आई एकटी पडली असेल या कल्पनेनं मन हळवं होऊ लागलं पण मी आनंदात आहे हे पाहून ती खूष होती. आणि अचानक आई दत्त म्हणुन दारात उभी राहिली . तिचा चेहरा पाहुन मी काय समजायच ते समजले . तिच्याबरोबर घरी गेले . आबाना परोपरीने विनवले की मला नोकरी करायचीच आहे , सुखासुखी कोणाला एव्हढी चांगली नोकरी मिळत नाही आणि नोकरी सोडून मी काय करणार! पण ते काही केल्या ऐकेचनात, इथे कोण पहाणार, आईची तब्येत बरी नसते मलाही त्रास होतो, नाहीतरी तुझही लग्न करुन द्यायचच आहे .... सतराशे साठ कारणं सांगू लागले . माझ्या आयुष्यात प्रथमच मी आबांना बोल बोल बोलले ! लग्न ठरलं की पाहू म्हणाले . तर त्यावरतीही ते नको नको ते बोलले की तुझं तुच ठरवून करुन मोकळी होशील तिथे काय तुला रान मोकळच आहे . तसही मी करणार नाही तुम्ही रितसर पसंत केलेल्या मुलाशीच लग्न करीन, तुम्ही स्थळं पहायला तर लागा . या वाक्याचा अर्थ त्यानी मला लग्नाची घाई झालेय असा काढला. एकुण काय मी हरले आणि नेहमीप्रमाणे ते जिंकले ! त्यावेळी मी त्याना अट घातली की मी नोकरी सोडेन पण तुम्ही कधी घरात आईबरोबर भांडायचं नाही, अगदी देवासमोर उभं राहुन त्यानी ते कबूलही केल. अशाप्रकारे माझी नोकरी सुटली आणि बंदिवास परत सुरु झाला. आबांनी त्यांच वचन पाळलं नाही हे सांगायलाच नको. मी तेंव्हाही बंड पुकारुन, दादाच्या आधाराने नोकरी चालू ठेवू शकले असते पण मग आईचं काय झालं असतं देवच जाणे ! आणि आबांनी नवीन गावात येऊन माझ्या बॅंकेत तमाशा करायलाही कमी केलं नसतं He was capable of doing anything!
|
पुढे लगेचच माझं रितसर दाखवून वगैरे लग्न ठरलं . माझ्या फ़ार काही अपेक्षा नव्हत्या. होणारा जोडीदार सुशिक्षित असावा, मला एक माणुस म्हणुन माझं म्हणुन एक जीवन त्याने जगू द्यावं, प्रामाणिक रहावं, मनमोकळेपणी बोलावं असच बरचसं . आणि हा मुलगा अगदी तसाच होता. मी त्याला मोकळेपणी आबांबद्दल, घरच्या परिस्थितीबद्दल सांगितलं . त्यानेही माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आमच्यात झालेलं सर्व सम्भाषण मी सखीला सांगितलं तिलाही तो आवडला. चला या पोरीला आता सुखाने संसार करु दे अशी तिने देवाजवळ प्रार्थना केली, मी दूर जाणार म्हणुन तिला वाईटही वाटलं . लग्नाची तारीख वगैरे ठरली, पत्रिका छापल्या. आता निमंत्रणाला सुरुवात करायची तर आबा भलत्याच शंका काढू लागले . मला मुलगा काही मनापासून आवडला नाही वगैरे (कारण नंतर समजलं की त्याना तोपर्यंत त्यांच्या बहिणीकडुन दुसरं एक श्रीमंत स्थळं कळलं होतं ) Somehow कुठलाच निर्णय घ्यायची आणि त्यावर टिकुन रहायची किंवा जबाबदारी घ्यायची त्यांची कुवतच नव्हती म्हणा किंवा धैर्य नव्हतं म्हणा. पण मी आणि आई मात्र ठाम राहिलो त्यामुळे ते गप्प राहिले किंवा त्यांचा त्यावेळी depression period चालू असेल म्हणुनही असेल कदाचित. लग्नाला पाच दिवस उरले तरी ते काहीच नसल्या सारखं दाखवत होते . दिवसदिवस झोपुन रहायचे , हाक मारली तरी ओ द्यायचे नाहीत. आणि अचानक एक दिवस लवकर उठले, पटपट आवरून सायकलला टांग मारून गावातली सगळी आमंत्रण उरकून आले . जवळजवळ वीस - एकवीस किलोमिटर अंतर ते सायकलवरून उन्हातान्हात फ़िरत होते . माझं लग्न झालं , दुसर्या दिवशी मी कंकण सोडवायला माहेरी आले , सर्व विधी पार पडल्यावर आबानी मला आत बोलावलं . मी आत गेले तर आबा माझा हात हातात घेऊन ढसढसा रडू लागले ! हे सगळं एव्हढ अनपेक्षित होतं की मला काय करावं हेच सुचेना. मला म्हणाले ,' मी तुला खूप मारलं, खूप त्रास दिला मला माफ़ कर! माझ्यावर राग धरून सासरी जाऊ नकोस. मला तुझं चांगलचं व्हाव अस वाटतं, तुझ्या वाईटासाठी मी हे सगळं नाही केलं '. त्याक्षणी मला त्यांची खूप कणव आली. कसेही असलेतरी ते माझे आबा होते . मी त्याना सांगितलं की माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही. मी काहीच मनात ठेवणार नाही. दादा सांगायचा तीच ही सगळी लक्षण होती . एकाएकी आचान्क त्यांचा मूड बदलायचा. त्यांच्यातल्या कर्तबगारीला, चांगुलपणाला या मानसिक आजाराने जणू चारी मुंड्या चित करुन टाकलं होतं . मी जाताना आबाना कळवळून सांगितल की आबा दादा सांगतोय ती औषधं घ्या तुम्हालाही त्रास होणार नाही. प्लीज माझ्यासाठी एव्हढं करा. लग्नानंतर मला आईची अवस्था किती वाईट आहे याची खरीखुरी जाणीव झाली, कारण नवरा बायकोचं नातं काय असतं ते तेंव्हा खरं कळलं . मी तेंव्हा सुरुवातीला कितीतरी वेळा झोपेतून दचकून उठायची. लांब असून देखील तो hangover जात नव्हता. आईच्या आग्रहास्तव पहिल्या बाळंतपणाला मी माहेरी आले आणि परत आबांची इतके दिवस न पाहिलेली cycles परत बघायला मिळाली. आबा औषधं घेत नव्हते हे उघडंपणे कळत होतं . एरवी सुद्धा आईच्या नुसत्या फ़ोनवरच्या सुरावरुन मला समजायचं . काही दिवस बरे वागत असलेले आबा मला नववा लागल्यावर एकदम तू बाळंतपणाला सासरीच का गेली नाहीस इथ का आलीस? असचं काहीतरी बरळायला लागले , काहीना काही पूर्वीचं काढून भांडणं करायला लागले . आधीचं गरोदरपणी शेवटी शेवटी मनस्थिती नाजुक आणि भित्री होते , त्यात आबांच हे असं सुरु झाल्यावर मला खरचं तिथुन निघून जावं असं वाटायला लागलं . मी बॅग सुद्धा भरली पण आई आडवी आली. पुढे सगळं नीट झालं मी परत ठरल्यावेळी नवर्याकडे परतले . पुढच्या वेळी मात्र बाळंतपण माझ्याच घरी झालं आईलाच थोडे दिवस बोलवून घेतलं . आई तशी थकली होती पण तिची सोबत मला धीर द्यायला पुरेशी होती . नंतर कधी मी मुलाना घेऊन फ़क्त चार दिवसासाठी माहेरी जायचे . सखी माझ्या लेकराना खूप जीव लावायची, त्या चार दिवसात तिला बाकी सगळ्या जगाचा विसर पडायचा. मलाही सखीला तसं पहायला खूप आवडायचं . सखीचा सहवास निवडुंगालाही म्रुदु आणि सुगंधित करुन जाईल असं वाटायचं . अशा माणसाच्या नशीबात कायम दुःख आणि उपेक्षाच का? असंही वाटायचं . दिवसं सरत गेले . मीही माझ्या मुलात, संसारात गुरफ़टत गेले . पुढे सासूसासरे थकले त्यांच करण्यात दिवस कसा सम्पायचा हेही कळेना. दरम्यान दादा आई - आबांना आपल्याकडे घेऊन गेला होता, त्यांची treatment ही चालू होती. त्यामुळे मला त्यांची फ़ारशी काळजी नव्हती. ... आणि ती काळरात्र आली ! सगळे उपचार झाले , शेवटी आईची बायपासही केली पण यश आलं नाही. काळाचे वार सहन करुन करुन तिचं ह्रुदय थकून गेलं होतं . त्याला आता चिरविश्रांतीची गरज होती. तिच्या शेवटच्या काळात मात्र इतके वर्ष न लाभलेला तिचा सहवास मला पूरेपूर लाभला. बर्याच वर्षानी आम्ही खूप बोललो. माझ्याजवळ तिला रहायचचं होतं बहुतेक! मुलगा म्हणुन आणि डाॅक्टर म्हणुन दादा सदैव सेवेसी तत्पर होता. आम्ही अक्षरशः उशापायथ्याशी रात्रंदिवस बसून होतो. आबा कधीकधी पूर्ण दिवस, रात्र हाॅस्पिटलमधे रहात आम्हाला येऊ नका म्हणत, तर कधीकधी चार चार दिवस फ़िरकतही नसत. आई त्यांची चौकशी करत असे पण त्यानी यावं असा तिचा आग्रह नसे . शेवटपर्यंत गोड बोलत, हासत, समाधानाने तिने प्राण सोडला. ती गेली तेंव्हा मी नेमकी तिथे नव्हते . मी गेल्यावर दादाने फ़क्त माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझा तोलच गेला. मी मला आवरुच शकले नाही. मी जोरजोरात ओरडत राहीले ’ सखी, नको ग अशी मला एकटी टाकून जाऊस! सखी s s सखी ’. जरा सावरेपर्यंत दादा म्हणाला ,‘ राणी, आबा एका जागी स्तब्ध बसून राहिलेत्’ काहीच बोलत नाहीयेत, त्यानी बोलायला पाहिजे , react करायला पाहिजे नाहीतर त्याना जास्त त्रास होईल ’. काय करावं तेच कळेना. मी आबांना हलवून हलवून आई गेल्याचं परत परत सांगू लागले पण काही उपयोग होईना. मी जोरजोरात ओरडू लागले ,‘ आबा शेवटपर्यंत तुम्ही कमनशिबीच राहिलात, सीतेसारखी साथ देणारी बायको मिळाली पण तुम्ही तिच्यालेखी वनवासच लिहिलात, सोन्यासारखी मुलं असून त्याना कधी माया लावली नाहीत. कधी जीवाभावाची दोस्ती केली नाहीत कोणाशी! चांगल्या नशीबाला स्वतःच्या हाताने ठोकरलत तरी ती साध्वी तुम्हाला साथ देत राहिली. आता कोणी नाही आबा! आता कोणी नाही! आमच्याबरोबर तुम्हीही पोरके झालात. तुमच सर्वस्व गेलं ! तुमची जन्माची जोडीदारीण तुम्हाला कंटाळून सोडून गेली. आता काहीही बोला तिच्या बद्दल ती परत येणार नाही, तिला त्याचा त्रासही होणार नाही. माझ्याबरोबरच तुमचीही एकमेव सखी हरवली आबा!’ मी कितीवेळ काय बोलत होते कोण जाणे पण एकदम आबांचा बांध फ़ुटला ते मला आणि दादाला मिठी मारून लहान मुलासारखे हमसुन हमसुन रडू लागले . मला उगाचच भासं झाला की सखी हसतेय, नेहमीसारखी समाधानाने ! --- समाप्त ----
|
मला या कथेतून hypomania आणि depression या मानसिक आजाराबद्दल थोडा awareness व्हावा हा उद्देश आहे . आपल्या अवतीभवती किंवा स्वतःमधे असे काही changes आढळले तर ते जरुर observe करावेत आणि गरजेप्रमाणे treatment ही घ्यावी. कारण मन हा शरिराचाच भाग आहे जसं आपणं शरिराला काही आजार झाला तर वेळीच उपाय करतो अगदी तसचं हे पण आहे . यात कमीपणा मानायचं काहीच कारण नाही. लवकर treatment घेण्याने सर्वाना (सभोवतालच्या लोकानाही) फ़ायदाच होतो.
|
Yog
| |
| Sunday, March 11, 2007 - 5:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
well said.. well written!
|
Psg
| |
| Monday, March 12, 2007 - 1:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अभिश्रुति, छान लिहिलं आहेस.
|
Jhuluuk
| |
| Monday, March 12, 2007 - 4:47 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
very touching... अजुन काय लिहु..
|
Mandarp
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अभिश्रुती, मी तुम्हाला काल ईमेल लिहीली आहे. क्रुपया उत्तर द्याल का धन्यवाद, मन्दार
|
Princess
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अभिश्रुती, खुपच हृदयस्पर्शी लिहिलय. ही सत्यकथा आहे का? असे कठोर सत्य ज्या लोकानी अनुभवले असेल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
|
Saanchi
| |
| Wednesday, March 14, 2007 - 6:07 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आभिस्रुति, खुपच छन लिहीले आहेस. ही सत्य कथच आहे.. कारन मी अशा एका कुतुम्बला ओलखते
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 14, 2007 - 12:39 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अभिश्रुती, खुप दिवस घेतलेस कथा पुर्ण करायला. आपल्याकडे या मानसिक विकाराने त्रस्त झालेली खुप माणसे दिसतात. आपण त्याना चक्रम, तिरसट अशी विशेषणे लावुन गप्प बसतो, आणि अन्याय सहन करत राहतो. पण हे मानसिक असले तरी आजार आहेत, हे एकदा मान्य केले कि मग, त्यावर उपचार करुन घेणे, शक्य होते. तुझा हेतु सफल होवो.
|
अभिश्रुती,छान लिहील्येस कथा. सुन्न व्हायला झालं वाचून.
|
दिनेश, मला हे लिहिताना थोडा त्रास होत होता plus खूप विचार करुन लिहायला लागत होतं कारण आई मुलीचं नातं दाखवताना किंवा मैत्री दाखवताना मला आबाना पूर्णतः खलनायकाच रूप द्यायचं नव्हतं आणि काल्पनिक काहीही लिहायचं नव्हतं . तरीपण वाचकहो, thanks for ur patience and compliments!
|
R_joshi
| |
| Thursday, March 15, 2007 - 7:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अभिश्रुती खुपच छान लिहिलिस कथा. शेवट तर मन हेलावुन सोडतो. खरच अशा मानसिक रुग्णांच्या घरच्यांची अवस्था किती बिकट होत असेल ना. स्वत:च्या एका प्रिय व्यक्तिला मानसिक रुग्ण म्हणुन पाहणे,हा विचारच किती जीवघेणा आहे.
|
|
|