« | »




अनुभव

माणूस प्रवास का करतो? "अनुभव" असं कोणीतरी याचं उत्तर दिलं आहे जे मला मनापासून पटतं. म्हणूनच आपण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळी राहण्याची जागा, पाहण्याची स्थळं, खाण्याच्या जागा वगैरेंचे बेत करतो. अनुभवाला महत्त्व नसतं तर सर्वांनी केसरी ट्रॅव्हल्सनीच प्रवास केला असता. असाच माझा हा अनुभवांनी भरलेला प्रवास. हा प्रवास एकट्याने केलेला त्यामुळे अनुभव जरा "निराळे". सहपरिवार प्रवास केला की त्या प्रवासांत परिवाराच्या गरजा पुरवणे हाच एक मोठा अनुभव लक्षात रहाण्यासारखा असतो.

म्हणुनच प्रवासाची संधी आल्या आल्या मी स्वतःला बजावलं - अनुभव मिळवणे. त्यातून हा प्रवास कचेरीखर्चाने. त्यामुळे बरेचसे अनुभव फुकट. मग तर मुळीच संधी गमवायला नको. बाकी अमेरिकेतल्या प्रवासांच्या बाबतीत मी जरा निराशावादीच आहे. भारतात डोंबिवली ते बोरीबंदर एवढा जरी प्रवास केला तरी दिवसाअखेर माझा अनुभवांचा साठा वाढलेला असायचा. कधी लोकल उशीरा यायची कधी वाटेतच थांबायची. कधी अनपेक्षितपणे ठाण्यालाच खिडकी (Window Seat) मिळायची तर कधी वर ठेवलेलं सामान डोक्यावर येउन पडायचं. लोकलमध्ये खिडकीची जागा मिळणे ही बातमी मुंबईकर लग्न ठरल्याच्या आनंदासारखी लोकांना सांगत सुटतो. अमेरिकेमध्ये तसं काही घडत नाही. सकाळचा चहा प्यावा तितक्या सहजपणे इथले लोक प्रवास करतात. फार फार तर सामान विमानाबरोबर येत नाही. माझ्या बाबतीत ते ही कधी होत नाही. मला पाहुन airline वाले एकवेळ हा पोहोचणार नाही पण याचं सामान जरुर पोहोचेल अशी भीष्मप्रतिज्ञा करत असावेत.

पण हा आंतरराष्ट्रीय प्रवास असल्याने माझ्या आशा थोड्या उंचावल्या. ऑफीस परतफेड करेल या विश्वासाने मी टॅक्सी बोलावली. तसं ते पैसे परत मिळेपर्यंत मी जीव मुठीत धरून असतो. कुठल्याही देवाणघेवाणीत देवाण आधी झाली तर त्याची घेवाण होईपर्यंत मला देणार्‍याचा संशय येत रहातो. अनुभवांचे परिणाम, दुसरं काय. कंपनीने ठराविक टॅक्सी संघटनांबरोबर करार ("deals") केले होते त्यामुळे पैसे परत हवे असतील तर त्यांच्याकडुनच सेवा मिळवणे भाग होते. त्या यादीमधले एक नाव मी कधी ऐकले नव्हते म्हणुन ती टॅक्सी वापरून पहावी असा मोह मला झाला. ही एक माझी अनुभव गोळा करायची पध्दत - patented. उदा. बाजारात मिळणारी व सर्वसामान्य माणसाला परवडातील अशी सगळी साबणं , shaving cream, tooth paste, body sprays वगैरे वस्तु मी वापरून पहातो. माझा अनुभवांचा साठा हा मुख्यतः असाच वाढला आहे. बाकी कुठल्याही बाबतीत विविधता आणावी असा विचार जरी केला तरी कौटुंबिक जिवनात विविध तणाव निर्माण होतात - असो. टॅक्सीने मी एकटा जाणार असल्याने असला प्रयोग मी करून पाहू शकलो.

टॅक्सीचालकाने "तयार रहा, दहा मिनिटात लिंकन घरापशी पोहोचते आहे" अशी फोनवर घोषणा केली. ते ऐकून क्षणभर मला चक्कर आली. कंपनीने परतफेड केली नाही तर लिंकनचे बील फेडण्यासाठी महिनाभर मलाच टॅक्सी चालवावी लागायची असं वाटु लागळं. बहुतेक लिमो एवढी महाग नसावी असा विचार करून थोडं धैर्य गोळा केलं. आता मागवलेलीच आहे तर बसू त्यात व पुढचं पुढे बघू असं ठरवलं. काळ्या लांबोड्या लिमोने मी ऐटीत विमानतळावर चाललो आहे अशी कल्पना करुनही मला जरा बरं वाटलं. दोन आठवडे घरापासून व माझ्या आप्तांपासून दूर जाणार या विचाराने होणारा मनस्तापही क्षणभर विरला. चटकन सूट - बूट - टाय लावून बसावे असेही वाटले. पण आमच्या काटकसरी कंपनीने एवढी चांगली गाडी वापरायची मुभा दिलीच कशी अशी शंकेची पाल चुकचुकली. म्हणुनच फार उतावीळ न होता चेहर्‍यावर गंभीर भाव आणून मी गाडीची वाट पाहू लागलो.

गाडीवाला म्हटल्याप्रमाणे वेळेवर दारात येउन उभा राहीला. त्याने बेल वाजवताच मी आतुरतेने दार उघडून तो काळा का गोरा (का भारतीय का चिनी) हे न पहाता त्याच्या धिप्पाड शरिरापलिकडली गाडी न्याहाळू लागलो. गाडी न काळी होती न लांबोडकी. गाडीपेक्षा गाडीवालाच जास्त लिमोसदृश् दिसत होता - काळा आणि उंच. या वेळेस प्रवास सुरु व्हायच्या आधीच एक जोरदार अनुभव. दारात उभी असलेली गाडी ही एक अत्यंत जुनी साधी लिंकन होती. अगदी अब्राहम लिंकनच्या काळातली या नावाखालीही खपली असती. गाडीत इंजिन वगळता काहीच automatic नव्हतं. धुलिवंदन करून आल्यासारखी गाडी मळलेली होती. समोरच्या काचेला मोठा तडा गेला होता. गाडीची अवस्था पाहून बहुतेक लोकांनीच तिच्यावर दगडफेक केली असावी. निमुटपणे मी त्या गाडीत जाउन बसलो. लोकांनी मला ओळखु नये म्हणुन काय करता येईल याचा विचार करू लागलो. गाडीवाल्याने माझ्या बॅग्स उपकार केल्यासारख्या उचलल्या व डिक्कीत आणुन आदळल्या. त्याने त्या बॅग्स उचलल्या का असा प्रश्न मला पडला. इतकं जिवावर आलं असेल तर ते काम करावंच कशाला माणसाने? कदाचित अमेरीकेत हे काम टॅक्सीवाल्यांकडून अपेक्षीत नसेल. मी टॅक्सीतून इतके कमीवेळा प्रवास करतो की हे रिवाज माहीत होणं व लक्षात रहाणं केवळ असंभव. सुदैवाने लोकांनाही उचलून बसवण्याचा रिवाज नाहीये इथे. हातातील वस्तू खाली ठेवावी तर इथल्या चायनीज हॉटेल्स मधल्या नाजुक वेट्रेससनी. अगदी काट्याला पण कळत नाही आपल्या बाजुला चमचा कधी येऊन पहुडला ते.

मी त्या काळ्या माणसाच्या मळखाऊ गाडीतून "बळी जाणारा बोकड आता तुझ्या डोक्यावरून सुरी फिरवणार आहे हं अस सांगीतल्यावर ज्या उत्साहाने कार्यस्थळी जाईल तेवढ्या उत्साहाने"(१) विमानतळावर जायला निघालो. तरी तो चालक भारतीय नाही हे पाहून मी जरा निश्चिंत झालो. सिएटलचे भारतीय टॅक्सीवाले वाटेत जितकी चौकशी करतात तितकं माझे नातेवाईक पण मला विचारत नाहीत.

"कुठे निघालात?", भारतीय नसुनही त्या काळ्या माणसाने गाडीने वेग घेतल्या घेतल्या प्रश्न टाकला.

भारतीय चालकांच्या संगतीचा परिणाम असावा अशी मी स्वतःची समजुत घातली.

"शिकागो", असं एका शब्दात तुटक उत्तर देऊन मी त्याच्या मनावर वेग घालण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

"कशासाठी?", त्याने हट्ट सोडला नाही.

"कामानिमित्त." मी एका शब्दात उत्तरे द्या अशी सूचना असल्यासारखं त्याच्याशी बोलत होतो. त्याच्या प्रश्नांचा भडिमार चालू झालाच होता तितक्यात त्या जुनाट गाडीच्या घोगर्‍या रेडिओवर एक माहितीतलं गाणं लागलेलं माझ्या लक्षात आलं. There's a double dutch bus comin' down the street हे कानावर पडल्या पडल्या मी एकदम वीस वर्ष भुतकाळात गेलो. शाळेत असताना जमवलेल्यांपैकी एका cassette मध्ये हे गाणं होतं. तेव्हा ते माझं अगदी खूप आवडणार्‍या गाण्यांमधलं नसलं तरी बरेच दिवसांनी ऐकल्याने ते आता मला ऐकावसं वाटू लागलं.

"अरे वा छान गाणं लागलं आहे", मला विषय बदलायची संधी मिळाली. "त" वरून ताकभात समजून त्याने लगेच रेडीओचा आवाज मोठा केला. काही वेळ गाणं ऐकण्यात दोघंही मग्न झालो. काहीवेळ गाणं ऐकल्यावर त्याने त्याचं बोलणं परत चालु केलं.

"हे रेडिओ स्टेशन अमुक अमुक. आजकाल हे चांगली गाणी लावतं. मध्ये फार खराब परिस्थिती होती याची", त्याने माहिती पुरवली.

"अरे वा", मी आज्ञाधारकाप्रमाणे उगीचच स्टेशनचं नाव नंबर वगैरे विचारून घेतलं. खरं तर भारतीय गाणी व बडबडगीते (मुलीसाठी) सोडली तर मी गाडीत काहीच ऐकत नाही. आणि घरी अजुन महत्त्वाच्या आवाजांना कान द्यावा लागल्यामुळे रेडिओ लावायची कधी गरजच पडत नाही.

"मी मुळचा फिलाडेल्फियाचा. तिथे बरेच प्रसिध्द बॅंड्स आहेत "त्याने अभिमानाने सांगितलं.

त्याला गाण्याची आवड आहे असं मला क्षणभर वाटलं. मी ग्वाल्हेरचा आहे समजलास काय असं म्हणावसं वाटलं. पण ग्वाल्हेर व संगीताचा काही संबंध आहे हे अमेरीकन्सना काय अर्ध्या भारतीयांनाही माहीत नसल्याचा स्वानुभव आला असल्याने मी ते म्हणण्याचं टाळलं.

"गाण्याची बरीच आवड दिसते आहे", मी उघड दिसणारी गोष्ट बोलून दाखवली.

"हो पण सिएटलला ती मजा नाही जी फिलाडेल्फियाला आहे." असं म्हणताना तो त्याच्या भूतकाळात हरवल्यासारखा वाटला. मला तो थोडा गमन मधल्या फारूख शेख सारखा वाटु लागला. फारुख शेखच्या गाडीत टेप नव्हतं एवढाच काय तो फरक.

"सिएटलचं music culture कसं आहे?", इथे ८ वर्षे राहूनही पाहुणा असल्यासारखा प्रश्न मी त्याला केला. हे तुम्ही मला विचारायचं का मी तुम्हाला असं तो मला म्हणाला नाही हे नशीब माझं.

"ठीक आहे ". अत्यंत खराब आहे असं त्याच्या "ठीक" म्हणण्याच्या पध्दतीवरून मला समजलं.

"काही जागा आहेत जिथे मधुन मधुन चांगले बॅंड्स येतात, उदा. ... मी इथे १० डॉलर्स मध्ये प्रोग्राम्स पाहीले आहेत. अमके तमके गाणारे तिथे येवुन गेले आहेत" असं म्हणुन त्याने बर्‍याच बॅंड्सची नावं व जवळच्या कुठल्यातरी casino चं नाव मला सांगितलं. casinos मध्ये बाकी गोष्टी इतक्या स्वस्त का असतात हे व्यवहारज्ञान त्याला दिसत नाहीये असा विचार चटकन डोक्यात आला. दहा डॉलर्स मध्ये गाणी ऐकता ऐकता slot machine मध्ये १०० डॉलर्स गेल्याचं बिचार्‍याच्या ध्यानातही आलं नसेल. भारतात जुगार अधिकृत असता तर भीमसेन जोशींचे अभंग लोकांनी slot machine मध्ये नाणी टाकत ऐकले असते का असा प्रश्न मनाला चाटून गेला.

"इथे कधी आलात?", त्याच्या या सिएटलबद्दलच्या ज्ञानसंपादनाला किती वेळ लागला याचा अंदाज मी घ्यायला लागलो.

"१९९०" अस त्याने म्हटल्यावर मला बर्‍याच गोष्टींचा उलगडा झाला.

खरंतर आता मीच जास्त चौकश्या करणं चालू केलं होतं पण गाणी या विषयावर चर्चा चालू असल्याने तो मोकळेपणाने बोलत असावा. गाडीवाल्याकडुन माहिती मिळवून घेण्याची मलाही लहर आली होती. तसंही मी त्याला काय माहिती देणार? कोलगेट टूथपेस्ट चांगली का क्रेस्ट? मी श्रोत्याची भुमिका पत्करली.

तेव्हढ्यात रेडीओवर मराया कॅरेचं गाणं लागलं. माझंही ज्ञान थोडफार आहे हे दाखवायला मी ते लगेच त्याला ओळखून दाखवलं. खरं तर त्याच्याशी स्पर्धा करण्यात काहीच अर्थ नव्हता.

माझ्यासाठी जसे लता मंगेशकर, अरुण दाते तसे त्याच्यासाठी हे गाणारे होते. पण उगीचच मला त्याची बरोबरी करावीशी वाटली. मराया कॅरेला (गाताना) बघायची माझी सुप्त इच्छाही त्याच्यासमोर मी प्रकट केली. त्याला ते गाणं फारसं आवडत नसावं कारण तो त्या गाण्याबद्दल फारसं काही बोलला नाही. "तिचा जन्म लॉंग आयलंड, न्युयॉर्कचा", असं अगदी आत्मविष्वासाने त्याने मला सांगीतलं. "गाण्यांच्या बाबतीत माझ्या वाट्याला जाऊ नको भल्या माणसा" असा संदेश मला त्याच्या उत्तरातून व्यवस्थित मिळाला. मराया कॅरे कुठे जन्मली याची उत्सुकता मला कधीच नव्हती. तिचं लग्न झाल आहे हे मात्र मी माझ्या लग्नाआधीच व्यवस्थित शोधून काढलं होतं. तरीपण निराश न होता सोनीच्या मालकाशी लग्न झालं आहे हे कळल्यावर मी जमेल तशा सोनीच्याच वस्तू घेऊन समाधान मिळवलं. तेवढाच तिच्या संसाराला हातभार. पुढे तिचा घटस्फोट झाल्याचं कळल्यावर त्या सगळ्या वस्तू garage sale मध्ये बाराच्या भावात विकुन टाकल्या. हा माणूस तर तिच्या जन्मापासून तिच्यावर डोळा ठेऊन होता!

एव्हाना गाडी freeway ला लागली होती. नेहमी चालकाचं काम मलाच करावं लागत असल्याने त्या जुनाट गाडीत मागे बसुन गाणी ऐकत आजुबाजुला पहात पहात जायला मला मजा वाटू लागली. संध्याकाळची वेळ असल्याने रहदारी वाढली होती व त्यामुळे गाडीचा वेगही जरा कमी झाला होता. पण कधी नव्हे ते बर्‍याच लवकर निघाल्याने मला पोहोचायची फार घाई नव्हती. त्या गाडीवाल्याबरोबर गाणी ऐकण्यात मी ही दंग झालो. गप्पा चालू रहाव्यात म्हणून मी सिएटलची रहदारी असा "open ended" विषय काढला. गप्पांसाठी असे विषय नेहमीच चांगले. प्रत्येकाला आपलं मत प्रकट करता येतं व शेवटी कोणीच खरं खोटं ठरत नाही. तेव्हढ्यात गाडीला carpool lane मिळाली. त्यामुळे आमची गती वाढली व बाजुच्या लेनमधली गाड्यांची गर्दी दिसु लागली.
"पाहीलंत, यामुळे रहदारी वाढली आहे सिएटलची", तो एकदम पुरावा देऊन आपली बाजू मांडू लागला. मला २ लेन्स व २००० गाड्या एवढं एकच रहदारीचं कारण दिसत होतं.

"डाव्या लेन मधून ट्रक्स, म्हातारे हळुहळु जातात व मागे अशी रांग लागते ", बाजुच्या लेनमधून संथ जाणार्‍या ट्रककडे बोट दाखवत तो म्हणाला. वैकुंठाच्या विमानाचा चालक प्रवाशांना घेउन जाता जाता त्यांच्या समाधानासाठी खाली बोट दाखवून ज्या थाटात "पाहिलंत जगाची काय परिस्थिती झाली आहे! बरं झालं तुम्ही सुटलात" असं म्हणेल तसं तो हे वाक्य म्हणाला. एव्हाना मी या इसमाचे ज्ञान पाहून चांगलाच प्रभावित झालो होतो. त्यामुळे तो सांगेल त्यावर मी विश्वास ठेवायला तयार होतो. नाही म्हटले तरी माझ्यापेक्षा त्याने सिएटलचे जास्त पावसाळे पाहिले होते. इथल्या रस्त्यांवर तो माझ्यापेक्षा दसपट तरी अधिक वेळ घालवत होता. त्यामुळे त्याच्या म्हणण्यात तथ्य असणार हे मला पटलं होतं. रस्त्यावर तो म्हणाला ते मला दिसतही होतं. लेनमध्ये खरोखरच बरीच मोकळी जागा व त्यामागे मोठी रांग असं दृश्य दिसत होतं. माझा मुद्दा मांडण्याऐवजी मी गाडीवाल्याकडून आपल्या ज्ञानात भर पाडणं पसंत केलं.

मरायाचं गाणं संपल्यावर एक साधारण माहितीतलं गाणं लागलं. मी आवाजावरून गायिका ओळखायचा प्रयत्न चालू केला तितक्यात गाडीवाल्याने "ही पॉला अब्दुल" असं ती त्याची चुलत बहीण असल्यासारखं अभिमानाने सांगून टाकलं. मला कौन बनेगा करोडपती मध्ये बसवून एक फोन करून उत्तर शोधायला सांगितलं असतं तरी ती पॉला अब्दुल आहे हे उत्तर मिळवता आलं नसतं.

माझ्या आधीच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरून त्याचीही स्पर्धात्मक भावना जागृत झाली असवी. आता मी या इसमाशी बरोबरी करण्याचा नाद सोडून दिला. पण या अशा धांगडाधिंगा असलेल्या गाण्यांचेही असे दर्दी चाहते असु शकतात हे मला नवीनच दिसत होतं. मला इतके दिवस ही गाणी स्वातंत्र्यदिनाच्या वेळेस दिसणार्‍या झेंड्यासारखी वाटायची. आठवडाभर ते झेंडे जागोजाग दिसतात व नंतर देश पारतंत्र्यात गेल्यासारखे गायब होतात. "अरे वा छान गाणं आहे" एवढंच मी त्यावर बोललो. काहीही बोलणं चालू झालं की गाडीवाला लगेच रेडीओचा आवाज छोटा करायचा व संभाषण संपलं की परत वाढवायचा. हे त्याला ऐकण्याचा त्रास आहे का एकाच वेळेस गाडी चालवणं, गप्पा मारणं व गाणी ऐकणं एवढं सर्व त्याला झेपत नाहीये का मला आदर दाखवायला तो असं करतोय हे काही मला त्याच्या "body language" वरून कळत नव्हतं. थोडं जपुनच रहावं म्हणुन मी माझी बडबड जरा कमी केली.

त्यानंतर अजून एक गाणं लागलं ते मी फारसं कधी ऐकलं नव्हतं व उगीचच त्याच्या कारभारात उपद्रव नको म्हणुन मी गप्प बसलो. लगेच रेडिओचा आवाज कमी करून गाडीवाल्याने या गायिकेचे नाव तेवढ्याच उत्साहाने सांगितले. ते गाणे तिने तिच्या boyfriend बरोबर, जो एक श्रीमंत बास्केटबॉल खेळाडू होता, त्याच्याशी breakup झाल्यावर बनवलं असा त्या गाण्याचा छोटा इतिहासही मिटक्या मारत सांगितला. त्या गाण्यात तिने त्या खेळाडुचे credit card चोरून आपल्या मैत्रिणींबरोबर खरेदीमध्ये कसे पैसे उडवले याचं वर्णन केलं आहे ही माहीती पुरवली. इथल्या लोकांचं मला हे कधी कळलंच नाही. प्रेमभंग झाल्यावरही इतक्या लगेच व सहजासहजी हे लोक परत काही न घडल्यासारखे वावरू कसे शकतात? मी तिच्या जागी असतो तर त्या धक्क्याने दीड दोन वर्षे गाणं बनवणं राहीलं दूर्; गाणी ऐकलीही नसती. कदाचित म्हणूनच ती आज एक यशस्वी गायिका होऊन कुठच्या कुठे पोचली आहे व मी कंपनीच्या जोरावर अशा या खटारा गाडीतल्या डब्बा रेडिओवर तिची गाणी ऐकण्यात समाधान मिळवतो आहे असं तिच्या वागण्याचं लगेच समर्थनही केलं (मनातल्या मनात).

गाणी व त्यांच्यावरची चर्चा असं करत गाडी विमानतळापाशी कधी पोहोचली हे कळलंच नाही. एव्हाना आम्ही आपले पेशे विसरून मोकळेपणे गप्पा मारण्यात व गाणी ऐकण्यात मग्न झालो होतो. त्याचा फायदा इतकाच की आमच्यात चालक - मालक अशी भावना न राहिल्याने प्रवास खूप रुक्ष झाला नाही. विमानतळापाशी गाडी उभी करून गाडीवाल्याने माझ्या बाजुचा दरवाजा उघडला. डिक्कीतून बॅग्स काढल्या व जमिनीवर अलगद नेवून ठेवल्या. माझ्याबरोबर झालेली मित्रत्वाची भावना व्यक्त करायला तो तेवढंच करू शकत होता. मी ही नेहमीपेक्षा जरा जास्त टीप देउन माझं समाधान करून घेतलं. या प्रवासाची परतफेड होईल याची एव्हाना मला खात्री झाली होती.

"Thank you Mr..." असं म्हणून मी त्याच्या शर्टावर कुठे बिल्ला आहे का ते शोधायला लागलो. त्याने त्याचं नाव सांगितलं व चेक हातात पडल्यावर "Thank you Sir!" असं म्हणून तो गाडीकडे निघाला. टॅक्सी संघटनेने ग्राहकांशी आदराने वागा व त्यांना नेहमी "सर" असे संबोधा अशी शिकवण दिली असावी. त्याने काही माझे नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. " See you soon! " तो जायला निघाला तसं मी त्याला म्हटलं. भले तो पुन्हा दिसेल न दिसेल मी आपली भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्रत्येक गोष्ट आपल्याला जमतेच असं नाही पण इच्छा व्यक्त केली तरी समोरच्याला आपल्या भावना कळतात हा माझा अनुभव. प्रवासाहून परत आल्यावर या वेळेस नवीन टॅक्सीचा अनुभव घेण्याऐवजी मी याच टॅक्सी संघटनेला फोन केला. यावेळेस गाडी आल्यावर गाडीकडे न पहाता मी ड्रायवर कोण आहे हे पाहू लागलो. नवीन ड्रायवर आहे हे पाहील्यावर राज कपूर तिसरी कसम मध्ये वहीदा निघून गेल्यावर जसा बैलांना वैतागून हाकतो तसं फटकळपणे मी त्याला जाण्याचा पत्ता सांगितला व सामान स्वतःच गाडीमध्ये ठेवून मालकाच्या तोर्‍यात सीटवर जाऊन बसलो.

(१) हे पुलंचं ढापलं आहे. व्यवस्थित "संदर्भ" न दिल्याने माझ्या शैक्षणिक जीवनात बरेच अडथळे आले आहेत.ती गोष्ट पुन्हा कधीतरी.

- राजेश देशपांडे