|| जीवेत् शरदः शतम् || (एक प्रकटचिंतन) जीवेत् शरदः शतम्...सहसा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ही ओळ आठवते. एखाद्याला शंभर शरदऋतू बघायला मिळोत असा ह्याचा सकृतदर्शनी अर्थ. थोडक्यात ' शतायुषी व्हा'. पण मग शरद ऋतूच का? बोली भाषेत आपण खरंतर याचंच निराळं रूप ' मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत..' असं वापरतो. बहुधा प्रत्येक पावसाळ्याचा अनुभव निराळा असू शकतो.. म्हणून असावं. कधी दुष्काळ पडेल तर कधी अतीवृष्टी होईल.. कधी पावसाची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर होईल तर कधी खूप वाट बघायला लावेल.. बरं, आपल्यासारख्या कृषीप्रधान देशात सगळं जीवनच त्यावर अवलंबून. तिथे पावसाळ्याचा दृष्टांत कसा फिट्ट बसतो. की जणू आपण सांगत असतो की ' मी तुझ्यापेक्षा जास्त अनुभव घेतलेत - संख्येनेही, वैविध्यानेही ( range ), आणि तीव्रतेनेही ( intensity )'. शरद ऋतूचा संबंध मात्र सुगीशी आहे. आतापर्यंत केलेल्या कष्टाचं, प्रतीक्षेचं चीज व्हायचा हा काळ. जे पेरलं ते शतगुणित होऊन पदरात पडायचा काळ. विसाव्याचा काळ. हवेत गुलाबी थंडीची चाहूल (मुंबईत नव्हे.. तिथे ऑक्टोबर हीट!!), निरभ्र आकाशात पडणारं लख्ख चांदणं.. सगळा आसमंतच कसा सुखावलेला.. हा असा ऋतू शंभर वर्षं उपभोगायला मिळावा. नुसतं दीर्घायुष्य नव्हे, समृद्ध दीर्घायुष्य. मला अजूनही एक अर्थ जाणवतो या शुभेच्छेचा. चिरतारुण्य. एका अर्थी माणसाचं आयुष्यही अश्याच ऋतूंमधून जात असतं. वसंतातल्या कोवळ्या पालवीसारखं बालपण, ग्रीष्मासारखे ज्ञानार्जनाच्या, अर्थार्जनाच्या संधी मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांना पावसाळ्यासारखी मिळणारी बेभरवशी दैवाची जोड ( आणि काही ओले बहरसुद्धा).. हे सगळं पचवून जेव्हा जीवनात स्थैर्य येतं, त्या सगळ्या धडपडीचं फळ मिळायला सुरुवात होते तो काळ म्हणजे जीवनातला शरदऋतूच नाही का? शिवाय अजून ' पानं पिकायला' लागलेली नाहीत. ते हेमंतात होणार. थोडक्यात चणे हातात मिळायला लागलेत, आणि दात अजून काही वर्षं नक्की चांगले असणार आहेत अशी ही अवस्था. शिवाय आता इतके अनुभव घेतल्यानंतर सुख घेण्यातही आलेला एक प्रकारचा patience.. समंजसपणा.. हाच तर आयुष्यातला सर्वात सुंदर काळ.. ( आणि आम्ही आधुनिक करंटे तेव्हा Midlife Crisis मधून जातोय म्हणतो!!) ' जीवेत् शरदः शतम्'.. फक्त तीन शब्द. पण किती सुंदर सदिच्छा आहे त्यात. ह्याला म्हणतात काव्य. (' नाहीतर आम्ही!!' - असं म्हणत नाही.) ज्या कुणाला हे सुचलं त्याला माझे शतशः प्रणाम! जीवेत् शरदः शतम् !! जीवेत् शरदः शतम् !! - स्वाती_आंबोळे
|