साहित्य सेवेसाठी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले असून मराठीतील उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार नागपूरच्या ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना 'भूमी' या कादंबरीसाठी मिळाला, ही आम्हा वैदर्भियांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील पाच महिला साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि आता आशा बगे ह्या महाराष्ट्रातील सहाव्या तर विदर्भातील पहिल्याच महिला साहित्यिक ठरल्या आहेत. तब्बल १६ वर्षानंतर एका महिलेच्या वाट्याला हा बहुमान आलेला आहे. 'भूमी" ही कादंबरी समुद्राकाठी राहणारी एक मुलगी महानगरात येते आणि तिच्या आयुष्यात तिला जे अनेक अनुभव येतात त्या विषयी आहे. आशा बगे यांनी दोन दशकाहून अधिक काळ कथा व कादंबरी लेखन करून मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. १९७८ ते २०००० पर्यंतच्या कालखंडात त्यांचे अनेक कथासंग्रह व कादंबर्या प्रकाशित झाल्या आहेत. 'मारवा' (१९८४), 'अत्तर' (१९८६), 'पूजा' (१९८९), 'चंदन' (१९९३), 'मांडव' (१९९३), 'अनंत' (१९९४), 'दर्पण' (१९९७), 'निसटलेले' (१९९९) या शिवाय तुफान, पंख, पाणी असे अनेक कथासंग्रह व 'मनस्विनी' (१९७८), 'झुंबर' (१९८४),'सेतू' (२०००) अशा कादंबर्या असे विपुल लेखनसाहित्य त्यांच्या नावावर आहे. 'मारवा' व 'अत्तर' ह्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासन पुरस्कार, 'झुंबर' या कादंबरीला महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा 'मृण्मयी' पुरस्कार, गद्रे पुरस्कार, कोठवळे पुरस्कार, दि. बा. मोकाशी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
|