« | »




आधार

तो वाडा मला दिसला तेव्हा बहुदा दुपारचे अडीच - तीन झाले असावेत. पण हिरव्यागार झाडांच्या राईने दुपारचे प्रखर ऊन सौम्य केले होते. राईतून भटकायला विलक्षण मौज वाटत होती. मी गेले सुमारे दोन तास हिंडत आहे हे तेव्हा कुठे माझ्या लक्षात आले.

वास्तविक मी सुट्टीमधे या गावी अनेकदा आलेलो आहे. निसर्गरम्य ठिकाणांच्या शोधात आसपासचा परिसर पिंजून काढलेला आहे. गावातल्या लोकांनाही त्याकरता प्रश्न विचारुन भंडावून सोडलेले आहे, आणि या राईतूनही मी पूर्वी अनेकदा भटकलेलो आहे. पण या आधी कधीही हा वाडा मला दिसला नव्हता, किंवा त्याचा उल्लेखही मी कोणाकडून ऐकला नव्हता.

वाडा प्रचंड, पाचमजली होता. बांधकाम घडीव, चिरेबंदी दगडांचे होते. भोवतालून सुमारे पुरुषभर उंचीची भिंत होती. पण वाड्याची बांधणी अत्यंत प्राचीन आहे हे उघड उघड दिसत असूनही त्याची अजिबात पडझड झालेली नव्हती. तो अगदी नवाकोरा वाटत नसला तरी अतिशय भक्कम स्थितीत आहे, काळजीने जपलेला आहे हे जाणवत होते.

या वाड्यात काहीतरी वेगळेपणा होता खास! नारायण धारप, स्टीफन किंग यांच्या भयकथा, सर्वसामान्य, नियमित जगातून अगदी अचानक अज्ञाताच्या गूढ, अनियमित जगात प्रवेश करतात. ते स्थित्यंतर वाचताना उमटते तशीच शिरशिरी हा वाडा पाहून माझ्या अंगावर उमटून गेली.

या वाड्याच्या जवळ जावे, भोवतालून एक चक्कर मारावी. जमलेच तर आत जाऊन पहावे अशी उर्मी माझ्या मनात दाटून आली. वास्तविक ती भावना फारशी प्रबळ नव्हती. मनात आणले तर मी त्या वाड्याकडे पाठ फिरवून परत जाऊ शकतो हे मला माहित होते, आणि तरीही मला तिथे जावेसे वाटत होते.
मी S.E. मध्ये असताना, माझी first sem ची परिक्षा सुरु होती. मध्ये दोन दिवसांची सुट्टी आली होती. तेव्हाच मला मायकेल क्रायटन चे 'लॉस्ट वर्ल्ड' मिळाले, आणि हातातला अभ्यास बाजूला ठेवून मी ते वाचून काढले. तेव्हाही मला माहित होते, की मनात आणले तर मी हे पुस्तक बाजूला ठेवून माझ्या अभ्यासाकडे वळू शकेन. कदाचित म्हणूनच मी तसे न करता ते वाचून काढले.

आताही मला असेच काहीसे वाटत होते. म्हणूनही असेल कदाचित, पण मी माझी पावले वाड्याकडे वळवली.

२.
जवळून त्या वाड्याचा भव्यपणा अधिकच जाणवत होता. त्याच्या दगडी भिंतीतून झाडाचे लहानसे मूळ देखील बाहेर आलेले नव्हते. बाहेरच्या भिंतीला प्रचंड दरवाजा होता, पण त्याला एक हलकासा धक्का दिला तेव्हा तो सहज हलला. मी तो उघडला आणि आत पाऊल टाकले.
आत विस्तीर्ण चौक होता. तिथे क्रिकेटचा डाव अगदी मस्त रंगला असता. मध्यभागी हौद होता आणि त्यात लहानसे कारंजे होते. पुढे पडवी, पडवीमध्ये काळ्या चकचकीत लाकडाचा झोपाळा होता. त्याला कोपर्‍यांवर पितळेच्या फुलांनी सजवलेले होते. त्यामागे घरात जाणारे मुख्य दार होते.

चौकात संपूर्ण शांतता होती. वाड्यातूनही आवाज येत नव्हता. बाहेर ऊन तळपत असूनही चौक गार होता. जणू त्या दगडी भिंतींनी उष्णतेला आत यायला मज्जाव केला होता.

मी पुढे, पडवीत गेलो, झोपाळ्यावर बसलो, आणि पायांनी हलकासा रेटा देत झोका घ्यायला सुरुवात केली. झोपाळ्याला तेलपाणी अगदी व्यवस्थित केले असावे, कारण त्याच्या कड्या जराही करकरत नव्हत्या.
जणूकाही माझे आगमन आत कुणालातरी समजले असावे असा वाड्याचा दरवाजा उघडला, आणि एक जोडपे वाड्यातून बाहेर पडवीत आले.

मी पायांनी झोका थांबवला आणि त्यांच्याकडे पाहिले.

काही माणसे वाढत्या वयाबरोबर अधिकाधिक तेजस्वी, अधिकाधिक भारदस्त, अधिकाधिक प्रेमळ होत जातात. आता बाहेर आलेली दोघे त्यांच्यापैकीच होती. पुरुषाचे वय सुमारे पंचावन्नच्या आसपास असावे. त्याच्या डोकयावर घेरा होता, शेंडी रुळत होती. जानवे डाव्या खांद्यावरुन खाली आले होते. अंगात पितांबर होता. देह गोरापान, चेहरा तेजस्वी होता. एखाद्या यज्ञकर्म करणार्‍या वैदिक ब्राह्मणांप्रमाणे तो तपःपुंज दिसत होता.
त्याच्याबरोबरील स्त्री सुमारे पन्नाशीची असावी. तिने नऊवारी पायघोळ साडी नेसली होती. केसांचा खोपा घातला होता. पदर दोन्ही खांद्यांवरुन खाली घेतला होता. कपाळी चंद्रकोर होती. तिचा चेहरा अतिशय सोज्वळ, अतिशय प्रेमळ होता. अंगावरील सौभाग्य अलंकारांनी तिची शालीनता अधिक उजळवली होती.

माझ्याही नकळत मी झोपाळ्यावरुन उठलो आणि जवळ जाऊन त्या दोघांच्या पाया पडलो. त्यातील पुरुषाने मला उठवले आणि प्रेमाने हृदयाशी धरले. मी माझ्या कुणा अतिशय जवळच्या व्यक्तीला भेटत आहे अशी तीव्र जाणीव मला झाली. माझे डोळे किंचित ओलावले.

ती दोघे झोपाळ्यावर जाऊन बसली. मी पडवीतच भिंतीला पाठ टेकून, त्यांच्या पायाशी बसलो. ही दोघे आपणाला दिसत आहेत, पण आपण समजतो त्या अर्थाने ती जिवंत नाहीत हे मला जाणवले होते, तरीही माझ्या मनाला भितीचा स्पर्शही झाला नाही. आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारी जवळीक, आपुलकी, इतकी दाट होती की त्यावर काही बोलायची आवश्यकता नव्हती. मी तसा त्या पडवीत त्यांच्या पायाशी कितीही वेळ बसून राहिलो असतो.

त्या पुरुषाने घसा खाकरला. 'मी माधोभट, आणि ही माझी पत्नी लक्ष्मी.' ते म्हणाले, 'खरे तर आम्ही खाली येऊन फारसे कुणाला भेटत नाही, पण मघा तुला राईबाहेर येताना पाहिले, आणि तुझी पावले या वाड्याकडेच वळली होती, तेव्हा तुला भेटण्यासाठी म्हणून आम्ही दोघे मुद्दाम खाली आलो.'

आणि मग झोपाळा पायांनी हलकेच हलवत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

३.
'आमचे घराणे, आमचा हा वाडा फार प्राचीन आहे. आमचे घराणे म्हणजे, माणसाच्या मृत्यूनंतर धर्मशास्त्रात त्याच्या आत्म्याकरता जे विधी करायला सांगितलेले आहेत, ते करणार्‍या ब्राह्मणांचे.

आमच्या घराण्याचा मूळपुरुष म्हणजे राघोभट. तो येथेच का आला, त्याने हाच व्यवसाय का निवडला, हे मला माहित नाही. कदाचित प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या शोकाकुल नातेवाईकांचे सांत्वन करता यावे म्हणून असेल, कदाचित मृत्यूशी निगडीत व्यवसाय निवडल्याने आपोआपच आपली, आपल्या वंशजांची ऐहिक आसक्ती कमी होत जाईल आणि अध्यात्मिक उन्नती होत जाईल म्हणून असेल किंवा या व्यवसायात प्रतिस्पर्धी फार कमी आहेत या अगदी व्यावहारिक विचारानेही असेल.

कारण काहीही असो; पण राघोभट मोठा सज्जन, विद्वान ब्राह्मण होता. लोकांशी तो अतिशय प्रेमाने वागत असे. त्याने कुणालाही लुबाडले नाही, कुणाचीही पिळवणूक केली नाही. आपला व्यवसाय तो अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणाने करे, आणि जे मिळेल ती परमेश्वरी इच्छा मानून समाधानाने राही.
तो करीत असलेल्या विधींनी लोकांचे खरोखरच सांत्वन होत असावे, त्यांच्या दुःखावर खरोखरच फुंकर घातली जात असावी. कारण लवकरच राघोभटाचे नाव आसपास प्रसिद्ध झाले आणि त्याला बोलावण्याकरता लांबलांबहून लोक येऊ लागले.

हा वाडा राघोभटानेच बांधला. या वाड्याकरता त्याला खुद्द पेशव्यांनी जमिन बक्षीस दिली होती.

वाड्याचा पाचव्या मजल्यावर राघोभटाने स्वतःकरता एक स्वतंत्र खोली बांधवून घेतली. दररोज प्रातःकाळी ऊठून, आपली शौचस्नानादी कर्मे करुन, तो या खोलीत उपासनेकरता जात असे. खोलीत असताना, आणि खोलीबाहेर पडतानाही, तो खोलीचे दार लोटून घेत असे. त्याने दाराला कुलूप कधीच घातले नाही, पण एका अलिखित कराराने, त्या खोलीत राघोभटाशिवाय कुणीच जात नसे.

एके सकाळी तो नेहमीप्रमाणेच उठला. नेहमीप्रमाणेच पाचव्या मजल्यावर गेला आणि नेहमीप्रमाणेच खोलीचे दार उघडून त्याने आत पाऊल टाकले.

मात्र आत पाऊल टाकतानाच त्याला दिसले की खोलीचा तळ संपूर्णपणे नाहीसा झाला आहे!

आत आधाराला धरायला म्हणून काहीही नव्हते. त्याच्या तोंडून निघत असलेल्या आरोळीबरोबरच तो पाच मजले खाली आला. चौकातल्या दगडी जमिनीवर त्याचे मस्तक आपटले, आणि काहीच क्षणात त्याचे प्राणोत्क्रमण झाले.

राघोभटाची आरोळी ऐकून सर्वच जण हातातील कामे टाकून धावले, पण त्याचा अर्थातच काही उपयोग झाला नाही.

नेमके काय झाले ते पहायला म्हणून नारोभट, राघोभटाचा कनिष्ठ बंधू, पाचव्या मजल्यावर गेला. त्याच्या सुदैवाने खोलीचे दार उघडेच होते, आणि त्यामुळे त्याला खोलीत पाय न टाकताही दिसले की खोलीची जमिन पूर्णपणे नाहीशी झाली आहे, आणि तेथून तळाचा दगडी चौक दिसत आहे.

वास्तविक त्या खोलीखाली इतर मजले होते. नारोभट खालच्या मजल्यावर त्या खोलीच्या बरोबर खाली गेला, पण तेथील छत आणि जमिन आहे तसेच होते. बाकीच्या मजल्यांवरील खोल्यांमध्येही काही फरक झाला नव्हता. मात्र, पाचव्या मजल्यावरील त्या खोलीपासून थेट खालपर्यंत फक्त मोकळा अवकाश होता.

दुसर्‍या दिवशी त्या खोलीचा तळ पूर्ववत झाला.

घडल्या प्रकाराबद्दल कुणीच बाहेर काही बोलले नाही. हळूहळू सर्व व्यवहार नेहेमीसारखे सुरु झाले. राघोभटानंतर घराचे कर्तेपण नारोभटाकडे आले. त्यानेही आपल्या वडीलबंधूंप्रमाणेच आपले काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने केले. त्यानेही आपल्या उपासनेकरीता राघोभटाची खोलीच वापरण्याचा परिपाठ ठेवला. तोही आपल्यामागे त्या खोलीचे दार ओढून घेऊ लागला. मात्र, दार उघडून आतला तळ पाहिल्याशिवाय त्याने कधी आत पाऊल टाकले नाही.

वर्षांमागून वर्षे गेली, आणि एकेदिवशी उपासनेकरता पाचव्या मजल्यावर गेलेला नारोभट थरथरत खाली आला.

खोलीचा तळ पुनः एकदा नाहीसा झाला होता.

त्या दिवशी नारोभटाने अन्नाचा घास किंवा पाण्याचा थेंबही घेतला नाही. हातापायांची जुडी करुन तो भिंतीला टेकून पडवीत बसून राहिला.

घरातील सर्व आपापली कामे न बोलता करीत होते; सगळीकडे एक चमत्कारिक शांतता पसरली होती.

हळूहळू संध्याकाळ झाली, बाहेरच्या सावल्या आत आल्या, आणि तेवढ्यात वाड्याच्या दारापाशी नारोभटाला गलका ऐकू आला.
नारोभट ताडकन उठून दारापाशी धावला आणि त्याने बाहेर नजर टाकली.

त्याला दिसले की त्याची लहानगी मुलगी, अंबू, रस्त्याचा कडेला एकटीच खेळत आहे, आणि डावीकडून, साक्षात यमाचे वाहनच वाटावे असा एक रेडा, मान खाली घालून, शिंगे रोखून, फुत्कार टाकत थेट तिच्याच अंगावर येत आहे.
रस्त्यावरील लोकांनी जिवाच्या भितीने रस्ता रिकामा केला होता. अंबूला वाचवण्याकरता आसपास कोणीही नव्हते.

नारोभटाला कळून चुकले की आपण अंबूला वाचवू शकू, पण मग आपला मृत्यू अटळ आहे.

तो क्षणाचाही विचार न करता वाड्याबाहेर पडला आणि त्याने अंबूला उचलून वाड्याच्या आत टाकले.
तो रेडा आता अगदी जवळ आला होता. आपणापाशी अगदीच अल्प वेळ आहे हे नारोभटाला समजले. पण अंबू वाड्याच्या आत सुरक्षित आहे, तिला थोडे खरचटले आहे आणि ती घाबरुन रडत आहे, पण बाकी काळजीचे कारण नाही हे समाधानाने पहायला तेवढा वेळ पुरेसा होता.

दुसर्‍या दिवशी खोलीचा तळ पूर्ववत झाला.

४.
नारोभटानंतर घराचा कर्ता पुरुष राघोभटाचा मुलगा, खंडोभट झाला. त्यानेही आपल्या वाडवडिलांप्रमाणेच वर्तन ठेवले. त्यानेही उपासनेकरिता राघोभटाची खोली वापरण्यास प्रारंभ केला, आणि त्यानेही खोलीचा तळ पाहिल्याशिवाय कधी आत पाऊल टाकले नाही.

एके सकाळी तोही नारोभटाप्रमाणेच, उपासना न करताच खाली आला. मात्र त्याच्या चेहर्‍यावर शांती होती. तो घरातील सर्वांशी नेहमीप्रमाणे प्रेमाने वागला. गावातील आपल्या ईष्टमित्रांना भेटून आला, आणि मग संध्याकाळी आपल्या राहात्या खोलीत जाऊन त्याने पद्मासन घातले आणि तो ध्यानस्थ झाला.

रात्री कधीतरी त्याचे प्राण गेले असावे, पण मृत्यूनंतरही त्याच्या चेहर्‍यावरील अपूर्व स्मितहास्य, त्याने अनुभवलेली विलक्षण शांती, विलक्षण आनंद दाखवीत होते.

५.
माधोभटांनी बोलणे थांबवले. नंतर किती वेळ आम्ही न बोलता बसून होतो ते मला माहित नाही.

मग मी उठलो, आणि पुन्हा एकदा माधोभटांच्या व लक्ष्मीबाईंच्या पाया पडलो. त्यांनी मला पुन्हा प्रेमाने जवळ घेतले, आणि मी खूप मागच्या पिढीतील, पण अतिशय जिव्हाळ्याच्या आप्तांना, सुहृदांना भेटत आहे अशी तीव्र जाणीव मला पुन्हा एकदा झाली.

मी पडवीच्या पायर्‍या उतरलो, बाहेरच्या दारापाशी आलो, वाड्याबाहेर पडलो.
संध्याकाळ झाली होती. सूर्याची किरणे लांब, तिरपी झाली होती. हवेत मंद गारवा आला होता.

राईपाशी पोचेपर्यंत मी एकदाही मागे वळून वाड्याकडे पाहिले नव्हते. पण आता मात्र मी मागे नजर टाकली.

माझ्या कल्पनेप्रमाणे तो वाडा नाहीसा झालेला नव्हता. तो होता तिथेच, होता तसाच होता. वाड्याच्या पाचव्या मजल्यावर, एका टोकाच्या खोलीत, माधोभट व लक्ष्मीबाई उभे होते, आणि हात हलवत मला निरोप देत होते. मी देखील हात हलवून त्यांचा निरोप घेतला आणि राईमधे शिरलो.

६.
माझ्या पुढच्या सुट्टीत मी परत गावाकडे आलो, आणि मुद्दाम त्या राईमधून हिंडलो; मात्र यावेळी माझा तर्क खरा ठरला. तो वाडा नाहीसा झाला होता.

गावात, माझ्या परिचयाच्या लोकांकडे मी आडून आडून चौकशी केली. वाचनालयातील ग्रंथ धुंडाळले. पूर्वी त्या ठिकाणी असे घराणे खरोखरच होऊन गेले असावे असे संदिग्ध संदर्भ मला मिळाले. इतकेच नव्हे, तर त्या घराण्याशी आमच्या पूर्वजांचे काही नाते असावे असाही अंधुक निष्कर्ष मी काढू शकलो.

तेवढे मला पुरेसे आहे.

कारण, जीवनाप्रमाणेच मृत्यूही अटळ आहे हे मला समजले आहे. मात्र जीवन जितके सुंदर आहे तितका, किंवा त्याहूनही अधिक, मृत्यू सुंदर असू शकतो हे देखील मला समजले आहे. मृत्यूनंतरही आपले अस्तित्व राहते हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे;
आणि कुणाला फारसे न भेटणारे माधोभट व लक्ष्मीबाई मुद्दामहून मला भेटायला खाली का आले, तेही मला कळले आहे...

माझे आयुष्य पूर्वीसारखेच सुरु झाले आहे; मात्र आता एखाद्या खोलीत पाऊल टाकण्याआधी, त्या खोलीचा तळ पहायला मी विसरत नाही.

-श्रीनि.