|
Bee
| |
| Tuesday, January 23, 2007 - 2:00 am: |
| 
|
ह्या वर्षीच्या भारतभेटीत मी एका संस्कार वर्गाला सुरवात करून आलो. पण ह्या मागची माझी प्रेरणा आणि गरज काय होती त्याबद्दल इथे लिहावेसे वाटते. 'मीपण' म्हणून मुळीच नाही. एक सुप्त इच्छा आहे आपण जे काही करतो आहे तेच मुळी योग्य आहे का? असेल तर त्यात आणखी कुठल्या गोष्टींची भर घालता येईल.. पुणे हे विद्येचे माहेरघर. पुणे हे संस्कृतीचे माहेरघर! कमला नेहरू पार्क जवळून दररोज जाताना वाटेत मला एक संस्कार वर्ग लागायचे. सुरवातीला हा प्रकार नक्की काय आहे हे मला काहीच माहिती नव्हते कारण विदर्भात तरी संस्कार वर्गाबद्दल मी काही ऐकले नव्हते. रोज रोज ह्या वर्गाच्या बाजूने जाताना मुलांचे आणि स्त्रिवर्गाचे काही वाक्य माझ्या कानी पडायचे. कधी एखादी बोधकथा ऐकायला आली की माझे पाय तिथेच थबकायचे आणि ती कथा पुर्ण होईपर्यंत तेथून हलायचे नसत. कधी कधी एखादा संस्कृत श्लोक व त्याचा अर्थ हेही मुलांना सांगितले जायचे. कधी कधी स्वच्छतेचे, टापटिपेचे पाठ मुलांना सांगतानाही मी ऐकले. नंतर मला कळले हे जे इथे रोज चालते ती कुठली शाळा बिळा नसून तो एक संस्कार वर्ग आहे. संस्कार वर्गाची ही संकल्पना मला खूप आवडली आणि ती माझ्या स्मरणात राहीली. फ़ुलारलेल्या आंब्याच्या झाडाखाली पट्ट्या टाकून बसलेली गोंडस मुले. जवळ कुठलेच दप्तर नाही की पाटी लेखणी नाही. फ़क्त श्रवण आणि कृती ह्यातूनच मुलांच्या मनावर यथायोग्य संस्कार घडवायचे आणि त्यांना देशाचे उत्तम नागरीक बनवायचे. निदान निस्वार्थी बुद्धीने तसा प्रयास तरी करुन बघायचा. नाहीतरी अधुनमधुन शाळेत तर कधी घरात शिक्षकं-लहानथोर मंडळी आपल्याला योग्य - अयोग्यतेचे पाठ देतच असतात. संस्कारक्षम वयातील मुले एकत्रीत आली की त्यांच्या मनावर ह्या गोष्टी लवकर ठसविल्या जातात. हा अभिप्राय मी कुठल्यातरी पुस्तकात वाचला आणि तो पटला. माझी बहिण तिच्या मुलीसोबत, सासर सोडून माहेरी आली त्याला आता ३ वर्ष होत आहेत. दिवसभराची कामे करुन देखील हाताशी खूपसा वेळ राहतो. झी सोनी बघण्यापेक्षा काहीतरी हीने करत रहावे असे मला मनापासून वाटले. शेजारणीच्या लेकीची गोष्टही बहिणीसारखीच होती. तिला एक मुलगा, माहेरी येऊन तिला ७ वर्ष पुर्ण होत आहेत. नवरा म्हणतो हा माझा मुलगाच नाही. हे ऐकूण अंगावर शहारे येतात. मी पहाटे ६ ला घराच्या बाहेर पडलो. हाती फ़ुले गोळा करायला संजय पात्र होते. उद्देश हा होता की नविन वसाहतीत झालेला बदल पारखावा. बाहेर कुणी दिसलच तर त्यांच्याशी छान ओळखी देखील होईल. फ़ुले द्यायला घ्यायला इथे कुणी नाही म्हणत नाही. खूप घरं ओलांडून मी चमेलीच्या एका साकवाजवळ येऊन ठेपलो. तिथे बघतो तर अंगणात एक रिकामा वर्ग. त्याला तट्ट्यांच्या भिंती. एक काळा फ़ळा. काही खडू. फ़ळा पुसायचा कपडा. मी थोडावेळ तिथे कुणी येईल का म्हणून थांबलो. आतून एक रया गेलेली स्त्रि बाहेर आली. तिला विचारलं इथे शाळा भरते का? त्यावर ती म्हणाली 'भरत होती'. मी आणखीन काही विचारल्यावर कळले की तिने गरीब मुलांना शिकवण्यासाठी अंगणात हा एक वर्ग उभारला होती. मुलांना गणित आणि ईंग्रजी मोफ़त शिकवावे हा तिचा हेतू होता. वर्ग फ़क्त दीड वर्ष चालला नंतर अनेक कारणांनी बंद पडला. खोलवर उसासे टाकून मी घरी पोचलो. मला माझे ऐसपैस अंगण आणि वरची रिक्त चंद्रशाळा दिसायला लागली. बाहेर मुले भरपूर दंगा करत आहेत. ती आपली कुणाचीच ऐकत नाहीत. हे सर्व दृष्य नजरेसमोरुन तराळून गेले. बहिणीला विचारले तू काही करत का नाहीस. इतका सारा वेळ तुला मिळतो तर काहीतरी करुन बघ. आपण कशामधे फ़िट बसतो हे ठरवण्यासाठी तुला चार दोन नविन गोष्टींची आखणी करावीच लागेल. वाटलं तिने योगाचे वर्ग घ्यावेत पण ती कुणाला शिकवू शकेल इतकी तिला योगाची माहिती नाही. मग वाटलं पाचवी पर्यंतच्या मुलांची शिकवणी घ्यावी तर आत्ता भेटलेली स्त्रि आठवली. इतक्यात तिची मुलगी शाळेतून आली. डबा एका दिशेला, गणवेष दुसर्या दिशेला, बुट कुठेतरी कोपर्यात फ़ेकून ती न जेवताच घरातून पसार झाली. मुलांना सांगून सांगून ती ऐकत नाहीत. मार दिला तर कोडगी होतात. काय करावे काहीच सुचत नाही. चांगली १५-२० मुले आहेत इथे. फ़क्त उनाडक्या करायला पहिला नंबर बाकी काही नाही. ताईचे हे हताश उद्गार ऐकून मी किंचित हसलो थोडे वाईटही वाटले. मला इथे येऊन ८ दिवस झालेत. एकदा मी आजूबाजूच्या सर्व मुलांसाठी पाणीपुरी केली. एकदा सिंगापोर मधून आणलेली choclates त्यांना दिलीत. कुणाचा तरी वाढदिवस होता म्हणून केक कापला. त्यांच्या पालकांची परवानगी घेउन त्यांना बागेत फ़िरायला घेऊन गेलो. एकूण काय तर मुलांच्या कलाकलाने घेऊन मी त्यांना आत्मसात करण्यात यशस्वी झालो. हळुहळू मुले आमच्या घरी येऊ लागली, रुळायला लागली आणि विशेष म्हणजे आमच्याशी संवाद साधायला लागली. ह्या परिस्थितीचा फ़ायदा म्हणून मी मुलांसाठी do'es आणि don't do ची एक यादी तयार केली. मुलांकडूनच ती यादी भरवून घेतली. म्हणजे प्रत्येकाला विचारले घरी आई वडील काय करा म्हणून म्हणतात ते Do'es मधे टाकले तर काय करू नये हे Don't do मधे टाकले. वय वर्ष ५ पासून दहा पर्यंतची मुले मुद्दाम मैत्रीसाठी निवडली कारण त्यांच्या IQ जवळपास सारखा असेल. बहुतेक मुलांनी हेच सांगितले की आपला गणवेश आपणहून घडी करुन ठेवावा. रोज गृहपाठ न विसरता करावा. आपले बुट बरोबर लावून ठेवावेत. पण हे करणार्या मुलांमधे कुणाचाच हात वरती नव्हता. मग इथून त्यांना प्रेमळ शब्दात उपदेश द्यायला सुरवात झाली. आधी केलेली यादी कमी जास्त व्हायला लागली. मुले ऐकायला लागली. घरी त्यांच्या आया येऊन आपल्या पाल्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया द्यायला लागल्यात. ही गोष्ट मग मी समोरच्या शेजारणीला सांगितली आणि चमेलीची फ़ुले देणार्या स्त्रिलाही जाऊन सांगितली. त्यांना माझी संस्कार वर्गाची कल्पना खूप आवडली खरी पण ती नेटानी केली जाणार की नाही, किती दिवस चालेल ह्याबद्दल त्यांच्या मनात शंकाकुशंका होत्या. शेवटी 'केल्यानी होत आहे रे..' ही उक्ती त्यांनाही पटली. घरात मुलांचे बरेचशे खेळ खेळणी होती. मी परदेशातून भाचीच्या वाढदिवसाला पाठवलेल्या तर कधी देशात जाताना न विसरता सोबत नेलेल्या ह्या सर्व गोष्टी. काही खेळ इतर मुलांकडून मिळालेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंगणात मुलांना खेळायला मी एक झोपळा तयार केला आणि दोन सिमेंटची बाकडं बनवून घेतलीत जशी मंदिरासमोर असतात तशी. त्यामुळे मुलांना खेळायला एक चांगली जागा मिळाली. लक्ष द्यायला स्त्रि वर्ग मिळाला. गच्चीवर एक रिक्त खोली होती. तिचा वापर फ़ारसा होतच नव्हता. मुलांना जिन्यावरुन गच्चीवर चढणे, खाली उतरणे खूप आवडते हे बघून वरची खोली संस्कार वर्गासाठी तयार केली. वर तिथे एक fish tank होता त्यात कमळाच्या कलमा देखील आम्ही लावल्या होत्या. 'अक्षरधाराच्या' पुस्तकांच्या sale मधून बोधकथांची पुस्तके मी खूप पुर्वीच घेऊन ठेवलेली होती. म्हणजे संस्कार वर्गासाठी हव असणार भांडवल तयार होतं. आता फ़क्त गरज होती हे वर्ग नियमीत चालवू शकणार्या महिलांची. विदर्भात पौष रविवार खूप मानले जातात. ह्या दिवशी अगदी पहाटे उठून सुर्य उगवण्यापुर्वी स्त्रियांनी केस धुवुन केस विंचरावे लागतात. उन पडल्यावर केस विंचरले तर सुर्याच्या ताटात केस जातात असे म्हणतात. मग सतीचे वाण म्हणजे उसाचे करवे, बोर, गाजर, वाटाण्याची शेंग, ओले बिब्बे, हरभरा हे सर्व साहित्य पितळेच्या झळाळत्या ताटात रांगोळीने सुर्य काढून त्या मधोमध ठेवले जातात. आणि जेंव्हा पुजा संपते तेंव्हा मुलांना सुर्याच्या कथा सांगितल्या जातात. ह्या संधीचा फ़ायदा घेऊन मी चार ब्राम्हण बायका गोळा केल्यात आणि त्यांच्याकडून मुलांना सुर्यनारायणाच्या कथा सांगायला लावल्यात. पौष महिन्यातला प्रत्येक रविवर असा साजरा करावा लागतो. विदर्भात तरी असे केले जाते. कथा सांगणार्या मावश्यांकडून मी अभय घेतले की त्यांनी आमच्या संस्कारवर्गासाठी थोडा वेळ काढावा. त्या तयार झाल्यात. आळीपाळीने कुणीनाकुणी संस्कार वर्गासाठी येऊ लागल्यात. एक दिवस आड चालत राहिल इतकी तरी सध्या ह्या वर्गाची व्यवस्था आहे. मुलांची संख्या कमी न होता ती वाढत आहे. ह्यातच काय यश येत आहे असे वाटते.
|
Ajjuka
| |
| Tuesday, January 23, 2007 - 2:37 am: |
| 
|
चांगला उपक्रम आहे. त्याबद्दल तुझे आणि सगळ्याच लोकांचे अभिनंदन..
|
Jhuluuk
| |
| Tuesday, January 23, 2007 - 5:00 am: |
| 
|
स्तुत्य उपक्रम बी! मागे पण तुम्ही महिलांसाठी वाचनाचा उपक्रम राबविल्याचे लिहिले होते. माझ्या आईच्या काही मैत्रिणी असाच लहान मुलांसाठी संस्कार वर्ग चालवतात. त्या छोट्या छोट्या मुलांना इतकी छान गाणी-गोष्टी येतात हे पाहुन आता कौतुक वाटते. जरा मोठ्या मुलांना स्तोत्रे पण येतात.
|
Jayavi
| |
| Tuesday, January 23, 2007 - 7:34 am: |
| 
|
बी....... फ़ार चांगलं काम करतो आहेस रे! तुला मनापासून शुभेच्छा! आमच्या सुट्ट्या आम्ही फ़क्त स्वत: आणि स्वत:चे लोक ह्यांच्यासाठीच घालवतो. पण तू काहीतरी वेगळं आणि कौतुकास्पद करतो आहेस. तुला शाबासकी द्यायला हवी रे!
|
Meenu
| |
| Tuesday, January 23, 2007 - 8:05 am: |
| 
|
वा !! बी माझ्या शुभेच्छा तुझ्या उपक्रमाला ..
|
Ek_mulagi
| |
| Tuesday, January 23, 2007 - 8:20 am: |
| 
|
बी, खूप छान उपक्रम. अभिनंदन.
|
Runi
| |
| Tuesday, January 23, 2007 - 11:31 am: |
| 
|
बी मी नेहमी फक्त विचारच करत रहाते असे काही तरी करण्याचा.....तू ते चक्क करुन टाकलेस, ते पण इतक्या सहजतेने...तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
|
Ashwini
| |
| Tuesday, January 23, 2007 - 11:53 am: |
| 
|
बी, खरच कौतुक आहे तुझं. तुझी ऊर्जा अशीच positive कामांसाठी वापर. तुझी मतं शब्दातून पटवून देण्याचा प्रयास करण्यापेक्षा अश्या कृतीतूनच त्यांना बोलू दे. हे संस्कारवर्ग संपले की गुरूदक्षिणा म्हणून त्या मुलांना एकच माग, मोठे झाल्यावर अश्याच प्रकारचे संस्कार त्यांनी किमान एकातरी मुलावर करावे. ज्योतीने ज्योत तेवत ठेवता येते.
|
Adi787
| |
| Tuesday, January 23, 2007 - 4:31 pm: |
| 
|
वा, छानच! तुझे हे समाज प्रबोधन असेच अखंड चालु राहो, हीच श्री चरणी प्रार्थना !!!
|
Bee
| |
| Tuesday, January 23, 2007 - 11:23 pm: |
| 
|
प्रतिक्रिया आणि प्रौत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार.
|
Manuswini
| |
| Wednesday, January 24, 2007 - 2:54 am: |
| 
|
बी पुन्हा एकदा स्तुत्य उपक्रम!!
|
Nalini
| |
| Wednesday, January 24, 2007 - 5:56 am: |
| 
|
बी, अगदी कौतुकास्पद उपक्रम आहे हा. तुझे हे समाजोपयोगी कार्यक्रम नित्य चालू राहो. अश्विनीला माझे अनुमोदन.
|
Marhatmoli
| |
| Wednesday, January 24, 2007 - 11:52 am: |
| 
|
अभिनंदन Bee , अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. अश्विनिला माझेहि अनुमोदन.
|
Arch
| |
| Wednesday, January 24, 2007 - 2:02 pm: |
| 
|
बी, मनापासून अभिनंदन. तू तुझ्या सुट्टीचा नेहेमी सदुपयोग करतोस. खरच कौतुक वाटत.
|
Prajaktad
| |
| Wednesday, January 24, 2007 - 3:27 pm: |
| 
|
लगे रहो ' बी ' भाई ! स्तुत्य उपक्रमाबद्दल तुझे आणी तुला साथ देणार्या सगळ्यांचेच अभिनंदन.
|
Gs1
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:42 am: |
| 
|
बी, अतिशय छान उपक्रम सुरू केला आहेस तू. अभ्यासक्रम, कार्यक्रम, खेळ, गाणी, गोष्टी, श्लोक व नियोजन याबद्दल मी काही नियमित मदतीची व्यवस्था करू शकेन संस्कारवर्ग शिक्षिकांसाठी. अशी काही आवश्यकता असेल तर ईमेल पाठव. बी चा लेख वाचून, अशा वर्गांकरता आपण सायंकाळी नियमित वेळ द्यावा वा देउ शकतो असे पुण्यातल्या कोणाला वाटत असेल तर त्यांनी कृपया संपर्क साधावा.
|
Manuswini
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:03 am: |
| 
|
बी तुला एक suggestions देवु का? ह्या संस्कार वर्गात तु लहान मुलांना आपली स्वःताची आरोग्याची निगा, general aptitude वाढतील अशी नाटक, गाणी arrange करु शकतोस. मी स्वःता इथे संस्कार वर्ग आवड म्हनुन घेतले आहेत. आता इथे ते वेगळी गरज म्हणुन indian parents आणत. म्हणजे भारतातील culture ची ओळख व्हावी, सण वार कळावे वगैरे वगैरे. तेव्हा मी अशी नाटके म्हणजे झाशीची राणी, इसाप नीती तील गोष्टी वाचुन दाखवायची. माझे पण मराठी चांगले झाले.
|
Milya
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:47 am: |
| 
|
बी खरेच छान उपक्रम आहे. हा उपक्रम उत्तरोत्तर वाढत जावो अशी शुभेच्छा...
|
Chinnu
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:26 pm: |
| 
|
बी, मनु अभिनंदन! खुप खुप शुभेछ्छा!
|
Laalbhai
| |
| Friday, January 26, 2007 - 5:44 am: |
| 
|
बी मस्त उपक्रम. मागे तो काही वाचानाचाही उपक्रम आपण सुरु केला होता, असे मला वाचल्याचे आठवते आहे. उपलब्ध वेळेत चांगले काम करत आहात. एक मित्रत्वचा सल्ला. (त्याची तुम्हास आवश्यकता नाहीच!) अशा सामाजिक कामात लोकं एकत्र येतात आणि मोठा गट तयार होतो. अशा नवख्या गटाला आपल्या बाजुला वळवून घ्यायला सगळेच राजकिय नेते / पक्ष तयार असतातच. त्यासाठे ते अनेक क्लुप्त्याही वापरतात. सर्वसाधारण आपण ह्या सगळ्यातच नवीन असतो, त्यामुळे हा चालूपणा लवकर लक्षात येत नाही. आणि कधीतरी आपल्या नकळत एखादा राजकिय पक्ष "ही आमचीच non राजकिय संघटना आहे!" असे आपल्या गताविषयी बिनदिक्कतपणे जाहिर करुन टाकतो. एकदा लागलेला शिक्का पुसणे अशावेळेस फार अवघड जाते. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. त्याचे details देण्यात अर्थ नाही. पण तुम्ही करताय ते फारच उत्तम आहे. पुढे हे रोप वाढेलच, पण त्यावर राजकिय छाप उमटू नये हीच इच्छा आहे. राजकिय छापाने या आणि अशा अनेक उत्तम उपक्रमांचे पूर्ण वाट्टोळे केले आहे, ह्याची अनेक उदाहरणे आहेत. राजकीय पक्षाशी किंवा विचारसरणीशी संबंधित लोकांना त्यांचे छाप तयार करण्यात जास्त रस असतो, ह्याची आपणास कल्पना असेलच. अशा हेतूने तुम्हाला कवेत घेऊ पहाणार्या छुप्या शत्रुंपासून सवध रहा, इतके आवर्जून सांगणे आहे. तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा. समाजातला फार मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते आवश्यकच आहेत आज समाजाला. धन्यवाद आणि शुभेच्छा.
|
बी अगदी मस्तं उपक्रम आहे. अभिनंदन.
|
Bee
| |
| Friday, January 26, 2007 - 6:31 am: |
| 
|
सर्वांचे मनापासून धन्यवाद! खरे तर ह्याला काही उपक्रम वगैरे म्हणता येणार नाही. वेळेचा सदुपयोग म्हणून हे एक अगदी छोटेसे कार्य आहे. असे कार्य ज्यात आपले खूपसे पैसे, शक्ती जाणार नाही, खूप धावपड होणार नाही आणि तरिही त्यातून आनंद आणि समाधान मिळेल. असो.. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद!
|
बी, छान उपक्रम आवडला, मीहि विचारत आहे अशा एखाद्या project बद्दल अजुन काहि असल्यास नक्कि महिती दे..!!!
|
Saee
| |
| Wednesday, February 07, 2007 - 6:54 am: |
| 
|
बी, कौतुक वाटतं तुझं खुप. आम्हालाही शिकण्यासारखं आहे हे तुझ्याकडुन.
|
|
|