माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहेर नॉनव्हेज खायला आवडत नाही आणि घरात कुणी नसतानाच घरी खाता येते पण बनवता येत नसल्याने घोटाळा होतो.

काही प्रश्न
१. भात नेहमी चिकट चिकट होतो.
२. अंडी किती वेळ/कुकर्च्या किती शिट्ट्या बॉईल करावीत?
३. चिकन कुकर्च्या किती शिट्ट्या झाल्यानंतर चांगले शिजते. सविस्तर व सोपी रेसिपी सांगावी.

हबा,मी एक्सपर्ट नाहि,पण माझ्या अनुभवावरुन सांगते.:
१: भात दोन वेळा धुवुन घेतला आणी शिजवताना त्यात थोडं तेल टाकलं तर कदाचित चिकट होणार नाहि.
२: माबोवर आधिपण चर्चा झाली आहे कि कुकरच्या शिट्ट्या करु नयेत्.पहिली शिट्टी होतेय असं वाटलं कि गॅस मंद करावा.अंड्यांसाठी ५ मिनिटे(पहिल्या शिट्टीनंतर) पुरेशी आहेत.
३:चिकन मी कधी कुकर मध्ये शिजवले नाहि पण पातेल्यात शिजवताना हाडांपासुन मांस जरा सुटायला लागले कि चिकन शिजले असे समजावे.

सुरुचि, छओटिशि टिप शेवयाकरिता. तुपावर परतल्या नतर लगेच दुधात न टाकता थोद्या गरम पान्यात शिजुन घे. नतर दुध घाल. अशा प्रकारे मि बरेचदा करते.नक्कि खीर जमेल.

लेकीला आवडतं म्हणून रोज ब्रेफाला तिला उकडलेले अंडे देते.
अंडे उकडायच्या आधी पातेल्यात पाणी घेऊन चेक करून मगच अंडे उकडते. पाण्यात अंडे आणि मीठ टाकून जास्त आंचेवर ठेवून पाणी गरम करते. पाण्याला उकळी आली की आंच कमी करून ८ मिनिटं उकडते. तरीही अंडे कापल्यावर असं आढळून येतं की बलक काळा पडला आहे. Sad कडेने काळा पडलेला असतो. चवीत बदल नसतो,पण लेक खायला तयार होत नाही. Sad
अंडे जास्त वेळ उकड्तेय का मी? इकडे अन्नपदार्थ शिजायला वेळ लागतो फार. ५-६ मिनिटात गॅस बंद केला तर बरेचदा अंडे कच्चेच असते. Uhoh

प्राची, नेहमी अंडे पहिले २-३ मिनीटे जास्त आचेवर नंतर ७-८ मिनिटे मध्यम आचेवर असे उकडावे. कडेने काळे पडलेले अंडे आतील बलकाचे सल्फर मध्ये रुपांतर झाल्यची चिन्हे दाखवतात तसे जास्त शिजल्याने होते. तसले अंड खाणे हे आरोग्यास हानिकारक असते.

प्राची,
अंडं जास्त उकडल्याने असं होतं. अंड्याच्या पांढर्‍या भागातलं सल्फर आणि हायड्रोजन यांची reactionमधून हायड्रोजन सल्फाईड तयार होतो. अंड्याच्या पिवळ्या बलकात लोह असतं, आणि त्यामुळे आयर्न सल्फाईड तयार होतं. म्हणून पिवळा भाग काळपट हिरवा दिसतो. पण यामुळे अपाय काही होत नाही.

धन्स बामा आणि चिनूक्स.

तसले अंड खाणे हे आरोग्यास हानिकारक असते.>>>>
पण यामुळे अपाय काही होत नाही. >>>> नक्की काय? अपाय होतो की नाही? Uhoh

प्राची,
मी मागे कुठेतरी एकले/पाहिले होते hard cooked eggs बद्द्ल . नेटवर देखील संमिश्र माहिती आहे. माझ्यामते एखाद्यावेळेस जास्त शिजले की खायला हरकत नाही पण नेहमी नको.
इथे पहा आणि इथेही

हायड्रोजन सल्फाइड चा
अवर्णनीय सुगंध वासून
मला सल्फर बॅक्टेरियाच
व्हावेसे वाट्ते.

अंडी गड्बडीत उकडली तर बरेच वेळा दगा देतात थोडा लीड टाइम जास्त घेऊन आधी उकडून घ्यावीत जरा मंद आचेवर. आत्ताच एक उकडून बघते.

अंडी उकडण्याची खात्रीशीर पद्धत अशी

भांड्यामधे पाणी घ्या.
त्यात अंडी घाला. शेगडी चालू करा.
पाणी उकळले की शेगडी बंद करून टाका आणि भांड्यावर झाकण ठेवून द्या.
८ मिनिटानंतर झाकण काढा. परफेक्ट अंडी तयार.
काळी/हिरवी रिंग अजिबात येत नाही या पद्धतीने अंडी उकडली तर.

फ्रीजमधे ठेवला होता का ? तूप गोठले तर असे होते.
रवा जर जाड असेल, तर तो आणखी पाणी शोषतो.
किंवा हर हवा कोरडी असेल, तरी असे होऊ शकते.
कारणाप्रमाणे, थोडे पाणी वा दूध शिंपडून गरम करता येईल.

रव्याच्या दिड पट दुध-पाणी घ्यावे..रवा जाड असेल तर या पेक्क्षा जास्त लागते...फ्रिज मधुन काढल्यावर पाण्याचा शिबका देवुन हाताने छान मोकळा करुन मायक्रो.त गरम करावा..ताज्याची च चव येते..

pals25, दिनेश म्हणतात तसे तूप ज्यास्त घालत असाल तर होते. दुसरे म्हणजे जाडा रवा घेतला असेल व दूधाएवजी पाणी घालून शिजवत असल शिरा तर असे होते किंवा रवा जरा कच्चा राहत असेल तर.

मी परवा अळूवड्या केल्या होत्या. उकडुन घेतल्यानंतर जेव्हा पानांच्या गुंडाळीचे काप केले तेव्हाचं पानं जरा सुटल्यासारखी वाटली. तेलात तळताना तर एक एक पान मोकळं झालं. चव चांगली आली होती पण सगळ्या वड्या सुटुन गेल्या. कोणी सांगेल का काय चुकलं?

मी काल कणिक आणी गुळाचे लाडु केले पण मिश्रण खुप कड्क झाले , लाडु झालेच नाहीत...काय चुकले असेल?
मिश्रणाचे काय करता येईल?

मी घरी दही आणि sour cream (अमेरिकेत मिळ्णारे) वापरून श्रीखंड बनवते ते बरेच पातळसर होते. दही रात्रभर टांगुन ठेवते . मग त्यात सकाळी sour cream आणी इतर गोष्टी मिसळ्ते. घट्ट श्रीखंड होण्यासाठी काय करावे बरे? कुठे चुकतेय?

मी दोन्ही टांगलं होतं दीड दिवस..छान झालं होतं....
पण माझा एक प्रश्न आहे कि माझ्याकडे पुरण यंत्र नाहिये आणि ब्लॅक अँड डेकरच्या मिक्सरमध्ये बारीक करून पण गुठळ्या राहिल्या होत्या.काय केलं म्हणजे स्मूथ होईल??

काही काही लोक हे सगळं मिश्रण आपली पीठं चाळायची चाळणी असते ना त्यात घालून, खाली एखादं भांड ठेऊन, हातानी गोल गोल फिरवत स्मूथ करून घेतात. पण त्यापेक्षा पुरणयंत्राचं जास्त चांगलं होतं असं मला वाटतं. आणि पुरण्यंत्रानी कमी वेळात आणि कमी लडथडाटात पण होतं.

कदाचित इथे काही जणांना माहीत नसेल तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की अमेरिकेतही पुरणयंत्र मिळते. त्याला फूडमिल म्हणतात. फूड नेटवर्कवर फक्त आयना गार्टन या शेफला नियमित पुरणयंत्र वापरताना पाहिले आहे. ती ते बहुतांशी वेळा बटाटे मॅश करायला वापरते. कधीकधी तांबड्या भोपळ्याची प्युरी करायलाही वापरते सूपसाठी.
इथे विकत घ्यायचे असेल तर थोडे महागच वाटते. इंडियन स्टोअरमध्ये मिळते का ते बघितले नाही. वरची साईट फक्त फोटो दाखवण्यासाठी दिली आहे. विकत घेण्यासाठी कितपत विश्वासार्ह आहे ह्याची कल्पना नाही. अ‍ॅमेझॉनवर आहेत फूडमिल्स तीस डॉलर्सपासून ते अगदी पावणे-दोनशे डॉलर्सपर्यंत !

तवा खूप जास्त गरम असणे, पोळ्या लाटतांना खूप जास्त पीठ लावले जाणे, कणीक घट्ट मळली जाणे, इंडीयन ग्रोसरीतून जूने किंवा मैदा घातलेले पीठ येणे अशी अनेक कारणे असू शकतात पोळ्या पापडासारख्या होण्याची.
कणीक पोळ्या करायच्या तासभर आधी गरम दूधात/पाण्यात मळून झाकून ठेवा. तसेच मळतांना तेलाचा हात लावा.

धन्यवाद रुनी. मी २-३ वेगळे कणकेचे ब्रँड वापरुन बघीतले पण काही फरक नाही पडला. सध्या आशीर्वाद ची कणीक ट्राय करतीये. भिजवताना गरम पाणी वापरुन बघते. किती गरम करु पाणी? कोमट का त्याहुनही गरम?
पीठ जास्त लावलेल गेल्याची शक्यता आहे पण पोळ्या लाटताना चिकटत होत्या.

आमच्या इथे Byblos नावाचे(ब्रँडचे) योगर्ट मिळते. ऑलमोस्ट चक्का आहे तो. त्यात फक्त साखर मिसळून, केशर-वेलदोडा घातला की श्रीखंड तयार होते.. कन्सिस्टंसी - दही+सावर क्रिम टांगून केलेल्या श्रीखंडाचीच येते. थोडे घट्टच.. वाटले तर हे बाय्ब्लोस दही(चीज?) सुद्धा थोडे पेपर नॅपकिन मध्ये ठेवले तर अजुन घट्ट होते.
मी टांगूनचे श्रीखंड करणे सोडले.. मिळाले हे दही तर जरूर ट्राय करा..

असा दिसतो डबा..

Pages