स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड..... हा आमचा चिटुकला मिटुकला देश.... पण आमच्या जीवनांत खूप मोठी वावटळ घेऊन आला. इथे कसे आलो, का आलो आणि यायचं तर हाच देश कसा निवडला असे प्रश्न पडले असतील पण ते जरा बाजुला ठेऊन देऊ.... कारण येणं तसं सोपं असतं पण तिथे टिकाव धरणं एक महाकठिण कर्मयोग! इथे पाऊल टाकलं तेच मुळी ऑक्टोबर १ तारखेला... कुंद धुक्याने भरलेलं वातावरण, झाडे-पाने दु:खी चेहरा घेऊन उभी, रस्त्यावर वर्दळ नाही. मुंबईतल्या धावपळीतून इथे आल्यावर पहिल्यांदाच एक विषण्ण करणारी पोकळी जाणवली! काहीच गोड वाटेना, काहीच सुचेना! पहिले थोडे दिवस घर लावण्यात, मुलांची नव्या शाळेत रुजुवात करण्यात गेले. माझ्या नवर्याची नोकरीमुळे भटकंती असायची. मुंबईला त्याची फिरती - एकत्र कुटुंबांत असल्याने - तशी अंगावर येत नव्हती. इथे आल्यावर बाबांची घरातली अनुपस्थिती मुलांना खूपच जाणवत असे. २५ वर्षांपुर्वी स्वीसमध्ये इंग्रजी अजिबात प्रचलित नव्हती. मुंबईत मी गाडी चालवत असे. इथे आल्यावर रस्त्याच्या उलट्या बाजुने गाडी चालवायचा सराव करायचा होता. गाडीच्या चाकावर बसल्याशिवाय नियम डोक्यात पक्के रुजत नाहीत अशी नवर्याची पक्की समजूत होती. मग एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घातलं. ते ड्रायव्हिंगचे तास एक दिव्य असायचं माझ्यासाठी! रस्त्यांतील सूचनेच्या पाट्या जर्मनमध्ये... बाजुला बसलेला शिक्षक त्याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत नियम समजाऊन सांगणार... त्याच्यादेखील सहनशक्तीची ती कसोटी होती हे आता मागे वळून पाहिलं तर जाणवतंय! मला मुंबईत गाडी चालवणं जास्त सोप्पं वाटायला लागलं. नशीब थोर होतं म्हणून ड्रायव्हिंगची लेखी परीक्षा द्यावी लागली नाही... रस्त्यावरच्या नियमांच्या पाट्या जर्मनमध्ये... वाचता न आल्यामुळे जर वाहतुकीची चूक झाली, पोलीसाने अडवलं तर आपली बाजू मांडता आली पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली. गाडीच्या चाकावर बसल्यावर वाहतुकीचे स्वीस नियम डोक्यांत फिट झाले आणि भाषा शिकायला क्लासमध्ये नाव घातलं. भाषेचे क्लास मी कधी चुकवत नसे. तिथे माझ्यासारखेच भाषेचे विद्यार्थी असत, निरनिराळ्या देशांतून आणि संस्कृतीतून आलेले! त्यांच्याशी बोलायला भेटायला मला आवडत असे. माझ्या वर्गांत अमेरिकन, अंग्रेज, इटालियन, स्पॅनिश, जपानी व थाई असे जगभरचे विद्यार्थी होते. क्लास आठवड्यातून दोनदा संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ असायचा. त्यानंतर आम्ही एखाद्या रेस्टारंटमध्ये कॉफी पीत इंग्रजीत खूप गप्पा मारत असूं. इथली अनुभवांची देवाणघेवाण मला समृद्ध करून गेली. माझा होमसिकनेस कमी झाला. भाषा शिकता शिकता नवीन ओळखी झाल्या, दुसर्या देशांतील लोकांच्या चालीरितींशी परिचय झाला... आणि मी या देशांत थोडी थोडी रुळू लागले! आमच्या गावांत गृहिणींसाठी एक व्यायामशाळा चालवीत असत. दर सोमवारी संध्याकाळी आठ वाजता गांवातल्या शाळेच्या व्यायामशाळेत हा क्लास सुरू होत असे. पहिला तास ऍरोबिक व नंतर अर्धा तास काही खेळ व स्वीस लोकगीते म्हणायची असत. थोडीफार भाषा समजायला लागल्यावर मी व्यायामशाळेत जायला सुरुवात केली. आधी आधी काही कळत नसे... भाषा शिकतो ती पुस्तकी असते, नेहमीच्या वापरातले शब्दप्रयोग त्या समाजांत मिसळल्याशिवाय समजत नाहीत. व्यायामशिक्षिका डोरा मला सांभाळून घेत असे. काही महिन्यात मला रोजच्या सरावातली स्वीस जर्मन समजू लागली. मग मात्र खूप मजा येत असे. त्या गावात असेपर्यंत मी एकदाही हा क्लास चुकवला नाही. एप्रिल ते ऑक्टोबर दर मंगळवारी दुपारी मी स्वीस मैत्रिणींबरोबर सायकलची भ्रमंती करत असे. दीड वाजता सायकलने निघून पाच वाजेपर्यंत घरी परत! स्वीसमध्ये सायकलसाठी वेगळ्या वाटा बनवल्या आहेत. नदीच्या कडेकडेने, डोंगरांना वळसे घेत, तलावाला फेरी घालत आम्ही भरपूर फिरलो. फिरता फिरता छान घरं, त्यांत फुलवलेल्या बागा बघायला मिळत. रस्त्यावर थांबून लोक बोलत असत. भारताविषयी माहिती विचारत असत. काही शेतकरीसुध्दा काम थांबवून बोलत असत. अशीच एका शेतकरीणीशी खूप चांगली मैत्री झाली... एकदा मी चिकाचं दूध विचारलं होतं. तिने ते पटकन आणून दिलं. मी तिला खरवस नेऊन दिला तो तिला इतका आवडला की गाय व्यायली की चिकाचं दूध पाठवायला अजुनही विसरत नाही, अर्थात मी देखील खरवस देऊन परतफेड करत असते! मुलं मोठी होत होती... आपापल्या विश्वांत रममाण झाली होती.. मला आता वेळ पुरून उरत असे, वरती वर्णन केलेले उपद्व्याप करूनही! मग मी नोकरी शोधायला सुरुवात केली. बर्याच कंपन्यांची दारं ठोठावली, एकतर वयही जास्त, मध्ये नोकरी केली नव्हती आणि सर्वांत मुख्य म्हणजे वशिला नाही. प्रयत्न सोडला नाही आणि एका विमा कंपनीत काम मिळालं. नोकरीमुळे माझी भाषा आणखी समृद्ध झाली, स्वीसमध्ये रहायला आवडू लागलं. इथपर्यंत यायला आयुष्याची पंचवीस वर्षं खर्ची घातली. कधी कधी असेही क्षण येतात... भारतातील सणवाराचे दिवस, आपली माणसं आठवतात. मन सैरभैर होतं, त्याला इलाज नाही. मी माझंच पुराण लावलंय नाही? पण "जावे त्याच्या देशा" मला वगळून कसं सांगू? माझी ही साता समुद्रापलिकडील कहाणी तुम्हाला आवडेल अशी आशा करून आवरतं घेते! - ललिता सुखटणकर
|