« | »




गोधडी

काही वेळा अवचित वाटेवर भेटलेली अनोळखी माणसं, जुन्या काळातले काही संदर्भ आठवून ओळखीची वाटू लागतात. माझ्या क्विल्टक्लासची टीचर ' मिशेल ' ला पाहून मला अशीच ओळखीची खूण भेटल्याचा आनंद झाला. स्वत:च्या नातवंडाविषयी बोलताना तिचा फुललेला चेहरा आणि दाटून आलेले डोळे पाहून क्षणभरच मला मिशेल नाही तर दुसरंच कोणीतरी असल्याचा भास झाला. जगाच्या पाठीवर कुठंही गेलं तर आजी अशीच असते का?

क्विल्ट शिकताना लक्षात आलं, इतके दिवसानंतरही माझे टाके अगदी सफाईदार पडताहेत. माझ्या आजीनं दिलेल्या अगणित देण्यांपैकी धाग्याचं हे देणं मी खोलवर कुठंतरी बंदिस्त करून ठेवलं होतं. कापडावर धावदोर्‍याचे बारीक ठिपके, माझ्या घरासमोरच्या रांगोळीसारखी उमटत गेले आणि आजीच्या आठवणींच्या रेशमी लड्या उलगडू लागल्या.

पानमळ्यानं संपन्न असलेल्या माझ्या आजीच्या गावात येताना शेतात बहुदा एक तरी मोर दिसायचाच, पण या सगळ्याहूनही ज्या ओढीनं या गावात मी येत होते, ते मऊ कापसासारखं मुलायम अंतरंग असलेल्या माझ्या आजीसाठी. गावाच्या आतल्या बाजूला असलेल्या आमच्या भल्याथोरल्या दगडी घराचं दुरूनच उंच धुराडं आणि कौलं दिसू लागत. अगदी घराच्या समोर गेलं तरच घराची भव्यता कळे. दुडुदुडु चढून तीन पायर्‍या गेलं की सोपा, बैठी खोली, त्यात मांडलेली पांढरीशुभ्र लोडतक्क्याची बैठक, मग भलं थोरलं मधलं घर आणि शेवटी आजीचा अखंड वावर असलेलं, लखलखीत स्वयंपाकघर.

दुपारच्या अगदी शांत वेळी त्या दगडी घरात डोळ्यांच्या खाचा झालेली आजी, तिची जुनी पत्र्याची ट्रंक काढून आतल्या घरात गोधड्या शिवत बसलेली असायची. बाहेर उन्हाच्या रखरखाटाने डोळे दिपून जायचे पण घरात मात्र त्या उन्हाची तिरीप सुद्धा जाणवायची नाही. ट्रंकेत चांदीचे बंदे रूपये, कपबश्या, अत्तरदाणी, गुलाबजल, कात, रक्तचंदनाची बाहुली, वेखंड, जपाच्या माळा असं बरंच काही किडुकमिडुक असायचं. घरी गेलं की कधी एकदा ती ट्रंक उघडून बघेन असं मला व्हायचं. सगळ्याचा तो संमिश्र असा गंध मला मनापासून आवडायचा. गोधड्या शिवत बसणं हा आजीचा अगदी आवडता उद्योग. जुन्या डब्यात शिवायचं सामान - जड लोखंडी कात्री, दोरे, सुया, शिसपेन्सली असं बरचं काही असायचं. तुकडे बेतून झाले की रंगसंगती साधून तिचं शिवणं सुरू व्हायचं. बरचसं काम तिचं अंदाजानेच चाले. ट्रंकजवळच्या गाठोड्यात जरीचे परकर पोलक्याचे तुकडे, तिच्या वडिलांनी दिलेली एकमेव चंदेरी जरीची साडी होती. अगदी लहान असताना पोरकं झालेल्या तिच्याजवळ आठवणीखेरीज भूतकाळाशी बांधून ठेवणारं काही नव्हतंच. नकळतच त्या तुकड्याबरोबर कुठलीतरी जुनी आठवण समोर यायची, सांगताना तिचे डोळे भरून यायचे आणि ऐकताना माझेही. पण थोड्याच वेळानं उन्हं खाली यायची. धारेची वेळ झालेली असायची. गडीमाणसं यायला लागायची. इच्छा नसतानाही उठावंच लागे तिला.

मी जायचे तेव्हा आजी परड्यात भाज्या तोडून झाडांना पाणी घालणं वगैरे करीत असायची. गोळा केलेली फळं, भाजी बरेच वेळा ती वाटून टाकी. आजोबांना ते आवडायचं नाही. आजीला व्यवहार कधीच जमला नाही. आजोबा स्वभावाने थोडे तुसडे आणि व्यवहारी, पण आजीचा स्वभाव काही बदलत नसे. धाग्याप्रमाणे माणसंही जोडली जावीत असंच तिला वाटे. आमच्या घराच्या मागच्या खोलीत बरीच पिंप, पत्र्याचे डबे आणि एक मोठं शिसवी कपाट होतं, खूप बरण्या असणारं... त्यात मुरांबे, लोणची निगुतीनं घालून ती आमची वाट पहात असायची. सुना, नातवंड, मुलं यावीत, सुट्टीत घर भरून जावं ही तिची आमच्याकडून एकमेव अपेक्षा. पण बरेचदा ती सुद्धा पूर्ण व्हायची नाही. पण ती तक्रार करायची नाही. तिच्या दृष्टीने नेहमी सगळं ' बरंच ' असायचं. फार चांगलं, फार वाईट असं काही नव्हतंच.

आमच्या घराच्या मागे, परड्यात जाईचा एक विलक्षण देखणा, पानांफुलांनी बहरून गेलेला असा वेल होता. त्याचा आखीव मांडव ही आजोबांची अगदी खासियत होती. संध्याकाळी त्यातली कळी न् कळी हलक्याश्या झुळकेबरोबर उमलायची. आजी पहाटे उठून देवाचं बारीक गुणगुणत फुलं तोडायची. पहाटेच्या मंद वार्‍यात डुलणार्‍या त्या कळ्यांमुळे सारा आसमंत वासाने दरवळून जायचा. मला वाटायचं तिनं फुलं तोडणं कधी थांबवूच नये. पण मग तिची मंदिरात जायची वेळ होत असायची.

तिचं सारंच काम इतकं आखीवरेखीव आणि सुंदर असायचं. मंदिरात न्यायच्या स्टीलच्या डब्यात तांदूळ, निरांजन, अष्टगंध, फुलं असा सरंजाम असायचा. फिकट, बारीक प्रिंटची साडी नेसून, फणेरीपेटी समोर कुंकू लावून झालं की तिची स्पेशल चंदनाचा वास असलेली पावडर फक्त मला लावण्यासाठी आणे. मलाही मग आपण आजीचे सर्वात ' लाडके ' आहोत असं उगाच वाटत राहायचं. मंदिरात बाहेर भली मोठी सहाण आणि चंदनाचं खोड होतं. मी गंध उगाळायला घेतलं की ती सांगायचीच " अगं, एकसारखं फिरव. हाताला थोडी लय असू दे. "

आजी मंदिरात देवाच्यासमोर खूप वेगळी भासायची. फार फार दूर गेल्यासारखी, अनोळखी अशी. समईच्या मंद प्रकाशात तिच्या चेहर्‍यावरचे ते तृप्त भाव निरखायची सवयच लागलेली मला. देवाशी ती इतकी समरस होई की समईच्या ज्योतीमधला आणि तिच्यातला फरकच नाहीसा होई. देवाचं इतकं करून तिला काय मिळवायचं असायचं ? ' मोक्ष ' तिचं ठरलेलं उत्तर. मला वाटायचं परमेश्वराचं ती एवढं करते मग तीही काहीच कसं मागत नाही? माझ्या तर रोज देवाकडून असंख्य मागण्या असत. तिच्या साध्या साध्या इच्छा सुद्धा कधी कधी अपुर्‍या राहून जायच्या. कुणी तिच्या मनातलं ओळखलं नाही तर ती मनस्वी दु:खी व्हायची, पण का कोण जाणे आजोबांना ते कधीच कळलं नाही की त्यांनी कळूनही डोळे बंद करून घेतले होते? तिचे आणि आजोबांचे सूर जुळले नाहीत ते बहुदा यामुळेच.

रात्री आजी गोष्टी सांगायची. बरेचदा तिच्या गोष्टीमध्ये राजाराणी, पर्‍या अगदीच नसायचे. तसले काही चमत्कार नसतातच असा तिचा ठाम विश्वास होता. मलाही ते खरं वाटायचं. रात्री आकाशातले तारे तिला अचूक ओळखता यायचे. मग कधी सप्तर्षीची तर कधी धृवाची गोष्ट ऐकायला मिळे. नीरव शांततेची ती गूढ रात्र मग आणखीनच अद्भुत आणि रम्य वाटू लागे. माझं लग्न ठरलं तेव्हा ती आमच्या घरी आली होती. त्यादिवशी तिचं ते केविलवाणं रूप मला अक्षरश: व्याकूळ करून गेलं. ती फार फार एकटी झाल्यासारखी वाटली. लग्न झाल्यावर तिच्याकडे गेल्यावर येताना तिनं हातावर दही ठेवलं आणि दह्याबरोबर एक गोधडी. त्या गोधडीत मला ते परकरपोलक्याचे चंदेरी जरीचे तुकडे स्पष्ट दिसले. काही न बोलता आजीनं माझं मस्तक हुंगलं, माझ्या कानशिलावरून बोटं फिरवली. माझ्या हृदयात कालवाकालव झाली. मला वाटलं ती माझा कायमचा निरोप तर घेत नाही ना? मन अगदी वाईट शंकांनी डागाळून गेलं. मला तो क्षण जितका होईल तितका लांबवायचा होता. अस्वस्थ होऊन मी तिला गोधडी पुढच्यावेळी नेते असं सांगितलं. नंतर जमलंच नाही जायला.

आज आजी गेली त्याला बरेच दिवस झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आजोबाही गेले. घर अगदीच रिकामं झालं. आता गावही खूप बदललंय. ठराविक एस्ट्यांचे येणारे आवाज, इतर असंख्य गाड्यांच्या कोलाहलात हरवून गेलेत आणि त्या आवाजाचा वेध घेत चिमणीसारखी आमची वाट पाहणारी आजीही. घरी कुणीतरी येऊनजाऊन असायचं, पण ते भकासच झालं होतं. मायेचा हात फिरवणारं कुणी तिथे नव्हतंच. कुणाला तितका वेळही नव्हता. परवाच्या पावसात घराची एक बाजू संपूर्ण ढासळली, घर भिंतीविना उघडं पडलं. पोरकं तर ते आधीच झालं होतं. नवीन भिंत बांधूनही फारसा उपयोग होणार नाही, असं सगळ्यांचं मत झालं. पाऊस सपासप येत होता आणि आला तरी त्याला अडवण्यासाठी कोणी नव्हतंच.

तिथं तसंही माझं जाणं कधीतरी थांबणारच होतं. माझ्या मनातलं ' आजीच घर ' जपण्यासाठी तर आता मी तिथे जाणारही नाही. त्या गावातल्या धुळीनं माखलेल्या पायवाटांवर गायीच्या पायरवात माझ्या पाऊलखुणा उमटलेल्या असतीलही. अजून कुठंतरी, कुणास ठाऊक, कुणी सांगावं पण ती पायवाटच आता मला अनोळखी वाटते. त्या पायवाटेवरचं माझी वाट न पाहणारं ते पडलेलं घर, माझं नक्कीच नाही. मग त्या पाऊलखुणा तरी कशाला शोधीत जायचं? पण मागे रेंगाळणार्‍या आठवणींची मोरपिसं अशी कधीतरी अलगद गवसतात. माझं वेडं मन अगदी सैरभैर होऊन जातं.

इतक्या सुंदर क्षणांची साक्षीदार केलेल्या भूतकाळातल्या या मायेच्या धाग्यांनीच तर घट्ट बांधून ठेवलंय मला माझ्या मातीशी. आजीच्या असंख्य देण्यांनी माझं आयुष्य विविध आकाराच्या, अनुरूप रंगाच्या, तलम तुकड्यांच्या गोधडीसारखं देखणं झालंय आणि आता त्याच संलग्न धाग्यांनी माझ्या आईला आणि लेकीला जोडलंय. मग एखाद्या दुपारी त्याही शिवतील मायेची, सुखाची गोधडी.

क्लास संपला. मिशेलचे मी आभार मानले.

घरी नव्यानं तयार केलेलं क्विल्ट निरखीत बसले होते. खिडकीतून दिसणारं निरभ्र मखमली आकाश तार्‍यांनी भरून गेलं होतं. सार्‍या वातावरणात जाईचा सुगंध व्यापून गेल्यासारखं वाटलं. हातातल्या क्विल्टच्या उबदार आश्वासक मिठीने मन भरून आलं होतं. नकळत डोळे पाणावले. दूरवर कुठेतरी मंदशी चंद्रज्योत क्षणभर चमकल्यासारखी झाली. क्षितिजावर सोनेरी चंदेरी जरीच्या प्रकाशकणांची उधळण झाली. मंद सुखकर अशी उबेची मिठी, त्या चंद्रज्योतीची होती की हातातल्या क्विल्टची? माझं मलाच उमजेना झालं. भारणार्‍या त्या सुगंधाच्या सहवासात लुकलुकणार्‍या सात्त्विक, सोज्ज्वळ नक्षत्राच्या साक्षीने मी मूकपणे तशीच बसून राहिले.


-Rga