मायबोलीची कहाणी || श्री || ऐक देवी मायबोली तुझी कहाणी. अमेरिका नामक देशात एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब*१ ब्राह्मण*२ रहात होता. त्याची त्याहून गरीब*३ स्त्री होती. तिने काय करावे? सकाळी उठावे, घरातील सर्वांच्या त्रिकाळ खाण्याची व्यवस्था करावी, आपले व मुलांचे आवरावे, मुलांना शाळेत व पतीला ऑफिसात धाडावे. आपण आपल्या ऑफिसात जावे. तिथे पाट्या टाकून घरी यावे. पुन्हा कामाला जुंपावे. तिला आपल्या माहेरची, आपल्या गावाची खूप आठवण यावी. तिने अट्टाहासाने पूजाअर्चा, सणवार करावे. मुलाबाळांना त्यांची माहिती करून द्यायला धडपडावे. माणसे खूप जोडावीत, परंतु कोणी समानशील, समानधर्मी न भेटावे. म्हणून हिने कष्टी व्हावे. एकदा ही स्त्री ऑफिसात पाट्या टाकत असताना तिच्या मैत्रिणीचा संदेश आला. ती अत्यंत आनंदात दिसत होती. हिने तिला विचारले, ' बाई, तुझ्या आनंदाचे रहस्य काय?' तेव्हा ती म्हणाली, ' मी दिवसरात्र मायबोली मातेची उपासना करते. तिच्या कृपेनेच मी आज सुखी आहे.' हिने विचारले, ' बाई बाई, मलाही हे व्रत सांगा.' ती म्हणे ' बघ हो, उतशील मातशील, घेतला वसा टाकशील..'. ही म्हणाली ' उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. पण तुम्ही हे व्रत मला सांगाच.' त्यावर मग तिच्या सखीने मायबोली व्रताची दीक्षा तिला दिली. हे व्रत कसे करावे? सकाळी ऑफिसमधे आल्याआल्या मनोभावे मायबोलीवर यावे. आपल्या शहराच्या बीबीवर जाऊन तिथे पडलेल्या नवीन पोस्ट्सना शक्य तितक्या खवचटपणे उत्तरे द्यावीत. नवीन पोस्ट्स न दिसल्यास त्यावरून विनोद करावेत. विनोदाच्या दर्जाची चिंता करू नये. प्रत्येक पोस्टमधे दात विचकावेत, तसेच दिवसाकाठी निदान एका बीबीकराला एक दिवा अर्पण करावा. अश्या रितीने आपल्या ग्रामदेवतेला वंदन करून मग इतर बीबी धुंडाळावेत. रात्रीच्या अपचनाचे उट्टे गुलमोहोरावर जाऊन काढावे. कुणी नवीन साहित्य प्रकाशित केलेले दिसले की त्याच विषयावर त्याच पद्धतीचे लिखाण आपण आपल्या नावाने पोस्ट करावे. त्या विषयाचा चावून पूर्ण चोथा होईस्तोवर हे करत रहावे. आपल्या मित्रमंडळींची(च) वाहवा करावी व इतरांचा अनुल्लेखाने वध करावा. मायबोलीतल्या साहित्याला शक्यतो हिंदीत वा पंजाबीत (बहोत खूब, क्या बात है, जियो, लगे रहो, तुस्सी ग्रेट हो, त्वाडा ज्वाब नहीं) अभिप्राय द्यावेत. अभिप्राय न सुचल्यास (पक्षी साहित्य डोक्यावरून गेल्यास) केवळ 'केवळ !!' इतकेच म्हणावे. 'तू अशक्य आहेस' अशी चमत्कृतीपूर्ण विधाने करावीत. ललितवर अभिप्राय देताना रडक्या चेहेर्याची आणि विनोदी लिखाणावर देताना खदाखदा हसणारी स्मायली टाकावी. तसेच ललितवरच्या अभिप्रायात 'डोळ्यांतून पाणी काढलंत हो / काढलंस गं !!' असं म्हणायला विसरू नये. मग पाककृतींच्या बीबीवर जावे. तिथे असलेल्यातलीच एखादी रेसिपी घेऊन त्यावर 'लुकिंग फॉर' मधे प्रश्न टाकावा. 'बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात काय फरक आहे?', 'तुमच्या रेसिपीत अर्धा तास म्हटलंय, मी ३२ मिनिटं ठेवलं तर चालेल का हो?', 'मला आहारात लोह वाढवायला सांगितलंय.. तव्याला धिरडी हमखास चिकटवण्यासाठी काय करता येईल? तवा लोखंडीच हवा की बिडाच्या तव्यातून पुरेसं लोह मिळतं? नॉनस्टिक चालणार नाही का?' यापैकी एखादा प्रश्न विचारावा. इतके होईस्तोवर जेवणाची वेळ होते. तेव्हा पार्ल्याच्या बीबीवर जावे. कोण, काय, किती (आणि कुणाकडून आणून) जेवलं याची चर्चा करावी. जेवून तरतरी आली की V&C वर जावे. ज्या विषयाबाबत आपल्याला सर्वात जास्त अज्ञान असेल अश्या विषयावर प्रक्षोभक मत नोंदवावे. लाल वा भगव्या रंगात नोंदवता आल्यास उत्तम. कुणी विरोध केल्यास त्यांना खुशाल जातीयवादी, अतिरेकी वगैरे म्हणून मोकळे व्हावे. वर ऍडमिनकडे तक्रार करावी. हे करून दमछाक झाली की पीपी च्या बीबीवर जाऊन चहासाठी जोगवा मागावा. हे सगळे करत असताना आपण ऑफिसमधे आहोत हे पूर्णपणे विसरता यायला हवे. बॉस कामाबाबत विचारायला आल्यास त्याच्याकडे त्रासिक कटाक्ष टाकावा. वेळीअवेळी आणि अस्थानी मायबोलीवरचे (आपणच केलेले) विनोद आठवून हसावे. इतके ऐकून होईस्तोवर हिची खिन्नता दूर झाली. म्हणाली 'बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर व्रत केल्याचं काय फळ?' तेव्हा तिच्या सखीने पुढीलप्रमाणे सांगितले. हे व्रत मनोभावे केल्यास मायबोली प्रसन्न होते. आपली समानशील माणसांशी संवाद साधायची भूक भागते. नवीन जिवलग मित्रमैत्रिणी भेटतात. त्यांच्याबरोबर बोलता, हसता येते, मन मोकळे करता येते. अडचणीच्या प्रसंगी सल्ला मागता येतो. ' आपण एकटे नाही' याची जाणीव होते. दोन दिवस दिसलो नाही तर ' कुठे आहेस गं?' म्हणून चौकशी करणारं कुणीतरी आहे हे समाधान मिळतं. आपण काही चांगलं करून दाखवल्यास आपुलकीने शाबासकी मिळते आणि चुका केल्यास अधिकाराने कान उपटले जातात. विविध वयांची, विचारांची, विविध कलांत निपुण, विविध क्षेत्रांत समाजोपयोगी कार्य करणारी लोकं एका ठिकाणी भेटतात. ज्याचा अभिमान वाटावा अश्या एका मोठ्ठ्या कुटुंबाचा भाग असल्याचं सुख मिळतं. हे ऐकून त्या स्त्रीने पुढे कायम या व्रताचे मोठ्या मनोभावे आचरण केले आणि देवी मायबोलीच्या कृपाप्रसादाने ती सुखात राहिली. जशी मायबोली तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवळाचे दारी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण. ***** तळटीप : १. गरीब हा स्वभावविशेष म्हणून आलेला आहे. आर्थिक स्थितीचा त्याचाशी संबंध असेल वा नसेलही. याविषयी अधिक जिज्ञासा दाखवू नये. अन्यथा देवी क्रोधाविष्ट होऊन मिळालेले पुण्य नष्ट होण्याची शक्यता आहे. २. ब्राह्मण हा जातीवाचक शब्द आहे. बरं, मग? ३. इथेही गरीब हा.... (टीप क्र. १ प्रमाणेच.) - स्वाती आंबोळे
|