अवघी विठाई माझी (२) - लीक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

leek.jpg

लीक हि भाजी आपल्याकडे मिळत नाहीच बहुतेक, तिला भारतीय नाव आहे का
हे मला माहीत नाही. पण हि भाजी आपल्याकडे होऊ शकेल असे मला वाटते.
कांदा ज्या भागात होईल, तिथे या भाजीची लागवड करता येईल.
लीक आणि कांदा तसे एकाच लिली कूळातले, पण कांदा आणि लीकची तूलना
करणे म्हणजे, कांदा आणि लसूण यांची तूलना करण्यासारखे आहे, कारण हे तिन्ही
एकाच कूळातले असले तरी, त्यांच्या स्वादात खुपच फ़रक आहे.

कांद्यापेक्षा, लीक बरेच गोडसर चवीचे असते. आपण कांद्याची जशी भाजी करतो, (म्हणजे
पीठ पेरुन वगैरे) तशी लीकची पण करता येईल. फ़क्त तिखटपणा कमी असेल.
लीकचे बाह्यरुप जरी पातीच्या कांद्यासारखे असले तरी (पातीचा कांदा म्हणजे स्प्रिंग अनियन
हा नेहमीच्या कांद्यापेक्षा वेगळा, तो आपल्याकडे अलिकडेच मिळायला लागला आहे.)
पातीच्या कांद्याप्रमाणे याची पाने खात नाहीत. एकतर त्यांना स्वाद नसतो आणि ती लवकर
शिजतही नाहीत. क्वचित ती ब्लांच करुन पदार्थ गुंडाळायला वापरतात किंवा बुके गार्नी
मधे वापरतात.

कांदा जसा गोलाकार (बल्ब) वाढत जातो, तसे लीक उभट वाढत जातो. कांद्याप्रमाणेच
हा भाग जमिनीच्या खाली वाढतो. आणि हाच भाग खातात.
हिवाळ्याच्या सुरवातीपासून लीक बाजारात येते. सुरवातीला पोपटी रंगाची पाने असतात,
ती पुढे निळसर आणि मग काळसर होतात. पण वर लिहिल्याप्रमाणे ती खात नाहीतच.
त्यामूळे लीक घेताना, हा भाग जास्तीत जास्त मोठा असेल असे बघावे लागते. हा भाग
पांढराशुभ्र व चमकदार असावा. पाने ताठ असावीत.
आधी पाने कापून टाकावीत. त्याच्या आत थोडी माती असेल तर तोही भाग कापावा.
पांढर्‍या भागाच्या वरचा एक पापुद्रा काढावा लागतो, कारण तो चिवट असतो, तसेच
अगदी मूळाकडचाही भाग कापावा लागतो. बाकीच्या भागाच्या आवडीप्रमाणे चकत्या
करुन उपयोगात आणता येतात.

leekb.jpg

या चकत्या कच्च्या रुपात सलाद मधे वापरता येतात. ही भाजी उकडूनही वापरता येते,
पण हिचा स्वाद जास्त खुलतो, तो किंचीत ऑलिव्ह तेलात परतल्यावर. थोडी मऊ पडेल
इतपतच ही परतायची, आणि मग सूप, ओ द ग्रांते, सारख्या पदार्थात वापरायची, बटाट्या
बरोबर हिचा संयोग छान लागतो. बटाटा आणि लीक यांचे सूप छानच लागते चवीला.
मी हा प्रकार केलाय तो थोडा वेगळा. कृति तशी सोपी आहे.

leekc.jpg

दोन लीकच्या दांड्या घेऊन तिच्या पातळ चकत्या करायच्या. एका मोठ्या बटाट्याच्या
साले काढून पातळ काचर्‍या करायच्या. ऑलिव्ह तेलावर आधी आधी बटाट्याच्या चकत्या
परतायच्या, त्या शिजल्या कि लीकच्या चकत्या परतायच्या. मग त्यावर क्रीम किंवा साईसकट
दूध घालून शिजवायचे. त्यात चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घालायची. याला पूर्णपणा देण्यासाठी
मी त्यात कॉर्नफ़्लेक्स घातले आहेत. थंडिच्या दिवसात, हा पदार्थ गरमागरम खायला मजा येते.
(या पदार्थाचा समावेश मूड फ़ूड मधे करता येईल, ज्यावेळी मन उदास असते, उगाचच काळजी
करत राहते, कुणाचीतरी आठवण काढत राहते, त्यावेळी असे पदार्थ करुन खाल्ले तर मन
ताळ्यावर येते.)
लीकचा उगम मध्य आशियातला मानला गेला असला तरी, तिचा प्रसार युरपभर झाला होता.
फ़्रेंच लोक याला "शक्ती आणि स्फ़ुर्ती" देणारी भाजी मानत असत. (अश्या औषधांवर कितपत
विश्वास ठेवायचा, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.) इजिप्त मधे इसवीसनाच्या पुर्वीपासून ही भाजी
आवडीने खात असत.
वेल्स देशात मात्र याला राष्ट्रिय मान आहे. सैनिकांच्या गणवेषात तिचा समावेश ऐतिहासिक
काळापासून करतात. शेक्स्पिय़रच्या हेन्री द फ़िफ़्थ, नाटकात याचा उल्लेख आहे तो याच
संदर्भात.
या भाजीचे शास्त्रीय नाव अलियम अम्पेलोप्रासुम असे आहे. या भाजीचे एकंदर रुप कांद्यासारखेच
असते. याची फ़ूलेही कांद्यासारखीच असतात. लागवड बियांपासुनच करतात.
भाजीत पिष्ट्मय पदार्थ, साखर याचप्रमाणे अ, ब क वर्गातली जीवनसत्वे असतात, लोह, चुना
यांचे प्रमाणही बरे असते. बाकिची खनिजेही ट्रेस रुपात असतात. कांद्यापे़क्षा लीक पचायला सोपे
असते (शिजवलेला कांदा हा कच्च्या कांद्यापेक्षा पचायला जड असतो) वरचा फ़्रेंच उपयोग,
वादग्रस्त असला तरी, हि भाजी मूत्रल आणि सारक अशी आहे.

(या मालिकेत, आपल्याकडे प्रसारात नसलेल्या किंवा दुर्लक्षित असलेल्या भाज्यांबद्दल
लिहिण्याचा मानस आहे. )

विषय: 
प्रकार: 

या मालिकेत, आपल्याकडे प्रसारात नसलेल्या किंवा दुर्लक्षित असलेल्या भाज्यांबद्दल
लिहिण्याचा मानस आहे. >> जरुर जरुर. आवडेल मला. नक्की लिहा. Happy

मस्त मस्त दिनेशदा.... फार छान माहिती आणि फोटो तर तोंपासू! Happy आता तुम्ही अश्या भाज्यांविषयी लिहाच!:-)

तो आपल्याकडे अलिकडेच मिळायला लागला आहे >>> अलिकडेच म्हणजे नक्की कधीपासून ? माझ्या जन्माआधी पासून तरी आई-बाबा पातीचा कांदा खात आलेत आणि माझा जन्म अलीकडचा नक्कीच नाही Proud

मूड फूडमध्ये समावेश करायचा की नाही हे व्यक्तीसापेक्ष आहे. साय असलेले दूध घालून केलेली भाजी नुसती बघूनच माझ्यासारखीचा मूड अजून खराब व्हायचा Uhoh

दिनेश, तुमच्या ह्या मालिकेचं नाव आणि ह्या लेखाचं नाव ह्याच्या मधे काहितरी चिन्ह द्याल का?

उदा : "अवघी विठाई माझी (२) : लीक" किंवा "अवघी विठाई माझी (२) - लीक"

"अवघी विठाई माझी (२) लीक" किंवा "अवघी विठाई माझी मश्रुम" ही शिर्षक वाचायला जरा फनी वाटतय...

सिंडरेला, पुर्वी आपल्याकडे कांदा मिळायचा, आणि त्याचीच रोपे पातीचा कांदा म्हणून मिळायचा. यात पातही जाड असते आणि कांदाही. स्प्रिंग अनियन मधे पाने कोवळी असतात व कांदा अगदी छोटा असतो. हे साधारण गेल्या २५ वर्षातच मिळायला लागले आहे. म्हणजे साधारण चायनीज फूड लोकप्रिय झाले त्यापासून, हि पाने कच्चीच गार्निश म्हणून वापरता येतात. साध्या कांद्याची पात तशी वापरता येत नाही. फ्रेंच प्रकार सहसा असेच दूधात वा क्रीम घालून शिजवलेले असतात. (आपल्याकडे पण दूधवांग, हा प्रकार असल्याचे मला इथेच कळले होते, कोल्हापूरात काहि भाज्या दूधात शिजवतात. द्दा. गवार, मका, बटाटा ) त्याचा समावेश मूड फूड मधे करता येईल, हे अर्थातच माझे मत आहे. (आणि माझ्या फ्रेंच मित्रांचे )

वैद्यबुवा, कॉर्नफ्लोअर नाही, कॉर्मफ्लेक्सच, फोटोत दिसताहेत. या भाजीला दाटपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअर वापरावे लागत नाही. बटाट्यामुळे तो येतोच.

पराग, सुधारणा केली आहे. अवघी विठाई माझी, हे माझ्या जून्या लेखाचे शीर्षक होते.

दिनेश मुड फुड म्हणजे "कम्फर्ट फुड" म्हणताय ना तुम्ही? जस आपल्या द्रूष्टीने "मेतकुट भात" , इथल्या लोकांच्या दृष्टीने "मॅकरोनी चीज , पीनट बटर जेली सँडवीच".
चांगली माहिती. लीक चे सुप पण करतात.

साय असलेले दूध घालून केलेली भाजी नुसती बघूनच माझ्यासारखीचा मूड अजून खराब व्हायचा

Proud सेम हिअर.... इथले दुधवांगे पण मी अजुन केलेले नाहीये...

दिनेश, मस्त माहिती.. दुघ घालुन भाजी हा प्रकार करायचे धाडस अजुन येत नाहीये...

या मालिकेत, आपल्याकडे प्रसारात नसलेल्या किंवा दुर्लक्षित असलेल्या भाज्यांबद्दल
लिहिण्याचा मानस आहे.

वाचायला आणि जमेल तसे प्रयोग करायला नक्किच आवडेल... Happy

साधारणपणे भरपुर स्टार्च असलेले पदार्थ, या वेळी वापरले जातात.

डिप्रेशनमध्ये असताना वजन वाढण्याचे हे सगळ्यात मोठे कारण आहे....

आधी डिप्रेशनमधून बाहेर येणे महत्वाचे. वजनाचे मग बघता येते.
या भाज्या मुंबईत मिळायला लागल्या का ? फार तर सूपचे (लीक अँड पोटॅटो) पाकिट मिळायचे, पण ताजी भाजी नाहीच.
अजून काही भाज्या येतील, इथे भेटीला !!

साधना,
दिनेशदांनी दिलेल्या शाहि बिरयानी ची भाजी दुधात शिजवायची आहे. मस्त लागते. मला पण खरतर दुधात भाजी शिजवणं जरा विचित्र वाटायच Wink