पुणेरी खड्डे आणि प्रगती काय? चपापलात ना शीर्षक वाचून? चपापणारच! आयुष्यभर खड्डे चुकवित चुकवित, त्यांच्यापासुन तोंड लपवित येणारेजाणारे तुम्ही, कधी विचार करणार खड्ड्यातून प्रगतीचा? शेवटी मराठी माणूस, हो, पुणेरी असला म्हणुन काय झालं, पण प्रगतीच्या खड्डेभरल्या वाटांवर वाटचाल करायला बिचकणारच! उगीच नाही मराठी माणूस व्यवसाय उद्योगात माग पडला! तर मी काय सांगत होतो की, खड्ड्यांमुळे सर्वांगिण सामाजिक उन्नतीचा मार्ग कसा खुला होतो ते पुण्याने सिद्ध करुन दाखविले आहे. प्रगतीचे फायदे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे तर "पुणेरी रस्ताभरखड्डे" या पॅटर्नचा विचार भल्याभल्यांना करायला लागणार. नव्हे नव्हे, युरोप अमेरिकेतले प्रगत देश आता पुण्यात अभ्यास दौरे काढु लागल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर आता सुवर्णचतुष्कोन सारख्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या योजनाही बासनात गुंडाळून ठेवल्या जातील. असं काय विशेष आहे या "पुणेरी रस्ताभरखड्डे" योजनेत? असं विचारता? ऐका तर मग! सोदाहरणच सान्गतो! नित्यनेमाने खड्डे बुजविण्याच्या कामामुळे किती मोठ्ठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते याचा कधी विचार केलात का तुम्ही? खड्डेच नसतील तर ही सर्व तळागाळातील उपेक्षितांचे जीवन जगणारे लोक बेरोजगार होणार नाहीत का? खड्डेविरहीत रस्ते ही भांडवलदारांची चैन असून उपेक्षितांना अधिक उपेक्षित करण्याचे षड्यंत्र आहे असे नाही का वाटत तुम्हाला? मी विचारलं तुम्हाला पण तुम्हां अल्पसंख्य पांढरपेशांना काय वाटतं याचा विचार करणारच आहे कोण? बर ते राहूदे बाजूला! मूळ विषयाकडे वळू. तर खड्डे बुजविण्याच्या कामामुळे प्रचंड संख्येने रोजगार निर्मिती होऊ शकते, पुण्याच्या महानगरपालिकेचे अनुकरण राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या सर्वच पालिकांनी केले तर हजारो लोकांच्या तोंडात दोन श्रमाधारीत घास सुखाचे पडतील. ही एक क्रांतीच नव्हे काय? पुर्वी काय होतं ना की एक उपेक्षित समाज दगडांच्या खाणीतून जीवावर उदार होऊन पहारीने दगड फोडुन काढायचा! इंग्रज आले नि त्यापाठोपाठ सुरुंग आले आणि त्या गरीब बिचार्या कष्टकर्यांचा रोजगार बुडाला तेव्हा ते खडी फोडायची कामे करु लागले, पण पुढे भांडवलदारांनी आणलेल्या मोठमोठ्या क्रशर्स मुळे खडी फोडायच्या रोजगारापासुनही हा तळागाळातला समाज वंचित झाला, कोणी घ्यायची याची जबाबदारी? नाही, दचकू नका, तुम्ही घ्या त्यांची जबाबदारी अस म्हणतच नाहीये मी. पुणे मनपाने पुण्यापुरती ही जबाबदारी केव्हाच उचलली आहे. म्हणजे असं आहे बघा, खड्डे दुरुस्त करताना, रस्त्यांवर अर्ध्या एक फुटाची खडी पसरवायला लागते की नाही? मग? पुर्वी खाणीत मोठ मोठे पत्थर फोडणारे, नंतर खडी फोडणारे हात आता या खडी पसरविण्याच्या कामास येऊ लागले, झाली की नाही त्यांच्या पोटापाण्याची सोय? अवो असं काहून चष्म्यातून बघून र्हायले माह्याकडे भोचकपणे? मी काय खोट बोल्लो का? वंगाळ बोल्तोय का? मग? आता असं बघा, अमेरिका हे ना? अवो मुंडी काय हलवताय नंदीबैलावाणी, तोंडानं बोला की राव... हाय की नाय? हाये! तर तिची प्रगती कशामुळे झाली? अहो तुमच्याच अर्थशास्त्राचा नियम हे! वापरा अन् फेकुन द्या, की ते ते नवं बनविण्याचा उद्योग जोमानं चालतो. आता तुमची ही बाईक बघा, किती वर्ष जुनी हे हो? तरी बघा, टायर कस्से नव्वे कोरे हेत. वापरलेच नाहीत तर झिजणार कुठुन? अन् गुळगुळित रस्त्यान्वर वापरले तर फेकायची वेळ तरी कधी येणार? आणि फेकले नाहीत तर देशातला टायर उद्योग तगणार तरी कसा म्हणतो मी! अन् तो उद्योग तगला नाही तर तिथल्या कामगार वर्गानं काय टाचा घासुन मरावं का? नाही, त्रिवार नाही. टायर उद्योगाची आकडेवारी असे दर्शविते की गेल्या दोन वर्षात पुण्यातील टायर आणि ट्युबची खपत कमालीची वाढली हे आणि त्याबद्दल ते मनपाचे आभारी आहेत. आहात कुठे तुम्ही राव! अन् झालंच तर पंक्चर काढणार्यांच्या टपर्या गल्लोगल्ली सुरु होवुन त्यांना रोजगार मिळतो अन् मनपाला टॅक्स मिळतो हा अधिकचा फायदा! अन् ते शॉक ऍबसॉर्बर वाले हो, पुर्वी गाडीला शॉक ऍबसॉर्बर आहेत की नाहीत याची फिकीरच कोणाला नसायची, आता कसं अधिकाधिक गचके अन् दणके सहन करु शकणारे शॉक ऍबसॉर्बर बनविण्याची नुस्ती अहमहमिका लागली हे! खड्डे नसते तर कुणी प्रगत शॉक ऍबसॉर्बर चा विचार तरी केला असता का? तुमचे पोट्टे पोट्टी नुस्ती इंजिनिअरच्या डिग्र्या घेऊन उपयोग काय? आरेन्डी मध्ये त्यांना काम नको मिळायला? पुणेरी रस्ताभरखड्ड्यांनी त्यांना काम देववलं आहे! ह्या पुणेरी रस्ताभरखड्ड्यांचा एक आगळावेगळाच उपयोग नव्यानेच सिद्ध झाला आहे! तुम्ही टीव्ही बघता नव्हं? त्यात नाय का त्या व्हायब्रेटर लाऊन स्लिम व्हायच्या जाहिराती असतात? आंगाक्षी! त्याच त्या! अहो आता असले महागडे व्हायब्रेटर घ्यायची गरजच पडत नाही, पुणेरी रस्ताभरखड्ड्यातून रोज दोन किलोमीटर जरी फिरल तरी पुरेस व्हायब्रेशन बॉडीला मिळतय अन् समद्यांचा बांधा कसा सुबक कमनिय होतो आहे! बिनखर्चात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी पुणे मनपा श्रेष्ठच नव्हे का? काय हो? पुणे अन् पिंचीची प्रगती वाहन उद्योगामुळे झाली हे तर मान्य आहे? पुण्यात दुचाकींची संख्या किती भरमसाठ आहे! अन् या समद्या दुचाक्या त्यांच्या बुंग्गाट इस्पीडने पळु लागल्या तर पुण्यात रोज किती एक्सिडेण्ट्स होतिल? तशात हल्ली स्पीडब्रेकरवर बन्दी आली आहे, सहा इंचाचा स्पिडब्रेकर काय कप्पाळ गाडी थांबवणार? पण त्यावर नको बोलुयात, न्यायालयीन मामला आहे तो! होतं काय की रस्ताभरखड्ड्यामुळे या वाहनांचा वेग सर्वदूर रस्ताभर आपोआपच मंदावतो आणि वेगामुळे होणारे अपघात टळतात हा भरीव फायदाच नाही का? तुम्हाला ठावं हे का? या सालच्या दुचाकींच्या रफ अन् टफ क्ले रोडच्या अडथळ्यांच्या शर्यतीत पुण्याच्या दुचाकीस्वारांनी सगळ्यात जास्त बक्षिसे मिळवली. त्यांच्या यशाचं रहस्य म्हणजे पुण्याचे रस्ताभरखड्डे! आता हे पुणेरी स्पर्धक जागतिक पातळीवर पुण्याचा झेंडा फडकवू लागले तर नवल वाटायला नको! तुम्हाला म्हणुन हळुच सांगतो, या पुणेरी रस्त्यांचा अजुन एक फायदा आहे! गाडी चालविताना आता कुणी इकडतिकडची हिरवळ बघत गाडी चालवुच शकत नाही. त्यामुळे तमाम हिरवळ अशा टुकार कटाक्षांपासून मुक्त झाली आहे आणि इकडे तिकडे लक्ष न वेधता एकाग्रपणे रस्ताभरखड्ड्यातून गाड्या चालविल्यामुळे पुणेरी लोकांची योगिक शक्ती वाढत चालली आहे! पुण्यात की नाही, बुरख्याची सक्ती करावीच लागत नाही, धुळीच्या भितीने अन्गभर तर झालच तोंडावरही कापड गुंडाळून तमाम कन्यका जेव्हा गाड्या चालविताना दिसतात ना तेव्हा तमाम संस्कृती रक्षकांचे उर कसे अभिमानाने भरुन येतात. बोला, तर मग अजुनही ठेवाल का नावं पुणेरी रस्ताभरखड्ड्यांना? की कौतुक कराल? - लिम्बुटिम्बु
|