« | »




युद्धस्य कथा रम्या

युद्ध आपण फक्त कथा, कादंबर्‍या, सिनेमा ह्यांमध्येच अनुभवतो. त्याची तीव्रता काय असू शकते ह्याची कल्पना आपण त्या त्या पात्रांच्या बोलण्यातून, प्रतिक्रियेतूनच करू शकतो. तसं आजकाल अमेरिकेच्या कृपेने, दूरदर्शन वाहिन्या देत असतात अशा बातम्या आपला माल मसाला वापरून. पण आजकाल त्यांच्या तिखटमिठाचीसुद्धा इतकी सवय झालीये ना, की त्याची कळ फारशी आतपर्यंत पोहचतच नाही. तेव्हा युद्ध म्हणजे अजूनही डोळ्यासमोर शस्त्र खाली टाकून बसलेला अर्जुन आणि त्याच्यामागे प्रचंड सेना, त्याच्यासमोर कृष्णाचं विराट रूप - त्याला गीतोपदेश करताना - असंच काहीसं दृष्य येतं नाहीतर टिव्ही मालिकेमधली लुटुपुटूची युद्धं!

पण आम्ही कुवेतला ह्या सगळ्या युद्धाचा अनुभव घेतलाय. खरं म्हणजे चढाई करणारी अमेरिका, युद्ध होणार इराकमध्ये.... आम्ही आपले कुवेतचे रहिवासी उगाचच मधल्या मध्ये भरडले गेलो. का तर म्हणे 'कुवेतला स्वतंत्र अस्तित्व अमेरिकेमुळेच मिळालं'. आता करा त्यांची सेवा आणि भोगा सगळं निमूटपणे! 'युद्ध होणार, युद्ध होणार' हे बरेच दिवसांपासून ऐकत होतो. पण होत काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही लोक पण तसे बिनधास्त होतो. बाकी बातम्या बघून भारतातली रक्ताची नाती मात्र काळजी करत होती.

होता होता मार्च महिना उजाडला. सगळं काही तसंच व्यवस्थित सुरू होतं. खरं सांगायचं तर, आपल्याला भारतामध्ये कशी धावपळीची सवय असते.... म्हणजे कुठेतरी आंदोलनं, कुठेतरी संप, कुठेतरी दंगली.... कुठे रस्त्यावरून जाणारी लग्नाची वरात, तर कुठे एखादी प्रेतयात्रा! सतत काहीतरी घडत असतं आजूबाजूला.... आणि तशी सवयही होऊन जाते आपल्याला ह्या सगळ्याची. किंबहुना काही घडलं नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. पण इथे.... सगळी शांतता...! अहो, काही घडतंच नाही हो! होऊन होऊन काही झालं म्हणजे काय तर अपघात! हो.... ते मात्र भरपूर होत असतात. बेदरकार गाडी चालवणारे कुवेती, अतिशय स्वस्त मिळणारं पेट्रोल आणि पैशाची मस्ती ह्याचा संगम म्हणजे हे रस्त्यांवरचे अपघात. तात्पर्य काय.... तर सगळं काही शांत, सुरळीत चाललं होतं.

मार्च म्हणजे परीक्षांचा महिना. मुलांच्या परीक्षा सुरू झाल्या. अचानक सगळीकडे खबर पसरली की आता युद्ध सुरू होणार. इथल्या जुन्या लोकांनी १९९० चं युद्ध बघितलं होतं. त्यांचा अनुभव फारच वाईट होता. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू होती.... आता काय होणार? आपण काय करायचं? सगळ्या कंपन्यांमधून पत्रकं मिळाली. युद्धाच्या दिवसात काय काय करायचं आणि काय करायचं नाही ह्याची पत्रकं मिळाली. ती पत्रंकं बघितल्यावर मात्र धाबं दणाणलं. अब क्या करें? त्यात इतक्या सूचना होत्या ना...! एकतर ह्या युद्धात इराक जैविक आणि रासायनिक अस्त्रं वापरणार ही भीती होती. त्यामुळे संपूर्ण घर सील करायला सांगितलं होतं. राखाडी रंगाच्या एकदम जबरदस्त चिकटपट्ट्या वापरून सगळं घर अगदी पॅक करायचं. घरात हवाबंद डब्यात मिळणारे पदार्थ साठवायचे. भरपूर पाणी आणून ठेवायचं. मेणबत्त्या, आगपेट्या, टॉर्च तयार ठेवायचं. एका खोलीत अगदी सगळं बंदिस्त करायचं म्हणजे चक्क एयरकंडीशनरचे डक्टसुद्धा! त्याच खोलीत सगळं खाण्यापिण्याचं सामान नेऊन ठेवायचं. म्हणजे जर युद्ध सुरू झालं तर सगळ्या कुटुंबियांनी त्याच खोलीत एकत्र रहायचं. बापरे...! आम्ही तर हादरलोच. दुसर्‍या दिवशी अजून एक पत्रक. त्यात वेगवेगळ्या सायरन बद्दल माहिती. तीन प्रकारचे सायरन होतील. एक म्हणजे Danger is approaching! दुसरा Danger has approached! आणि तिसरा होता All Well! अहो, हे सगळं वाचल्यावर तर उरलं सुरलं अवसान पण गळालं.

आमची मग युद्धपातळीवर तयारी सुरू झाली. प्लॅस्टिकच्या पातळ शीट्स, चिकटपट्ट्या आणि त्या पत्रकात लिहिलेली सगळी सामग्री घरात आली. एक दिवस जीवाचा वठम् करून सगळं घर सीलबंद केलं. एकीकडे मनात धाकधूक! कारण हे रासायनिक युद्ध म्हणजे काय होणार हे कोणालाच माहीत नव्हतं.... सगळ्यांचे फक्त अंदाजच. हिरोशिमा, नागासाकीच्या आठवणींनी अक्षरश: घाम फुटायचा. मुलांना तर सुट्या जाहीर झाल्या. पण बाकी ऑफिसेस सगळी सुरूच होती. नवरा घरी येईपर्यंत काही जीवाला चैन नसायचं. नवरे घरातून बाहेर पडले की आम्ही सगळ्या मैत्रिणी एकमेकांच्या संपर्कात असायचो.

बोर्डाच्या परीक्षा काही ह्या युद्धामुळे थांबणार नव्हत्या. सगळे आई - वडील आणि मुलं अगदी जीव मुठीत धरून होते. बर्‍याचशा लोकांनी आपापली कुटुंबं आपापल्या देशात पाठवायला सुरुवात केली होती. पण आम्ही मात्र ठाम होतो. जे काय व्हायचंय ते सोबतच होऊ दे, असं म्हणून आम्ही इथेच रहायचं ठरवलं. जेव्हा हा निर्णय पक्का झाला, तेव्हा मन काहीसं शांत झालं. पण मधून मधून तो निश्चय डळमळायचा.

आता बरेचदा रस्त्यांवरून मिलिटरीच्या गाड्यांची रांग दिसायला लागली. एका पाठोपाठ एक जाणारी ती मोठ्ठी रांग बघून थोडं दडपण यायचं.

एक दिवस अचानक ह्यांचा ऑफिसमधून फोन आला की आम्हाला ऑफिसने सुटी दिली आहे.... म्हणजे तुम्ही कुवेतबाहेर जाऊ शकता. झालं...! हे ऑफिसचं फर्मान ऐकल्यावर जीवाची घालमेल व्हायला लागली. तिकडे भारतातून सुद्धा आई, बाबा आणि सगळ्यांचे फोन सुरू होते की तुम्ही ताबडतोब निघून या म्हणून. मग काय तिकडूनच - ऑफिसमधूनच - हे परस्पर तिकीटं काढायला गेले.

आता देवापुढची प्रार्थना बदलली होती. 'देवा, आम्हाला तिकीटं मिळू दे'. तिकिटांसाठी चक्क मारामारी. कधी एक तिकीट तर कधी दोन...! आम्हाला तर चक्क चार तिकीटं हवी होती. ह्यांचे तिकडून फोन.... "तू आणि मुलं तरी जा.... माझं एखादं तिकीट कधीही मिळेल". पण माझी एकटीने जायची अजिबात तयारी नव्हती. शेवटी Emirates ची तिकीटं मिळाली, ती सुद्धा फर्स्ट क्लासची घ्यावी लागली. पण दुसरा इलाजच नव्हता. ह्यांचा फोन आल्याबरोबर मी लगेच पॅकींगला सुरुवात केली. दुसर्‍या दिवशीचं फ्लाईट होतं.

बरचसं कुवेत रिकामं होत होतं. घराकडे अगदी शेवटचं पोटभर बघून घेतलं. न जाणो पुन्हा कधी बघायला मिळेल की नाही....! आमच्या नेहमीच्या टॅक्सीवाल्यासोबत आम्ही एअरपोर्टवर पोचलो. इतकी तुफान गर्दी होती तिथे की बस. सगळ्यांची एकच झुंबड. आम्ही तसे लवकर निघाल्यामुळे आम्हाला बोर्डींग पासेस लवकर मिळाले आणि आम्ही सगळे सोपस्कार करून विमानात बसायची वाट बघत होतो. आधीच्या ३-४ फ्लाईट्स कॅन्सल झाल्यामुळे आमचं विमान उडणार की नाही ह्याची धास्तीच होती. पण बोर्डींग पास मिळाल्यामुळे मन जरा शांत झालं होतं.

पण काहीतरी वेगळंच घडायचं होतं. अचानक तो 'पहिला' सायरन वाजला. Danger is aaproaching वाला.... झालं, सगळीकडे नुसता गोंधळ उडाला. कोणाला काही सुचेना, काय करावं कळेना. नुसती धावाधाव. विमानळावरच्या कर्मचार्‍यांनी घोषणा करून तळघरात जायला सांगितलं. हातातलं सामान जिथल्या तिथे टाकून सगळे तळघराकडे पळाले. आमचं सामान आत गेल्यामुळे आमच्याकडे फारसं सामान नव्हतं. फक्त जीव वाचला तरी पुरे.... जान बची लाखो पाए! आम्ही एकमेकांचे हात घट्ट धरून काळोखातून तळघराकडे सरकत होतो. बायका मुलांची तर नुसती रडारड आणि आरडाओरड. तेव्हढ्यात कोणीतरी ओरडलं, 'अरे ये Chemical weapon है', सगळ्यांच्या परफ्युमचे वास आता अगदी Chemical weapons वाटायला लागले. आम्ही सुद्धा जीवाच्या आकांताने स्वत:ची, मुलांची नाकं आपापल्या ओढण्यांनी बांधायला लागलो. 'आई गं, देवा, वाचव रे!' मनातल्या मनात भरपूर नवस बोलून झाले. शेवटी कसेबसे तळघरात पोचलो. इतकी गर्दी की बस. बर्‍याचशा बायका आपापल्या मुलांना कवटाळून गळे काढत होत्या. कोणी मोबाईलवरून संपर्क साधत होता, कुणी आपल्या सामानाला घट्ट धरून बसलं होतं. तेव्हढ्या गर्दीत २-३ पत्रकार ह्या सगळ्या सोहळ्याचं शांतपणे चित्रिकरण करत होते. आम्ही त्यांच्यासमोर आमचे चेहेरे शक्य तेवढे शांत ठेवायचा प्रयत्न करत होतो.

तेव्हढ्यात All well चा सायरन वाजला. सगळ्यांनी हुश्श:...! सुटकेचा नि:श्वास सोडला. सगळा लवाजमा पुन्हा वर आला. आम्ही पुन्हा इमिग्रेशनचा ठप्पा मारून विमानात बसायची वाट बघायला लागलो. फक्त पाच मिनिटं झाली असतील. पुन्हा एकदा तसाच दणदणीत खतरा सायरन वाजला.... पुन्हा एकदा तीच काळोखी वाटचाल, तीच धडधड, नवस फक्त नवे. आता मात्र धीर सुटायला लागला होता. बाहेर काय सुरू आहे काही कळतंच नव्हतं. पुन्हा एकदा 'ऑल वेल' झाल्यावर वर आलो. मग मात्र ती फ्लाईट कॅन्सल झाली. आता पुन्हा मोठा प्रश्न! आता काय करायचं? घरी तरी कसं जायचं? बाहेर आलो तर सगळ्यांची तुफान गर्दी. आम्ही आमच्या त्याच टॅक्सीवाल्याला पुन्हा फोन केला. त्याचं नाव अलीभाई.... अगदी अल्लासारखा धावून आला तो आमच्या मदतीला. जेवढे लोक मावतील तेवढे लोक घेऊन त्याने आम्हाला सुखरूप घरी आणून सोडलं.

घरी आल्यावर शांती नव्हती. आता काही कुवेतमध्ये रहाणं शक्य नव्हतं. त्याच रात्री आमच्या घरासमोरच्या समुद्रात अमेरिकेने सोडलेलंच मिसाईल मिसफायर होऊन पडलं. देवा रे..! रात्र कशी बशी काढली आणि सकाळीच बुकींग करायला निघालो. भरमसाठ पैसे देऊन त्याच दिवशीची तिकीटं मिळावली. पण त्या तिकीटांवर स्टीकर हवं होतं म्हणून आम्हाला कुवेतच्या दुसर्‍या टोकाला जावं लागलं. मुलांना तिकडूनच फोन केला आणि तयार रहायला सांगितलं. रस्त्यात जागोजागी चेकींग सुरू होतं. तिकडे पोचायलाच दोन तास लागले. तिथेही गर्दी! पण आम्हाला स्टिकर लावून मिळालं एकदाचं. आम्ही घरी आलो आणि सामान घेऊन त्याच टॅक्सीने एअरपोर्टवर निघालो. वाटेत ह्यांच्या एका मित्राला सुद्धा घेतलं. त्याचं कुटुंब आधीच भारतात गेलं होतं. त्यामुळे त्याची अजून घालमेल सुरू होती. अहो, किती तरी लोक तिथे एअरपोर्टवरच ठिय्या मारून बसले होते.

शेवटी पोहचलो एअरपोर्टवर. आम्हाला हैदराबादचं तिकीट मिळालं होतं. म्हटलं हैदराबाद तर हैदराबाद. आम्हाला भारतात पोचव रे.... मग ते अगदी कन्याकुमारीला पोचवलंस तरी चालेल. आमचे पासेस घेऊन आम्ही इमिग्रेशनच्या दिशेने जायला लागलो, तर अचानक तो मित्र किंचाळत आला, की त्याची बॅग गायब झाली म्हणून. त्यात त्याचे सगळे महत्वाचे पेपर होते म्हणे.... झालं.... कुवेत काही आम्हाला सरळ मार्गाने जाऊ देणार नव्हतं वाटतं. मग आम्ही सगळीकडे फिरून बघितलं.... आणि काय आश्चर्य! ती बॅग अगदी तश्शीच, त्याच अवस्थेत समोर दिसली. तो तर आनंदाने वेडा व्हायचा राहिला. मग ती बॅग अगदी हृदयाशी कवटाळून तो विमानात बसला. विमानात शिरताना छातीत चांगलंच धडधडत होतं. शेवटी विमान उडणार की नाही. सगळ्यांच्या चेहेर्‍यावर भयंकर टेन्शन होतं.

आणि विमान एकदाचं धावपट्टीवर पळायला लागलं.... मनात जोरजोरात देवाचा धावा सुरू होता.... शेवटी विमानानं जमीन सोडली आणि आकाशात झेपावलं. त्या डायनासॉरच्या ज्युरॅसिक पार्क सिनेमातला शेवटला प्रसंग अक्षरश्: आम्ही जगत होतो. जमिनीवर पाय असले की माणूस सुरक्षित असतो असं म्हणतात, पण आम्ही मात्र तेव्हा आकाशात उडाल्यावर सुरक्षित होतो.

भारतात पोचल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. कुवेतमधल्या सगळ्या खबरी अगदी रंगवून रंगवून सांगितल्या लोकांना. ८-१० दिवसच झाले असतील. कुवेतमधून तिथे राहिलेल्या मित्रांचे फोन.... 'युद्ध संपलं! आता लगेच या नाहीतर नोकरीचं काही खरं नाही. आता इथे काहीच धोका नाही!' झालं...! आता पुन्हा भारतातून कुवेतमध्ये जाण्यासाठी तडफडाट! मग काय.... Back to square one! पुन्हा आमची धावपळ तिकीटांसाठी!

पुन्हा जी मिळतील ती तिकीटं घेऊन आमचं पुन:श्च आगमन कुवेतमध्ये! इथे राहिलेली मंडळी आमच्यावर अजूनही हसतात हो...! डरपोक म्हणून! मग त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा आमच्यावर हसून घेतो. करणार काय....? कुवेतमध्ये जे काही झालं ते सगळं बघून (भोगून??) आम्ही भारतात गेलो. आम्ही गेल्यावर काहीच विशेष घडलं नाही. जणू काही फक्त आम्हाला मायदेशी पाठवायलाच हे सगळं घडलं. आता नाही म्हणायला अमेरिकेचं थोडं फार नुकसान झालं म्हणा.... :-)

आता या गोष्टी आठवल्या की मज्जा वाटते. पण त्यावेळी मात्र पाचावर धारण बसली होती.

म्हणतात ना.... 'युद्धस्य कथा रम्या'!

- जयश्री अंबासकर