« | »




आठवणी... कोकणातल्या गणपतीच्या

सिंधूदुर्ग जिल्ह्यात, मालवणजवळचं मसुरे हे आमचं छोटसं गाव. कोकणातल्या इतर गावांप्रमाणेच इथं पण निसर्गाने भरभरून दिलेलं. दहा-बारा वाड्यांचं, चांगलं उभं-आडवं पसरलेलं. गावातल्या ख्रेरवंद नावाच्या वाडीत आमचं टुमदार घर आहे. मागे हिरवा गर्द डोंगर, भरगच्च जंगल, मागच्या खळ्यापर्यंत पसरलेल्या आंबा-काजूच्या बागा, शेणानं सारवलेलं ऐसपैस खळं, जवळच कोपर्‍यात गोड पाण्याची विहीर, खळ्याच्या पलिकडे नारळी-पोफळीच्या बागेकडे घेऊन जाणारी मऊ हिरवी वाट, दोन्ही बाजूला भिरभिरणारी भाताची शेतं आणि या सगळ्याच्या मधोमध मांडा ठोकून बसलेलं, शे-दिडशे वर्षापूर्वीचं, मातीचं, कौलारू घर.... आमचं घर.

मी लहानपणापासून शहरात वाढलेला. शाळा, कॉलेज, नोकरी या रगाड्यातून वेळ काढून गावाला जायच्या संधी फारच कमी वेळा यायच्या. त्यातूनही गणपतीला जाण्याच्या संधी विरळच. पण ज्या एक-दोन संधी मिळाल्या त्या आठवणींचा अमोल ठेवा सोडून गेल्या. त्या एक-दोन भेटीत कोकणांतला गणेशोत्सव मनावर जी छाप सोडून गेलाय, ती आजही कायम आहे. किंबहुना आजच्या कर्कश उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ती अधिकच ठळक होत जातेय.

कोकणांतला गणपती म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात त्या रानफुलांनी आणि फळांनी नटलेल्या मांडवी, शेणाने सारवलेली घमघमणारी स्वच्छ जमीन, गावातल्याच कलाकारांनी घरातल्या भिंतींवर रंगवलेली पौराणिक चित्रं, सदैव तेवणारी समईची मंद ज्योत आणि सर्वांच्या मधोमध आसनावर प्रतिष्ठित गणरायाची प्रसन्न मूर्ती. इथल्या मूर्ती स्थानिक कलाकारांनीच घडवलेल्या. पेणच्या मूर्तींइतक्या सुबक नसतील पण इतर कुठेही गणरायाच्या चेहर्‍यावर इथल्याइतकं समाधान झळकत नसेल असं उगीच वाटत रहातं.

कोकणांत गणपती हाच सगळ्यांत मोठा सण. अमाप उत्साह, भजन, किर्तन, आवर्तनं अशी कार्यक्रमांची रेलचेल, एरव्ही एखाद-दोन टाळकी मिरवणारी आणि गणपतीला हमखास ओसंडून वाहाणारी घरं आणि या सगळ्याच्या जोडीला निसर्गानं शेवटचा हात फिरवलेलं अप्रतिम श्रावणलेणं.... इतकं सगळं असल्यावर दुसर्‍या कृत्रिम सजावटीची गरजच भासत नाही. गणपतीच्या सुमारांस इथे निसर्ग उधाणावर असतो. हिरव्या रंगाच्या असंख्य छटा, कुठे आणि कशा भरू असं त्याला होत असणार. हिरवीगार जमीन, अधुन्-मधुन वाहणार्‍या लालसर वाटा, श्रावण उन्हांत उजळून निघालेलं निरभ्र आकाश आणि एकूणच या सुंदर चित्राला दृष्ट लागू नये म्हणून मधे मधे पेरलेले रंगी-बेरंगी फुलांचे ठिपके.... फुलांनी दृष्ट काढणे सारखे वाक्प्रचार इथेच जन्माला आले बहुतेक.

इथे घरा-घरातून गणरायाचे लाड तर काय वर्णावेत! पूजा, सोवळं, नैवेद्य, गोडधोड सगळं यथासांग. रात्री आरत्यांचे सूर आणि नंतर 'देवे' घुमायला लागली की देहभान हरपून जातं. या सगळ्या उत्साहांत देवाच्या देवत्वाचं ओझं कुठेही जाणवत नाही हे महत्वाचं. देवाचं सगुण रूप इथं मनापासून जपलं जातं. इथं एक गंमत हमखास आठवते ती अशी लहानपणी एकदा गणपतींत गावाला गेलो होतो. रोज सकाळी गणपतीची यथासांग पूजा, आरती, नैवेद्य वगैरे होत असे. हे सर्व होते न होते तोच माझी आत्या स्नान करून सोवळ्याने दर्शनाला येत असे. नमस्कार करून झाला कि ती हळूच बाप्पाच्या पोटाला स्पर्श करून बघे. हे काय म्हणून विचारलं तर उत्तर ठरलेलं, "त्याचं पोट भरलं की नाही हे नको का कोणी बघायला?" आम्हाला तिचं ते वागणं तेव्हा बालिशपणाचं वाटत होतं. पण आज इतक्या वर्षांनंतरही ती आठवण आंत कुठेतरी स्पर्श करून जाते. वाटतं देवावर भाबडी का होईना पण माया करण्याचं भाग्य लाभलं होतं तिला... त्या भाबडेपणाचा हेवा वाटायला लागतो.

असाच अजून एक प्रसंग बाबांच्या आठवणींतला. माझे बाबा, आत्या, काका सगळेंच शिक्षण किंवा नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक झालेले. सगळेजणं गणपतीला न चुकता घरी जमत असत. घरी अगदी दिवळीसारखं वातावरण असे. दिवस भुर्रकन उडून जात आणि विसर्जनाचा दिवस जवळ येइ. हळूहळू वातवरण पालटू लागे. उद्या बाप्पा जाणार या विचारानेच प्रत्येकजण कासावीस होत असे. मग हळूहळू आजोबांकडे हट्टाचे सूर निघू लागत, "बाबा, राहू दे ना गणपतीला अजून. उद्याच जायची काय घाई आहे?" आजोबांचीही मनातून तीच इच्छा असे. पण या सगळ्या गडबडीत सणाचं किंवा देवाचं महत्व कमी होता कामा नये याचंही त्यांना भान होतं. त्यांनी यावर एक मस्त उपाय शोधून काढला होता. ते जास्वंदीचं एखादं फूल देवाच्या मस्तकावर कलतं ठेवत आणि देवालाच विचारत, "काय रे बाबा, जातोस का राहतोस अजून थोडे दिवस? मुलं रहा म्हणतायत." ते फूल सहाजीकच थोड्या वेळाने खाली पडत असे. मग आजोबांची घोषणा, "बाप्पा राहातोय म्हणतो अजून थोडे दिवस." घरात आनंदाला नव्याने उधाण येत असे. ही कदाचीत वेडगळ गोष्टं वाटेल एखाद्याला. पण यातून उठून दिसतो तो एक महत्वाचा संस्कार, सर्व गोष्टी देवाला आवडतील अशा रितीने करण्याचा. संस्कार हरवत चाललेल्या आजच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आजोबांचं ते गावठी शहाणपण अधिकच ठळकपणे जाणवत रहातं.

अशा अनेक आठवणींची पानं मनातल्या सोनेरी पुस्तकात जपून ठेवली आहेत. या वर्षी गणपतीला घरी जाण्याची संधी मिळाली आणि त्या आठवणी उचंबळून वर आल्या. मनाचा तळ पुन्हा एकदा ढवळला गेला. एकीकडे कोकणच्या स्वर्गीय सौंदर्याची, भाव-भक्तिच्या उधाणाची नुकतीच घेतलेली अनुभूति, तर दुसरीकडे रिकाम्या पडत चललेल्या वाडीच्या सुनेपणाची रुखरुख. एकीकडे दूर खुणावणारी सोनेरी क्षितीजं, तर दुसरीकडे मऊ मातीत उमटलेल्या पाऊलखुणा. पुन्हा एकदा चालू झाली आहे मनाची तळमळ मधली वाट शोधण्यासाठी... ती अशीच चालू राहणार शहरी सुखाचा निबर लेप चढेपर्यंत.


- mi_anand_users