राजामणी 'राजामणी, राजामणी उठ लेका, किती उन्हं आली तरी झोपलास कसा, उठ. उठ म्हटलं ना. आता हाणू का एक?' या किंवा अशाच अर्थाच्या वाक्यांनी राजामणीचा दिवस उगवत असे. त्यातून राजामणीच्या आईचा आवाज एकदम खणखणीत. त्यामुळे जिन्याखालच्या चिंचोळ्या जागेत रहाणार्या राजामणीला आणि त्याच्या वडिलांनाच काय, बिल्डिंगमधल्या सर्वांना जाग येत असे ती राजामणीच्या आईच्या आवाजाने. ती घरात असेल आणि जागी असेल तर कोपर्यावरुन गल्लीत वळल्याबरोबर कळत असे. चाळ ते ब्लॉक या उत्क्रांतीच्या मधल्या टप्प्याचा नमूना म्हणावा अशी बिल्डिंग होती ती. रस्त्यालगत एक ३ - ४ फूट उंच भिंत. त्यात मध्ये एक गेट. आत एक छोटंसं अंगण. सिंधी मालक म्हणतात पण तो नक्की कोण ते कोणाला माहित नाही. वरच्या मजल्यावरचा सिंधीच सगळे कारभार सांभाळतो. तळमजल्यावरच्या घरांना पुढे छोटासा ओटा आहे. पण त्याला कठडा नाही. त्यामुळे अंगणत उभं राहून घरातल्यांशी बोलता येतं सहज. तीन मजली बिल्डिंग. मधून जिना आणि जिन्याच्या डाव्या उजव्या बाजूला चार चार घरं. प्रत्येक घराला एक बैठकीची खोली आणि एक स्वैपाकघर. त्या स्वैपाकघरातच एक तीन बाय तीन ची मोरी. प्रत्येक मजल्यावर मागच्या बाजूला जिन्याच्या जवळ कॉमन संडास. गोरी मद्राशीण या सार्थ नावाने गल्लीत ओळखल्या जाणार्या राजामणीच्या आईचं किंवा कधीही कुणाशी मान वर न करून बोलणार्या त्याच्या बाबांचं नाव कुणालाही माहिती नव्हतं. राजामणीच्या जन्माच्या अगोदर राजामणीच्या आईचा आवाज देखिल कोणी ऐकला नव्हता. बिल्डिंगमध्ये त्यांच्या शिवाय एकच मद्रासी कुटुंब होतं. लग्नानंतर पहिल्यांदा मुम्बईला आली तेव्हा त्या दुसर्या मद्राशिणीला फार आनंद झाला होता. पण अय्यंगार कसे सर्वश्रेष्ठ आणि इतर सर्वांनी कसं त्यांच्या वर्चस्वाखाली रहायला पाहिजे अशा तिच्या भाषणबाजीला लवकरच ती फॅमिली कंटाळली. नवरा ऑफिसला गेला की ती बिल्डिंगच्या पहिल्या दोन तीन पायर्या होत्या त्यावर बसून काही निवडण - टिपण, जुन्या कपड्यांची डागडुजी असलं काही बाही करत असे. सुरुवातीला तमिळ सोडून इतर कुठलीही भाषा तिला येत नव्हती. त्या बिल्डिंगमध्ये कमीत कमी दहा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात. पोराबाळांना एकमेकांचे ऐकून मराठी, गुजराती, हिंदी आणि बंगाली व्यवस्थित कळत असे. वेळप्रसंगी या सर्व भाषांमधून त्यांची भांडणे ही चालत. पायर्यांवर बसून बसून हे सर्व राजामणीच्या आईच्या कानावर पडत असणारच. पण राजामणीच्या जन्मापर्यंत तिचा आवाज काही कोणी ऐकला नव्हता. नाही म्हणायला बिल्डिंगमधले कोणी भाडेकरू सोडून गेले की ती राजामणीच्या वडिलांच्या मागे ती जागा घ्यायचा लकडा लावायची. सोडणार्या माणसाने भरपूर पागडी घेऊन दुसरा भाडेकरू अगोदरच शोधून ठेवलेला असे. ज़िन्याखालच्या त्या जागेत जवळपास फुकटच रहाणार्या राजामणीच्या वडिलांना घराचं भाडं एखादेवेळेस परवडलं असतंही, पण पागडी ते कुठून आणणार होते? बायकोच्या माहेराहून काहीही न मिळण्याचीच शाश्वती. तेव्हा दोघांची कुरबूर क्वचित कानावर पडत असे. राजामणी झाल्यापासनं मात्र राजामणीची आई एकदम बदलून गेली. तिने आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा राजामणीवर केंद्रित केल्या. तिचा सर्व वेळ आणि शक्ती राजामणीला सांभळण्यात जात असे. सहा वर्षांचा झाला तरी त्याला स्वतः हाताने भरवत असे, आंघोळ घालणे, केस विंचरणे, शाळेतून आल्यावर हातपाय धुऊन देणे सर्व काही तीच करत असे.. शाळेत जाऊ लागल्यावर मात्र राजामणीनेच ठरवले की तो आता मोठा झालाय आणि आईने भरवणे वगैरे त्याला आवडत नाही. राजामणीला शाळेत घालताना तिने ठरवलं होतं की तो convent मध्ये जाईल. Convent मध्ये शिकल्याने राजामणीला भरपूर पगाराची नोकरी मिळेल आणि मग तो नव्या सोसायटीमध्ये स्वतःचा ब्लॉक घेईल आणि गोर्या गोमट्या अय्यंगार सुनेकडून आपण सेवा करवून घेऊ असं तिचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाचा ती राजामणीला कधीही विसर पडू देत नसे. Convent शाळेने फीमध्ये सवलत दिली नव्हती आणि वरून त्यांचा धर्म स्वीकारल्यास 'तुमच्यासारख्या गरिबांना फुकट पण शिकवू' असं म्हटलं तेव्हा जाम बिथरली होती ती. जगात सर्वश्रेष्ठ माणसं अय्यंगार जातीत जन्म घेतात. त्याकरता मागल्या अनेक जन्मांचं पुण्य लागतं इत्यादी तिची ठाम मतं होती. शेवटी नाइलाजाने तिने जवळच्या इंग्रजी / मराठी / गुजराती अशी तिन्ही माध्यामातून शिकवणार्या शाळेत इंग्रजी माध्यमाच्या सेक्शनमध्ये त्याला घातलं होतं. शाळेतून येताना राजामणी तर घरापर्यंत यायला तयारच नसे. वाटेत ज्या ज्या मित्राचं घर लागत असे त्या सर्वांशी तो बोलत वेळ काढत असे. मग मित्राच्या आईने त्या त्या मित्राला खडसावले की राजामणीची स्वारी पुढे सरके. मग घरी आल्यावर परत आईच्या शिव्यांचा भडिमार चालूच. बर्याच खटपटी करून तिने मुलाला इंग्लिश मिडियम शाळेत घातलं होतं. त्याने शाळेतून येता येता 'माराटि बच्चा' लोकांबरोबर टैमपास केला तर 'अमको अच्चा नैं लगता' म्हणत असे. राजामणीच्या बरोबर त्याचे मित्र आणि त्यांच्या पूर्वजांचा पण उद्धार होत असे. जेव्हा जेव्हा राजामणी घरी असेल ती त्याला सतत अभ्यासाला जुंपत असे. त्या चिंचोळ्या जागेत त्याला अभ्यासाला वाव नाही म्हणून तिने कोपर्यातल्या चिकरमने आजींची मनधरणी करून त्यांच्या गॅलरीमध्ये त्याच्या अभ्यासाची सोय केली होती. कोपर्यातल्या दोन घरांमधून चिकरमने आजींची वंश वेल फोफावत होती. तीन मुलगे, त्यांच्या बायका, मुलं, पै पाहुणे नेहेमीचे. नांदतं घर होतं आणि सर्व जण एकमेकांशी गुण्या गोविंदाने वागत असत. गल्लीभरच्या सासवा आणि सुना एकमेकींना 'त्यांच्याकडे बघा आणि शिका काहीतरी' असं प्रत्यक्ष नसलं तरी मनातल्या मनात तरी म्हणत असत. राजामणी चौथीत असताना राजामणीच्या आईला कोणीतरी सांगितलं की चिकरमने आजींच्या घरी आणि पहिल्या मजल्यावरच्या नाडकर्ण्यांच्या घरी नियमितपणे मासे आणि खोबर्याचे प्रकार खाल्ले जातात म्हणून त्यांची मुलं अभ्यासात हुशार आहेत. झालं तिला आता नवीन प्रॉजेक्टच मिळाला. तिने रोज खोबर्याचे प्रकार करायला सुरवात केली. स्टेशनच्या जवळच्या मारुतीच्या देवळात रविवारी सकाळी जाउन ती शनिवारच्या देवाला वाहिलेल्या नारळांच्या वाट्या आणत असे. मग ते सगळे खोवणे, वाटणे, चिकरमने आजींच्या फ्रिजमध्ये ठेवणे वगैरे सोपस्कार आलेच. पण राजामणीला मासे खाऊ घालण्यासाठी काय करावं ते तिला कळत नव्हतं. अय्यंगार म्हणून जन्माला आल्यानंतर घरात मासे शिजवण्याला काही स्कोप नव्हता. शिवाय राजामणीच्या वडिलांनी ते अजिबात चालवून घेतलं नसतं. तो प्रश्न राजामणीने चुटकीसरशी सोडवला. चिकरमने आजींना सांगितलं त्याने की तुमच्याकडे जेव्हाही मासे असतील मी तुमच्याकडेच जेवायला येत जाईन. एवढ्या मोठ्या भरल्या कुटुंबात ते एक खाणारे तोंड वाढले तर कोणाला कळलेदेखील नाही. चिकरमने आजी आठवणीने त्याला बोलवत. घरातल्या मुला - बाळांना तो घरचाच वाटत असे. राजामणी जस जसा वरच्या इयत्तांमध्ये जात होता तसं तसं त्याची आई त्याच्या अभ्यासावर जास्तच भर देऊ लागली. त्याला कुठेही मोकळा वेळ मिळाला की 'राऽजामणी' चालूच. त्याला गल्लीतल्या मुलांबरोबर खेळायला मिळत नसे. शाळेतर्फे सहल असो की काही स्पर्धा असोत कशातही भाग घ्यायला मिळत नसे. जर चिकरमने आजींनी स्वतः येऊन मुलांचा चित्रपट आहे किंवा मुलांकरता कार्यक्रम आहे असं सांगितलं तरच त्याला चिकरमनेंच्या घरी जाऊन टि व्ही बघता येत असे. अन्यथा तो आपला पायर्यांवर बसून सर्व घरांमधून येणार्या टि व्हीच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा निष्फळ प्रयत्न करत असे. क्रिकेट मॅच बघायला मिळावी म्हणून त्याने जंग जंग पछाडले, पण त्याच्या आईने त्याला मॅच कधी बघू दिली नाही. राजामणी नववीत असताना तिने कुठून तरी एक जुनं शिलाई मशीन आणलं आणि ती आसपासच्या बायकांची पोलकी, परकर, पडदे, उशांचे अभ्रे असं काहीबाही शिवून देऊ लागली. त्यातून पैसे साठवून तिने राजामणीला दहावीच्या वर्षात एका बर्यापैकी नावजलेल्या क्लासला घातलं. कोणी म्हणतात की त्याला क्लासमधली एक मुलगी आवडत होती पण राजामणी तिच्या कधी लक्षाताही आला नाही. कोणी म्हणतात की त्याच्या आईच्या अखंड 'राऽजामणि स्टडी' या मंत्राला तो कंटाळला. अनेक अफवा, अनेक कयास. पण राजामणी अचानक प्रिलिमला बसलाच नाही. लागोपाठ तीन पेपरना तो नाही हे पाहून शेवटी वर्गशिक्षक घरी आले. दुर्दैवाने राजामणीने आईला नुकतेच पेपर अगदी छान गेल्याचे सांगितले होते आणि तो थोडा वेळ पायर्यांवर बसून बिल्डिंगमधल्या मित्रांशी गप्पा मारत होता. सर समोर उभे पाहून त्याला काय करावे ते सुचेना. तो एकदम दीनवाणा चेहरा करून उभा राह्यला. मग काय सर गेल्यावर त्याची जी खरडपट्टी काढली त्याच्या आईने. हातात जे काही मिळेल ते घेऊन त्याला मार मार मारलं. शेवटी त्याला मारून मारून थकली मग स्वतः च डोकं भिन्तीवर आपटून घेऊ लागली. सर्व वेळ तोंडाने राजामणीला, त्याच्या मित्रांना, त्याच्या शाळेला, आणि इतर जे कोणी आठवेल त्याला शिव्यांची लाखोली चालूच. अजुनही बिल्डंगामधल्या मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा तिचा तो अवतार आठवला की काळजाचा एक ठोका चुकतो. राजामणीचा जीवच घ्यायचा राहिला होता त्यादिवशी. मद्राशीण मध्ये पडायला गेली तर तिला ही शिव्या देऊन 'ही माझी खाजगी गोष्ट आहे' वगैरे दमदाटी केली. शेवटी चिकरमने आजी देवळातनं आल्या. त्यांनी आणि त्यांच्या मोठ्या सुनेने मध्ये पडून राजामणीला आईच्या तावडीतून सोडवलं आणि आपल्या घरी घेऊन गेल्या. राजामणीचे वडिल आल्यावर परत आईने जोरजोरात आरडा ओरडा करून सर्व कहाणी सांगितली. त्याचे वडिल बिचारे दोन्ही हातात डोकं धरून मटकन खालीच बसले. मग चिकरमने आजीच परत त्यांनाही आपल्या घरी घेऊन गेल्या. दुसर्या दिवशी राजामणी, त्याचे वडील आणि चिकरमने आजी शाळेत गेले. त्याचे वडील मुळात मुखदुर्बळ. त्यात त्यांच्या मुलाची चूक. त्यामुळे बोलणार तरी काय? परत चिकरमने आजीच मदतीला आल्या. त्याच शाळेत त्यांच्या घरची आणि बिल्डिंगमधली इतर मुलं शिकत होती. त्या सर्वांचा दाखला देऊन त्यांनी राजामणीला उर्वरित पेपर लिहायची परवानगी मिळवून दिली. घरी आल्यावर सुद्धा परिक्षा संपेपर्यंत राजामणीला त्यांनी आपल्याच घरी ठेवून घेतलं होतं. पण आईच्या नजरेला तो पडला रे पडला की तिच्या तोंडाचा पट्टा चालू होत असे. रोज चिकरमने आजी स्वतः त्याला शाळेत सोडत आणि आणायला जात. मधला वेळ शाळेच्या बाहेर बसून राहात. हळूहळू घरचे वैतागू लागले. कारण आता राजामणीच्या आईने त्या सर्वांनाही शिव्या वाहायला सुरवात केली होती. शेवटी प्रिलिम संपल्यावर त्याचे बाबा त्याला आपल्या घरी घेऊन गेले. म्हणजे प्रिलिम चालू असेपर्यंत तो चिकरमनेंच्या गॅलरीत झोपत असे तो आता परत मधल्या पायर्यांपाशी झोपू लागला. सर घरी आले त्या दिवसापासून राजामणी काहीच बोलेनासा झाला. अगदी नाईलाज झाला तर एखाद दुसरा शब्द बोलत असे तेही फक्त चिकरमने आजींशीच. बाकी आई वडिलांशी, बिल्डिंगमधल्या मित्रांशी, शाळेतल्या मित्रांशी कुण्णाशीही बोलत नसे. चिकरमने आजींनी त्याच्या आईला बोलावून तिची समजूत घालायचा प्रयत्न केला तर ती त्यांच्यावरही उखडली आणि त्यांना वेडं वाकडं बोलू लागली. राजामणीचे वडील नंतर येऊन आजींच्या अक्षरशः पाया पडून रडले. माझी बायको बोलते ते मनाला लावून घेऊ नका. या आयुष्यात स्वतःचं घर असावं हे तिचं एकुलतं एक स्वप्न आहे. आणि राजामणीवर तिची सगळी भिस्त आहे. त्याच्यावरच्या प्रेमानेच ती अशी वागते. तुम्ही मोठ्या आहात, चार पावसाळे जास्त पाहिलेत. तुम्ही तिला माफ करा. आणि तिच्या अशा वागण्यामुळे राजामणीला दूर करू नका. त्याला आता तुमचाच आधार आहे. प्रिलिमपासून परिक्षेपर्यंतचे दिवस भराभर गेले. राजामणी काही बोलत नव्हताच. पण हळूहळू त्याच्या आईचाही आरडाओरडा कमी झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत राजामणीने चिकरमने आजींकडे मनसोक्त टि व्ही बघितला. बिल्डिंगमधल्या आणि गल्लितल्या मुलांबरोबर न बोलता करता येतील तितक्या उनाडक्या केल्या. परिक्षेचा निकाल म्हणजे खरोखरच राजामणीचा निकाल झाला. त्याला पाच विषयात शम्भरात वीस मार्क मिळाले होते आणि इतर विषयातही काठावर पास. राजामणीच्या आईने जे काही थैमान घातलंय निकाल हातात आल्यावर! बिल्डिंगमध्ये चांगले मार्क मिळवून पास झालेल्यांची कानकोंडी झाली पार. कोणाला पेढे द्यायची सोय राहिली नाही. जिन्यात बसून सर्व येणार्या जाणार्यांवर नजर ठेवणे हा तिचा जन्मसिद्ध हक्क होताच नाहीतरी. त्यात मुलाच्या अपयशाचं दु:ख. पुन्हा त्याच्या मौनव्रताची टोचणी. अपयशाच्या आणि अगतिकेतेच्या जाणीवेने होरपळून गेली होती ती. पण राजामणी मख्ख होता अगदी. आला दिवस काही जायचा रहात नाही. चिकरमने आजींनी परत त्याला क्लासला घातलं. त्याला रोज समोर बसवून अभ्यास करायला लाऊ लागल्या. त्याला अभ्यासाचं वेळापत्रक करून दिलं. दिवसाचा थोडा वेळ टि व्ही बघायला राखून ठेवला. पण सगळं पालथ्या घड्यावर पाणी. चौथ्या वेळी तो दहावी नापास झाला त्या दिवशी त्याच्या आईने सर्व पुस्तकं, वह्या, नोटस नेऊन कचर्याच्या टोपलीत टाकले आणि दोन्ही हातात डोकं गच्च धरून पायरीवर बसून राहिली. किती वेळ तिथे बसली होती कोणास ठाउक. दिवे लागणीला चिकरमने आजी तिच्या जवळ जाऊन बसल्या अणि पाठीवर हात ठेवला तर त्या तेवढ्या धक्क्याने ती पलीकडे कलंडली. चिकरमने आजींना तर बराच बेळ कळलंही नाही. समोर गेटमध्ये उभं राहून गप्पा मारणार्या पोरांनी पाहिलं अन् आरडा ओरडा करून सर्वांना गोळा केलं. कोणीतरी डॉक्टरला बोलावलं पण तोपर्यंत तिचा पूर्वपुण्याईनं मिळालेला अय्यंगार वंशातील जन्म सम्पून गेला होता. स्वतःच्या मालकीचं घर तर राहो दूरच, मोरी असलेलं बिर्हाडसुद्धा न थाटता ती निघून गेली. आता राजामणी वर कसलाच दबाव नाही, आता तरी तो नीट अभ्यास करेल, चांगले मार्क मिळवून पास होईल. निदान दहावी तरी पास झाला तर त्याला काहीतरी धंद्याचं शिक्षण देता येईल असा विचार सगळ्या बिल्डिंगने केला. पण राजामणीने सर्वांचा विरस केला. चिकरमने आजींना तो उलट उत्तर देत नसे इतकंच काय ते. बाकी कोणालाही उलट सुलट सुनवत असे. त्याला कोणी काही बोलेनासे झाले. मधली काही वर्षे तो बोलत नव्हता. आता त्याच्याशी कोणी बोलेना. आईच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी राजामणी घरातून पळून गेला. पोलिसात सांगून झालं. "आपण यांना पाहिलंत का?" मध्ये त्याचा फोटो झळकला. वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या. गावाकडे शोध घेऊन झाला. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. त्याचे वडिल आणखीन खंगत गेले. पण बिचारे इमाने इतबारे नोकरी करीत. चिकरमने आजींशी काय दोन चार वाक्यं बोलत तेवढंच. दरवर्षी राजामणीच्या वाढदिवसाला बिल्डिंगमधल्या मुलांना गोळ्या वाटत. राजामणी तिशीचा झाला असता त्यावर्षी तिसर्या मजल्यावरच्या सिंध्याने सर्वांची मीटिंग बोलावली आणि सांगितले की मूळ मालकाने बिल्डिंग एका बिल्डरला विकायचं ठरवलं आहे. सर्व भाडेकरूंना आहे त्या जागेच्या दीडपट स्क्वेअर फूट फ्लॅट मिळेल पण त्याकरता थोडे (बाजार भावापेक्षा बरेच कमी) पैसे भरावे लागतील आणि बांधकामाच्या काळात इतरत्र रहाण्याची व्यवस्था ज्याने त्याने करायची आहे. बिल्डिंगमधल्या अनेकांना असे काही होईल याची कुणकुण होतीच. त्यांनी त्याप्रमाणे तयारीपण सुरू केली होती. राजामणीचे वडिल मात्र गडबडून गेले. मीटिंग संपल्यावर सगळेजण एकमेकांशी चर्चा करत होते. कोण कुठ रहायला जाणार, जास्तीचं स्क्वेअर फूटेज पाहिजे तर काय करावं लागेल? कोण कोण ते घेणार आहे? राजामणीचे वडिल बिचारे गपचूप कोपर्यात उभे होते. सिंध्याने त्यांना जवळ बोलावून सांगितले 'देखो तुम्हारा तो इधर कोई मकान है ही नही. तुमको चाहिये तो का जो रेट लगेगा उसमें तुमको एक बेडरूम का मकान मिल सकता है. लेकिन इधर ग्राउंड फ्लोर पे दुकान आयेगा. और लिफ़्ट भी रहेगा. सीढी के निचे रहने को जगह नही मिलेगी' 'संसाराची ऐन उमेदीची वर्षे त्या चिंचोळ्या जागेत काढली मी आणि राजामणीच्या आईने. आता ती गेलीच, राजामणीचा पत्ता नाही या वयात कोणासाठी मी एक बेडरूमचं घर घेऊ? आणि इतके पैसे तरी कुठनं आणू? आणि काम चालू असताना मी राहू कुठे? राजामणी जर परत आला तर ?' त्यांच्या मनात एकामागे एक नुसते प्रश्नच प्रश्न दाटून आले. सवयी प्रमाणे त्यांनी चिकरमने आजींकडे मोर्चा वळवला. त्यांच्या घरात तर एकदम उत्साहाचं वातावरण होतं. नातवंडं मोठी होत होती त्यांची. तिघा मुलांनी आणि त्यांच्या नुकत्याच कमवू लागलेल्या मुलांनी मिळून एक अख्खा मजलाच घ्यायचा प्लॅन केला होता. त्या मजल्याचं प्रत्येकजण आपापल्या परीने डिझाइन करत होता. चिकरमने आजींच्या धाकट्या सुनेने राजामणीच्या वडिलांना घरात बोलावले. त्यांना कुठून सुरवात करावी तेही कळत नव्हतं ते नुसतेच 'अं! उसका क्या है' वगैरे म्हणत अडखळत होते. शेवटी थोरल्याने विचारलं ' सिंधी क्या बोला आपको?' मग त्यांनी सिंध्याचं बोलणं सांगितलं. मग डोळे पुसत म्हणाले 'आता या वयात मी एवढा पैसा कुठून आणू? माझी जोडीदारीण हे जग सोडून गेली. हाता तोंडाशी आलेला एकुलता एक मुलगा घर सोद्दून गेला. तो कुठे असेल, कसा असेल या काळजीने मला झोप येत नाही की अन्न जात नाही. त्यात आता ही घराची विवंचना. राजामणीची आई गेली तसाच मीही मरून गेलो तर सुटेन तरी. पण राजामणीला न भेटता गेलो तर माझा आत्मा तळमळत राहील हो.' घरातले सगळेच गडबडून गेले. त्यांच्या आनंदावर विरजण पडलंय हे लक्षात येताच राजामणीचे वडिल उठून निघायला लागले. तेव्हा चिकरमने आजींनी त्यांना जवळजवळ हाताला धरून परत बसवलं. मुलांना पण बसवून घेतलं अन सिंध्याला बोलावणं पाठवलं. तो आल्यावर त्यांनी सिंध्याला बराच दम दिला. त्याची खाशी कान उघाडणी केली. म्हातार्या, निराधार आणि हतबल अशा राजामणीच्या वडिलांना कपट कारस्थाने करून बेघर करू नका इत्यादी इत्यादी. त्यांच्या बोलण्यापुढे सिंध्याने पण नमतं घेतलं. मालकाशी बोलून काही तडजोड करू म्हणाला. चिकरमने आजींच्या मुलांनी आणि बिल्डिंगमधल्या इतरांनी पण राजामणीच्या वडिलांचा बाजूने बरीच खटपट केली. शेवटी तळमजल्यावर दुकानांच्या मागच्या बाजूला एक छोटा पण ब्लॉक त्यांना मिळेल अशी व्यवस्था झाली. मधल्या काळात राहण्याची व्यवस्था त्या दुसर्या मद्रासी फॅमिलीने आपल्याबरोबर करायचं कबूल केलं. अनेक अडचणींवर मात करत अखेर बिल्डिंग उभी राहिली. राजामणीचे वडील रोज वाट वाकडी करून ते बांधकाम बघायला येत. तिथे काम करणार्या सुतार - गवंडी लोकांना राजामणीचा फोटो दाखवून तो आला होता का? तो दिसला होता का याची चौकशी करत. म्हणता म्हणता बिल्डिंगचे काम पूर्ण होत आले. कुठल्या सणाचा मुहूर्त साधून गृहप्रवेश करता येईल याच्या चर्चा सुरू झाल्या. अगदी इलेकट्रिशियनचं कामसुद्धा संपत आलं होतं त्या सुमारास राजामणी अचानक उगवला. दिवसभर नुसता रस्त्याच्या पलिकडे उभा राहून बघत होता. एका - दोघा येणार्या जाणार्यांनी त्याला हटकलं तेव्हा बिल्डिंगच्या अंगणात काम करणार्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्यातल्या कोणाला तरी राजामणीच्या वडिलांची आठवण आली. त्याने मुकादमाला सांगितलं. त्याने बिल्डरला कळवलं. त्याने मद्राशाला फोन करून कळवलं. तो आणि राजामणीचे वडिल लगेच आले. राजामाणीच होता तो. वडिलांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ते आपले राजामणीकडे बघत डोळे पुसत, त्याच्या डोक्यावरून, अंगा - खांद्यावरून हात फिरवत तो किती वाळला, किती खराब झाला ते पहात होते. मद्राश्याने त्या दोघांना हाताला धरून रिक्षात बसवले आणि घरी घेऊन गेला. राजामणी आला ही बातमी सगळ्या बिर्हाडकरूंमध्ये पसरली. चिकरमने आजी नातवाला सोबत घेउन आल्या. राजामणीची दृष्ट काढली. त्याला अनेक प्रश्न विचारले. तो पर्यंत त्याने कोणालाही काहीही सांगितलं नव्हतं. कुठे होता इतके दिवस, काय करत होता, का निघून गेला, का परत आला - काही नाही. चिकरमने आजींनाही काही बोलला नाही. पण त्यांना पाहून जरासं हसला तेवढंच. मग चिकरमने आजींनी सगळ्यांना सांगितलं की त्याला प्रश्न विचारून सतावू नका. थोड्या वेळाने त्या घरी जायल्या निघाल्या तेंव्हा राजामणी उठून त्यांच्याबरोबर जायला निघाला. वडीलांनी बरीच समजूत घातली. मद्राशाने सांगून पाहिलं. चिकरमने आजींनीही सांगितलं की इतक्या वर्षांनी आलायस तर वडिलांबरोबर रहा. त्यांची सेवा कर. पण तो कोणाचांही ऐकेना. शेवटी कदाचित दोन चार दिवस राहून परत येईल असं म्हणून चिकरमने आजी त्याला घेऊन गेल्या. पण राजामणीने चिकरमने आजींची पाठ काही सोडली नाही. बिल्डिंग तयार झाली. सगळ्या बिर्हाडकरूंच्या घरी सामान सुमानाची बांधाबांध झाली. राजामणीच्या वडीलांकडे अगदी मोजकं सामानच होतं - एक जुना स्टो, एक दोन ट्रंका आणि एक मोडकळीला आलेलं टेबल. दोन - चार सतरंज्या आणि चादरी. परत चिकरमने आजींनी पुढाकार घेऊन त्यांना एक पलंग, दोन चार खुर्च्या आणि एक कपाट असं फर्निचर स्वस्तात शोधून दिलं. त्यांच्या नावावर गॅस नोंदवायला चिकरमने आजी स्वतः गेल्या होत्या. राजामणीच्या वडिलांचे डोळे भरून आले बायकोच्या आठवणीने. परत आल्यावर त्यांनी ट्रंकेच्या तळाशी ठेवलेला राजामणीच्या आईचा आणि राजामणीचा एकुलता एक फोटो काढला. तो फोटोग्राफरकडे नेऊन राजामणीच्या आईचा फोटो करून आणला. दसर्याच्या मुहुर्तावर सर्वांना घराच्या चाव्या मिळाल्या. प्रत्येकाने यथाशक्ति गृहप्रवेशाचा सोहळा केला. याची देही याची डोळा मुम्बै महानगरीत स्वतःच्या मालकीची जागा मिळाल्याचा आनंद प्रत्येक चेहर्यावर दिसू लागला. चिकरमने भावांनी एक पूर्ण मजला घेतला होता, बिल्डिंगमध्ये येणार्या प्रत्येकाला त्यांचं घर दाखवण्याचा कार्यक्रम होऊ लागला. बरंच प्लॅनिंग करून बांधलेल्या चिकरमनेंच्या या नव्या मोठ्या घरात राजामणी करता जागाच नव्हती. पहिल्या दिवशी सामानाची ने - आण करता करता राजामणीच्या कानावर या सर्व चर्चा पडतच होत्या. संध्याकाळ झाली तशी तो गपचूप खाली गेला आणि आपल्या घराच्या पायर्यांवर बसून राहिला. जेवणाची पानं मांडली गेली तेव्हा चिकरमने आजी त्याला शोधू लागल्या. तो कुठेही दिसेना. मग एका नातवाने सांगितलं की राजामणी खाली पायर्यांवर बसलाय. आजींचा सगळ्यात मोठा मुलगा लगेच खाली गेला आणि त्याने बरंच समजावलं पण राजामणी ऐकेना. शेवटी त्याचं आणि त्याच्या वडिलांच ताट वाढून घेऊन खाली गेल्या आणि म्हणाल्या तुम्ही खाईपर्यंत मी पण काही खाणार नाही. त्या दिवशी तो जेवला खरं पण परत कधीही बिल्डिंगच्या पायर्या चढून वर चिकरमनेंच्या घरी गेला नाही. वडील काय स्वैपाक करतील ते खायचा. भांडी घासणे, कपडे धुणे, घराची साफसफाई अशी कामे न बोलता करायचा आणि उरलेला वेळ पायर्यांवर बसून काढायचा. चिकरमने आजी खाली उतरल्याच कधी तर त्याच्या बाजूला निशब्द दोन मिनिटे बसून जात. नव्या घरांमध्ये दिवाळी पण अगदी दणक्यात साजरी केली सगळ्यांनी. जुन्या भाडेकरुंनी नव्या लोकांना बिल्डिंग नावाचं जे कुटुंब होतं त्याची ओळख करून दिली. नवी मंडळी पण त्या कुटुंबात मिळून मिसळून गेली. कुरबुरी होत, नाही असं नाही. पण एकंदरीत कारभार गुण्यागोविंदाने चालत असे. एक दोन नव्या लोकांकडे गाड्या होत्या. फारशी बोलणी न होताच त्या गाड्या धुवायचं काम राजामणीकडे लागलं. पुढच्या बाजुला जी दुकानं आली होती त्यांच्याकडेही राजामणी बारीक सारीक कामं करू लागला. एकदाचा मुलगा चार पैसे कमावतोय याचा आनंद राजामणीच्या वडिलांच्या चेहर्यावर दिसू लागला. दिवाळीच्या दिवसात फराळ, माहेरवाशिणी, नवीन घर म्हणून येणारे पाहुणे, त्यांची सरबराई या सगळ्याचा परिणाम चिकरमने आजींच्या तब्येतीवर झालाच. पूर्णपणे विश्रांती घ्यायच्या डॉक्टरच्या सल्ल्याचाही काही फायदा झाला नाही. मग सर्व टेस्ट वगैरे करून झाल्या. काही बोट ठेवण्यासारखं निघालं नाही. पण त्यांना बरं काही वाटेना. अन्नावरची वासना उडाली आणि प्रचंड थकवा वाटू लागला. आयुर्वेदिक उपचार झाले, होमिओपॅथीच्या गोळ्या घेऊन झाल्या, असतील नसतील त्या सर्व देवांना नवस बोलून झाले. पण त्यांना अन्न जाईना. शहाळ्याचं पाणी, फळांचा रस, ताक असे प्रकार चमचा दोन चमचे घेत तेवढंच. नर्सिंग होममध्ये ठेवून सलाईन वगैरे प्रकारही झाले. त्या नर्सिंग होममध्ये एक आठवडा काढल्यावर त्या थोरल्या लेकाला म्हणाल्या ' आता माझे काही फार दिवस राहिले नाहीत. या आजारातून मी काही उठत नाही. मला घरी घेउन चला.' घरच्यांनी, बिल्डिंगमधल्या लोकांनी, डॉक्टरांनी सांगून पाहिलं पण आजींचा हट्ट कायम. आजींच्या लेकाने सांगितलं 'आजच्या दिवस रहा. उद्या काय ते पाहू.' रात्री तो घरी आला तर पायर्यांवर राजामणीने त्याला रोखलं आणि म्हणाला 'आईचं मन मोडू नका' आणि निघून गेला. थोरला चिकरमने तसाच परत नर्सिंग होममध्ये गेला आणि ताबडतोब आजींना घेऊन आला. घरी आल्यानंतर बरोबर तीन दिवसांनी आजी वारल्या. अंत्यदर्शनालासुद्धा राजामणी वर गेला नाही. आजींचा पार्थीव देह खाली आणल्यावरदेखील त्याने फक्त दुरून हात जोडले. आणि काही न बोलता तो सर्वांच्या मागनं चालायला लागला. आजींच्या बाराव्याला चिकार मंडळी जमली होती. मोठं कुटंब तर होतंच. पण आजींच्या ओळखी पण तितक्याच. राजामाणी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेला आणि काही न बोलता घरात पडेल ते काम करत होता. तिकडे स्मशानात पिन्डाला कावळा शिवत नव्हता. आपला अंत जवळ आलाय हे ओळखलेल्या आजींचा जीव कशात बरं अडकला असावा याचे अनेक तर्क पुढे आले. थोरल्याने सर्व काही सांगून पाहिलं पण पिंडाला कावळा काही शिवत नव्हता. शेवटी धाकट्या लेकाने घरी फोन लावला आणि मोठ्या वहिनीला विचारलं की तिला काही सुचतंय का? आजी तिला कधी काही बोलल्या होत्या का? फोन वर बोलता बोलता तिने तिने राजामणी कडे पाहिलं आणि ती जवळ जवळ ओरडलीच ' अहो राजामणी!' तिच्या दिराला क्षणभर काही कळलंच नाही. मग तो म्हणाला 'बरं, सांगून बघतो.' मोठ्या लेकाने परत एकदा हात जोडून म्हटलं ' आई, राजामणीला अंतर देणार नाही. तू गेलीस म्हणून त्याला एकटा पडू देणार नाही. जुन्या घरात, लहान असताना तो जसा घरचा होता तसाच वागवेन. आम्ही सगळेच घरच्यासारखं वागवू त्याला.' एवढं म्हणायचा अवकाश, एक कावळ्यांची जोडी येऊन पिंड खाऊ लागली. डोळे पुसत सर्वजण घरी आले. तोपर्यंत राजामणी परत खाली येऊन पायर्यांवर बसला होता. भिंतीला डोकं टेकून, डोळे मिटून बसलेल्या राजामणीला पाहून थोरल्याला भडभडून आलं. आई आपली गेली पण पोरका हा झाला असं वाटलं. थोडा वेळ पायरीपाशीच रेंगाळला. राजामणीशी कसं बोलावं, काय बोलावं ते न कळून तो नुसताच राजामणीच्या शेजारी बसला. त्याने राजामणीला हळूच हाक मारली. उत्तर तर आलं नाहीच पण राजामणीने डोळेपण उघडले नाहीत. दोन क्षण थांबून त्याने परत हाक मारली. पण परत तेच. त्याने हळूच खांद्यावर थोपटलं तर कित्येक वर्षांपूर्वी त्याची आई कोसळली होती तसाच निष्प्राण राजामणी कोसळला. चिकरमने आजींचा थोरला लेक नि:शब्द रडत त्याच्या बाजूला बसून राहिला. - शोनू.
|