दैव जाणिले कुणी...? १. सुनीता वर्मा... फक्त नाव सांगितलं तर कुणालाही कसलाच अर्थबोध होणार नाही. असेल कुणीतरी एखादी व्यक्ती! चारचौघांसारखी... अगदी माझंही हेच मत होतं त्यांच्याबद्दल अगदी गेल्या आठवड्यापर्यंत. सध्या आमच्या मासिकाच्या महिला विशेषांकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या यशस्वी महिलांच्या मुलाखती घेणं धडाक्यात सुरू आहे. कॅंटीनमध्ये, डेस्कपाशी, येता - जाता सध्या याच अंकाचा विषय चालू असतो. मला सरांनी परवा सकाळीच बोलावून ' सुनीता वर्मा या डिटेक्टिव्हची मुलाखत तुला घ्यायची आहे. ' हे सांगितलं होतं. त्यानुसार मी माझा होमवर्क सुरु केला होता. त्याच दुपारी लंचनंतर माझा सहकारी श्रीकांत आणि मी त्याच्या डेस्कपाशी गप्पा मारत उभे होतो. " शिक्या, प्रियदर्शिनी काटकरची मुलाखत तू घेतोयस म्हणे? " " हो ना... किती यातायात झाली मला ती असाईनमेंट मिळवायला. " " म्हातारी होत चाललेय पण ती आता. " " हॅ चले, म्हातारी कशानं? फक्त सदोतीस वर्षांची आहे ती... पण काय दिसते!! आय हाय... " " गपे शिक्या, परवा आपण तिचा तो सिनेमा पाहिला त्यात क्लोजप सीन्समध्ये वय जाणवतंय तिचं... " " जाऊ दे ना! मला तिच्याशी लग्न थोडीच करायचं आहे. मला तिची मुलाखत घ्यायची आहे. खरं तर एकच प्रश्न विचारायचा आहे... " शिक्याने डोळे मिचकावत माझ्याकडे बघितलं. " काय? " " तिच्या करीयरच्या सुरुवातीला तिने एका मासिकासाठी दिलेले आणि नंतर बंदी आल्याने बघायला दुर्मिळ झालेले तिचे ' ते ' फोटो बघायला मिळतील का? " " वाटलंच... बाकी, तू तुझी मनोराज्यं चालू दे. मी आलेच पाच मिनिटांत. सुनीता वर्माला फोन करायचा आहे. मुलाखतीची वेळ ठरवण्यासाठी. " " सुनीता वर्मा म्हणजे ती???? ती डिटेक्टिव्ह????? " शिक्या किंचाळला. " इतकी फेमस आहे का ती? " " आधी होती. When she was at the peak of her career. आपल्याकडे महिला डिटेक्टिव्ह हा प्रकार जवळपास नसल्याने ती बरीच लोकप्रिय झाली होती. आता सध्या retired life एंजॉय करतेय. लकी यू! तुला बोलायला मिळतंय तिच्याशी. " माझ्या डेस्कपाशी जाऊन मी सुनीता वर्माचा नंबर फिरवला. तीन चार बेलनंतर आवाज आला... " हॅलो. सुनीता वर्मा बोलतेय. " व्वा.... काय खणखणीत आणि करारी आवाज आहे. " मी अनुराधा बोलतेय. संस्कृती मासिकाच्या ऑफिसमधून. आपली मुलाखत घेण्यासंदर्भात आधी सरांचं आपल्याशी बोलणं झालेलं आहेच. प्रत्यक्ष मुलाखतीकरता वेळ हवी होती. " " मला दुपारच्या वेळात केव्हाही चालेल. उद्या तुम्ही येऊ शकाल का? " आवाजात एक प्रकारची सहजता होती त्यांच्या.... उद्याच??? माझा ' होमवर्क ' झालेला नाहीय अजून! " तुम्हाला शनिवारी नाही का चालणार? " मी विचारलं. " मी येत्या शुक्रवारी तीन महिन्यांकरता बाहेर चाललेय. सध्या तीही कामं चालू आहेत. माझा नाईलाज आहे. " मी चटकन मनाशी विचार केला. " ओके चालेल. मी उद्याच येईन. दुपारी १ वाजता चालेल ना तुम्हाला? " " हो नक्की. भेटू. बाय. " ....दुसर्या दिवशी मुलाखतीची जय्यत तयारी करून मी सुनीता वर्मांच्या पत्त्यावर पोचले. बंगल्याचं फाटक बंद होतं. आतमध्ये एक भला दांडगा कुत्रा शांत बसलेला होता. त्याला पाहून मी बाहेरच थबकले. तेवढ्यात आतून " टायगर, कम हियर... " अशी हाक आली आणि पाठोपाठ सुनीता वर्मा स्वतः बाहेर आल्या. सही! काय व्यक्तिमत्त्व आहे! मी मनाशीच दाद दिली. साडेपाच फुटांपेक्षा जरा जास्त उंची, त्याला साजेसा सुडौल बांधा, या वयातही काळेभोर असलेले केस, जीन्स आणि टीशर्ट असा सुटसुटीत पेहराव आणि चेहर्यावर शोभून दिसणारा करारीपणा... त्यांनी कुत्र्याला बाजूला नेऊन साखळी घातली. आणि माझ्याकडे वळून पाहत, हसून मला आत यायची खूण केली. " अनुराधा, बरोबर? मी सुनीता वर्मा. टायगर फार शांत कुत्रा आहे पण तरीही लोकांना भीती वाटते म्हणून कुणी आलं की बांधून ठेवते त्याला. या आत या. " " मला अगं म्हटलंत तरी चालेल! मी बरीच लहान आहे तुमच्यापेक्षा. " मी चटकन बोलून गेले. त्यावर त्या प्रसन्न हसल्या. आम्ही दोघी त्यांच्या बागेत टाकलेल्या टेबलाशी जाऊन बसलो. " काय घेणार तू? सरबत, चहा वगैरे? " " आत्ता या वेळी खरंच काही नको. आत्ताच जेवण करून आलेय मी. आपण मुलाखत सुरु करूयात. तुमचा फार वेळ यात मोडायला नको. " " ओह नो प्रॉब्लेम... माझ्या व्यवसायातून निवृत्ती घेतल्यापासून तशी मी मोकळीच असते. वेळच वेळ आहे माझ्याकडे सध्या. तू त्याची चिंता करू नकोस. " ...मुलाखत सुरु झाली. नेहमीचे प्रश्न म्हणजे ' याच व्यवसायात पडावंसं का वाटलं? ' वगैरेवर भर न देता मी त्यांना थोडे वेगळे प्रश्न विचारून बोलतं करत होते. त्याही मनमोकळेपणाने उत्तरं देत होत्या. " सुनीता, तुमच्या कारकीर्दीमधली तुम्हाला चॅलेंजिंग वाटलेली आणि कायम लक्षात राहिलेली अशी एखादी केस? तुम्ही त्याबद्दल डिटेलमध्ये सांगू शकाल? " " अनुराधा, माझा व्यवसाय असा आहे की प्रत्येक केस या ना त्या कारणाने अविस्मरणीय ठरते. तरीही एक केस अशी आहे जी मी आजपर्यंत विसरू शकलेले नाही. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला ही केस माझ्याकडे आली होती. आज इतक्या वर्षांनंतरही ती माझ्या मनात ती ताजी आहे. That case was wonderful. And mind you, I didn't do much to bring it to the end. But it was a memorable experience. पण फार लांबलचक आहे गं ती. तुझ्या मासिकात इतकी जागा मिळेल का त्याला? " " तुम्ही काळजी करू नका. वाटल्यास मी ती स्वतंत्रपणे पुढच्या अंकात छापेन; पण ही केस मला ऐकायचीच आहे. " आपल्या खुर्चीवर मागे रेलून बसत धीरगंभीर सुरात त्या बोलू लागल्या. २. " माझं ऑफिस त्यावेळेस बंगलोरमध्ये होतं. माझ्या करीयरचे सुरुवातीचे दिवस होते ते. माझ्याकडे फारशा केसेसही येत नसत. ज्या येत त्याही फार गुंतागुंतीच्या नसत. पण तरीही त्यामुळे माझा अनुभव वाढत होता; म्हणून मी समाधानी होते. डिसेंबरच्या सुरुवातीची ती सकाळ असेल; मी नेहमीप्रमाणे साडे आठला माझ्या ऑफिसमध्ये आले. ऐन हिवाळ्याचे दिवस. थंडी जबरदस्त होती. खरं तर मला घरीच बसावंसं वाटत होतं. केस तर एकही नव्हती तेव्हा. त्यामुळे तो विचार बळावलाच होता त्या सकाळी. तरीही मी तयार होऊन ऑफिसला पोचले होते. ऑफिसमध्ये पोचल्या पोचल्या मी समोरच्या टपरीवाल्याला दोन गरमागरम चहाची ऑर्डर दिली. आतमध्ये येऊन मी डेस्कवरचे ताजे पेपर चाळू लागले. तेवढ्यात बाहेरची बेल वाजली. चहावाला चहा सरळ आतमध्ये आणून देई. ' इतक्या सकाळी कुणी क्लायंट???? ' माझं आश्चर्य लपवत मी बाहेर गेले. दरवाजापाशी एक तरुणी उभी होती. तिचं वय तिशीच्या आसपास असावं. दिसायला दहाजणींत तरी उठून दिसेल अशी. कपडे साधेसेच असले तरी उंची वाटत होते. रात्रभर प्रवास करून आली असावी. मी समोरच्या टपरीवाल्याला आणखी एक चहा पाठवायला सांगितलं. " आपण? " " मी नेहा... नेहा भागवत. तुमच्याकडे माझं फार महत्वाचं काम आहे. " " या, आत या. बसा जरा स्वस्थ. थोडा चहा प्या. तुम्हाला हुशारी वाटेल. मग आपण सविस्तर बोलूया. " तिने आपले हातमोजे, कानटोपी काढली. चहावाल्याने आणून ठेवलेला चहा पीत तिने बोलायला सुरुवात केली. " मी... मला काही कळतच नाहीये हो. माझ्या जिवाला धोका आहे. पण कुणाकडून तेच कळत नाहीये. मला... मला मदत करा प्लीज. " " हे पहा नेहा, तुम्ही शांत व्हा. आणि जे काही सांगायचं आहे ते नीट तपशीलवार सांगा. जितकं डिटेलमध्ये सांगाल तितकं बरं. " थोडं थांबून, चहा पीत ती बोलू लागली. " आय होप मी सगळं नीट सांगू शकेन. मध्ये काही मिस करणार नाही अशी आशा... माझं पूर्वाश्रमीचं नाव नेहा राव. माझे वडील एक उद्योजक होते. इथेच बंगलोरमध्ये त्यांचा gym/sports equipments तयार करायचा बिझनेस होता. माझी आई मी तेरा वर्षांची असतानाच वारली. मी आणि पपा असे दोघंच होतो एकमेकांना. तसे आमचे जवळचे नातेवाईकही नाहीत. पपांचे एक मोठे भाऊ होते; गिरीशकाका. त्यांनी बर्याच वर्षांपूर्वी पपांशी संबंध तोडले होते. पपांचं आणि माझंही friends circle फार मर्यादित होतं. पार्टीज वगैरेंना जाणं पपांना फारसं आवडत नसे. त्यापेक्षा ते त्यांच्या स्टडीमध्ये बसून पुस्तकं वाचणं पसंत करत. मला खेळांची आवड आहे. किंवा ' आवड होती ' म्हणा. आता मी फारशी खेळू शकत नाही. रोजचा व्यायाम, खेळ यामध्ये मी स्वतःला busy ठेवायचे. " " तुमची आणि तुमच्या नवर्याची ओळख केव्हा झाली मग? " " पपांनी दिलेल्या मोजक्या पार्ट्यांपैकी एक म्हणजे पपांच्या ५० व्या वाढदिवसाची पार्टी. त्या पार्टीमध्येच माझी आणि आदित्य भागवतची ओळख झाली. आदित्यने नुकताच import-export चा business सुरु केला होता. त्याच्या बोलघेवड्या स्वभावामुळे त्याच्या समव्यावसायिकांमध्ये तसंच, बिझनेस सर्कलमधल्या इतरांशीही चटकन ओळखी झाल्या होत्या. पपांशी आणि माझ्याशी चांगली ओळख झाल्यानंतर तो कधीमधी घरी देखील येऊ लागला. तो अर्थातच माझा चांगला मित्र बनला. तसं सगळं सुरळीत सुरु होतं. पण... " तिचे डोळे नकळत पाण्याने भरून आले. " काय झालं, नेहा? " " दीड वर्षांपूर्वीची ती ऑगस्टमधली रात्र मी अजूनही विसरू शकत नाही. पपा आणि मी मंगलोरहून आमच्या कारने परतत असताना आम्हाला हायवेवर भयंकर accident झाला. पपा त्याच वेळी... त्याच वेळी... ऑन द स्पॉट गेले... मी वाचले... पण जबर जखमी झाले होते. मी वाचण्याचीही आशा नव्हती. अशा वेळेला आदित्य माझ्या मदतीला धावून आला. माझ्यावर तीन ते चार मोठी ऑपरेशन्स झाली; तेव्हाही त्यानेच मला आधार दिला. दोन महिने लोटले. सुदृढ शरिरामुळे मला लवकर बरं व्हायला जमेल असं वाटायला लागलं. तरीही डॉक्टर माझ्या रिकव्हर होण्याची खात्री देऊ शकत नव्हते. माझ्या injuries तेवढ्या प्राणघातकही होत्या. त्यामुळे मी हॉस्पिटलमध्येच होते. सुमारे अडीच महिन्यानंतर माझी प्रकृती बर्यापैकी स्टेबल झाली. तेव्हा डॉक्टरांनी मला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. " " एक मिनीट... आदित्य मदतीला धावून आला वगैरे... म्हणजे तुमचं आणि त्याचं लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत? " " नाही. तोवर मी लग्नाचा विचारही करत नव्हते. आदी माझा चांगला मित्र होता इतकंच... पण अचानक डिस्चार्जच्या आदल्या दिवशी आदित्यने माझ्याशी लग्न करण्याची इच्छा दर्शवली. त्याच्या मते या अशा प्रसंगी कुणीतरी जवळच्या व्यक्तीने माझी काळजी घेणं आवश्यक होतं. त्याची आणि माझी अतिशय छान मैत्री असल्याने त्याला माझ्याशी लग्न करण्यात काहीही अडचण नव्हती. बराच विचार करून मी आदीला होकार द्यायचं ठरवलं. पपांच्या जाण्यामुळे मी एकटी पडले होते. माझं आणि आदित्यचं लग्न झालं. माझा संसार सुरु झाला; पण पपांच्या अचानक मृत्यूमुळे मला बंगलोरमध्ये राहणं नकोसं वाटायला लागलं होतं. मी आदीकडे बंगलोरपासून दूर जाण्याचा हट्ट धरला. ... " कुठे राहणारेस मग तू, नेहा? " " कोडाईकनाल. पपांना तिथे राहायला आवडायचं. मलाही या सगळ्या गर्दीपासून दूर जाऊन बरं वाटेल तिथे. " " नेहा, तुझी प्रकृती अजून नीट नाहीये. कधीही critical होऊ शकते. तिथे वैद्यकीय मदत मिळणार आहे का वेळेवर? आणि तुला काही झालं म्हणजे? " आदीचा आवाज नकळत कातर झाला. " आदी, प्लीज... मला काही होणार नाही. तू इतकं प्रेम करतोस ना माझ्यावर. मी नक्की बरी होईन. " हो ना करता करता अखेर मोठ्या प्रयत्नाने आदीने मला कोडाई कनालला नेण्याचं ठरवलं. माझ्या दिमतीला एक नर्स ठेवण्यात आली. पहिले सहा महिने प्रचंड कष्टाचे गेले. त्या अपघाताने मला अतिशय अशक्त, दुबळं बनवलं होतं. But still I fought. खेळाडू असल्याने मी त्यातून सावरायला लागले. " आदी या काळात बंगलोरमध्येच होता? की कोडाईला तुमच्या सोबत? " " या सर्व काळात आदी बंगलोर - कोडाई अशा वार्या करत असे. त्याचा बिझनेस त्याला इकडं आणणं शक्य नव्हतं. तरीही तो शक्य तितक्या वेळा कोडाईत माझ्याबरोबर असायचा. " " आणखी एक... तुम्ही कोडाईला आलात, आदीशी लग्न केलंत.. तुमच्या पपांच्या business चं काय झालं? " " पपांचा business मी कोडाईला येतानाच आदीच्याच नावे करून टाकला. कारण सुरुवातीला मी जगेन, अशीही आशा मला नव्हती. आणि तसंही तो business चालवणं मला शक्य नव्हतंच! माझा जगाशीही संपर्क तुटलाच होता. नव्हे, मी तो तोडून टाकला होता. आत्ता गेल्या मार्चमध्ये आदीने पपांचा business विकला एका मोठ्या व्यायसायिकाला. कारण त्याला दोन दोन business सांभाळणं जमत नव्हतं. पपांचा business त्यामुळे तोट्यात जात होता. मीही त्याला हरकत घेतली नाही. या डीलमध्ये मिळालेली रक्कम आदीने माझ्या नावे ठेवली. मी नकोच म्हणत होते. तरीही... आदी खूप छान नवरा आहे. आयुष्य मार्गी लागतंय असं वाटायला लागलं होतं. मी आनंदात होते. पण... " नेहा भागवत बोलायची थांबली. मी तिला पाणी दिलं. " तुमचा कार्डसवरून सांगितल्या जाणार्या भविष्यावर विश्वास आहे का, सुनीता? " " म्हणजे ते टॅरो कार्डस वगैरे? " " हं काहीसं तसंच! " " अजूनतरी मी असं भविष्य जाणून घ्यायच्या फंदात पडलेले नाहीय. " मी हसून म्हटलं. " मीही कधी मुद्दामहून तसा प्रयत्न केला नव्हता. पण गेल्या शनिवारी..... " ३. " काय झालं गेल्या शनिवारी, नेहा? " " गेल्या शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी आदी कोडाईला घरी आला. दिवसभर मग मी आणि आदी भटकत होतो सहज. संध्याकाळी मला फोन आला, मिसेस नंदिनी मेहताचा. आता तुमच्या माहितीसाठी, नंदिनी मेहता ही एक टिपिकल पेज थ्री टाईपची बाई आहे. नवर्याचा प्रचंड बिझनेस आहे. त्या पैशाच्या जोरावर नंदिनी सतत भटकत असते आणि असेल तिथे पार्टीज एंजॉय करत असते. अगदीच कुठे पार्टी नसेल तर ही स्वतः पार्टी देईल... कोडाईमध्ये मेहतांचा प्रशस्त बंगला आहे. आणि सहसा इतर कुणीही विनाकारण पार्टी देत नसल्याने नंदिनीला स्वतःलाच त्या अरेंज कराव्या लागतात. अर्थात त्याला तिची ना नसतेच म्हणा कधी. त्या दिवशी तिचा फोन आला तो ह्याच कारणासाठी. ' शनिचरकी हसीन शाम और पार्टी ना हो, अच्छा नही लगता.... ' वगैरे बोलून तिने मला पार्टीचं आमंत्रण दिलं. मला खरं तर जायला अजिबात आवडलं नसतं. रविवारी रात्री मी आदीसोबत बंगलोरला एखाद दोन महिने राहायला यायला निघणार होते. आता माझी तब्येत पुष्कळशी बरी असल्याने मी प्रवास करू शकते. आदीच्या कोडाई - बंगलोर अशा फेर्या वाचवाव्यात म्हणून मी हा बंगलोरला यायचा घाट घातला होता. ते संपूर्ण पॅकिंग बाकी होतं. ... ' जा ना नेहा पार्टीला. बरं वाटेल चार लोकांमध्ये मिसळून. मला आज नेमका एक महत्त्वाचा फोन कॉल आहे म्हणून नाहीतर मी पण आलो असतो. पार्टी आटोपली की कॉल कर. मी घ्यायला येतो तुला. ' आदीने फारच आग्रह केला म्हणून मी काहीशा अनिच्छेने तयारीला लागले. संध्याकाळी सात वाजता मी मेहतांच्या बंगल्यावर पोचले. पार्टी नेहमीसारखीच होती. नंदिनी मेहता नेहमीप्रमाणेच तिच्या पार्टीवेअरमुळे लक्षवेधक दिसत होती. तिच्या नेहमीच्या अघळपघळ स्टाईलमध्ये तिने माझं स्वागत केलं आणि चार पाच मिनिटं जुजबी काहीतरी बोलून ती पुन्हा तिच्या ग्रुपमध्ये मिसळली. मला लगेचच तिचा निरोप घ्यावासा वाटत होता; पण ते तितकंसं सभ्य दिसलं नसतं; म्हणून मी उगीचच एका एकीकडे असलेल्या टेबलाशी बसून वेळ काढत होते. ' मी इथे बसू शकते का? ' कुणाचातरी आवाज आला तसं मी चमकून बघितलं. ' माझं नाव सिद्धी. नंदिनीच्या ग्रुपमध्ये नवीनच आहे मी. साहजिकच मी कुणाला ओळखत नाही इथे. तुम्ही एकट्याच बसलेल्या दिसलात; म्हणून तुम्हाला जॉईन करायला आले. चालेल नं? ' मी मान डोलावली. सिद्धी दिसायला अतिशय आकर्षक होती. वयाने ती माझ्याएवढीच असेल. हळूहळू आम्ही दोघी गप्पा मारू लागलो. बोलता बोलता सिद्धीने मला तिच्या शिक्षणाबद्दल सांगितलं. ' मी भविष्य सांगते. कार्डस आणि फाशांचा वापर करून. ' ' वॉव. म्हणजे टॅरो कार्डस नं? ' ' नाही. हा थोडा वेगळा प्रकार आहे. खूपच दुर्मिळ झालाय आजच्या काळात. हे शिक्षण देण्यासाठी अख्ख्या जगात एकच पाठशाळा आहे सध्या. मी तिथेच शिकले. बरं ते जाऊ दे. तुला तुझं भविष्य जाणून घ्यायचं आहे? ' मला तिथे नुसतं बसून नाहीतरी कंटाळा आलाच होता. मी हो म्हणाले. तिने नंदिनीला हाक मारली. ' नंदिनी आम्हाला एखादी खोली मिळू शकेल थोड्या वेळासाठी? शक्यतो शांत. ' ' ओह सिद्धी... हिचं भविष्य सांगतेयस का? Neha, she is gifted. तिचं भविष्य अचूक ठरतं हं. नो प्रॉब्लेम! वरच्या मजल्यावरच्या खोल्यांपैकी एक मी उघडायला लावते तुमच्यासाठी. ' नंदिनीने ताबडतोब एका नोकराला हाक मारून खोलीची व्यवस्था करायला लावली. मी आणि सिद्धी नोकराच्या पाठोपाठ गेलो. खोलीमध्ये सिद्धीने नोकराला केवळ थोड्याफार मेणबत्त्या पेटवून ठेवायला सांगितल्या आणि ती एका टेबलाशी डोळे मिटून स्वस्थ बसून राहिली. नंतर काही वेळाने तिने जवळच्या एका मखमली बटव्यातून काही कार्डस आणि तीन फासे काढले. आणि ते टेबलावर माझ्या तिच्यामध्ये काही विशिष्ट पद्धतीने मांडून हात जोडले. ती स्थिर आवाजात बोलू लागली, ' नेहा, तुझ्यासमोर आता काही उलटी करून ठेवलेली कार्डस आणि फासे आहेत. तुला फक्त एकवेळाच तीन कुठलीही कार्डस उचलता येतील. एक एक करून कार्डस निवड. शेवटचं कार्ड उलटतानाच तुला फासे टाकायचे आहेत. त्यानंतर मी तुला तुझं भविष्य सांगेन. ' एवढं बोलून ती स्थिर नजरेने कार्डसकडे बघत राहिली. तो मेणबत्त्यांचा प्रकाश, ती एकीकडची शांत, काळोखी खोली, समोर काही न बोलता बसलेली सिद्धी, ती भविष्य सांगण्याची विचित्र पद्धत... I was feeling uneasy. तरीही मी धीर धरून एकएक कार्ड उलटू लागले. मी शेवटचं कार्ड उलटताना फासे टाकले. तीन, एक, एक... शेवटचा पत्ता उघडताच सिद्धीचा चेहरा बदलला. तिन्ही कार्डांकडे ती एकटक बघत राहिली. आणि अस्फुट स्वरात पुटपुटली... ' तुझ्या जिवाला धोका आहे नेहा. कुणालातरी तू या जगात नकोयस. ' ' काय? कुणीतरी मारणार आहे मला????????? ' मी ताडकन उभी राहिले. त्या धक्क्याने ते फासे कसेतरीच हलले. कार्डस विस्कटले. सिद्धीची नजर अजूनही त्या तीन कार्डांवर खिळली होती. ' हे इतकं अचूक असू शकत नाही... ही एक शक्यता आहे... हो ना? ' 'These cards never fail, Neha. It's gonna happen.' ४. " मग तुम्ही काय केलंत, नेहा? " " असल्या भविष्यकथनामुळे मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. मी जवळपास धावतच पुन्हा पार्टीच्या ठिकाणी आले. माणसांत आल्यावर मला जरा बरं वाटलं. मी आदीला कॉल केला आणि त्याला मला घ्यायला यायला सांगितलं. पण आदी बिझी होता. त्याचा महत्त्वाचा फोन कॉल चालू होता. त्याने ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवतो म्हणून सांगितलं. पण जवळपास दोन तीन तास उलटून गेले तरी ड्रायव्हरचा ठावठिकाणा नव्हता. शेवटी नंदिनी मेहताने मला तिच्या गाडीतून घरी सोडायचं ठरवलं. बहुतेक सर्व गेस्ट्स गेले होते. आम्ही बाहेर आलो. नंदिनी मेहताच्या गेटपास्शी काही अंतरावर माझी गाडी उभी होती. " " म्हणजे तुमचा ड्रायव्हर आला होता? " " तो मला गाडीपाशी दिसला नाही. आसपास कुठे गेला असेल म्हणून वाट बघितली तरी आला नाही. माझ्या पर्समध्ये नेहमी माझ्या गाडीची duplicate किल्ली असते. मी ड्रायव्हरसाठी निरोप ठेवला आणि घरी निघाले. मला लवकरात लवकर घरी पोचायचं होतं. म्हणून मी गाडीचा वेग अंमळ जास्त ठेवला. पुढे एका ठिकाणी एक शार्प वळण होतं. मी तिथे स्लो जाण्यासाठी म्हणून ब्रेक लावले. पण ब्रेक जवळजवळ फेल झाले होते. " " ओह्ह्ह्ह... " " समोर एका ठिकाणी थोडा फार भुसभुशीत मातीचा भाग दिसला तेव्हा जीव खाऊन मी ती गाडी तिकडे धडकवली आणि कशीबशी थांबवली. थोड्या वेळाने तिथून जाणारा एक टेम्पो दिसला तेव्हा त्याला विनवण्या करून घरी सोडायला लावलं. मी प्रचंड घाबरले होते. गेल्या गेल्या आदीला घट्ट मिठी मारून रडायलाच लागले. तो मला शांत करू बघत होता तेव्हाच नंदिनी मेहताचा फोन आला. " " तो तुमच्या ड्रायव्हरबद्दल असणार. " " बरोबर आहे तुमचं. आमच्या ड्रायव्हरबद्दलच होता तो फोन. नंदिनीच्या नोकरांना तो एका जवळच्याच झाडीत सापडला.... बेशुद्धावस्थेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो साडे दहाच्या सुमाराला गाडी घेऊन मेहतांच्या बंगल्याजवळ आला. आतमधलं पार्किंग पूर्ण भरलेलं दिसत होतं म्हणून त्याने बाहेर एका कडेला गाडी लावली आणि तो आत जायला निघाला. पण त्याला अचानक दम लागायला लागला आणि चक्कर यायला लागली. त्याला ओरडताही येत नव्हतं. आणि तो तिथेच कोसळला. तो त्या झाडीत कसा गेला, त्यालादेखील कळत नाहीये. " " ओके. आदित्य यांचं काय मत आहे पूर्ण घटनेवर? " " त्याचा या भविष्यावर वगैरे विश्वास नाहीये. त्याने मला खूप समजावलं. त्यादिवशी नेमकी जी गाडी ड्रायव्हरने काढली तिचं सर्व्हिसिंग बरेच दिवस झाले रखडलं होतं. तुम्हाला तर माहीत आहेच; हिल स्टेशनसारख्या परिसरात रस्त्यांत चढ उतार बरेच असतात. त्यामुळे ब्रेक्स हा कारचा सगळ्यात महत्त्वाचा भाग... ते वरचेवर खराब होतातच! " " मग तुमच्या ड्रायव्हरचं अचानक गायब होणं आणि नंतर बेशुद्धावस्थेत सापडणं? " " त्याला गेले काही दिवस अधूनमधून ताप वगैरे येतोय. त्यावर कुठल्याशा वैद्याकडून आणलेला काढा घेत होता तो. त्यानेच काही झालं असेल. आता एकदम ठीक आहे तो. " " आज सोमवार आहे. तुम्ही काल काय केलंत अजून, नेहा? " " आदी आणि मी पुन्हा सिद्धीला भेटायला गेलो. आदीने तिला माझं भविष्य पुन्हा पाहायची विनंती केली. त्याला तिने नकार दिला. त्यावरून आदी बराच भांडलाही तिच्याशी. पण काही उपयोग झाला नाही. आदीने मला ताबडतोब बंगलोरला आणायचं ठरवलं. त्यानुसार आज आम्ही इथे पोचलो. मला जरासं निर्धास्त वाटायला लागलं. पण... " " आम्ही दोघं बसमधून उतरलो आणि बस पुढे गेली. इतक्यात मागून एक ट्रक वेगाने आला आणि मला अक्षरशः चाटून गेला. आदीने मला वेळीच बाजूला ओढलं म्हणून... नाहीतर.... " " हे फार विचित्र आहे, नेहा... " " आय नो... पण मला खरोखर काही सुचत नाहीये. आदीने मला घरातून बाहेर पडायला मना केलं होतं. तो ऑफिसला गेल्यानंतर मला अजूनच भीती वाटायला लागलीय; म्हणून मी तुमच्याकडे आलेय तडक. " ...आत्तापर्यंत घडलेल्या गोष्टींचा ताण असह्य होऊन नेहा ओक्साबोक्शी रडायला लागली. ५. " नेहा, मला कळतेय तुमची मानसिक अवस्था. घाबरू नका. प्लीज शांत व्हा. मी तुम्हाला शक्य तितकी सर्व मदत करेन. मला एक सांगा, तुम्हाला कुणावर संशय आहे? " " नाही हो... कुणावरही संशय नाही. माझा कुणी शत्रूही नाही. " " तुमचे काका, तुमच्या वडिलांच्या बिझनेसमधलं कुठलं जुनं वैर, तुमच्या कॉलेजमधलं एकतर्फी प्रेम वगैरे, तुमचा नवरा.... " आदित्य भागवतचा उल्लेख करताक्षणी नेहाने चमकून माझ्याकडे बघितलं. " काका तर वारले, आणि पपांनी बिझनेस अतिशय नेकीनं केला होता, त्यामुळे ती शक्यतादेखील नाहीय. राहता राहिला आदी.... " ती मंद हसली. " माझ्या मनातदेखील हा विचार आला. पण विचार करकरूनदेखील मला एकही कारण सापडत नाहीये आदीवर संशय घेण्याचं. माझा पैसा मी त्याच्याच नावावर करण्यासाठी त्याला या आधीही बरेच वेळा सांगितलं होतं. त्याच्या बिझनेसमधून त्याला मिळणार्या पैशाचा विचार करता माझा पैसा अगदी नगण्य आहे. तोही त्याने कधीकाळी मागितला तर तो त्याला द्यायची माझी तयारी आहे. पण माझ्यावर तो मनापासून प्रेम करतो, हेही मला जाणवतं. मग मला संपवून आदीला काय मिळणारेय? " तिचा एकूण एक मुद्दा बिनतोड होता. पण तरीही... तरीही कुणीतरी नेहा भागवतला संपवू बघतंय, हे सत्य होतं. पण सिद्धी??? तिला हे कसं कळलं? असं खरंच का काही कार्डस आणि फाशांच्या साह्याने कुणाचं भविष्य लख्ख दिसतं? माझ्या डोक्यात विचार सुरु झाले. नेहाच्या आवाजाने माझी तंद्री मोडली. " मी इथे राहायचं ठरवलं होतं आदीबरोबर. जमेल का? की कोडाईला यावं लागेल मला तुमच्यासोबत? " " कोडाईला जावं लागेलच; पण अगदी आजच्या आज नाही. तुम्ही आज आराम करा. घरीच रहा. शक्यतो, कुठेही बाहेर जाऊ नका. आपण परवा कोडाईला जायला निघूया. " नेहा बरीच घाबरली होती. मी स्वतः तिला तिच्या घरापाशी सोडलं. त्यानिमित्ताने मला तिचं घरही डोळ्यांखालून घालता आलं. मी तिला माझ्या ऑफिसचा आणि घरचा फोन नंबरही दिला. नंतर मी जाऊन कोडाईची तिकिटं बुक केली. आणि इतर कामांसाठी बाहेर पडले. रात्री घरी परतल्यावर मी नेहाला फोन केला आणि सर्व काही ठीकठाक असल्याची खात्री करून घेऊन मी तिच्या केसवर विचार करू लागले. तशी केस सरळ होती, नेहाला कुणीतरी संपवू पहात होतं. त्या व्यक्तीचा शोध घेणं हे माझं काम होतं. पण का? motive काय यामागचं? तिच्याकडे फारसा पैसा नव्हता, दिसायला ती चारचौघींसारखीच किंवा थोडी उजवी होती, वडिलांच्या बिझनेसमधलं वैर असण्याचीही शक्यता जवळपास नव्हतीच, काका वारले होते, आदीच्या वागण्यातही कुठे तिला काही वेगळं जाणवलं नव्हतं. तिला मारण्याचा नक्की हेतू लक्षात येत नव्हता. And yes... there was one more thing which was making this case very peculiar. सिद्धीने सांगितलेलं भविष्य! कार्डस आणि फाशांवरून कुणाला कुणाचं भविष्य कळू शकतं? असं शक्य आहे? इतकं अचूक भविष्य वर्तवणं शक्य आहे? मी कसल्याशा विचाराने अनिकेतचा नंबर फिरवला. अनिकेत हा एक वल्ली होता. म्हटलं तर तो माझा सहकारी होता; पण मला प्रत्येक वेळी मदत करेलच याची शाश्वती नसे. अतिशय लहरी माणूस! सहसा कुणालाही नसलेली माहिती अनिकेतकडे असे. पण ती माहिती इतरांना मिळणार अनिकेतच्या लहरीनुसार! त्याला पैशाची ओढ नव्हती, त्याला प्रसिद्धीही नको असायची पण तरीही त्याच्याकडून माहिती काढून घेणं हे अवघड काम होतं. सिद्धीची भविष्य सांगायची पद्धत मला अस्वस्थ करत होती, त्याबद्दल मला स्वतःलाही कुठे, काही वाचल्याचे आठवेना. म्हणूनच मी अनिकेतची मदत घ्यायची ठरवलं. मात्र मी त्याला सिद्धीच्या ' विद्येबद्दल ' सांगताच तोही चाट पडला. " सुनीता, हे असलं मीही आज पहिल्यांदाच ऐकतोय. " " अनिकेत, प्लीज... तूच असं म्हणायला लागलास तर कठीण आहे! बघ जरा आठवून.. कुठे कधी काही वाचलं असशील... " मी अस्वस्थ होऊन म्हणाले. " सुनीता, नाही गं. मला भविष्य सांगण्याच्या बर्याच पद्धतींबद्दल माहिती आहे; पण आत्ता तू जे सांगतेयस ते माझ्यासाठीही नवीन आहे. तशी पद्धत नसेलच असंही मी खात्रीशीर सांगू शकत नाही. प्रयत्न करतो माहिती मिळवण्याचा. " " किती वेळ? " " आठवडा... कदाचित दोन आठवडे... महिना... सांगता येत नाही. " महिना? आठवडा?? मी हताशपणे ' बरं ' म्हणून फोन ठेवला. एवढा वेळ नेहाला आणि मलाही मिळेल का? ६. कोडाईला जायला नेहासोबत निघताना मी अनिकेतला माझे कोडाईचे कॉंटॅक्ट डिटेल्स कळवले. तसा माझा निघायच्या आदला दिवसदेखील फार गडबडीत गेला होता. पण अखेर सर्व व्यवस्था लागली, या समाधानात मी होते. मला हवी असलेली माहिती उपलब्ध झाली की ती माझ्याकडे ताबडतोब पोचणार होती. नेहाला मी आदित्यला काही सांगू नकोस म्हणून बजावलं होतं. तिने ते बिनचूक पाळलेलं दिसत होतं. बस सुरु झाली. नेहा माझ्याशेजारी गप्प बसून खिडकीबाहेर बघत होती. हळूहळू रात्र गडद होत होती. विचार करता करता माझेही डोळे मिटायला लागले. किती वेळ गेला असेल, माहीत नाही. मी जागी झाले ती दचकूनच! माझ्या हे आत्तापर्यंत डोक्यात कसं आलं नाही? मी नेहाला उठवलं. " नेहा... सिद्धी... " " तिचं काय? " " तुम्ही याआधी सिद्धीला कधी भेटला होतात? एखादी ओझरती भेट? कुठेतरी झालेली? कॉलेजमध्ये, नंतर कधीतरी, मित्र मैत्रिणींकडे? " " नाही. नंदिनी मेहताच्या पार्टीत मी पहिल्यांदाच सिद्धीला भेटले. त्याआधी तिला भेटल्याचं किंवा पाहिल्याचं मला आठवत नाही. " " पण आधी कुठल्याही संदर्भात या नावाच्या व्यक्तीचा उल्लेख? कुणाकडूनही ऐकलायत का? प्लीज, नीट आठवून बघा. " नेहाने नाही म्हणून मान हलवली. मी काहीशी निराश झाले. अजूनही या सर्व प्रकरणाची संगती लागत नव्हती. काही क्षण तर मला वाटलं, कशावरून नेहा भागवतवर लागोपाठ दोन जीवघेणे प्रसंग ओढवणं हा एक योगायोग नसेल? कशावरून आदित्य भागवत म्हणतो तेच सत्य नसेल? कशावरून सिद्धीने गंमत म्हणून नेहाला तसलं भविष्य नाही सांगितलं आणि लागोपाठ घडलेल्या प्रसंगांनी नेहाला हादरवून नाही टाकलं? मी जी कालपासून इतकी धडपड करतेय त्याला खरंच काही अर्थ आहे का? नेहाने सांगितल्याप्रमाणे तिचा कालचा आणि आजचा पूर्ण दिवस व्यवस्थित गेला होता. कुठल्याही प्रकारचं संकट तिच्यासमोर उभं न करता... मग? मी क्षणभर नेहाकडे बघितलं. मी तिच्यासोबत असल्याने ती निर्धास्त झोपली होती. माझ्यावर केवढा विश्वास टाकला होता तिने! जर मला आत्ता सुचलेली थियरी खरी असेल तर किमान तिला ते नीट पटवून देईपर्यंत मला तिच्यासोबत राहायलाच हवं, माझ्या मनाने निश्चय केला. कोडाईला पोचलो तेव्हा सकाळचे साडे नऊ वाजले होते. नेहाने आदल्या रात्रीच कॉल करून तिच्या ड्रायव्हरला गाडी घेऊन यायला सांगितलं होतं. तिच्या गाडीत बसून आम्ही त्यांच्या घरी निघालो. कोडाई शहरातला हॉटेल्स आणि दुकानांचा वर्दळीचा भाग लौकरच मागे पडला आणि आम्ही एका शांत वस्तीत प्रवेश केला. नेहाचं घर रोहाऊस पद्धतीचं होतं. अतिशय साधं. दुरून बघितलं असतं तर इतर आलीशान बंगल्यांच्या पसार्यात ते कुणाच्या नजरेतही भरलं नसतं. फाटकाशी गाडी थांबवून नेहाने आवाज दिला, " श्वेता... " आतून एक बाई बाहेर आली. वयाने साधारण पस्तिशीची, रंगाने काळीसावळी, पण विलक्षण रेखीव चेहरा आणि बोलके, काळेभोर डोळे. सर्वांत लक्ष वेधून घेणारे होते ते तिचे लांबसडक काळेभोर केस.. " श्वेता, ह्या सुनीता वर्मा. माझ्या नात्यात आहेत. काही दिवस आपल्यासोबत इथे कोडाईलाच राहणार आहेत. आणि सुनीता, ही श्वेता... माझी नर्स, मदतनीस, मैत्रीण सर्व काही. " श्वेताने माझ्याकडे पाहून एक औपचारिक नमस्कार केला. का कोण जाणे, मला वाटलं की श्वेताला मी तिथे येणं फारसं रुचलेलं नाही. त्यावर फार विचार न करता मी मला दिलेल्या रूममध्ये गेले, आंघोळ आटोपली. तोवर नेहाने मला ब्रेकफास्टसाठी हाक मारली. मी खाली डायनिंग रूममध्ये गेले. श्वेताने सगळा ब्रेकफास्ट नीट मांडला होता. नेहा टेबलाशी बसून माझी वाट बघत होती. ब्रेकफास्ट करता करता आमचं इकडच्या तिकडच्या विषयांवर जुजबी बोलणं सुरु होतं. श्वेता मात्र अजिबात भाग घेत नव्हती गप्पांमध्ये. नेहाने तिला टोकलंदेखील न बोलण्याबद्दल. त्यावरही तिने फारसं प्रत्युत्तर केलं नाही. अचानक काहीतरी आठवल्यासारखी ती उठली आणि बाहेरच्या हॉलमधून एक सीलबंद जाडजूड पाकीट आणून तिने नेहाला दिलं. " नेहा, ही तुम्ही मागवलेली कादंबरी कालच आलीये. मी आधी द्यायचं विसरून गेले. " नेहाने उत्सुकतेने ते पाकीट उघडलं. आतमध्ये त्या पुस्तकाला एका कुठल्यातरी छापील कागदाचंच वेष्टण होतं. कुठलंतरी इंग्रजी पुस्तक असावं ते. त्याची छपाई नीट झाली नव्हती बहुधा. बरेच शब्द, वाक्य अस्पष्ट होती, मात्र एक वाक्य चटकन लक्ष वेधून घेत होतं. 'I know you will return here... never to go anywhere again.' (भाग १ समाप्त...) दैव जाणिले कुणी...? (भाग २)
|