« | »




एका जेवणाची गोष्ट

जपानच्या नैऋत्येला एक सुंदर द्वीपसमूह आहे. त्याचे नाव ओकीनावा. ऑफीसातले दोघं आणि आम्ही दोघं तिथे जाणार होतो.

तिथे सगळ्यांचं मिळून एक शानदार Team dinner करायचं ठरलं. तिथल्या रिसॉर्ट मधल्या चार पाच उपहारगृहांचे मेनू महाजालावरुन पाहिल्यावर, "आम्हाला खायला काय मिळणार?" असा यक्षप्रश्न पुढे उभा राहीला. त्या सर्व खाद्यपदार्थांच्या यादीत फक्त टोमॅटो आणि कारलं एवढे दोनच पदार्थ शाकाहारी दिसत होते. आता असल्या उपर्निर्दिष्ट उपहारगृहात शाकाहारी जेवण मागायचं त्राण माझ्यात नव्हतं. निकोलस बुकींग करत होता. त्याची बायको जपानी म्हणून त्याचं जपानी माझ्यापेक्षा फरडं. तो म्हणाला, "चल, तू राहू दे! मी करतो आपल्या टीम डिनर साठी बुकींग". बाकीच्यांना चायनीजचे डोहाळे लागले होते; म्हणून चायनीज उपहारगृहाला पहिला फोन लावला. सुमारे चार फोन झाल्यावर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला एकदाचा की आम्हाला एक चार जणांचे रात्रीचे जेवण बुक करायचे आहे व चौघातले दोघं, शाकाहारी आहेत. मग पुढची चार संभाषणं "शाकाहाराची व्याख्या" याच्यावर झाली. ट्युना चालतं का? एबी ( shrimp ) चालतं का? बेकन चालतं का? इथपासून सुरुवात झाली ती चिल्लर पदार्थांपर्यंत येऊन ठेपली. म्हणजे साखर चालते का? वगैरे. निकोलस बिचारा उत्तरं देऊन देऊन जेरीला आला होता. शेवटी आठ संभाषणांनंतर त्यांनी शेवटी आम्हाला एक खास शाकाहारी मेन्यू कळवला. तो बघून आम्ही थक्क झालो.

सहा कोर्सेसचं ते महागडं जेवण खालीलप्रमाणे होतं -

Vegetarian Prawn Salad
Vegetarian Duck Starter
Vegetarian Pork Main course वगैरे.
असलं ते सगळं!

"दिङ्मूढ" का काय म्हणतात ना मराठीत, तशी अवस्था झाली! मग सर्वत्र चौकशी सुरु झाली. एकाचं म्हणणं - "अगं म्हणजे ज्या प्राण्यांना शाकाहारी अन्न खाऊ घालतात त्यांचेच मांस". डोंबल! हे स्पष्टीकरण काही पटत नव्हतं. असं कसं असेल? मग कोणीतरी म्हणालं - "Google it". हे बरंय एक; गूगल अस्तित्वात आल्यापासून. When in doubt- Google it. If you still can't find it- it does not exist! हे तत्त्व आचरणात आणलं. (हे तत्व वरकरणी चांगलं वाटत असलं, तरी भलतंच झोप उडवणारं असू शकतं. मैत्रिणीच्या जावेच्या शेजारच्या सासूबाईंना अलीकडे कसलातरी तब्येतीचा त्रास होत होता. त्यांचा महाजालावर अतूट विश्वास. त्यांनी रोगाची लक्षणं गूगल केली, तर ती म्हणे कसल्याश्या कॅन्सरची निघाली - झालं! एवढ्यावरनं त्यांच्या मनाने घेतलं, की आपल्याला अमुक एक असाध्य रोग जडलाय. सगळ्या चाचण्या होऊन आणि हजारो डॉलर खर्चून निदान झालं की किरकोळ तक्रारी आहेत - कुठलाही असाध्य रोग नाही. तात्पर्य, गूगलवर डोळे झाकून विश्वास टाकू नये. जिज्ञासूंनी खात्री करून घ्यावी!) असो.

तर गूगलवर असले अनेक vegetarian pork/beef वगैरे लिहीलेले मेन्यू सापडले. पदार्थांची कृती येणेप्रमाणे - "व्हेजिटेरियन ऑयिस्टर सॉसमधे व्हेजिटेरियन पोर्क मिसळा - गरमागरम व्हेज पोर्क तयार!" पण म्हणजे हा पदार्थ सामिष की निरामिष हे मात्र कळेना. आणि शिवाय ही असली कृती लिहिणार्‍याच्या XXX ची टांग!

मग गूगलच्या पाचव्या सहाव्या पानावर एकदाचं काहीतरी सापडलं! त्यावरुन समजलं की हे fake vegetarian पदार्थ, 'ग्लूटेन' किंवा 'तोफू' पासून बनवतात. पैकी तोफू हे सोयाबीनपासून बनवतात ही अगाध माहीती होती. आता राहिलं ग्लूटेन - आता परत गूगल करणं आलं - पहिल्याच दुव्यात, " Gluten is an amorphous ergastic protein found combined with starch in the endosperm of some cereals, notably wheat, rye, and barley. " हे मिळालं. आता परत बर्‍याच शब्दांचा अर्थ शोधणं आलं! विज्ञानाशी माध्यमिक शिक्षणानंतर काडीमोड घेतल्याचे हे दूरगामी दुष्परिणाम! यावरुन मी बर्‍याचदा तोंडघशी पडले आहे. (उदा. १ - लोणच्याच्या बाटलीचं गच्चं बसलेलं झाकण उघडत नाही, म्हणून झाकणाच्या बाजूनी (काचेची) बाटली गॅसवर धरली, आणि गॅस फुल्ल ठेवला. मग ती छानपैकी फुटली. आणि लोणच्यातल्या मिरच्या व बाटलीच्या काचा, फूटभर वर उडून, ओट्यावर इतस्ततः विखुरल्या. माझ्या रुममेट अभियंता मैत्रिणीची, ओटा आवरायला मदत करता करता यावर ही मल्लिनाथी, "तुला basic physics माहीत नाही!"
उदा. २ - मायक्रोवेवमधे मैत्रिणीसाठी अंडं उकडत ठेवणे. हे जिज्ञासूंनी (आपल्या जिकीरीवर) करून पहावे).

मग कोणीतरी म्हणालं, "अगं ते 'Shojin Ryori' चा प्रकार असेल." ( Shojin Ryori म्हणजे चीनकडून आलेल्या, जपानात स्थिरावलेल्या झेन बुद्ध धर्मातल्या लोकांचे खास शाकाहारी जेवण.)
मग त्यावर माहिती वाचणं आलं. शेवटी आता ह्या प्रश्नोपनिषदाचं पठण मी बंद केलं. काहीतरी वनस्पतीजन्य आहे ना - असं म्हणून सोडून दिलं. निकोलसनी मेन्यू मंजूर असल्याचं त्यांना कळवलं.

सुमारे दोन महिन्यांनी ती संध्याकाळ उगवली. ओकीनावात दिवसभर पावसात आणि वादळात भटकून सगळ्यांना वैताग आला होता. सगळ्यांनी अवतार आवरून (म्हणजे अतोनात महागड्या जेवणाला साजेसा पोषाख करून) सात वाजता त्या चीनी उपहारगृहात भेटायचे ठरले. तिथे स्थानापन्न होईस्तोवर चीनी (का जपानी) व्यवस्थापक जपानी पद्धतीने वाकून अभिवादन करता झाला. आम्हीही वाकलो. मग निकोलसनी त्यांचे आमच्यासाठी खास शाकाहारी पदार्थ केल्याबद्दल आभार मानले. त्या व्यवस्थापकाने आम्हाला आणि आम्ही त्याला आपादमस्तक न्याहाळून घेतले आणि पहिला कोर्स आला - Vegetarian (नकली) Duck starter ! माझ्या आणि नवर्‍याच्या पुढ्यात आलेला, आणि टेबलाच्या दुसर्‍या बाजूला निकोलस आणि मासामिचीच्या पुढला खरा Duck यांच्यातील साम्य विलक्षण होते! मग, "आपल्याला चुकून त्यांचा पदार्थ नाही ना आला?" या शंकेची सगळ्यांच्याच मनात पाल चुकचुकली!
पण आता नाईलाज होता - आलीया भोगासी असावे सादर!
तरीही नवर्‍याने आधी खाऊन पाहिलं आणि मला म्हणाला, "अगं खा, नक्की ( नकली ) duck आहे!"
"तुला काय माहीत, तू कधी खरं बदक खाल्लंयस का?"
"डकला बदक म्हणू नकोस." (त्याच्या डोळ्यासमोर नक्की गोंडस शुभ्र बदक आलं असणार.)
"डकला मराठीत बदकच म्हणतात."
असले सवाल जवाब होऊन शेवटी मी ते प्रकरण खाल्लं; म्हणजे खाल्ल्यासारखं केलं. म्हणजे त्यावरच्या सगळ्या चेरी बेरींचे गार्निश आणि काही पानंबिनं फळं वगैरे सजावट खाल्ली आणि ते बदकसदृश राहू दिलं. ते मासामिचीनी, "बघू तुझं शोजीन डक कसं लागतं?" म्हणून संपवलं.

मग पुढचा पदार्थ आला. नशीब, हे पदार्थ 'मिया मूठभर आणि दाढी हातभर', किंवा कोकणस्थांच्या गौरींना देशस्थांच्या गौरींची आरास असावी, तसे असतात. म्हणजे मूळ पदार्थ कमी, सजावटच फार. एबी ( shrimp ) सालाड - ईश्वरसाक्ष खरं सांगते, त्या खोट्या एबीत आणि खर्‍या एबीत काऽऽही फरक नव्हता (दिसण्यात)! त्या तोफूपासून बनवलेल्या एबीवर चक्क केशरी पट्टे रंगवण्यात आले होते, आणि एबीच्याच आकारात ते होतं. पुन्हा एकदा बाकीची आरास खाल्ली आणि fake एबी इतरांनी संपवलं.

मग मुख्य पदार्थ आला. तो पाहून मात्र माझा धीर खचला. ते प्रकरण fake pork होतं, आणि चौघांच्या डीश एकत्र ठेवल्यावर पहाणार्‍याला कुठलं खरं आणि कुठलं खोटं ते सांगता आलं नसतं. अक्षरशः पोर्कसारख्या रेषा - बिषा रंगवल्या होत्या त्यावर. आता मात्र मी ते खायला साफ नकार दिला. त्या चीन्याला जपानीत नको म्हणून सांगितलं. त्याचाही चेहरा पडला. तो म्हणाला, "ग्लूटेनचं आहे, खोटं आहे." मी (उघड) "सॉरी, मला भूक नाहीये हो, प्लीज परत घेऊन जा!" (स्वगत) "हे असलं दिसणारं मी कालत्रयी खाणार नाही!"

नेलं बिचार्‍याने परत. इकडे निकोलस हसून लोळत होता. मला म्हणाला, " It took me two weeks to order that fake vegetarian food for you ! And there you go and decline it. I am telling you, the cook will be so offended that he is going to spit in your next course. " त्याला म्हटलं, "अरे खर्‍या मांसासदृष खोटं मांस देण्यापेक्षा त्यांनी निरामिष दिसणारं पण सामिष असलेलं काहीतरी दिलं असतं तर एकवेळ खाऊ शकले असते. एवढं रंगवून खर्‍या मांसासारखा दिसणारा पदार्थ बनवायचं प्रयोजन काय?" ते तिघंजण खो खो हसत सुटले होते.

ओकीनावाहून परत आलो. दुसर्‍या दिवशी ही "एका जेवणाची गोष्ट" निकोलस आणि मासामिचीनी सगळ्यांना सांगून लोकांची भरपूर करमणूक केली. मग जो तो उठून मला म्हणू लागला, "चल, आज जेवायला जाऊयात - जोनाथन मधे जाऊ."
"अरे पण तिथे मला काही खायला मिळत नाही."
"त्यात काय, तिथे आपण तुझ्यासाठी " Vegetarian (fake) Steak " मागवू!!!"

- रैना