ये कहाँ आ गये हम....(भाग २) घराबाहेर अशी शिकवणूक कानी पडत असताना आमच्या घरात मात्र एकमेकांसाठी काही करण्याची वृत्ती जाणवण्याएवढी स्पष्ट होती. स्वत: सुपरमार्केटमध्ये जाताना दुसर्याला काही हवे आहे का हे एकमेकांना विचारण्याची खबरदारी सगळ्याच जणी घेत होत्या. मी जरी नेहमीच शाळेतून सगळ्यात उशीरा घरी पोहोचत असले तरी घरी कुणी आणलेल्या केकचा तुकडा किंवा बनवलेलं डेझर्ट माझ्यासाठी राखून ठेवलेलं असायचं. घरी असताना छोटा-मोठा खोकला, ताप, सर्दी असं काही झालं की आजीबाईच्या बटव्याकडे लगेच धाव घेतली जाते. पण थोडीशी अपुरी माहिती असल्यामुळे म्हणा किंवा माझा वेंधळेपणा म्हणा, मी एक क्रोसिन सोडून फार काही औषधं इथून नेली नव्हती. आणि बर्याच औषधांच्या आणि ऍन्टीबायोटिक्सची ऍलर्जी असल्याने तिथे औषधं घेणं शक्यतो टाळायचं असं मी ठरवूनच गेले होते. अशातच मार्च महिन्यात पोलिनेशन, थोडाफार पाऊस आणि थंड वारा ह्याच्या एकत्रित परिणामामुळे मला शुक्रवारी शाळेत असतानाच घसादुखी सुरु झाली आणि दुपारी तापही येतोय ह्याची जाणीव झाली. संध्याकाळी बस मिळून त्यातून पाऊण तासाची फेरी करत मी दोन जिने चढून घरात पोहोचले तेव्हा हॉल मध्ये नदिन, लिलिया आणि लॅडेल टि.व्ही. बघण्यात गुंग होत्या. मी जेमतेम माझ्या खोलीत गेले. जेव्हा रात्री उशीरा मी चहा करून पीत होते तेव्हा इतरांनी जेवणाबद्दल विचारलं पण 'बरे वाटत नाही' सांगून मी झोपले. दुसर्या दिवशी जेवायच्या वेळी उथून चहा पीताना नदिनच्या 'बॉंजूर' ला उत्तर द्यायला तोंड उघडलं पण शब्दच फुटेना. जरा वेळाने तिने सांगितलं की आदल्या दिवशी संध्याकाळी मी घरात शिरले तेव्हा सरळ चालत नव्हते आणि तेच पाहून त्या घाबरल्या होत्या. दुपारी लिलिया आजी माझ्यासाठी रशियन उपाय करते म्हणाल्या. सुपरमार्केटमाध्ये जाऊन त्यांनी रेड वाईन आणली. त्यात लवंग, मिरी, दालचिनीचे तुकडे, थोडे ऑरेंज ज्युस घातले आणि ते उकळून रात्री मला ते प्यायला लावलं. आणि तिनेही हे औषध प्यायलं. त्या दिवशी आम्ही दोघीच घरी होतो. बाकीच्या कुठे वीकएंडसाठी बाहेर होत्या. दुसर्या दिवशी नक्की आवाज सुटेल अशी तिला खात्री होती आणि नाहीच तसं झालं तर व्होडका वापरायची असं तिनं सांगितलं. नशीब की ती व्होडका गॅसवर उकळायची नव्हती नाहीतर त्या लाकडी घराचं काय झालं असतं देवच जाणे! दुसर्या दिवशी मी उठले तरी लिलिया झोपेत होती आणि मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा हॉटप्लेटवर वाईनचं भांडं! वाईन पार वाळून गेलेली, शिल्लक फक्त मसाले. घरभर वाईनचा वास आणि हॉटप्लेट 'सहा' वर चालू! रशियन उपाय फारच जबरी की हो! माझा आवाज काही लवकर सुटला नाही पण शेवटी लिलियानी प्रेमानी केलेली सुश्रुषा माझ्या मनात घर करून राहिली. मान दुखत असताना ती चेपून देण्यातही हेच प्रेम दिसून आलं होतं. असाच हक्क दाखवला ददिननी जेव्हा चार दिवसानी माझा कमी होत चाललेला खोकला परत सुरु झाला तेव्हा. 'आज डॉक्टरकडे गेलंच पाहिजे' ह्या तिव्ह्या हट्टाखातर मी मार्टिनच्या डॉक्टर नवर्याची मदत घेतली. त्याच्या औषधांच्या भडिमाराने मी शेवटी बरी झाले पण त्या आठ दिवसात ह्या मुलींनी केलेली विचारपूस आणि मदत तेवढीच महत्वाची होती. आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी. फ्रांसबद्दल नाखूष असायची ती मुख्यत्वेकरून नदिन. ऑस्ट्रियात व्हिएन्नाला राहणारी ती रस्त्यातली अस्वच्छता बघून खरी वैतागायची. भारतात आली तर तिचे काय होईल ह्याची एक छोटीशी चुणूक दिसली. ती, आणखी एक जर्मन असिस्टंट स्टेफ़ी आणि मी अशा एक दिवस गेलो ब्रसेल्सला. माझ्या छोट्याशा गावात फक्त भारतीय म्हणता यावी अशी एकही वस्तू मला जानेवारी महिन्यापर्यंत मिळाली नव्हती. इथे मी प्रामुख्याने बोलत आहे ते भारतीय खाद्यपदार्थांविषयी. कणीक, पोहे, साबुदाणा, बेसन किंवा पिठी, तूर, उडीद, चणाडाळ, किंवा कडधन्यं, आलं, मिरच्या, कोथिंबीर, कदीपत्ता, पापड, लोणची, ह्यातली एकही गोष्ट मला माझ्या किंवा आजुबाजूच्या गावात मिळाल्या नव्हत्या. आल्याशिवाय उपमा, बेसनाशिवाय कढी, वरणाशिवाय भात, कढिलिंबाशिवाय फोडणीचा भात! चवीने खाणारा किती दिवस फक्त पास्ता, दही भात(योगर्टभात म्हणू का?) राजमा, छोले खाऊन काढू शकेल? तर जेव्हा ब्रसेल्सला 'बॉंबे' नावाचं रेस्टॉरंट दिसलं तेव्हा मी आत जाऊन चक्क 'बेसन कुठून मिळवता' अस तिथल्या हुसेनला विचारलं. दुकानाचा पत्ता घेतला आणि त्या दुकानात जाऊन पोहोचले. पाकिस्तानातून बारा वर्षापूर्वी ब्रसेल्सला आलेल्या हसनच्या दुकानात कधी नव्हे ते आलं, बेसन आणि तूरडाळ ह्या गोष्टी पहायला मिळाल्या. याच्याशी हिंदीतून गप्पा चालू असताना स्टेफ़ी आणि नदिन बोलत होत्या जर्मन मधून. दुकानातून बाहेर पडताना वेफर्सचे छोटे पाकिट लहान मुलाला खाऊ द्यावा तसं हुसेनने माझ्या हातत ठेवलं. दुकानात शिरतानाच नदिन आणि स्टेफ़ी ह्या दचकल्या होत्या तिथली अस्वच्छता पाहून कारण पोत्यात ठेवलेलं धान्य किंवा भाज्या त्यांनी ह्या पूर्वी पाहिल्याच नव्हत्या. रस्त्यात कचरा टाकला तर दंड होणार ही जाण जिथे त्यांच्या देशात कायम ठेवली जाते तिथे अन्नधन्याच्या बाबतित अशी हेळसांड त्यांना नाहीच पचायची. आणि हेच त्या दुकानात असताना बोलत होत्या. जर्मनीत हे असे चालणार नाही असे त्यांचे मत होते आणि म्हणूनच फ्रांसमध्येही रस्त्यात कुठे घाण दिसली की त्या त्रासून जात असत. भले दुकान असेल अस्वच्छ पण भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय वाद विसरून एक हिंदी भाषिक भारतीय दुकानात आल्यावर खाऊ देऊन मैत्री करून हिंदुस्तानी संस्कृती जपणारा हसन निश्चितच कौतुक करावं असा! मला सामावून घेणारे आणखी लोक भेटले ते युनिव्हर्सिटीत. भारतात M.A. झालेलं असल्यामुळे फ्रेंच युनिव्हर्सिटीत पहिलं वर्ष न करता M.A. च्या दुसर्या वर्षाला तांत्रिकदृष्ट्या प्रवेश नक्कीच मिळू शकतो पण ह्यासाठी परवानगी घेणं आणि ती मिळेपर्यंत प्रवेश घेता न येणं ह्या सगळ्या अडचणी येतातच. नोकरीच्या वेळा आणि प्रोफेसर्सना भेटायच्या वेळा ह्याची सांगड घालण्याची कसरत करणं हेही मला कठीणच जात होतं. त्यामुळे प्रोजेक्ट गाईड मिळवताना मला विलक्षण धावपळ करावी लागली. त्यातून मला मिळाला तो प्रोजेक्ट गाईड मूळचा अमेरिकन. काही वर्ष फ्रांसमध्ये राहिलेला, शिक्षण फ्रांसमध्ये झालेला, सध्या बर्लिनला राहणारा आणि आठवड्यातले दोन दिवस आमच्या Valenciennes ला येणारा. त्यामुळे एक भारतीय मुलगी नोकरीसाठी येऊन शिकायच्या इच्छेने येते ही गोष्टच त्याला खूप महत्त्वाची वाटत होती. एक वर्षात ह्या M.A. च्या दुसर्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणं हे पूर्णवेळ विद्यार्थ्यांनाही शक्य नाही. त्यामुळे माझे सगळे सेमिनार्स आणि निबंध पुरा होणार नाही हे मला आधीपासूनच जाणवत होतं. पण इतर सगळ्या असिस्टंट्स्प्रमाणे एक नोकरी करून बाकीचा वेळ फुकट दवडणं मला पटत नव्हतं. त्यामुळेच फ्रेंच विद्यार्थी आणि प्रोफेसर्स ह्यांच्या सोबत वेळ घालवता यावा ह्या साठी मी वेळप्रसंगी न खाता पिता शाळेतून युनिव्हर्सिटीत किंवा युनिव्हर्सिटीतून शाळेत पळत असे. अभ्यासक्रम जरी मला खूप आवडेल असा नव्हता तरी माझ्या अनुभवात भर पडावी हाच माझा हेतू होता. उदाहरणच द्यायचे झाले तर Shakespeare चे फ्रेंच मधे अनुवादित Henri IV फ्रांसमध्ये जाऊन शिकायला लागणं हे हास्यास्पदच होतं. त्या ऐवजी मला जर एखाद्या फ्रेंच लेखकाचा अभ्यास करायला मिळाला असता तर ते मला अधिक आवडलं असतं. पण नाही म्हणायला निबंधासाठी विषय शोधताना सोळाव्या शतकातली फ्रेंच कवयित्री लुईझ लाबे हिच्या 'प्रेम' या विषयावर आधारित सुनीतांशी ओळख होणे हे मात्र अत्यंत आनंददायी होतं. आणि वेळ न दवडता जमेल तेवढे प्रयत्न करून, तीन सेमिनार्सच्या परीक्षा देऊन त्या पास होणं हेही मल तेवढंच समाधानकारक वाटतं. भले तिथली डिग्री मला मिळाली नाही पण ह्याच काळात मला प्रोत्साहन देऊन, मला न समजलेलं समजावून देऊन इथल्या प्रोफेसर्स आणि इथल्या विद्यार्थ्यांनी दिलेला मदतीचा हात ही माझी खरी मिळकत आहे. फ्रांसमध्ये शाळांना बुधवारी आणि रविवारी सुटी असते आणि शनिवारी शाळा असते. परंतु परकीय भाषांचे तास शनिवारी नसतात त्यामुले आम्हाला तसं म्हटलं तर चार कामाच्या दिवसात एकूण बारा तास शिकवावं लागत असे. काही नैमित्तिक सुट्ट्यांबरोबर चार महत्त्वाच्या मोठ्या सुट्ट्या तिथे असतात. सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी शाळा सुरु झाल्या की पहिली मोठी सुटी येते ती ऑक्टोबर महिन्यात. All Saints' Day झाला की ही सुट्टी संपते आणि पुढचे सहा आठवडे पुन्हा शाळा होते. फ्रांसमध्ये हॅलोवीन साजरा करायला हल्ली सुरुवात झाली आहे. परंतु ती अमेरिकन पद्धत आहे असं शाळांमधून आवर्जून सांगितलं जातं. लहान मुलं मात्र शेजार्यापाजार्यांकडून हॅलोवीनच्या नावाखाली हक्काने खाऊ उकळण्याचे पुण्यकर्म पार पाडतात. त्या सहा आठवड्यात थंडीचीही चाहूल लागलेली असते. स्वेटर्स, मफलर्सची खरेदी सुरु होते. आणि भेटवस्टूंची खरेदी अर्थातच ख्रिसमससाठी केली जाते. गावागावांतून ख्रिसमस मार्केट्स सुरु होतात. रंगीबेरंगी खेळण्यांनी दुकाने सजतात. Vin Brulé म्हणजेच गरम रेड वाईनचे घोट घेत घेत फ्रेंच माणूस न चुकता ह्या मार्केटमध्ये फेरफटका मारून येतो. रस्त्यारस्त्यात ख्रिसमस ट्री सजतात. दिव्यांची रोषणाई असते. सगळे वातावरण आनंदात न्हाऊन जाते. घराच्या खिडक्यांत शिडी लावून घरात शिरू पाहणारे सॅंटा क्लॉज बहुतेक सगळ्या घराच्या बाहेर दिसू लागतात. आमच्या घरतील सगळेच जण ह्या सुटीत फिरायला गेल्यामुळे अम्ही ख्रिसमस ट्री काही सजवले नाही पण लॅडेलनी पांढर्या कागदाचे जाळीकाम खिडक्यांच्या काचांवर चिकटवून, तिच्या आईच्या अमेरिकन पद्धतीप्रमाणे, येणार्या हिवाळ्याची जाणीव ह्या स्नो फ्लेक्सच्या स्वरुपात करून दिली. ख्रिसमसनंतर सुट्टी आली ती हिवाळ्याची. फेब्रुवारी महिन्यात पूर्ण फ्रांसमध्ये आळीपाळीने दोन आठवड्याची सुट्टी दिली जाते. एकाच वेळी आल्प्समध्ये जाणार्या पर्यटकांची गर्दी होऊ नये आणि वेगवेगळ्या प्रांतातल्या उत्साही स्केटर्सना प्रवास सुसह्य व्हावा म्हणून सगळ्या प्रांतात एकाच वेळी शाळांना सुट्टी देणं टाळतात. मार्च मध्ये शाळा होते, अभ्यास होतो पण एप्रिल सुरु होतो तोच तिथे कार्निवलची चाहूल लागते आणि मुलं मुखवटे बनवायला सुरुवात करतात. शाळेत कार्यानुभवच्या तासांना रोपटी लावायचे शिक्षण द्यायला सुरुवात होते कारण शरद ऋतू सुरु होणार असतो. सगळी निष्पर्ण झाडं गुलाबी, पिवळ्या, जांभळ्या फुलांनी सजतात. ही फुलं दोन तीन आठवडे झाडावर राहून मग गळून पडतात आणि पोपटी पालवी फुटल्याने झाडाचं रुप पार पालटून जातं. ह्यातच अर्धा एप्रिल होतो न होतो तोच शाळेला पुन्हा एकदा दोन आठवड्यांची सुट्टी लागते ती एक मेचा लेबर डे होईपर्यंत. एप्रिलमध्ये थंडी कमी व्हायला सुरुवात होते आणि पाऊसही कमी होतो. पण उत्तर फ्रांसमधळी हवा एवढी फसवी की मे महिन्यातही तिथे अनेकदा गडगडाटासह विजा चमकून पाऊस हाला. बंद केलेले पाण्याचे हीटर्स पुन्हा सुरु करायची वेळही ह्या वर्षी आली, अगदी मे महिन्याच्या अखेरीस. रोजचं तापमान एवढं बदलत होतं की दिवसा दिवसात पंधरा ते वीस अंशाचा फरकही तिथे मी अनुभवला. मे आणि जून महिन्यात एक Ascension ची सुट्टी वगळता इतर वेळी शाळा चालू असते. Ascension ह्या दिवशी जत्रा भरते. अनेक खेळ, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागतात आणि त्यासाठी मोठी गर्दी उसळते. मार्च महिन्याच्या अखेरीस शाळांमध्ये वार्षिकोत्सव असल्याने त्याची तयारी सुरु होते. अभ्यास पुन्हा एकदा मागे पडतो आणि त्याचबरोबर वेध लागतात जुलै मध्ये सुरु होणार्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे. नऊ महिन्यांपैकी जवळजवळ दोन महिने अशी सुट्टीच असते आणि एवढ्या सुट्ट्या असतानाही दमून, त्रासून जाणारी मुलं पाहिली की आपण भारतात शाळेत घालवत असलेला वेळ आणि घ्यायला लागणारी मेहेनतच आपल्याल अनेक गोष्टी एकाच वेळेला करू शकण्याचे कसब शिकवतात हे जाणवलं. २१ जून हा दिवस उन्हाळ्याचा पहिला दिवस मानला जातो आणि त्यामुळे ह्या दिवशी गावागावात म्युझिक फेस्टिव्हल होतो आणि रात्री गाण्यांची कॉन्सर्ट होते. तिथल्या माझ्या युनिव्हर्सिटीनेही ह्या वर्षी बावीस तारखेला परीक्षा ठेवून आपला कठोरपणा सिद्ध केल्याने मलाच काय पण माझ्या वर्गातल्या कोणालाच ह्या फेस्टिव्हलचा आनंद घेता आला नाही. डिग्री पुरी होत नाही हे कळत असूनही परीक्षा विसरून जाऊन धमाल करायची माझी वृत्ती नाही त्यामुळे हा म्युझिक फेस्टिव्हल बघायला पुन्हा फ्रांसला जायच्या संधीची मी वाट पाहत आहे. आत्तापर्यंतची माझी ही फ्रांसमधली चौथी आणि सगळ्यात मोठी ट्रिप असल्यामुळे ह्या वेळी तीन ऋतूंचा अनुभव मला घेता आला. पुरेसा वेळ असल्यामुळे मागील भेटीत ओळख झालेल्या आणि Lille पासून जवळच रहाणार्या Jacques आणि phran篩se Dalles ह्या जोडप्याला पुन्हा एकदा भेटायची मला संधी मिळाली. व्यवसायाने डॉक्टर असणारा जॅक आणि त्याला मदत करणारी फ्रॉसुआझ ह्यांच्याकडे मी सहा वर्षांपूर्वी पाहुणी म्हणून राहिले होते आणि त्या नंतरच्या काळात हे संबन्ध जपून आम्ही ते आणखी वाढवलेच आहेत. शाळा, युनिव्हर्सिटी दोन्ही करून मला त्यांच्या घरी जायला जमत नही हे जाणवल्यावर दोघे जण मला भेटायला Valenciennes पर्यंत आले. फ्रेंच पद्धतीचे जेवण मला आवडते म्हणून मला घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेले. त्यांचीच एक आठवण सांगते. अगदी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा माझे सामान मर्सिडीजच्या डिकीत भरून झाल्यावर फ्रॉन्सुआझ मला म्हणाली होती, " बस! तुझीच गाडी आहे ही. " मला उद्या कधी स्वत:ची मर्सिडीझ जरी हाती मिळाली तरी फ्रांसमध्ये गेले की मला घ्यायला येणार्या ह्या मर्सिडीझची सर तिला येईल असं वाटत नाही. मी कधीही त्यांच्या घरी रहायला गेलेच, मग ते अगदी चर - दोन दिवसांसाठी का असेना पण ' माझी खोली ' माझ्यासाठी कायम तयार असेल. सत्तरीची ही दोघं माझ्यावर जे निर्व्याज प्रेम करतात त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. ह्या माझ्या वास्तव्यात सुद्धा अधून मधून मला फोन करून चौकशी करणं, काही हवं नको पाहणं आणि फ्रांसमधे असताना माझं पालकत्व न सांगता स्वीकारणं ह्या त्यांच्या मला भावलेल्या आणखी काही गोष्टी. माझी आई जेव्हा मला भेटायला आली तेव्हा तिने माझ्या ह्या फ्रेंच आई-वडिलांना भेटायची इच्छा दर्शवली. मदर्स डे ला स्वत:ची मुलं घरी आलेली असतानाही दोघं संध्याकाळी माझ्याकडे घरी जेवायला आले. त्यांना भारतीय पद्धतीचा फक्त ढोकळा माहित होता. तेही आधीच्या वेळी मी तो त्यांच्याकडे बनवला होता म्हणून. तेव्हा नवीन काही आवर्जून चाखून बघणारे हे दोघं येणार म्हणून मी पुलाव, कटलेट्स, टोमॅटो सार आणि खीर बनवली. इंग्लिश बोलता न येणारे हे दोघं आणि फ्रेंच न येणारी माझी आई फक्त चेहेर्याच्या हावभावाद्वारे मूक संवाद साधत होते. माझ्या तोंडून अनेक गोष्टी ज्यांच्याबद्दल ऐकल्या होत्या आणि केवळ फोटोतून ज्यांचे चेहरे पाहिले होते अशा ह्या दोघांसाठी त्या दिवशी माझी आई होस्ट होती आणि त्यामुळेच आईने जेवायला सुरुवात करायची वाट पाहण्याचा शिष्टाचार ते दोघं पाळत होते. आर्थातच ही पद्धत आईला माहित नसल्यामुळे आई त्या दोघांनी सुरुवात करायची वाट पाहत होती. शेवटी ही कोंडी मला फोडावी लागली आणि मी आईला बळेबळेच पहिला घास घ्यायला लावला. माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना बरेचदा आश्चर्य वाटतं जेव्हा मी फ्रांसबद्दल भरभरून बोलते. पण जेव्हा माझे ऋणानुबंध फक्त जागेशीच न जुळता तिथल्या माणसांशीही जुळलेले असतात तेव्हा हे होणं स्वाभाविकच आहे. बिल्डिंगची साफसफाई करणारे कर्मचारी असोत किंवा तिथले काही शिक्षक असोत, माझा प्रत्यक्ष High school शी संबन्ध नसताना माझी प्रत्येकाशी असलेली मैत्री असो किंवा म्युनिसिपल लायब्ररीतली लायब्रेरियन असो. भाषेमुळे जेव्हा आपण कोणाशी जोडले जातो तेव्हा त्यांची आठवण येणं हे स्वाभाविकच असतं. ज्या भागात औषधालाही भारतीय सापडत नाही, जिथे आपल्या जेवणाच्या पद्धती आपल्याला बदलाव्या लागतात, जिथे आपल्या सवयीचे अन्न मिळतही नाही तिथे जाऊन मराठीपण जपणं कठीण असतं. आणि तो अट्टाहास मी करतही नाही. जायचं तिथला माणूस जर जास्त जाणून घ्यायचा असेल तर त्याच्याच सारखं वागावं ही मनापासून पटणारी गोष्ट मला अनेक वेळा प्रत्यक्षात जगून बघता आली आहे आणि त्यामुळेच अनेकानेक सुखद अनुभव माझ्या झोळीत आजपर्यंत पडले आहे " परत आलीस फ्रांसमध्ये तर भेटायला ये हो नक्की! " हे त्या सगळ्यांचे उद्गार हीच मला माझ्या वागणुकीला त्यांनीही भरभरून दिलेली दाद आहे असं मी मानते. - सोनचाफा
|