पावा कुणाचा वाजतो.... ....उन्हाळा असह्य व्हायला लागलाय, ही जाणीव आताशी मनात घट्ट व्हायला लागलेली. परिक्षा नुकत्याच आटोपलेल्या. गावातल्या थंडगार घराची ओढ आता वाढायला लागलेली. मन तर शेवटचा पेपर झाल्याझाल्या कधीच तिथं जाऊन पोहोचलेलं होतं. तिथल्या मातीत पुन्हा नव्यानं रुजलं होतं. चिंचांची बोटकं... आंब्याचा माच... बाबांच्या भजनीमंडळातली पेटी तबला वाजवण्याची हौस... ग्रामपंचायतीच्या वाचनालयातील पुस्तकं... सगळं सगळं पुन्हा खुणावू लागलं होतं. शहरातल्या रखरखत्या उन्हानं काहिली होत असलेल्या देहाला खेड्यातल्या गार झुळुकीची दुलई पांघरण्याची अनिवार इच्छा पुनः पुन्हा उचंबळून वर येऊ लागली होती. 'सुट्टीमध्ये काय काय करायचं ?' ही गणितं मनात नव्याने आकडेवारी करू लागली अन् गावात कधी येऊन पोहोचले, ते कळलंही नाही. ... सकाळी डोळे उघडले तेच मुळी पाव्याच्या मंजूळ आवाजानं.कुणीतरी सुरेल पावा वाजवत होतं.मी डोळे चोळत उठले, तशीच आईजवळ गेले. आई स्वयंपाकघरात दुधाची, दह्याची पातेली दूधदुभत्याच्या कपाटातून काढण्यात गुंग होती. मी आल्याचा तिला सुगावा लागला. "तोंड धुतलंस का... दूध घेतेस की चहा ?" ,तिनं विचारलं. "एवढ्या सकाळी पावा कोण वाजवतंय गं ?", मी तिला विचारलं. पण तिचं लक्षच नव्हतं. "लवकर तोंड धू. चहाच हवा असेल तुला. माझ्या चहासोबत तुझाही टाकते, बाकीची उठली नाहीत अजून ?" तिला तिची कामंच महत्वाची होती. दुधाला विरजण लावायचं होतं, दही घुसळून ताकातून लोणी काढायचं होतं. आणखीही बरंच काही. 'इतका सुंदर पावा कोण वाजवत असेल ?' माझ्या मनातला प्रश्न पुन्हा पुन्हा फणा काढून उभा रहात होता. पण.. मागच्या अंगणात नुकत्याच घातलेल्या सड्याचा सुगंध माझ्या तनामनात भिनला अन् मग मी पावा वाजवणार्याला विसरून गेले. दात घासून घराच्या मागच्या दारात दडीवर बसले. समोर दोन-तीन पायर्या, खाली पसरलेलं विस्तीर्ण अंगण, त्या अंगणात उगवलेल्या झुडूपांतून, हिरव्यागार पानांतून काही पिवळसर रंगाची रानफुलं डोकावत होती. मला ती फार आवडायची. मी आईच्या डब्यातील क्लिपा हुडकून त्याच्या सहाय्यानं त्या फुलांचे गुच्छं माझ्या केसात कोंबायचे. कसे दिसायचे, माहीत नाही. त्या अंगणाखालच्या दोन घरांमध्ये आमची गडीमाणसं रहायची. मधल्या भागातून आमच्या घाणीकडे जाणारा एक रस्ता होता. 'घाणी' म्हणजे जिथं आमचे गाई-बैल बांधले जायचे,ती जागा. घाणीमध्ये एक मोठी विहीरसुद्धा होती. आम्ही मुलं घाणीत गेलो की, त्या विहिरीत डोकावून पाहू नये, म्हणून कुणा न् कुणा गड्याचा आमच्यावर सतत एक डोळा असायचा. पण त्याचा डोळा चुकवून कधीमधी आम्ही त्या विहिरीत डोकावायचोच. एखाद्यावेळी हिरवी झाडाची फांदी जरी त्यात पडली असली अन् हलत असली तरी 'हिरवा साप, हिरवा साप' म्हणून आम्ही एकमेकांना दाखवायचो. गाई बैलांना बांधलेलं असलं की आम्ही घाणीत निर्धास्त फिरायचो. मात्र एखादं वासरू सुटलेलं असलं की 'ते आडवं तिडवं धावतं' म्हणून आम्ही एखाद्या गड्याचा आसरा घेत घाणीत फिरायचो. त्या रस्त्यांवरून कधी काही बैलांच्या जोड्या गळ्यातली घुंगरे वाजवत जायच्या, तेव्हा त्या नादमय आवाजानं छान वाटायचं. हाततल्या कपामधल्या वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत घेत मला ते सगळं निरखायला आवडायचं. एखाद्या गड्याच्या बायकोनं पाहिलं की 'उठल्या का जी ताई...तोंड- बिंड धुतलं का तशाच च्या पिऊन राह्यल्या ?' म्हणून त्या माझी फिरकी घ्यायच्या. आमच्या गावात लम्हाण जातीचे लोकही खूप होते. कधी कधी त्या बायका रस्त्यावरून पाणी भरायला जाताना दिसायच्या. रंगबिरंगी कापडाच्या तुकड्यांची चोळी, घेरदार घागरा, डोक्यावर उंच गुढीसारखे दिसणारे आकडे लावून त्यावर अडकवलेली ओढणी, हातात धातूच्या नाहीतर प्लास्टिकच्या खूप सार्या बांगड्या, नाकात नथनी, एका पायात वाळं, डोक्यावर एक भलीमोठी घागर, दुसरी काखेत अशा त्या दोघी- चौघीजणी पाणी भरून जाताना दिसायच्या. त्यांच्या डोक्यावर लावलेल्या त्या आकड्यांचं आम्हाला खूप अप्रुप असायचं. कधी कधी आम्ही त्या बायकांना थांबवून, त्यांच्या डोक्यावरचा तो आकडा काढून, तो स्वतःच्या डोक्यावर लावून, त्यात ओढणी अडकवून, हातात एखादी कळशी घेऊन त्यांच्यासारखंच लचकत मुरडत चालयचो. घरातल्या सगळ्या लोकांची त्यामुळं करमणूक व्हायची. संध्याकाळी आम्ही त्या अंगणात हलका हलका सडा शिंपून तिथंच जेवायला बसायचो. कधी बाबांसोबत तर कधी मुलमुलंच... त्यांच्यासमोर एकमेकांची टिंगलटवाळी करता येत नाही म्हणून. "झाला का चहा पिऊन... भोईण आलीय भांडी घासायला", आईच्या आवाजाने मी भानावर आले. पुन्हा मला पाव्याचे सूर आठवले. मी हातातला रिकामा कप घेऊन समोरच्या अंगणात आले. तिथं रखमा भोईण भांडी घासत बसली होती. "रखमाबाई, ह्या बाजूच्या गढीत पावा कोण वाजवतो, तुम्हाला माहिती आहे का ?" माझी उत्सुकता मला गप्प बसू देत नव्हती. "थो होय... थो तानीचा पोरगा हाय. नेहमीच वाजवित बसतो". "छान वाजवतो", मी तिला म्हटलं. "आता नेहमीच वाजवतो. त्यात काय छान ?" बोलता बोलता तिनं हातातला अर्धवट धुतलेला गंज बादलीतल्या पाण्यातून बुचकळून काढला. "तुम्ही कधीसा आल्या ?" "काल संध्याकाळी". "तरीच. काल सकाळी समदं सामसूम होतं." तेवढ्यात तिच्या मुलाने डांगरे आणून दिली. रामा भोई नदीच्या त्या पल्याडच्या पात्रात डांगरे लावायचा. आम्ही मुलं मुली आलो की आठवणीनं आणून द्यायचा. त्याला काल आमची रेंगी दिसली असणार बहुधा. "ताक हाये का जी बाई ?", बाजूच्या सामटीकडच्या दारातून एक बारा- तेरा वर्षाचा कोवळा चेहरा डोकावला. "एवढ्या सकायी सकायी तुह्या मायले ताकाचं काय काम पडलं ?" रखमाला सकाळी सकाळी बोलायला विषय मिळाला. "रुताताई कदी आल्या ?" तिची नजर आता माझ्यावर होती. ती मला ओळखत होती तर! "ताक हाये ?" तिनं पुन्हा विचारलं. "आई, ताक आहे ?", मी अंगणातूनच ओरडून विचारलं. "हो आहे. आत्ताच लोणी काढलं. कितीचं पाहिजे विचार."आई आतूनच म्हणाली. रखमा भांडी घासण्यात गुंग होती. "आण भांडं" मी त्या मुलीच्या हातातलं भांडं घेऊन, ती काही बोलतेच आहे, ते न ऐकताच दाण दाण पावलं टाकत आत देखील गेले. "पंचवीस पैशाचं हवंय", मी आईला म्हटलं. "ही घे ताकाची बरणी अन् नेऊन दे तिला" आईला मी तिचं भांडं आत आणलं ह्याचा पत्ताच नव्हता. जराशानं तिचं माझ्याकडे लक्ष गेलं अन् ती ओरडलीच. "कोण आलंय... कुणाचं भांडं आणलं आहेस आत ?" ती तशीच तरातरा बाहेर आली. "तिला कळत नाही. तुला सांगता येत नाही का ?" त्या मुलीवर ती जवळजवळ ओरडलीच. तिचा बिचारीचा चेहरा एवढासा होऊन गेला. "बाहेर आणून ठेव ते भांडं आधी." आई पुन्हा माझ्यावर डाफरली. मी मुकाट्याने ते भांडं समोरच्या वरांड्यात आणून ठेवलं. ' ती पाटलाची मुलगी नाहीये. खालच्या जातीतील आहे, हा तिचा दोष आहे काय? अन् मी आत नेलेलं भांडं पुन्हा स्पृश्य झालं काय ?' मला आईला विचारावंसं वाटलं पण तोंडातून शब्द मात्र फुटला नाही. माझ्याशी बोलायला आसुसलेली ती मुलगी काहीसुद्धा न बोलता निमूटपणे ताक घेऊन, पैसे देऊन निघून गेली. तिच्या हातातलं भांडं आईला चालत नव्हतं. पैसे मात्र... .... संध्याकाळ होत आली होती. आईचा स्वयंपाक आत सुरू होता. माझ्या लहान सख्ख्या- चुलत भावंडांचा स्वयंपाकही आटोपला होता. फुलांची भाजी, पानांच्या पोळ्या, आणखी काय काय... त्यांचं मलाही जेवायला बोलावणं सुरू झालं. मी आरामखुर्चीत वाचण्यात गुंग झाले होते. अन् तेवढ्यात.... सकाळचे तेच परिचित सूर वातावरणात दरवळले. मला तो पावा वाजवणारा मुलगा पाहण्याची खूप अनिवार इच्छा झाली. माझ्याही नकळत माझं तन- मन बाजूच्या दाराकडे झेपावलं. मी दाराची कडी काढून बाहेर पाऊल टाकणार... तोच मधला काका शेतातून परत आलेला दृष्टीस पडला. "संध्याकाळची कुठे चाललीस?... आता नाही कुठे नदी- बिदीवर जायचं", त्यानं मला दटावलंच. मला पाठमोरं वळणं भाग पडलं. पाव्याचे सूर मात्र माझा पाठलाग करतच राहिले. "बाई, महादूच्या अंगात देवी आलीया. शेवंताच्या अंगातलं भूत काढणं सुरू झालंय". रखमानं आल्याआल्या माहिती पुरवली. "मग मी म्हणतच होते 'शेवंता करणी करते' म्हणून. पण कुणीच ऐकायला तयार नव्हतं माझं. परवाच हाकलली मी तिला घरून. गेल्यावर बघते तर माझ्या जरीच्या साडीचा एवढा मोठा काठ तिनं फाडून नेलेला. करणी करायला ती आपल्या कपड्यांचे तुकडे कापून नेते", आई रखमाला सांगत होती." बाईंना कितीदा सांगितलं 'तिला येऊ देत जाऊ नका" म्हणून.पण ऐकतच नाही कुणी माझं. माझी पोरंही सुटणार नाही अशानं तिच्या तावडीतून. चांगली वित- दोन वित साडी फाडून नेली मेलीनं"... आईचं सुरूच होतं. माझ्या पाठच्या भावंडांच्या ओठातून हसू फुटू पहात होतं. मी त्यांना डोळ्यांनीच दटावलं. बाहुलीच्या शालूसाठी चांगलं कापडच नव्हतं मिळालं. ती तरी कुठून आणणार होती... "मी जाऊन येते. आल्यावर भांडी घासते." रखमाची लगलग सुरू होती. "मी येऊ ?", मी तिला विचारलं. "कशाला?... घाबरलीस म्हणजे ?" 'मी जावं' अशी आईची इच्छा नव्हती. "तू बाबांना सांगू नकोस, मी लवकर येते. मला 'देवी अंगात कशी येते ?' ते बघायचंय. मी येते ना रखमाबाई तुमच्यासोबत' माझं हट्टी मन ऐकायला तयार नव्हतं. खरं तर मनातून खूप भीतीही वाटत होती पण, ती 'देवी' अन् ते 'भूत'... दोन्हीही मला बघायचं होतं. "मग चला बिगीबिगी" रखमाच्या मागून मी निघाले. तिच्यासारखं आडव्या- तिडव्या वाटेवरून रस्त्यावरचे दगड चुकवत 'बिगीबिगी' चालायची मला सवय नव्हती. त्यामुळे जवळजवळ धावतच तिच्यामागून मी निघाले. तिथं जाऊन पाहते तर सगळीकडे नुसता धूर दाटलेला. कसलातरी उग्र वास नाकाला झोंबत होता. आजूबाजूच्या झोपड्यांमधली बरीच माणसं तिथं गोळा झाली होती. बायका नाका- तोंडावर पदर घेऊन उभ्या होत्या. बर्याचजणींच्या अंगावर ब्लाऊज नव्हता, साडीचा पदर अंगाभोवती घट्ट लपेटून कमरेशी खोचला होता. "कुणाचं घर आहे ?", मी रखमाला विचारलं. "हाये एका गोंडिणीचं", रखमा कुजबूजत म्हणाली. देवीचा आवाज वाढला होता अन् समोरचं 'भूत'ही मोठमोठ्यानं घुमत होतं. देवीच्या हातातला कडुनिंबाच्या जाडजूड फांदीचा चाबूक सटासटा भूताच्या अंगावरून फिरत होता. त्या सपकार्यांनं वेदना होऊन भूत मोठमोठ्यानं ओरडत होतं. आजूबाजूचे सर्व श्वास रोखून बघत होते. थोड्याच वेळात 'भूत' अंगातून निघालेली शेवंता निपचित होऊन खाली कोसळली अन् दुसर्याच क्षणी त्या मुलाच्या अंगातली 'देवी'ही निघाली. "थकला असशील. खाऊन घे." त्याच्या हातात वाडगा देणारी ती त्याची आई असावी. एव्हाना इतर बायका त्याच्या पाया पडू लागल्या होत्या. "झालं ?", मी रखमाला विचारलं. "हं.. वापशी जाऊ या. बापूसाब आलं असतील तर दोघींवरबी वरडतील." मी पुन्हा अंधारलेल्या वाटेवरून फरफटत तिच्यामागून निघाले अन् वळणावर येत नाही तोच.... माझा आवडता 'तो पाव्याचा सूर' माझ्या कानांना सुखावून गेला. "थोच हाय. देवी आंगात आलेला...", रखमा म्हणाली. "म्हणजे?... म्हणजे तोच सकाळी पावा वाजवत होता ?", मला कसंसंच झालं. 'इतका सुंदर पावा वाजवणारे हात कुणावर आसूडही उगारू शकतात... "नाय तर काय... चला बिगीबिगी". रखमा पुन्हा म्हणाली. 'त्याच्या अंगात खरंच 'देवी' येते का ?' 'त्याला खरंच 'भूत' काढता येते का ?' की... 'पैसे मिळवण्यासाठी तो हे सारं करतो ?' की.. 'त्याचे आई- वडील त्याच्याकडून हे करवून घेतात ?'..... असंख्य प्रश्नांच्या आवर्तात गुरफटून त्या अंधार्या वाटेवरून मी रखमाच्या मागून तशीच ठेचाळत चालत राहिले. - सुमती वानखेडे
|