Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 26, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through October 26, 2006 « Previous Next »

Daad
Wednesday, October 25, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या अनेक अनेक दिवसांत इथे फिरकले नाही. कुठे आहेत सगळेजण? का अजूनही फराळवर ताव मारणंच चालू आहे?
उगीचच असं वाटतय की आपण एखाद्या नेहमीच्या खेळण्याच्या जागी (पण रिकाम्या), बागेत वगैरे डोकावतोय आणि, एकदम सगळेजण येणार भॉ sssss करून लहानपण आठवलं!!
एकीच्या सोबतीला आलेली एक साजणी....
साजणी

जरा उशिराने आली, तुला जागऊ पहाट
मऊ केशरी उन्हाची, झाली जरीची किनार

ताम्रवर्णी कलशांत, धारा कधीच्या वाजल्या
कुलकुललेही पक्षी होण्याआधी गं पसार

ओव्या जात्याच्या संपल्या, वासुदेव आला गेला
धुळ उडवीत गेला रानी कधीचा खिल्लार

उन्हं थांबले अंगणी, ओठंगुन पायरीशी
काढलाही नाही ना गं गवाक्षाचा अडसर?

स्नान झाले ना, पूजन, केला सडा ना शिंपण
नको केर-वारा सये, आधी आपले आवर

ज्योतीवरी पतंगाचा, पाहवला ना जोहार?
दारी आला बघं तुझ्या, सार्‍या दुखा:चा उतार

नको करू वेणी-फणी, येण्याचीच साध वेळा
नको भर्जरी ओढणी, चोळामोळा ना होणार?

ओळखीचा पायरव, प्राजक्ताशी का थांबला?
वेचण्याला तुझ्यासाठी, केशरीया दहीवर

हास बाई, थांब जरा, निपटू दे गहीवर
आता निघते गडणी, आता माझाच जोजार?
-- शलाका


Vinya
Wednesday, October 25, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! काय सुंदर कविता आहे. शब्दांवर छान पकड आहे तुझी. आणि लयीवर सुध्धा. मजा आली.

Lopamudraa
Wednesday, October 25, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता आवडली.. अर्थ तुच तुझ्या शैलीत समजावुन दे ग.. म्हनजे अजुन आवडेल..!!!

Bee
Wednesday, October 25, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थ सरळ सरळ आहे लोपमुद्रा, रसग्रहाणाची तशी गरज नाही आहे ह्या कवितेला. to be frank!!!!!

जोजार म्हणजे काय शलाका...


Dineshvs
Wednesday, October 25, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, अगदी वेगळीच शब्दकळा. छान आहे, कविता

Swaatee_ambole
Wednesday, October 25, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, छान लिहीलंयस.
विशेषतः

ज्योतीवरी पतंगाचा, पाहवला ना जोहार?
दारी आला बघं तुझ्या, सार्‍या दुखा:चा उतार
आणि
ओळखीचा पायरव, प्राजक्ताशी का थांबला?
वेचण्याला तुझ्यासाठी, केशरीया दहीवर
हे आवडलं.

लोपा, मला समजला तेवढा अर्थ सांगते. शलाका, तू बरोबर आहे का ते सांग.

सहसा भल्या पहाटे उठून सडा सारवण, स्नान, पूजा करणारी ही स्त्री आज पहाट टळून चांगला दिवस उजाडला तरी उठलेली नाही. तिला जाग आली नाही म्हणा किंवा उठावंसं वाटत नाही. ज्योतीवर पतंगाचा जोहार ही प्रतिमा सहसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे विफल झालेल्या प्रेमासाठी वापरली जाते. इथे ही स्त्री अशीच कुणाची रात्रभर वाट पहात होती का? आणि अखेर तो येणारच नाही असं वाटून निराश आहे का?
तिची सखी तिला सांगत्ये, ' जरा उठून बघ, ज्याची वाट पहात होतीस, तो अंगणात येऊन खोळंबला आहे.. राहू देत रोजची कामं.. वेणीफणी.. आधी त्याला दार उघड..' पुढे ती तिची थट्टा करत्ये की साजशृंगार करण्यात वेळ का घालवत्येस? नाहीतरी आता ' तो' ते विसकटणारच आहे..

यातही, ' तो' तिच्या भेटीला येताना दोन क्षण थबकतो.. तिच्यासाठी प्राजक्ताची फुलं वेचायला.. हे फार ह्रदयंगम आहे.

जोजार या शब्दाचा मला माहीत असलेला अर्थ ' त्रास'. आता ' तो' आल्यामुळे ही सखीही ज्याला बोलीभाषेत ' कबाब मे हड्डी' म्हणतात तशी होणार आहे, हे ही ती खिलाडूपणे मान्य करते, आणि काढता पाय घेते.

काय बी, पुन्हा प्रियकर - प्रेयसी? तोच तोच विषय? बरोबर?? चूक!!
आता यात ' ती' म्हणजे एखाद्या ध्येयासाठी वेडं झालेलं आणि वाटेत निराश होणारं कुणीही, आणि ' तो' म्हणजे यश अशी कल्पना करून बघ. समज की ज्योतीवर धाव घेऊन जळणारे पतंग म्हणजे जे असाध्य ते साध्य करायचा ध्यास घेऊन त्यात सर्वस्वाची आहुती देणार्‍यांची उदाहरणं.
बघ, काही निराळा आशय आणि अन्वय समजतो का?


Chinnu
Wednesday, October 25, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, अर्थ समजावुन सांगितल्याबद्दल खुप धन्यवाद. शलाका कविता या आधी वाचली तेव्हा मला शेवटल्या ओळी कळाल्या नव्हत्या. आता मात्र अगदी लख्ख उजेड पडला! :-)
स्वाती, अतीवसुंदर उदाहरण दिलेस ध्येयासाठी हपापल्या मनाचे. Kudos to you! .

आणि शलाका, कित्ती कित्ती सुंदर शब्द ते,

उन्हं थांबले अंगणी, ओठंगुन पायरीशी
काढलाही नाही ना गं गवाक्षाचा अडसर?

व्वा! आणि-

ओव्या जात्याच्या संपल्या, वासुदेव आला गेला
धुळ उडवीत गेला रानी कधीचा खिल्लार

मस्त!!
आणि दहिवर म्हणजे दवबिंदु का? त्यापण ओळी सुरेख आहेत.


Ashwini
Wednesday, October 25, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, अग किती सुरेख लिहीलं आहेस ग. आणि स्वाती तुझं रसग्रहणही काय देखणं आहे. फारच सुरेख.

Vaibhav_joshi
Wednesday, October 25, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम

ते म्हणाले, ' प्रेम अमुचा विषय नाही!'
मी म्हणालो, ' का? तुम्हाला ह्रदय नाही??'


एकदा तूही भिडव डोळे जगाशी
रोज झुकणे पाप आहे, विनय नाही

ध्वस्तले कित्येक आडोसे मनाचे
थांबला पण आसवांचा प्रलय नाही

आजही आहे अबाधित व्यसन माझे
राहिली तुजलाच माझी सवय नाही

गारद्यांचा काय मी द्यावा भरवसा
शब्द त्यांचा शब्द आहे, अभय नाही

माणसांनी निवड केली श्वापदांची
लोकशाहीचा मुळी हा विजय नाही

स्वाभिमानाचेच केवळ तेज आहे
भोवती माझ्या निराळे वलय नाही

सोडली मैफ़िल अता मी काजव्यांची
यापुढे गावात त्यांच्या उदय नाही..


Daad
Wednesday, October 25, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती ताई, अर्थ अगदी चपखल आणि म्हणूनच अप्रतीम!! मला खरतर, तसा लौकिक आणि शब्दातून येणारा अर्थच प्रतीत होता. पण एक वेगळा विचार मांडून तू ह्या माझ्याच कवितेबद्दल मला विचार करायला भाग पाडल आहेस.... खरंच आवडलं!
सगळ्यांचेच आभार!!
वैभव - 'एकदा तूही भिडव डोळे जगाशी
रोज झुकणे पाप आहे, विनय नाही '
आणि - 'माणसांनी निवड केली श्वापदांची
लोकशाहीचा मुळी हा विजय नाही '
छ्छे.... हर एक शेर खणखणीत नाण्यासारखा..... आमच्या गावाकडल्या भाषेत सांगायचं झालं तर - 'आक्शी गुळधाव सोनं.....'!!




Lopamudraa
Wednesday, October 25, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती नेहमीप्रमाणेच तुझ्या शैलीत छान सांगितलेस.. मी याच अर्थाची एक कविता खुप पुर्वी केली होती.. पन एवढे निरनिराळे शब्द.(शब्द समर्थ्य). माझ्याकडे नव्हते..
म्हणुन कविता पुर्ण समजवुन घ्यावीशी वाटत होती.. thanks again ..तुझ्या अर्थांनी कविता अजुन सुंदर वाटु लागली..!!!

वैभव खुप जोरदार.... मस्त आहे.. कविता..!!!


Meenu
Thursday, October 26, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा शलाका सुंदरच फारच गोड लिहीतेस तु .. आणी किती छान छान शब्द माहीती आहेत तुला .... अप्रतिम स्वातीच्या रसग्रहणानी मजा आणली त्यात ...

वैभव काय रे ठीक ना ..... गज़लेतला प्रत्येक शेर सुंदर रे


Bee
Thursday, October 26, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तुला वाटणारी ही प्रेमकविता मला मात्र मैत्रीमधील मस्करी व्यक्त करणारी कविता वाटते आहे. एक हिंदी गाणे आहे 'सुन सुन दिदी तेरे लिये ईक रिश्ता आया है' ह्या गीतात जशी मस्करी चाललेली असते तशी मस्करी इथे एक मैत्रीण आपल्या मैत्रीणीची करते आहे..

Seema_
Thursday, October 26, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कविता . आणि त्याहुनही सुंदर स्वातीच रसग्रहण . Great.

Sarang23
Thursday, October 26, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, कवितेतील शब्द खास नादमय!
कवितेचा गाभा एकंदर, सुरेश भटांच्या...

सजण दारी उभा काय आता करू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?


...सारखा वाटला

निनावी, तुझे रसग्रहण मस्त!!

वैभवा... मतल्यात अमुचा वापरून तुही समुचा अमुचा संप्रदाय सार्थ केलास रे!
मतला जरी झकास असला तरी मला मात्र स्वतःला सूर्य म्हणवणारा शेर आवडला...... ( जरी त्यातला फ़ि चा नुक्ता खटकलाय... )
वा!!! फार छान गझल, पण काही हझलेचे शेर वगळता आले असते अस वाटून गेलं


Himscool
Thursday, October 26, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, छान कविता..
स्वातीच्या रसग्रहणामुळे जे काही शब्द आडले होते ते कळाले आणि सगळा अर्थ व्यवस्थित कळाला..
वैभव मस्त आहे गझल..


Asmaani
Thursday, October 26, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, स्वाती वैभव. छानच!

Swaatee_ambole
Thursday, October 26, 2006 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर गज़ल, वैभव!

मलाही ' अमुचा' खटकलं. पण बराच विचार करूनही पर्यायी शब्दरचना सुचली नाही. सारंग, तुला काही सुचतंय का?

बाकी मतला आहे झकास! आपण तर तो वाचूनच गारद झालो! जियो!!
इतरही सगळेच शेर सुंदर आणि आशयघन आहेत.

सारंग, हज़ल म्हणजे विनोदी गज़ल ना? ( मला नक्की माहीत नाही म्हणून विचारत्ये.) यात तुला कुठले शेर तसे वाटले? तसंच मैफ़िल चा नुक्ता का चूक आहे?

काय बी, तुला काही भाष्य नाही का करावंसं वाटलं या गज़लेवर? की आपल्याला कळली नाही हे कळलं??


Paragkan
Thursday, October 26, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह दाद .. क्या बात है!

वैभव .... चांगली आहे गजल.
आणि इतक्या मनावर घेऊ नको रे त्या प्रतिक्रीया ...
:-)

Dineshvs
Thursday, October 26, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मी मागेहि तुला म्हणालो होतो, कि ईतके मनाला लावुन घेणे चांगले नाही.
स्वती, तु सांगितलास ते एकदोन शब्द जरा अपरिचीत आहेत खरे, पण दाद ची कविता समजायला अजिबात अवघड नाही. पण मुळात कविच्या मनात काहि वेगळा अर्थ होता का ? ते मात्र कळायला हवे. मला फक्त ओढणी हा शब्द खटकला, कारण बाकिचे वातावरण मराठमोळे आहे.







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators